सज्जन शक्ती सर्वत्र

विवेक मराठी    05-May-2021
Total Views |

देश कोरोना आपत्तीशी झुंजत असताना प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यासह संघस्वयंसेवक काम करताना दिसत आहेत. हा समाज आपला आहे, त्यांचे सुखदुःख आपले आहे या भावनेतून काम करताना संघ समाजातील सज्जन शक्तीला आवाहन करत असतो. यातूनच अनेक छोटी-मोठी सेवा कार्ये सुरू होतात. सेवा आणि संघ या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचा सातत्याने प्रत्यय येतो.

RSS_1  H x W: 0

कोरोना आपत्तीच्या काळात सर्वच पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वाढणारी बाधितांची संख्या, उपचारासाठी आवश्यक सेवांची वानवा, औषधांचा तुटवडा, ऑक्सिजनची टंचाई अशा बातम्या सातत्याने येत आहेत. अशा बातम्यांतून नकारात्मक वातावरण निर्माण होते आहे. परिस्थिती गंभीर आहे हे मान्य केले, तरी सर्वत्र नकारात्मक परिस्थिती आहे असे म्हणता येणार नाही. कारण कुठे ना कुठे तरी काही सकारात्मक घडत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केवळ प्रशासनावर आणि आरोग्य यंत्रणेवर अवलंबून राहता आपल्या ताकदीनुसार परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणारी सज्जन शक्ती सर्वत्र आहे. मात्र नकारात्मकतेचे मळभ एवढे वाढले आहे की सज्जन शक्ती झाकोळून गेली आहे. अशा सज्जन शक्तीच्या बळावरच आपला आजवरचा प्रवास झाला आहे. जेव्हा जेव्हा आपल्या देशावर, समाजावर संकट येते, तेव्हा तेव्हा ही सज्जन शक्ती सक्रीय होते. या सज्जन शक्तीला समर्पक नाव द्यायचे, तर पाननिवळीचे देता येते. वाहत्या पाण्याच्या तळाशी असणार्या पाननिवळ्या पाणी गढूळ होताच सक्रिय होतात आणि पाण्याची गढूळता घालवतात. आपल्या समाजाचेही असेच आहे. समाजात सुप्त रूपात असणारी ही सज्जन शक्ती संकटकाळी सक्रिय होते. कोरोना काळात त्याचा अनुभव येतो आहे. या सुप्त शक्तीला आवाहन केले की ती जागृत होते, कधी वैयक्तिक तर कधी समूहरूपात ती व्यक्त होते. कोरोना आपत्तीच्या गंभीर कालखंडात या समाजशक्तीला आवाहन करण्याचे काम रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले आहे. ते म्हणतात, “आपल्या समाजाची संवेदनशीलता आणि सक्रियता अद्भुत आहे. लोक आपले प्राण संकटात घालून विपरीत स्थितीत कार्य करत आहेत. पण भारतीय समाजाची शक्ती विशाल आहे. समाजातील सर्व लोकांच्या सहकार्याची आवश्यकता असून आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोनाला मात देऊ शकतो. समाजातील सर्वांच्या एकत्रित शक्तीतून आपण या आपत्तीवर मात केली पाहिजे.” संघाचे पदाधिकारी जेव्हा समाजाला आवाहन करतात, तेव्हा संघस्वयंसेवकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली असते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कामास गती दिलेली असते.

कोरोना आपत्तीच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्यांचेही मनोधैर्य खचलेले असते. अशा सदस्यांना धीर देणे आणि आवश्यक ती मदत करणे, औषधे, बेड उपलब्ध करून देणे अशा प्रकारच्या कामात स्वयंसेवक गुंतले आहेत. रक्तदान, प्लाझ्मादान यातून कोरोनाबाधित व्यक्तींना मदत केली जात आहे. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अशा प्रकारचे काम कमी-अधिक प्रमाणात चालू आहे. त्याचप्रमाणे काही वेगळे प्रयोगही चालू आहेत, त्यांची या निमित्ताने नोंद घेतली पाहिजे.


RSS_2  H x W: 0

किन्नर समाजाला अन्नधान्य देण्याचे काम जनकल्याण समितीच्या माध्यमातून मुंबईत करण्यात आले.

कोरोनाचा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मंडळी तणावाखाली असतात. नैराश्य, भीती यामुळे त्यांना अधिकच अस्वस्थ वाटत असते. नाशिकच्या श्रीगुरुजी रुग्णालय अन्य संस्थांच्या मदतीने चालणार्या कोविड सेंटरमध्ये नैराश्यावर मात करण्यासाठी एक अभिनव प्रयोग केला गेला. ‘दीपस्तंभया संस्थेच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी गायन-वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा चांगला परिणाम दिसून आला.

जानेवारी महिन्यापासून आपल्या देशात लसीकरण चालू झाले आहे. तरीही या लसीकरण मोहिमेबाबत आणि लसीबाबत अनेकांच्या मनात शंका, भीती आहे. यामुळे अनेक जण लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत असेही चित्र समोर येते आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेन ही संस्था लसीकरण वाढावे आणि लसीबाबत ते गैरसमज दूर व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या आणि सोशल मीडियाच्या विविध आयामांचा वापर करत या संस्थेचे पदाधिकारी प्रबोधन करत आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसांपासून कडक टाळेबंदी सुरू आहे. त्यामुळे जनजीवनावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः भीक मागून जगणार्या व्यक्तींपुढे जीवन-मरणाचा प्रश्न आहे. अशांपैकी किन्नर समाजाला अन्नधान्य देण्याचे काम जनकल्याण समितीच्या माध्यमातून मुंबईत करण्यात आले. गेल्या वर्षी टाळेबंदीमध्ये अन्नधान्य वाटप खूप मोठ्या प्रमाणात करावे लागेल होते. आता तशी स्थिती नसली, तरी हातावर पोट असणारा खूप मोठा समूह आहे. त्याच्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाते आहे.

 
RSS_1  H x W: 0 

 राधे टी स्टॉलचे रूपांतर या तात्पुरती ऑक्सिजन सेवा उपलब्ध करून देणार्या केंद्रात केले आहे.


त्याचप्रमाणे काही व्यक्ती आणि संस्था स्वतःच्या ताकदीनुसार, कल्पकतेनुसार कोरोनाबाधितांसाठी मदत करत आहेत. जे सहज उपलब्ध होत नाही, ज्याच्याशिवाय जीवन-मरणाचा खेळ सुरू होतो, त्या ऑक्सिजनबाबत लातूरमध्ये एक आगळीवेगळी संकल्पना राबवली गेली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजनसाठी करावी लागणारी धावपळ लक्षात घेऊन ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे पण ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला नाही, अशा रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे काम लातूरच्या रौद्र प्रतिष्ठानने सुरू केले. टाळेबंदीमुळे बंद झालेल्या राधे टी स्टॉलचे रूपांतर या तात्पुरती ऑक्सिजन सेवा उपलब्ध करून देणार्या केंद्रात केले आहे आणि अनेक रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. अशा अभिनव संकल्पना का प्रकट होतात? असा प्रश्न पडला, तर त्याचे एकच उत्तर असते - ‘सज्जन शक्ती सर्वत्र’. हा समाज आपला आहे, त्यांच्या सुखदुःखांनी मी बांधलो आहे, ही भावंडभावना आपल्या समाजाची शक्ती आहे आणि तीच शक्ती आता प्रकट होताना दिसत आहे. हे काम जसे संस्थेच्या माध्यमातून झाले, तसेच वैयक्तिक पातळीवर सुनील कुलकर्णी यांनी कौतुकास्पद काम केले. परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याच्या यंत्रणेत बिघाड झाला, तेव्हा बायोमेडिकल अभियंता असलेल्या सुनील कुलकर्णी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून यंत्रणा पूर्ववत केली आणि चौदा रुग्णांचे प्राण वाचवले.

RSS_3  H x W: 0 

मागील काही दिवसांपासून रक्तांची आवश्यकता लक्षात घेऊन अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करत असून महाराष्ट्रातील तीन प्रांतांतील 41 शाखांच्या माध्यमातून 1460 रक्तदात्यांचे रक्त संकलित केले गेले.

ही आणि अशी असंख्य उदाहरणे आपल्या आसपास आहेत. समाजाच्या सज्जन शक्तीच्या रूपात ती काम करतात. त्या शक्तीला आपण बळ दिले पाहिजे.