एका विशेषांकाची जन्मकथा

विवेक मराठी    10-Jun-2021
Total Views |

 ‘विवेक धनिकांच्या किंवा राजकीय मंडळींच्या पाठिंब्यावर तरला नसून तो वाचकांच्या आपुलकीवर तरला आहे.’ या आपुलकीच्या भावनेतून आपण नेहमीच विवेकला अर्थबळ देत आलेले आहात. ‘संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवारया विशेषांकासाठी आपल्या आपुलकीची पोच मिळावी.

RSS_1  H x W: 0

विवेक आणि उपक्रमशीलता यांचे अभेद्य समीकरण झालेले आहे. विवेक नीट चालावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी वेगळे उपक्रम करावे लागतात. त्याच वेळी काही उपक्रम केवळ आपल्या विचारधारेच्या प्रचारासाठी आणि प्रबोधनासाठीदेखील करावे लागतात. अशा वेळी पैशाचा विषय दुय्यम राहतो.

उपक्रमशीलता करीत असताना कोणतेही विषय करून चालत नाही. बाजारात सिनेमाविषयक रंजक कथा, नट-नट्यांच्या खाजगी जीवनांचे किस्से, नट्यांचे अर्धनग्न फोटो याला मागणी असते. मोबाइलमधील बातम्यांचे ॅप आपण जेव्हा उघडतो, तेव्हा चार बातम्या असतील तर नट-नट्यांचे चाळीस विषय असतात. यातील एकही विषय आपण घेऊ शकत नाही. चुकून घेतला तर जोडे खावे लागतील. त्याचप्रमाणे नाटक, वेगवेगळे चित्रपट, गुन्हेगारी जगत, लहान-थोरांच्या भानगडी हेदेखील रंजक आणि खप वाढविणारे विषय असतात. विवेकला ते वर्ज्य आहेत.

म्हणून विवेकच्या अस्मितेशी निगडित असलेले विषय आपल्याला करावे लागतात. गेल्या वर्षी राममंदिर ते राष्ट्र मंदिर हा विषय केला आणि त्याला वाचकांनी जो प्रतिसाद दिला, त्यामुळे बुडायला लागलेले विवेकचे जहाज तरले आणि वादळातून वाटचाल करू लागले. विचारधारेतील असाच एक विषय या वर्षाच्या सहामाहीत करावा आणि दुसरा विषय दुसर्या सहामाहीत करावा, असे ठरले. पहिला विषय संघसंस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या विचारसूक्तांवरील भाष्यांचा करावा, असा विषय मी सर्वांपुढे मांडला. त्याला सर्वांनी अनुमती दिली.

अंकाची विषय मांडणी तसा सोपा विषय आहे. नंतर पूजनीय डॉक्टरांची विचारसूक्ते शोधण्याचे काम सुरू केले. त्यासाठी पालकरांनी लिहिलेले डॉक्टरांचे चरित्र मी काळजीपूर्वक वाचायला लागलोे. माझ्या संग्रही पूजनीय डॉक्टरांवर लिहिलेली लहान-मोठी अनेक पुस्तके आहेत, त्यांचे मी वाचन सुरू केले आणि सूक्ते काढणे प्रारंभ केले. डॉ. श्रीरंग गोडबोले हे पूजनीय डॉक्टरांचा एक वैचारिक ग्रंथ करीत आहेत, हे मला माहीत होते. मी त्यांच्याशी संपर्क साधला.



 अंक  नोंदणीसाठी  https://www.evivek.com/dr-hedgewar/
 
 

डॉ. श्रीरंग गोडबोले यांना अंकाची संकल्पना सांगितली. त्यांनी त्यानंतर रोज एक किंवा दोन विचारसूक्ते माझ्याकडे पाठवायला सुरुवात केली. यातील काही वाचनात होती आणि काही मला अगदीच नवीन होती. पूजनीय डॉक्टरांचा विचारसूक्तांच्या अंगाने विचार करू लागलो, तेव्हा मला हे जाणवले की फार मोठी दिव्य प्रतिभा असलेल्या एका तपस्वी राष्ट्रसाधकाचे हे बोल आहेत. त्यावर विचार करता करता आपल्या बुद्धीच्या मर्यादाही आपल्याला जाणवू लागतात, असा गहन अर्थ त्यातून प्रकट होत जातो, मन थक्क होते आणि मस्तक आपोआप झुकते. एका दिव्य कामामध्ये आपण सहभागी आहोत, यातच आपल्या जीवनाचे सार्थक झाले आहे, ही भावनादेखील तीव्र होऊन जाते.

डॉक्टरांची विचारसूक्ते खूप आहेत. सर्वच विचारसूक्तांवर भाष्य करणारे लेख जर मागावायचे ठरविले, तर किमान पाचशे पानांचा ग्रंथ करावा लागेल. पण ते शक्य नव्हते. शिवाय आणखी एक विषय होता, तो म्हणजे पूजनीय डॉक्टरांच्या नावाचा उपयोग करून धनसंग्रह करायचा नाही. त्यामुळे सर्वांनी दोन गोष्टी ठरविल्या. पहिली गोष्ट आपण ग्रंथ करता स्वतंत्र विशेषांक करावा आणि दुसरी गोष्ट - अंकाची किंमत फक्त 50 रुपये ठेवावी. अंकाची पृष्ठसंख्या 150 इतकी असावी.

हे एक धाडसच होते, पण सर्वांना आत्मविश्वास होता की, या विशेषांकाची विक्री आपण एक लाखाच्या आसपास घेऊन जाऊ शकतो. तशी सर्वांनी रचना लावली आणि वितरण विभाग विक्री भाग कामाला लागले. भाष्यासाठी जी सूत्रे निश्चित केली, त्यांचे लेखक निवडण्याचे अवघड काम होते. संपादकीय विभागातील सर्वच जण वयाने तसे लहान आहेत आणि त्यातील अनेकांना प्रत्यक्ष संघकामाचा अनुभव फारसा नाही. त्यामुळे एखाद्या सूक्तावर कोण उत्तम भाष्य करील, असा संघकार्यकर्ता डोळ्यापुढे आणणे हे सर्वांना शक्य नव्हते.

निवृत्ती होऊनही मला प्रवृत्तीपर व्हावे लागले आणि तसा गेल्या वर्षीच झालो. एकूण 33 विचारसूक्तांसाठी लेखक निश्चित केले. त्या प्रत्येकाशी मी फोनवर बोललो, त्यांना विषय समजावून सांगितला. आणि विशेषत: हे सांगितले की, पूजनीय डॉक्टरांच्या आठवणी, विशेष प्रसंग सांगणे हा या अंकाचा उद्देश नाही. जसे ज्ञानदेवांनी गीतेच्या एकेका श्लोकावर भाष्य केले आहे, तसे भाष्य आपल्याला करायचे आहे. विषय लिखित स्वरूपातही स्पष्ट असावा म्हणून सर्वांना पत्रे लिहिली. म्हणजे मी सांगितले आणि पूनमने लिहून काढले. नंतर ही सर्व पत्रे लेखकांना ईमेल केली आणि स्पीड पोस्टनेदेखील पाठविली. पत्रे मिळाली की नाही, याचा पुरवठाही पूनमने केला. लेख देण्यासंबंधी एक अपवाद सोडून सर्वांचे होकार आले आणि सर्वांचे लेखही आले.

आलेल्या लेखांचे बारकाईने वाचन करणे हा विषय करावा लागला. हे कामदेखील संपादकीय विभागातील कुणाकडे देण्यासारखे नव्हते. विचारसूक्त काय आहेत, त्याचा आशय काय आहे, आणि त्यावर भाष्य काय केले आहे, हे संघातील एखादा अनुभवी आणि वृत्तपत्रातील कार्यकर्ताच जाणू शकतो. सर्व लेख वाचून पुन्हा सर्व लेखकांशी दूरभाषद्वारे मी संवाद केला आणि आलेल्या लेखाविषयीचा अभिप्राय दिला. सर्वच लेख विषयाला धरूनच आहेत. जेथे विषयांतर झाले आहे असे वाटले, त्या ठिकाणी तो भाग संपादीत केला आहे. अनेक लेखांमध्ये एका अक्षराचीही बदल करण्याची आवश्यकता वाटली नाही.

एखाद्या विचारसूक्तावर भाष्य लिहिणे हे तसे अवघड काम आहे. नुसतेच अवघड नाही, तर अतिशय कठीण काम आहे. त्यातले काठीण्य लक्षात येण्यासाठी पातंजल योगसूत्रावरील भाष्ये वाचायला पाहिजेत. योगसूत्र अगदी थोडक्या शब्दाचे असते, परंतु भाष्यकार सात-आठ शब्दांवर कधी एक पान, तर कधी पाच पाने लिहितो. मग त्यातील खोलवरचा अर्थ आपल्या लक्षात येतो.

पूजनीय डॉक्टरांच्या संघसूत्रांवर कुणीही भाष्य करू शकत नाही, ती सूक्ते जगावी लागतात. जीवनात उतरवावी लागतात. म्हणून लेखकही असे शोधावे लागले, जे डॉक्टरांचे विचार जगत आहेत. त्यांचे संघमंत्र आचरणात आणीत आहेत. एवढी सगळी काळजी घेतली गेली, तरीसुद्धा सगळ्या सूक्तांवरील सगळीच भाष्ये वाचकांच्या बुद्धीचा आणि हृदयाचा ठाव घेतील असे होणार नाही, याची मला जाणीव आहे. काही सूक्तांवरील भाष्य वाचकांना भाष्य वाटता एक सुंदर लेख वाटण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा ज्यांनी ज्यांनी लिहिले, त्यांनी त्यांनी त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत, सखोल मनन, चिंतन केले आहे.

 

संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवारया विशेषांकाचा विषय सर्वदूर जावा, यासाठीसंघमंत्र व्याख्यानमालाही दिनांक 10 मे ते 14 मे अशी पाच दिवसीय व्याख्यानमाला करण्यात आली. व्याख्यानमालेचे सर्व विषय आणि वक्ते रवींद्र गोळे यांनी निश्चित केले. या व्याख्यानमालेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दुसर्या टप्प्याची व्याख्यानमाला 5 जून ते 8 जून अशी चार दिवसीय झाली. या व्याख्यानमालेचा विषय होता, ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’. तसे हे दोन्ही विषय नावीन्यपूर्ण आहेत आणि दोन्ही व्याख्यानमालेत व्याख्यान देणार्या वक्त्यांनी विषय नीट समजून घेऊन अतिशय अप्रतिम अशा प्रकारची व्याख्याने दिली आहेत. याला जोडूनच निमेश वहाळकर याने पूर्वप्रसिद्धीसाठी काही मान्यवरांचे व्हिडिओ तयार केले. अंकाचा विषय सर्वदूर जाण्यास याची खूप मदत झाली.

कोरोनाच्या दुसर्या लाटेत हा सर्व विषय सुरू झाला. पूजनीय डॉक्टरांनी निर्माण केलेली ऊर्जा इतकी जबरदस्त आहे की, या लाटेवर मात करून विवेकची सर्व टीम कामाला लागली. सर्व जिल्हा प्रतिनिधी कामाला लागले आणि सर्व जिल्ह्यांच्या संघकार्यकर्त्यांनी विवेकला भरभरून सहकार्य केले. विवेकच्या टीमने अंकाच्या यशासाठी रोज रात्री साडेदहापर्यंत वेबिनारच्या बैठकी केल्या आहेत. हा लेख लिहीपर्यंत अंकाची पूर्वनोंदणी पन्नास हजारांच्या आसपास पोहोचली होती. तिला लाखापर्यंत घेऊन जाणे हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे.

दीडशे पानांच्या अंकांचे आशयाच्या दृष्टीने मूल्यमापन करायचे, तर कैक हजार रुपयांचा अंक होईल. एकदा अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की, “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.” विवेकच्या बाबातीतही असे म्हणावे लागते की, ‘विवेक धनिकांच्या किंवा राजकीय मंडळींच्या पाठिंब्यावर तरला नसून तो वाचकांच्या आपुलकीवर तरला आहे.’ या आपुलकीच्या भावनेतून आपण नेहमीच विवेकला अर्थबळ देत आलेले आहात. ‘संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवारया विशेषांकासाठी आपल्या आपुलकीची पोच मिळावी.