‘विवेक ज्ञानगंगा’ एक सकारात्मक सुरुवात

विवेक मराठी    03-Jun-2021
Total Views |

 

कोविड महामारीने निर्माण केलेल्या नकारात्मक वातावरणाच्या आणि गृहबंदीच्या पार्श्वभूमीवर सा. विवेकनेविवेक ज्ञानगंगाहा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत एखाद्या विषयातील उपयुक्त माहिती देणार्या किंवा विशेष कला-कौशल्य शिकवणार्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘विवेक ज्ञानगंगाची पहिली कार्यशाळापुढच्या लाटेसाठी सज्ज होतानादि. 28 मे ते 31 मे 2021 या कालावधीत संपन्न झाली. वैद्य ज्योत्स्ना पेठकर या कार्यशाळेच्या मार्गदर्शक होत्या.


vivek_1  H x W:

 

सध्याचे एकूण वातावरण पाहता कार्यशाळेसाठी हा विषय स्वाभाविकपणे समोर आला. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेतून आपण कधी दुसर्या लाटेत पोहोचलो, ते कळलेसुद्धा नाही. त्याच वेळी तिसर्या लाटेचे भाकितही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवू लागले. शिवाय ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक आहे असे सांगण्यात आल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. जोपर्यंत प्रश्न आपल्या आरोग्याचा होता, तोपर्यंत ठीक होते, पण आपल्या मुलांच्या आरोग्याला धोका असेल तर मात्र हे आव्हान अधिक अवघड असेल, हाच विचार प्रत्येक पालकाच्या मनात आहे. एकतर गेले वर्षभर या आजाराच्या भीतीने मुले शाळा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, मोकळी हवा, मैदानी खेळ या सगळ्यांपासून वंचित आहेत. त्यांचे जग संकुचित झाले आहे. आता या संभाव्यतिसर्या लाटेच्याचर्चेने भीतीत अधिकच भर पडली आहे. यावर उपाय आहे का? मास्क, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग हे पुरेसे आहे का? ही तिसरी लाट येण्याआधीच आपण आपल्या मुलांना तिच्यापासून बचाव करण्यासाठी सक्षम बनवू शकतो का? आपण आणि आपली मुले निर्भयपणे या लाटेचा सामना करू शकतो का? असे कित्येक प्रश्न पालकांसमोर आहेत. ‘विवेक ज्ञानगंगाच्या माध्यमातून या प्रश्नांची योग्य समाधानकारक उत्तरे देता येतील का? असा विचार पुढे आला.

खरे तर आता या विषयाबाबत समाजमाध्यमांवर अनेक जण आपापली मते मांडत आहेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञमंडळी विविध व्यासपीठांवरून बोलत आहेत. अनेकदा त्यात मतभिन्नताही आढळते. त्यामुळे समाधानापेक्षा संभ्रमच अधिक वाढत आहे. अशा वेळी आपण हा विषय कशा प्रकारे हाताळला पाहिजे, याबाबत विवेकच्या लेखक-हितचिंतक परिवारातील काही आरोग्यतज्ज्ञांशी चर्चा केली असता, काय करायला हवे याबाबत अधिक स्पष्टता येऊ लागली. लोक घाबरलेले आहेत, आपल्याला त्यांच्या भीतीत भर घालायची नाही, त्याऐवजी या भीतीच्या मुळावरच घाला घालायचा. आजारावरील उपचारापेक्षा आजाराला प्रतिबंध ही आदर्श स्थिती असते. आयुर्वेदात ऋतुमानानुसार आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रशुद्ध उपयोजन सांगितलेले आहे. या प्रतिबंधात्मक उपायांवरच या कार्यशाळेत भर देण्याचे ठरले. त्याविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी आयुर्वेद क्षेत्रातील अनुभवी नाव समोर आले... वैद्य ज्योत्स्ना पेठकर.


vivek_1  H x W:

वैद्य ज्योत्स्ना पेठकर आणि त्यांचे पती वैद्य सचिन पेठकर पुण्यात परिवर्तन आयुर्वेदिक आणि पंचकर्म सेंटरद्वारे रुग्णचिकित्सा आणि उपचार करतात. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना पूर्ण बरे केले. अनेकांना केवळ दूरध्वनी संपर्काद्वारे मार्गदर्शन करून या आजारावर मात करण्यात सहकार्य केले. त्याशिवाय हे दांपत्य पुण्यातजिज्ञासानावाची प्रयोगशील शाळा चालवतात. महत्त्वाचे म्हणजे मागचे संपूर्ण वर्ष काही अपवाद वगळता जिज्ञासातील सर्व मुले शाळेत नियमित उपस्थित राहिली होती आणि कोणालाही या आजाराचा त्रास झाला नाही. वैद्य पेठकर दांपत्याच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आहार-विहाराचे योग्य नियम पाळल्यामुळे हे शक्य झाले होते. पालकांनीही विश्वासाने मुलांना शाळेत पाठवले, हे विशेष.

 

ज्योत्स्नाताईंनी आमच्या योजनेला दिशा देत मोठ्या उत्साहाने या कार्यशाळेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. कार्यशाळेतील 4 दिवसांपैकी तीन दिवस मार्गदर्शनपर सत्रे होती. त्यामध्ये ऋतुचक्र, ऋतुसंधी म्हणजे काय, आजारांशी त्यांचा असलेला संबंध, संसर्गाची नेमकी कारणे कोणती, मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहारनियमन यांविषयी ज्योत्स्नाताईंनी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. तसेच काही सर्वसाधारण लक्षणे आढळल्यास घरच्या घरी करता येतील अशा उपाययोजना - अर्थातफर्स्ट एड आयुर्वेदही एक वेगळी संकल्पना त्यांनी मांडली. अतिशय सोप्या भाषेत, सूत्रबद्ध मांडणी करत ज्योत्स्नाताई प्रत्येक विषय समजावून सांगत होत्या. ही सर्वच सत्रे सहभागींना योग्य मार्गदर्शन करणारी आणि त्यांचे मनोबल वाढवणारी होती. तशा प्रतिक्रियाही सहभागींकडून वेळोवेळी येत होत्या. चौथ्या सत्रात ज्योत्स्नाताईंबरोबरच जिज्ञासातील काही मुले पालक यांच्याशी सहभागींनी संवाद साधला. मुलांनी पालकांनी जिज्ञासाविषयीचे अनुभव सांगताना वर्षभर निर्भयपणे शाळेत जाण्यामागचे रहस्यही उलगडले.

या कार्यशाळेत महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, डोंबिवली, बदलापूर, नाशिक, नांदेड या भागातून, तसेच गोवा, बेळगाव अशा महाराष्ट्राबाहेरील भागातून 55 पालकांनी नोंदणी केली होती. या निमित्ताने एक वेगळा अनुभव आला. पहिल्या सत्रानंतर एका सहभागीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे त्यांच्या नातेवाइकांनी कार्यशाळेत सहभागी करून घेण्याची विनंती केली होती आणि अर्थातच ती आम्ही नाकारू शकलो नाही. तसेच काही सहभागींनी त्यांच्या नातेवाइकांना, परिचितांनाही या कार्यशाळेत सहभागी होता आल्यामुळे ही कार्यशाळा पुन्हा एकदा आयोजित करावी अशी सूचना केली. आम्हालाही हे मोलाचे मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे होतेच. त्यामुळे 14 जून ते 17 जून 2021 या कालावधीत पुन्हा एकदा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ही कार्यशाळा एक वेगळा अनुभव होता. या कार्यशाळेने आमच्या मनातही सकारात्मकता जागवली. चांगल्या योजनांमध्ये चांगले लोक जोडले जातात आणि अधिक चांगल्या योजना तयार करण्याचे बळ देतात, हे या निमित्ताने प्रकर्षाने जाणवले. कोरोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी आपले शरीर आणि मन दोन्ही सक्षम बनवावे लागेल, तेही तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली. त्यासाठी सा. विवेकच्या माध्यमातून आणि विवेक ज्ञानगंगाच्या माध्यमातून आम्ही आमचा सहभाग देत राहू.

- सपना कदम-आचरेकर