चीनचे नवे कटकारस्थान

विवेक मराठी    08-May-2021
Total Views |

भारतात कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे, भारतात अराजक माजले आहे यासाठी चीन जे कॅम्पेन राबवत आहे, हेच चीनचे नवे कटकारस्थान आहे. त्याला दुर्दैवाने काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे संचालकही चीनची री ओढताना दिसत आहेत. हे चीनचे कटकारस्थान भारताने उधळून लावणे गरजेचे आहे.

 china_1  H x W:

सर्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एखाद्या राष्ट्राचा जीडीपी ग्रोथ रेट किंवा त्या राष्ट्राकडील अण्वस्त्रे ही त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय शक्तीची साधने बनली होती. त्या आधारावर त्या राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय राजकारणामधील महत्त्व मोजले जात होते. त्यानुसार त्याचा प्रभाव निश्चित केला जायचा. त्याचप्रमाणे ते राष्ट्र इतरांवर कशा पद्धतीने प्रभाव टाकू शकते आणि इतर राष्ट्रांना आपल्या मर्जीप्रमाणे कसे वागायला लावू शकते, तसेच इतर राष्ट्रांनी त्या राष्ट्रावर टाकलेला नकारात्मक प्रभाव कशा पद्धतीने थांबवू शकते, या सर्व गोष्टी त्या राष्ट्राची आर्थिक प्रगती, लष्करी सामर्थ्य यावर अवलंबून होत्या. तशा प्रकारे आज 2021मध्ये संपूर्ण जग जेव्हा कोरोना महामारीचा सामना करत आहे आणि कोरोनाच्या विध्वंसक लाटांच्या थैमानाने मोठमोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या आहेत, लक्षावधी लोक मृत्युमुखी पडत आहेत, अशा परिस्थितीमध्ये कोरोनावरची लस ही आता राष्ट्रीय शक्तीचे साधन बनली आहे. ज्या देशांकडे कोरोनावरील लस आहे, त्या देशांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.
 

कोरोनाची पहिली लाट जेव्हा जगात धुमाकूळ घालण्यास सुरुवात करत होती, तेव्हा जवळपास 50 देशांकडून लस बनवण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्या देशांना यामध्ये अंतिमतः यश प्राप्त झाले. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. इंग्लंड, रशिया, अमेरिका यांच्याबरोबरीने भारत आघाडीवर राहिला. लस तयार करून ती बाजारात आणण्यामध्ये भारत जगात तिसर्या स्थानावर होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भारताची लस ही काही ठळक बाबतींमध्ये प्रगत राष्ट्रांनी बनवलेल्या लसींपेक्षा सरस आहे. अमेरिकेसारख्या देशाने बनवलेल्या लसींची वाहतूक करण्यासाठी, त्यांची साठवण करण्यासाठीची प्रक्रिया व्यवस्था क्लिष्ट आणि खर्चीक आहे. तसेच भारतीय लसीची परिणामकारकताही चांगली असल्याने तिला मागणीही मोठी आहे. लसींच्या या स्पर्धेमध्ये कुठेतरी चीन मागे पडताना दिसला. वास्तविक, गेल्या दशकभरामध्ये औषधनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये चीनने मोठी भरारी घेतली. किंबहुना, यामध्ये एक प्रकारचा हातखंडा निर्माण केल्याने चीनची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. परिणामी बहुतांश देश औषधनिर्मितीसाठी चीनवर अवलंबून राहू लागले होते. ही चीनची मक्तेदारी कोरोनाकाळात भारताकडून कमी होताना दिसली. एकीकडे कोरोनामुळे चीनची विश्वासार्हता ढासळत होती. संपूर्ण जग चीनला पर्याय शोधत होते आणि या पर्यायामध्ये भारताला प्राधान्य दिले जात होते. यातून हेल्थ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून भारताचा उदय होत होता. भारताने गेल्या वर्षभरामध्ये त्या पद्धतीची भूमिकाही पार पाडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन अनेक राष्ट्रांना पुरवणे, मास्क, पीपीई किट्स पुरवणे, दोन कोटींहून अधिक लसींचे डोस पुरवणे यातून भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन सकारात्मकरित्या बदलला होता. कारण लसीचा किंवा औषधांचा पुरवठा करताना भारताने कसल्याही अटी-शर्ती घातल्या नाहीत. तसेच बहुसंख्य देशांनी भारताच्या लसीचे स्वागत केले.

china_3  H x W:

चीनच्या कटकारस्थानाचे बळी असलेले देश भारतीय प्रवाशांवर बंदी घालत आहेत

दुसरीकडे, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या चार देशांच्याक्वाडया संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक काही आठवड्यांपूर्वी पार पडली. या संघटनेने 2022पर्यंत कोरोनावरील लसींचे 1 अब्ज डोस तयार करण्याचा निर्णय घेतला आणि याची जबाबदारी भारताकडे देण्यात आली. हे डोस 137 देशांना वाटण्यात येणार आहेत. यातून चीनला पर्याय म्हणून भारताला पुढे आणण्याची जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांची भूमिका स्पष्टपणाने पुढे आली. साहजिकच यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ बनला.

 

या अस्वस्थतेतूनच चीनने भारताविरोधात एक नवा डाव आखला. आज भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे संक्रमितांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. भारतातील मृत्युदरही झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पण चीन मात्र या जागतिक संकटकाळातही भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. चीनकडून भारताला बदनाम करण्याचा आंतरराष्ट्रीय कट रचला जात आहे. या कटकारस्थानाअंतर्गत जागतिक स्तरावरील विविध प्रसारमाध्यमांतून कोरोनाच्या संकटाचे निमित्त साधत भारताची बदनामी केली जात आहे. गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये, दूरचित्रवाहिन्यांमध्ये आणि अन्य माध्यमसमूहांमध्ये चिनी कंपन्यांकडून अब्जावधी डॉलर्सच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुंतवणुकी केल्या आहेत. त्याआधारे आंतरराष्ट्रीय माध्यमातून भारताच्या विरोधातील लेख जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक छापून आणले जात आहेत. यातून भारताची छबी डागाळण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताची अंतर्गत लसींची मागणी कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे वाढल्याने भारताने लसींची निर्यात तूर्तास थांबवली आहे. ही संधी साधून चीनने आपली लस निर्यात वाढवली आहे. आज चीनचा लसींच्या निर्यातीमधील वाटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. भारताची निर्यात 42 टक्के होती. पण भारताने ही निर्यात थांबवल्याने चीन ही पोकळी भरून काढत आहे. हे करत असताना चीन भारताला बदनाम करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. चीनने गेल्या काही वर्षांत हॉलीवूड इंडस्ट्रीमध्येही प्रचंड मोठ्या गुंतवणुका केल्या आहेत. त्यामुळे आज चीनविरोधात चित्रपट तयार करण्यास, बोलण्यास हॉलीवूडमधील निर्माते तयार नाहीयेत. तशाच प्रकारे चीनने गुंतवणूक केलेल्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून भारतविरोधी लेख, बातम्या जाणीवपूर्वक, ठळकपणे प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे भारताने अत्यंत सजगपणाने याकडे पाहण्याची गरज आहे.

अलीकडेच चीनमधील साम्यवादी पक्षाच्या संकेतस्थळावर एक पोस्टर झळकावण्यात आले होते. यामध्ये एकीकडे चीन अंतराळात उपग्रह पाठवण्याच्या तयारीत असल्याचे छायाचित्र होते, तर दुसरीकडे चीनचा स्पर्धक असणारा भारत कोरोनाने मृत झालेल्या लोकांच्या चितांना अग्नी देत आहे, असे छायाचित्र होते. अशा प्रकारची तुलना करणारी, भारताच्या जखमांवर मीठ चोळणारी पोस्टर्स चीनमध्ये झळकू लागली आहेत. इतकेच नव्हे, तर भारताला मिळणारे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, इतर देशांकडून मिळणारी मदत यामध्ये चीन अडथळे निर्माण करत आहे.


china_2  H x W:


china_1  H x W:

भारताची लसींची निर्यात थांबताक्षणीच चीनने त्याचा फायदा घेतला.

भारतात कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे, भारतात अराजक माजले आहे यासाठी चीन जे कॅम्पेन राबवत आहे, त्याला दुर्दैवाने काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे संचालकही चीनची री ओढताना दिसत आहेत. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने अशी घोषणा केली की, भारतात आढळणारे कोरोनाचे नवे 17 प्रकार हे जगासाठी प्रचंड मोठा धोका निर्माण करणारे आहेत. ‘इंडियन व्हेरियंटअसा त्यांचा जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात येत आहे. यातून भारत जगासाठी डोकेदुखी ठरत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. यातून कोरोना महामारीवरून चीनकडे वळलेली जगाची वक्रदृष्टी भारताकडे वळवण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेकडून केला जात आहे.

 

वास्तविक, कोरोनाचा उगम आणि प्रसार चीनकडूनच झाला आहे. गेल्या वर्षभरातील चीनचे या संदर्भातील वागणे अत्यंत गूढ आणि रहस्यमय राहिले आहे. चीनने जागतिक आरोग्य संघटनेचीही अत्यंत धूर्तपणे दिशाभूल केली होती. कोरोनाच्या उगमाबाबतचे सर्व पुरावेही चीनने नष्ट केले होते. आता आपल्यावरील बालंट भारतावर कसे ढकलता येईल आणि कोरोनामुळे झालेल्या जागतिक हानीस भारतालाच कसे जबाबदार ठरवता येईल, यासाठी चीनकडून कटकारस्थान रचले गेले आहे. यापूर्वी पाकिस्तानकडून दहशतवादासंदर्भात असा प्रकार केला जायचा. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणून पाकिस्तान हा दहशतवादाची निर्यात करणारी फॅक्टरी आहे या मुद्द्याकडून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराकडून केला जायचा. असेच कारस्थान चीनकडून केले जात आहे. दुर्दैवाने याला काही प्रमाणात यशही येताना दिसत आहे. आजघडीला तीन देशांनी भारतीयांना प्रवेशबंदी केली आहे. ऑस्ट्रेलियाने तर भारतीयांनी आमच्या देशात प्रवेश केल्यास त्यांना दंड ठोठावला जाईल, तुरुंगात टाकले जाईल अशा धमक्याही देण्यास सुरुवात केली आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाचा उगम झाल्यानंतर चीनने जागतिक आरोग्य संघटनेला - डब्ल्यूएचओला एक महिन्याच्या आत याबाबतची माहिती देणे बंधनकारक होते. मात्र चीनने ती दडवून ठेवली. परिणामी, सहा महिन्यांनंतर जागतिक आरोग्य संघटनेने तिला वैश्विक महामारी म्हणून घोषित केले. तोपर्यंत हा विषाणू अनेक देशांत पसरला होता. पण तरीही डब्ल्यूएचओने चीनला यासाठी जबाबदार धरले नाही. किंबहुना चीनवर साधे ताशेरे ओढण्याचे, खडे बोल सुनावण्याचे धाडसही आरोग्य संघटनेने दाखवले नाही. उलट चीनला क्लीन चिट दिली. याचे कारण डब्ल्यूएचओचे संचालक आणि चीन यांचे संबंध जगजाहीर आहेत. त्यांच्या निवडीमध्ये चीनने मोठी भूमिका पार पाडली होती. त्यांच्या पक्षपाती भूमिकेमुळे अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देणारी मदतही बंद केली होती. चीनला निर्दोष ठरवणारी डब्ल्यूएचओ आज भारताविरोधात मात्र तत्परतेने बोलताना दिसत आहे. यामागे चीनचा प्रचंड मोठा दबाव आहे. भारताने याकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे आवश्यक असून हे कटकारस्थान उधळून लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील कोरोनाची दुसरी लाट लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजनाही करायला हव्यात.

 
 

लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.