‘कोव्हीसेल्फ’ने घरच्या घरी कोरोना चाचणी

विवेक मराठी    11-Jun-2021
Total Views |

@शैलेंद्र कवाडे 

 एकीकडे
सामाजिक अंतर पाळत कोरोना संसर्ग पसरू देण्याचे आव्हान, तर दुसरीकडे कोरोना चाचण्यांसाठी होणारी गर्दी असे विरोधाभासी चित्र सर्वत्र आहे. लॅबमधील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्यावरचा ताणही वाढतोय. यावर पर्याय म्हणून पुण्याच्या माय लॅबनेकोव्हीसेल्फहे होम बेस्ड टेस्ट किट तयार केलं आहे. त्याविषयीची माहिती देणारा लेख

corona_1  H x W

साधारण सव्वा वर्षापूर्वी जगभर कोरोना विषाणूचा प्रसार झाला, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. चीनपासून सुरुवात होऊन युरोप, अमेरिका आणि नंतर भारत या सगळ्या देशांमध्ये कोरोना पसरला. जेव्हा केव्हा असा एखादा विषाणू सर्वत्र पसरतो, तेव्हा त्याला एका साथीचं स्वरूप येतं. नजीकच्या इतिहासात अशी गोष्ट घडलेली नाही की एखादा विषाणू इतक्या लवकर इतक्या मोठ्या भूभागावर पसरला. कोरोनाच्या बाबतीत तसं झालं, कारण तो रेस्पिरेटरी म्हणजेच श्वसनातून पसरू शकणारा विषाणू आहे. इतर विषाणू - उदा. एचआयव्ही, एचसीव्ही, एचबीव्ही हे सगळे विषाणू शरीरद्रव्यांद्वारे पसरत होते. कोरोना श्वसनातून पसरत असल्याने तो खूप लवकर पसरला.

 

जेव्हा विषाणू अशा प्रकारे पसरत असतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्याचं टेस्टिंग होणं. या विषाणूच्या टेस्टिंगच्या पद्धती जगाने पटापट शोधून काढल्या. वैज्ञानिक जगात ज्या टेस्टला गोल्ड स्टँडर्ड समजलं जातं, ती रिअल टाइम पीसीआर टेस्ट सगळ्यात आधी आली आणि जगभर तिचा वापर सुरू झाला. डिस्कव्हरी सोल्युशनने पहिल्यांदा हे किट मार्केटमध्ये आणलं आणि भारतातील खूप सार्या प्रयोगशाळांमध्ये त्या किटचा वापर सुरू झाला.

 

खरं सांगायचं, तर जेव्हा हा विषाणू भारतात आला होता, तेव्हा आपल्याकडे फक्त शंभरेक प्रयोगशाळा होत्या, ज्या याचं निदान करू शकत होत्या. यात खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या प्रयोगशाळांचा समावेश आहे. पण भारताने सरकारच्या मदतीने खूप पटापट हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आणि त्यासाठी लागणार्या सर्व यंत्रसामग्रीची मांडणी, प्रयोगशाळा स्थापन करणं या गोष्टी भारताने पटापट केल्या. देशभरात किमान 700-800 किंवा जास्तच प्रयोगशाळा असतील, जिथे कोरोनाची चाचणी होते.

हे सर्व चांगलं असलं, तरी ते पहिल्या लाटेत घडत होतं. आरटीपीसीआर चांगली असली, तरी या चाचणीतल एक मोठी उणीव होती. या चाचणीसाठी नाकाच्या वरच्या भागातून (ज्याला nasopharyngeal cavityम्हणतात) स्वॅबने सँपल घेतलं जातं, त्याला VTMध्ये (Viral Transfer mediaमध्ये) टाकून तो स्वॅब प्रयोगशाळेत पाठवला जातो. प्रयोगशाळेत त्यावर बर्याच प्रक्रिया होतात. त्यातला विषाणू बाहेर काढला जातो. त्या विषाणूचा आरएनए बाहेर काढला जातो आणि मग त्याची रिअल टाइम पीसीआर टेस्ट होते. विषाणू असेल तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, नसेल तर निगेटिव्ह येतो. ही सर्व वेळखाऊ प्रक्रिया आहे. समजा, एखाद्याला असं वाटायला लागलं की मला कोरोनाची लक्षणं आहेत, तर त्यानंतर त्या लॅबच्या टेक्निशियनला बोलवून तो घरी येणं किंवा त्या व्यक्तीने लॅबमध्ये जाणं, स्वॅब घेणं, तो प्रयोगशाळेत पाठवणं यात वेळ जातो. रिअल टाइम पीसीआर टेस्ट जरी 2-3 तासांत होत असली, तरी मधला वाहतुकीचा वेळ कमी करता येत नाही. त्यामुळे जेव्हा साथ मोठ्या प्रमाणात येते, त्या वेळी प्रचंड त्रास होतो. आरोग्य यंत्रणेवर मोठा दबाव येतो. त्यामुळे रिअल टाइम पीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड असली, तो शेवटचा शब्द असला तरी त्या चाचणीच्या काही मर्यादा आहेत, त्या जगभर लक्षात आल्या.


corona_1  H x W

मग जगाने पर्यायी तंत्रज्ञानांकडे जाण्याचा प्रयत्न केला, ज्या आरटीपीसीआर इतक्या संवेदनक्षम नसतील परंतु वेगवान असतील. लोकांना त्या कमी श्रमात करता येतील किंवा सरकारलाही त्या कमी श्रमात आणि वेगाने करून घेता येतील आणि प्रयोगशाळेच्या बाहेरही करता येतील. याला म्हणतातपॉइंट ऑफ केअर टेस्ट’. म्हणजे एखादं आरोग्य केंद्र, किंवा दवाखाना किंवा छोटीशी प्रयोगशाळा (कलेक्शन सेंटर) असेल तर तिथेही ही टेस्ट करता आली पाहिजे. त्याला स्क्रीनिंग टेस्ट किंवा प्राथमिक तपासणी म्हणता येईल. यातली सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे, तिला लॅटरल टेस्ट किंवा अँटिजेन टेस्ट किंवा अँटिबॉडी टेस्ट असंही म्हणतात. ही टेस्ट अतिशय साधी, सोपी त्याचबरोबर यूजर फ्रेंडली आहे. यामध्ये nasopharyngeal cavityमधून सँपल घेतलं जातं. लॅटरल फ्लो टेस्टमध्ये नायट्रोसेल्युलोज पेपरवर अँटिजेन तपासायचं असेल, तर अँटिबॉडीचा लेप लावला जातो, अँटिबॉडी तपासायची असेल तर अँटिजेनचा लेप लावला जातो. त्यावर सँपल टाकलं असता ते त्या कागदावर पसरतं. तुम्ही अँटिजेन तपासत असाल तर सँपल पसरत असताना कागदावरील अँटिबॉडीज त्याला बांधून ठेवते. अँटिजेन आणि अँटिबॉडी यांचा ठळक पट्टा तेथे तयार होतो. त्या पट्ट्यांच्या रंगावरून तो रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे आपण ठरवू शकतो.

यातील अडचण अशी आहे की ही पॉइंट ऑफ केअर टेस्ट असली तरी होम बेस्ड टेस्ट नाही. पॉइंट ऑफ केअर टेस्ट ही आरोग्य कर्मचार्यालाच करावी लागते. मागील एक ते सव्वा वर्ष हे सर्व आरोग्य कर्मचारी प्रचंड काम करत आहेत. आपण फक्त डॉक्टरांचा विचार करतो. डॉक्टर अर्थातच या साखळीतील खूप महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, कोरोनामध्ये एकूण लोकसंख्येच्या 2 किंवा 3 टक्के लोकांना संसर्ग होत असेल, तर यातील फक्त 10-15 टक्के लोक दवाखान्यात भरती होतात. त्यानंतर नर्सेस, डॉक्टर्स या लोकांचा रोल सुरू होतो. पण यातील 70-80 टक्के लोक फक्त टेस्टिंग करतात आणि टेस्टिंग केल्यानंतर लक्षणं कमी असल्याने ते घरीच राहतात. त्यांचं टेस्टिंग कोण करतात? तर हे रुग्ण लॅबमध्ये गेले, तर फ्लेबोटोमिस्ट त्यांची टेस्ट करतात किंवा हे लोक फ्लेबोटोमिस्टला घरी बोलवतात ते त्यांचं सँपल घेतात. जर हे लोक संसर्गित असतील, तर लॅबमध्ये जाईपर्यंत कमीत कमी शे-दीडशे लोकांशी त्यांचा संपर्क येतो. तसंच टेस्टचे रिपोर्ट येईपर्यंत ते स्वत:ला निगेटिव्ह समजून घरात आणि घराबाहेर मोकळेपणाने वावरतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे विषाणू संसर्गाची साखळी खंडित होत नाही. विषाणूवर विजय मिळवायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती साखळी तोडणं, म्हणजेच स्वत:ला असलेला विषाणूचा संसर्ग दुसर्यापर्यंत पोहोचू देणं. यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वत:चे विलगीकरण करणं. स्वत:चं विलगीकरण करायचं असेल, तर या पद्धतीच्या टेस्टिंगचा काही उपयोग नाही.

जगाने याच्यावर उपाय शोधण्यासाठी तिसर्या प्रकारची टेस्ट शोधून काढली, ज्याला म्हणतातहोम बेस्ड टेस्ट’. म्हणजे हीच लॅटरल टेस्ट, पण ती घरात करायची. घरात करायची म्हटल्यानंतर त्यावर खूप मर्यादा असतात आणि त्याची संवेदनक्षमता खूप जपावी लागते. यामध्ये नियमित कोरोना चाचणीप्रमाणे नॅसोफॅरेंजियल स्वॅब चालणार नाही, कारण त्यात नाकाच्या वरच्या भागातून हाडाच्या वर नाक आणि घशामधल्या पोकळीतून सँपल घेतलं जातं. तसं करताना बर्यापैकी वेदना होते. परंतु स्वत:ला अशी टेस्ट करायची असेल तर अशा प्रकारे सँपल घेणं अशक्य आहे. कारण अशा प्रकारे स्वॅब घेताना जर तुम्ही काही चूक केली तर तो मेंदूच्या दिशेने जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला होम टेस्टसाठी स्वॅब वापरायचा असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे nasal cavityमधून (नाकाच्या हाडाच्या खालचा भाग, जिथे आपलं बोट पोहोचू शकतं) सँपल घेणं. या लॅटरल फ्लो टेस्टसाठी ते सँपल पुरेसं असलं पाहिजे

भारतात माय लॅबने याबाबत पुढाकार घेऊनकोव्हीसेल्फनावाची लॅटरल फ्लो टेस्ट तयार केली आहे. ही होम बेस्ड टेस्ट आहे. याचं दुसरंं वैशिष्ट्य म्हणजे ही सेल्फ कंटेण्ड टेस्ट आहे. म्हणजे एकाच पाउचमध्ये तुम्हाला टेस्ट करण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी मिळतात. स्वॅब, माहितीपत्रक, ज्या रिएजंटमध्ये तुम्हाला तो स्वॅब बुडवायचाय आणि विषाणूचं विघटन करायचे असतं, त्यानंतर त्याच बाटलीमधील 2 थेंब ड्रॉपरने त्या डिव्हाइसवर टाकायचे असतात. अशा बर्याच गोष्टी आम्ही या कोव्हीसेल्फ किटमध्ये केलेल्या आहेत. त्याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी खूपच चांगली आहे.

तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक किटवर युनिक क्यू आर कोड आहे. टेस्ट करण्याच्या आधी तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर बरोबर 15 मिनिटांनंतर तुमचा मोबाइल अलार्म देईल. त्यामुळे तुम्हाला समजेल की टेस्ट संपली आहे. त्या टेस्टचा फोटो घेऊन तुम्हाला माय लॅबच्या ॅपमध्ये तो अपलोड करायचा असतो. त्या ॅपमधून तो डेटा सरळ आयसीएमआरला जातो आणि तिथून रिपोर्ट जनरेट होतो. हा रिपोर्ट लॅबच्या रिपोर्टप्रमाणेच अधिकृत असतो. रिपोर्टचा पिनकोड घेतला जातो. त्यामुळे सरकारलाही कोरोना रुग्णांबद्दल योग्य आकडेवारी उपलब्ध होते. हा रिपोर्ट एंट्री पॉइंटसाठी अधिकृत असेल. ही सगळी मार्गदर्शक तत्त्वं हळूहळू येत आहेत. त्यामुळे ही होम बेस्ड टेस्ट खूप फायद्याची ठरेल. जे लोक लॅबमध्ये गेल्यामुळे या आजाराचा संसर्ग वाढला असता, त्यांना लॅबमध्ये जाण्याची आता गरज पडणार नाही.

शब्दांकन : सपना कदम-आचरेकर

shailendrakawade@gmail.com