शूद्र नव्हे, ‘शुद्ध’ कवी संत सारलादास

विवेक मराठी    24-Jun-2021
Total Views |

ओरिसा प्रांतातील संत सारलादास आपल्या साहित्यात स्वत:ला शूद्र मुनी म्हणवून घेतात. त्यांचे संपूर्ण जीवन अत्यंत दारिद्य्रात गेले. चंडीपुराण ही त्यांची शेवटची साहित्यकृती होय. त्यात ते असे लिहितात - ‘मी तर जन्मापासून बुद्धिहीन आहे. माझ्या कुटुंबातील सर्व जण निरक्षर आहेत. मला रोज नांगर हाती धरून शेती करावी लागते.’


sant_1  H x W:

बरे झाले देवा कुणबी केलो। नाही तरी दंभे असतो मेलो॥आणियाती शूद्र वैश्य केला वेवसाव।अशा शब्दांत आपल्या अभंगातून आपल्या जातीचा उल्लेख करणार्या जगद्गुरू संत तुकोबारायांनाच या महाराष्ट्रात जातिभेदाचे चटके भोगावे लागलेले नाहीत, तर देशभरातील विविध प्रांतांतील संतांनाही आयुष्यभर याच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. ‘शूद्रकवीम्हणून आपली ओळख सांगणार्या ओरिसा प्रांतातील संतकवी सारलादास यांनाही जातिभेदाचे चटके सहन करावे लागले आहेत. पण संतांनी त्याचे कधी भांडवल केले नाही. आताच्या काळात त्यांची नावे घेऊन या गोष्टींचे भांडवल केले जाते, ही गोष्ट वेगळी! आपण कुणबी कुळात जन्माला आलो, हे बरेच झाले असेच संत तुकोबांनी म्हटले आहे, कारण अन्य उच्च कुळात जन्माला आलो असतो, तर मरेपर्यंत आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा दंभ आपण पाळला असता आणि आता जसा परमार्थ आपल्या हातून घडत आहे तसा घडला नसता!

शेत करा रे फुकाचे। नाम पंढरीरायाचे।असा शेतकीचा सल्ला देणार्या संत तुकोबारायांशी आत्मिक नाते सांगणारे हे ओरिसाचे संत सारलादास. ‘नागरीसंस्कृती आणिनांगरीसंस्कृती असा वर्गकलह मांडणार्या तथाकथित विद्वानांना मात्र या परमार्थाशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळे सारलादासांचे महाभारतव्यासकृत महाभारताला पर्यायी चित्रण उभे करते, असे विद्वानांकडून सांगितले जाते. सारलादास यांनी रेखाटलेली स्त्री-पात्रे ही व्यासांच्या स्त्री-पात्रांपेक्षा अधिक सरस शक्तिशाली असल्याचेही देवी पार्वतीचे उदाहरण देऊन सांगितले जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या पात्रचित्रणांवर ब्राह्मणी ठसा नसल्याचाही आवर्जून उल्लेख केला जातो. सारलादास यांनी अभिजन वर्गातील पात्रांपेक्षाहिडिंबाआणिघटोत्कचयांसारखी नागरी संस्कृतीत रुजलेली अशी उपेक्षित वनवासी पात्रे आहेत, त्यांना व्यासांपेक्षा अधिक प्राधान्य दिले आहे, असे सांगितले जाते. याचा कवीच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीशीही संदर्भ जोडला जातो. सारलादास आपल्या साहित्यात स्वतःला शूद्र मुनी म्हणवून घेतात. त्यांचे संपूर्ण जीवन अत्यंत दारिद्य्रात गेले. चंडीपुराण ही त्यांची शेवटची साहित्यकृती होय. त्यात ते असे लिहितात - ‘मी तर जन्मापासून बुद्धिहीन आहे. माझ्या कुटुंबातील सर्व जण निरक्षर आहेत. मला रोज नांगर हाती धरून शेती करावी लागते.’

हे तर संत चोखामेळा यांच्यासारखेच उद्गार म्हणावे लागतील -

आम्हा कळे ज्ञान कळे पुराण।

श्रुतींचे वचन कळे आम्हा॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा।

गाईन केशवा नाम तुझे॥

पण संत चोखोबांना जितका परमार्थ कळला, तितका भल्याभल्यांना उमगला नाही. त्यामुळेच वैकुंठवासी झाल्यावरही चोखोबांच्या हाडांतून संत नामदेवरायांनाविठ्ठल, विठ्ठलध्वनी ऐकू येत होता.

सारलादास यांनी एकाच वेळी नांगर हाती धरला आणि लेखणीसुद्धा! कष्टकरी शेतकर्याचे जीवन जगताना त्यांनी 91,300 छंद रचले आहेत. ओरिसात त्या काळात ताडपत्रावर सुईने कोरून लेखन करावे लागत होते. यामुळे सुमारे दोन लाख काव्यपंक्तीचे हे लेखन त्यांनी किती कष्टाने केले असेल, याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. आता प्रश्न उपस्थित होतो की, ज्या मनुष्याने आयुष्यात पाठशाळेचे तोंडही पाहिले नाही, त्याने तीन-तीन महाकाव्यांची रचना तरी केली कशी? संस्कृत भाषेतील रामायण, महाभारत आणि पुराणे यांचे ज्ञान सारलादास यांनी कसे मिळविले? त्या काळात अशा तथाकथित शूद्राला संस्कृत साहित्याचे विद्यादान कुणी केले असावे? त्यामुळे दैवी कृपाप्रसादावाचून असे कवित्व प्रकट होण्याचा मुळीच संभव नाही, अशी एक सर्वसामान्य समजूत आपल्या समाजात आढळते. ती असू नये असा दावा करता येणार नाही. पण याचे समर्थन करण्यासाठी दैवी कृपाप्रसादाच्या आख्यायिका अशा संतांच्या चरित्रात जोडल्या जातात आणि बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा नेमका याच गोष्टींना आक्षेप असतो. सारलादास यांच्या संदर्भातही अशा आख्यायिकेचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

सारलादास यांचे मूळ नाव सिद्धेश्वर असे होते. ते खूपच गावंढळ आणि अज्ञानी होते. त्यांच्या वडिलांनी एके दिवशी त्यांची खूपच निर्भर्त्सना केली. त्यामुळे ते नाराज होऊन गावाबाहेरील सारलादेवीच्या मंदिरात जाऊन बसले. त्यांचा निग्रह आणि तपस्या पाहून सारलादेवीने त्यांना बुद्धिमत्ता आणि काव्यप्रतिभेचे वरदान दिले. तेव्हापासून सिद्धेश्वर यांनीसारलादासहे नाव धारण करून आपली साहित्यरचना केली आणि ते विख्यात झाले.

ते आपल्या महाभारतात असे म्हणतात -

हे पंडित जने मोरन घेनिब दोष।

मूर्ख अज्ञान अटइ बुद्धि मोर किस॥

प्रसन्न होइण मोत्ते जा दियं ति कहि।

मोर दोष घनिब मु ताहा लेखइ॥

सारला पादे सारला दास शरण।

अष्टादश पर्व पुथि कलि मु पुराण॥

जगन्माता जहुँ प्रसन्न मोते हेले।

शूद्रमुनि सारला दास नाम मोते देले॥

या संदर्भात आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सारलादास हे उडिया भाषेतील प्रथम म्हणजे आदिकवी आहेत. त्यांनी संस्कृतऐवजी लोकभाषेत धार्मिक साहित्याची रचना केली.

आपण जाणतो की प्राकृत भाषेत शूद्राने कवित्व केले म्हणूनआपुलिया बळे नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची॥अथवाफोडिले भांडार धन्याचा हा माल। मी तो हमाल भारवाही॥असे बोलूनही कर्मठ ब्रह्मवृंदांनी संत तुकोबारायांना त्यांची अभंगगाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविण्यास भाग पाडले होते. त्यातूनही गाथा तरल्या, हा भाग अलाहिदा! पण सारलादास यांचा काळ संत तुकारामांच्याही पूर्वीचा आणि अदमासे पंधरावे शतक असल्यामुळे संस्कृतनिष्ठ पंडितांच्या कोपाला बळी पडण्याच्या भयापोटी आणि भक्तिगत विनयानेही सारलादासांनी आपल्या साहित्यरचनेचे श्रेय सारलादेवी यांच्या चरणी अर्पण केले आहे. यातूनच अशा दैवी कृपाप्रसादाच्या आख्यायिका जन्मास आल्या आहेत. कारण काही का असेना, पण यामुळे कवीच्या साहित्यप्रतिभेला मुळीच नाकारता येत नाही.

सारलादास यांच्या साहित्यात जी युद्धवर्णने आली आहेत, त्यावरून असे अनुमान लावता येते की, कवीने अशी युद्धे जवळून पाहिलेली असावीत. ओरिसा प्रांतात अशी प्रथा होती की सर्वच वर्णाच्या तरुणांना ठरावीक काळासाठी सैन्यात लढायला जाणे भाग पडत असे. यामुळे असा दावा केला जातो की, जेव्हा सारलादास सैन्यात सेवा करीत होते, तेव्हा अन्य उच्चवर्णीय मित्रांच्या सान्निध्यात त्यांना संस्कृत भाषेचे आणि साहित्याचे ज्ञान प्राप्त झाले असावे.

ओरिसा प्रांतात मूळचे आंध्रातून आलेल्या गंगवंशाचे शासन सुरू होते. जेव्हा या वंशाचा शेवटचा कुलदीपक भानुदेव चतुर्थ यांचे राज्य सुरू होते, तेव्हा ओरिसावर बाह्य आक्रमणाचे काळेकुट्ट मेघ दाटून आले होते आणि युद्धाचे वादळ घोंघावू लागले होते. तेव्हा एक सर्वसाधारण शिपाई असलेल्या कपिलेंद्र यांनी सशस्त्र बंड पुकारून राजाला पदच्युत केले. सेनेचे नेतृत्व करून त्यांनी हुमायून शाह बहमनी, शाल्व नरसिंह आणि मल्लिकार्जुन अशा सेनानायकांना धूळ चारली उत्कल विजयाची कीर्तिपताका उत्तरेतील गंगेपासून थेट दक्षिणेत कावेरी तटापर्यंत फडकू लागली. याच सुमारास सेनेतून निवृत्त झालेल्या सिद्धेश्वर नामक एका सर्वसाधारण शिपायाने उडिया भाषेत प्रथमच साहित्यरचना करून या भाषेची कीर्तिपताकाही दिगंत फडकविली.

अशा रितीने स्वदेश आणि स्वधर्म यांच्या रक्षणार्थ सारलादास यांनी अनुक्रमे नांगर, शस्त्रे आणि लेखणी धारण केलेली आढळते. दुसरीकडे सायलेन राउतराय नामक एक संशोधक असा दावा करतात की, महाभारतातीलधर्मयुद्धही ब्राह्मणी संकल्पना आहे आणि सारलादास हे युद्धाच्या विरोधात होते. कौरवांनी पहिला हल्ला केल्यानंतर सारलादास यांच्या महाभारतात युद्धाला प्रारंभ होतो, हे कारण पुढे करून भगवान कृष्णाने अर्जुनाला उपदेश करून युद्ध लढण्यास प्रवृत्त केले, हेसुद्धा सारलादास यांना पसंत नव्हते असे सांगितले जाते. सारलादास यांचे पांडव हे आरंभापासून शांतताप्रिय होते, याचेही गोडवे असे संशोधक गातात. त्यामुळे अर्जुनाचा विषाद अथवा संभ्रम दूर करण्यात गीतेचे अथवा दैवी उपदेशाचे काहीच योगदान नव्हते, असाही खोडसाळ प्रचार हे स्वयंघोषित विद्वान आणि संशोधक करताना आढळतात.

जखमी दुर्योधन जेव्हा रक्ताने भरलेल्या नदीतून पलीकडे जाण्यासाठी पाण्यावर तरंगताना नाइलाजाने मृतदेहाची मदत घेतो नंतर तो मृतदेह हा त्याचा प्राणप्रिय पुत्र लक्ष्मणकुमार याचाच होता हे त्याला कळते आणि मग त्याला खूप पश्चात्ताप होतो, अशी या महाभारतात कथा आहे. याच कथेबरोबर जानुघंटा या सिंधुमंदार देशाच्या राजाचीही कथा सांगितली जाते. सारलादास यांच्या मते हा एक आदर्श राजा आहे. कारण तो अत्यंत पराक्रमी असून कधीही कुणावर आक्रमण करीत नाही आणि प्रजेकडून गोळा करण्यात आलेल्या प्रत्येक पैचा विनियोग प्रजेच्या कल्याणार्थ करीत असल्यामुळे जवळजवळ नग्नावस्थेत भिक्षा मागून तो आपला चरितार्थ चालवितो. प्रजेच्या एकाही पैशाचा तो अपहार करीत नाही.

या ठिकाणी आपण असे लक्षात घेतले पाहिजे की सारलादास यांच्यासारख्या कवीची प्रतिभा अत्यंत उत्तुंग असते. एखाद्या मूळ कथेवर भाष्य करताना कवीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य ते मुद्दाम घेतात. त्यामुळेच त्यांचे साहित्य अन्य काव्याची नक्कल ठरता त्यात अस्सलपणा येतो. संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा भावार्थदीपिका लिहिली, अथवा संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण लिहिले, तेव्हा प्रत्येक पद रचताना ते मूळ गीता ग्रंथ अथवा वाल्मिकी रामायण यांची प्रत समोर ठेवून लेखन करीत नव्हते. संतकवी सारलादास यांनीही व्यासांच्या मूळ मंदिराचा पाया घेऊन त्यावर आपल्या काव्यप्रतिभेने स्वतंत्र साहित्याची भव्य इमारत रचली आहे. ही अस्सल काव्यप्रतिभा आहे. त्यामुळे व्यास आणि सारलादास यांच्या रचनातील साम्य आणि भेदस्थळे यांचा अभ्यास केवळ बौद्धिक कसरत ठरते. मात्र काही विद्वान वेगवेगळे भेद दर्शवून समाजाला तोडण्यासाठी जेव्हा ही कसरत करू पाहतात, तेव्हा समाजसंघटक संतांच्या मूळ हेतूलाच बाधा आणली जाते. अशांची कृती ही निषेधार्ह आणि संतसाहित्याचा अवमान करणारीच ठरविली पाहिजे.

सारलादास यांच्याबाबत उल्लेख करण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारलादास यांच्या साहित्यात पर्यावरणवादी दृष्टीकोनसुद्धा दिसून येतो. मध्यंतरीच्या काळात पुत्रप्राप्तीबाबत भाष्य केलेल्या एका कीर्तनकार महाराजांबद्दल मोठी वावटळ उठली होती; पण सारलादास यांनी संतानप्राप्तीचे सात उपाय सांगितल्यानंतर आठवा रामबाण उपाय असा सांगितला आहे की, वरील उपायांनी अपत्य झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करावे. या उपायाने आधुनिक युगात अपत्यप्राप्ती होईल अथवा नाही हे सांगता येत नाही; पण आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य नक्कीच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शंभर टक्के सुखमय होईल, हे नक्कीच सांगता येते.

संतांना जातीपातीत वाटून मग समाजात फाटाफूट घडविणार्या राजकारण्यांनीही संतसाहित्याचे योग्य परिशीलन करण्याची गरज आहे. सर्वच संतांच्या उपदेशांतून असा कालोचित बोध घेतला गेला, तर समाजात रुंदावणारी दरी खरोखरच कमी होईल आणि पुढच्या पिढीसाठी एका चांगल्या समाजाचे स्वप्नसुद्धा साकार होईल. संतांना सरसकट पारलौकिकवादी संबोधणार्यांनीही संत सारलादास यांनी आपल्या लेखणीतून राज्यशकट चालविणार्या शासकांना जे बोधामृत पाजले आहे, ते सर्व ऐहिक कल्याणकारी राज्याशीच संबंधित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. युधिष्ठिराला उपदेश करताना भीष्म पितामह असे सांगतात - ‘देशावर धर्मानुसार शासन करावे. अन्यथा तुमच्या हातून सत्ता निसटून जाईल. आपल्या राज्यात कोणीही दुःखीकष्टी राहणार नाही, अशा पद्धतीने शासन करावे. प्रजेचे सुख हेच राजाचे सुख आहे, हे लक्षात घ्यावे. गुप्तचरांकडून सत्य जाणून घ्यावे आणि देशाच्या शत्रूंचा शिरच्छेद करावा. पापी लोकांना शिक्षा करणे हे पाप नव्हे. शेतकर्यांवर आर्थिक कर बसवू नये त्यांना हैराण करू नये. अन्य राज्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी. त्यांच्या हेरांना आपल्या राज्यात शिरकाव करू देऊ नये.’

 

सारलादास यांच्या काळी असा नियम होता की, जमिनीतून गुप्तधन मिळाल्यास ते राजाच्या मालकीचे मानण्यात यावे. हा नियम न्यायोचित नाही, हे दर्शविण्यासाठीसारला महाभारता एक अत्यंत सुंदर कथा आली आहे. सुरेश्वर नावाच्या एका ब्राह्मणाने एका शेतकर्याला आपली जमीन कसण्यास दिली. त्यात एक रत्नजडित कंकण सापडल्यावर या दोघांत एक विचित्र भांडण जुंपले आणि राजा युधिष्ठिरासमोर हा खटला आला. ही जमीन ब्राह्मणाची असल्यामुळे कंकणावर आपला हक्क नाही, असे शेतकर्याचे म्हणणे होते, तर जमिनीतून जे पिकेल त्यावरच फक्त आपला हक्क आहे, असे ब्राह्मणाचे म्हणणे होते. या दोघांनाही रत्नजडित कंकणाचा मोह नाही हे पाहून राजा आश्चर्यचकित झाला. तेव्हा सहदेवाने त्याला सांगितले की, काही काळाने कलियुगाचा प्रभाव सुरू होऊ द्या. मग हेच दोघे कंकण मिळविण्यासाठी भांडतील! मग तसेच झाले आणि कंकणासाठी त्या दोघांत भांडण जुंपले. ते भांडण सोडविताना पांडवांचा वारस परीक्षित राजाने असा न्याय केला की, जमिनीतील गुप्तधन हे राजाच्या मालकीचे असल्यामुळे ते कंकण राजाच्या खजिन्यात जमा केले जावे. ही केवळ रंजक कथा नसून, प्रजेच्या हक्कात आणि अधिकारात कपात करून राजसत्ता कशी बलवान होत गेली आहे, यावरचे तिरकस भाष्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

समाजस्थितीचे भान असल्याशिवाय आपल्या साहित्यातून असा उपदेश करता येत नाही की असे भाष्य करता येत नाही. मात्र असे भाष्य हे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात असल्याचा तर्क काही विद्वान काढतात. हे विद्वान एवढ्यावरच थांबता असेही म्हणतात की, “सारला महाभारतात प्राकृत आणि द्रविड उत्पत्तीचे बहुसंख्य शब्द आढळतात. त्यामुळे याची प्राकृत ग्रंथ आणि लोककथा यांच्याशीच नाळ जुळलेली आहे. उडिया भाषा ही संस्कृत भाषेचेच अपत्य आहे, असा प्रचार करणार्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.” उडिया भाषा ही प्राकृतची धाकटी बहीण आहे हेच जास्त अचूक आहे. यातूनच आपल्याला उडिया भाषा आणि संस्कृतीचा बिगरब्राह्मणी वारसा ठळकपणे दिसून येतो. मात्र सारला महाभारताची संशोधित आणि संपादित आवृत्ती दुर्दैवाने उपलब्ध नाही. अर्थवल्लभ मोहंती नामक विद्वानाने हे कार्य हातात घेतले होते, पण जेव्हा ओडिशा सरकारने पन्नास वर्षांपूर्वी या ग्रंथाची आवृत्ती प्रकाशित केली, तेव्हा मोहंती हयात नव्हते. तेव्हापासून सारलादासांचे साहित्य समर्थ संपादकाची वाट पाहत आहे. मात्र ब्राह्मणशाहीच्या या वावटळीत शूद्र महाभारताच्या संपादनाचा प्रकल्प कोणाला पचनी पडेल?

अशा अर्थाचे लेख अगदी अलीकडे प्रकाशित झालेले आहेत. आपापली वेगळी सांस्कृतिक अस्मिता उभी करण्याच्या नादात वाहवत गेलेले विद्वान पाहता, समाजाला एकजीव करण्यासाठी कष्ट उपसणारे संत सारलादास यांच्यासारखे महात्मे अशाक्षुद्रप्रवृत्तींना कधी उमगतील, हा प्रश्नच आहे!