‘रेनिसाँ’ क्रांती की प्रवर्तन?

विवेक मराठी    12-Jul-2021
Total Views |
अगोदर कुठेही न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या अनेकविध आयामांचा स्वप्रतिभेने वेध घेऊन ते प्रत्यक्षात उतरविणार्‍या प्रतिभावंतांनी घडवून आणलेले ‘रेनिसाँ’ हे प्रवर्तन होते. या प्रवर्तनातून पुढे युरोपमध्ये अनेक पर्व उदयास आली. एकीकडे ‘रेनिसाँ’चा शब्दश: अर्थ आहे पुनर्जन्म, पण साध्य मात्र झाले असे आविष्करण, जे अगोदर कधीही अस्तित्वात नव्हते.


rushia_1  H x W
‘रेनिसाँ’ - एक असा शब्द, ज्याभोवतीचे वलय सामाजिक शास्त्रशाखांच्या अभ्यासकांना हमखास आकर्षून घेते. जगातील बहुतांश देशांत मूलगामी अथवा रचनात्मक परिवर्तनासाठी समानार्थी झालेल्या ह्या शब्दाचा उगम जरी फ्रेंच भाषेतून असला, तरी या संकल्पनेचे उगमस्थान मात्र मानले जाते ते ‘इटली’मध्ये. ‘रेनिसाँ’ म्हणजे पुनर्जन्म. अगदी सोपे ठोकताळे लावायचे झाले, तर या ‘रेनिसाँ’चा कालखंड इ.स. 1350 ते इ.स. 1600 असा मानता येईल. ‘रेनिसाँ’चा अर्थ आहे पुनर्जन्म. खरे तर तत्कालीन कर्मठ ख्रिस्ती युरोपीय धर्ममतात मानवी पुनर्जन्म ही संकल्पनाच धर्मबाह्य होती. मग हा पुनर्जन्म नक्की होता तरी कुणाचा? अनेक ‘ह्युमनिस्ट’ अथवा मानवतावादी लोकांच्या मते तो होता युरोपचा सांस्कृतिक पुनर्जन्म. कला, स्थापत्य, काव्य, साहित्य या सर्वांवर मूलगामी व दूरगामी परिणाम टाकणार्‍या या रेनिसाँच्या रूपाने जणू प्राचीन ग्रीक तसेच रोमन जीवनदृष्टीचा व मुक्त आविष्काराचा पुनर्जन्म झाला, हीच या ‘रेनिसाँ’ शब्दामागची भावना आहे.
मध्ययुगात ‘रेनिसाँ’चे सूतोवाच होण्याअगोदर युरोपमधील समाजप्रवाह जणू थिजू लागला होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेली राजेशाही, चर्चने घालून दिलेले दंडक, घट्ट रुतलेली सरंजामशाही आणि त्यायोगेच उद्भवलेली सामाजिक उतरंड.. प्रतिभावंत आणि मुक्त विचारसरणीच्या व्यक्तींना अत्यंत हतोत्साहित करणारे हे वातावरण सार्वत्रिक झाले होते. सळसळत्या चैतन्याचा, उमेदीचा, धडाडीचा आणि काव्यात्मक दृष्टीकोनाचा अभाव असलेल्या या निरस सामाजिक जीवनाचा वीट अनेकांना आला असला, तरी यातून पुढे मार्ग काय? याचे उत्तर मात्र फारसे कुणाकडे नव्हते.
आणि अशाच वेळी तारणहार म्हणून जी जमात पुढे आली, ते ना कोणते पराक्रमी योद्धे होते, ना कुणी राजे-रजवाडे होते, नाही कुणी शास्त्रज्ञ होते. ते होते कलाकार आणि प्रतिभाशाली कारागीर! नवीन राजा नवीन कायदे आणू शकेल, मोठे योद्धे नवीन प्रदेश जिंकतील, शास्त्रज्ञ जीवन सुकर करतील; पण एका मर्यादेनंतर जीवनप्रवाह चैतन्यशाली व खळाळता ठेवायचा असेल, तर काव्यात्मक दृष्टीकोन असणारे वेडेच लागतात. अन्न, वस्त्र, निवारा हे टप्पे भागले की त्यापुढेही मूलभूत गरजांचा आणखी एक समूह तयार होतो आणि तो म्हणजे रसग्रहण, अभिरुची आणि अभिव्यक्ती. सौंदर्यदृष्टी, कल्पनाशक्ती आणि अफाट प्रतिभा लाभलेले चित्रकर्मी, शिल्पकर्मी आणि स्थापत्यकर्मी हेच ‘रेनिसाँ’चे प्रवर्तक ठरले, त्याचे कारण कदाचित हेच असावे.
या ‘रेनिसाँ’ची सुरुवात अमुक एका प्रसंगाने झाली का? तर नाही! एकदम सर्वत्र झाली का? तर तसेही नाही. अगोदरच निरस झालेल्या या समाजजीवनात ज्या ज्या प्रदेशात अराजकाचा अथवा हिंसाचाराचा अतिरेक झाला, त्या त्या प्रदेशात इ.स. 1350नंतर ह्या ‘रेनिसाँ’ची पालवी फुलत गेली, असे मात्र अनेकांचे निरीक्षण आहे.


rushia_2  H x W
इ.स. 1305मध्ये इटलीत रोममध्येसुद्धा अराजक इतके टोकाला गेले की प्रत्यक्ष पोपला स्थलांतर करून फ्रान्समधील ‘अ‍ॅव्हिग्नान’ नगरात आश्रय घ्यावा लागला. पण 14व्या शतकाच्या मध्यानंतर परिस्थिती झपाट्याने पालटू लागली. उत्तम व्यापारी संघ, कुशल अर्थकारण आणि वेळोवेळी या भांडवलाच्या जोरावर उभारता येऊ शकणारे भाडोत्री पण कसलेल्या योद्ध्यांचे सैन्य या तीन कारणांमुळे अनेक इटालियन शहरे समृद्धीच्या शिखरावर पोहोचली. इटलीमध्ये व्हेनिस, फ्लोरेन्स, मिलान अशांसारख्या बलवान आणि ऐश्वर्यसंपन्न सिटी स्टेट्स उदयास आल्या.
या सिटी स्टेट्समध्ये प्रशासनात व अर्थकारणात सर्वात प्रगल्भ मानल्या गेलेल्या फ्लोरेन्स शहराला ‘रेनिसाँ’चे प्रवर्तन केंद्र मानले जाते. येथील व्यापारी समुदायाने इतकी प्रचंड मजल मारली की तेच या शहराचे शासक बनले. व्यापार्‍यांचे व कारागीरांचे संघ - ज्यांना ‘गिल्ड्स’ म्हणत, ते समाजजीवनावर प्रभाव पाडू लागले. फ्लोरेन्स हे ‘मर्चंट्स रिपब्लिक’ म्हणजेच ‘व्यापारी समुदायाने लोकशाही मार्गाने नियंत्रित केलेले गणराज्य’ म्हणून उदयास आले.
या व्यापारी शासकांना आता राजेशाही थाट हवाहवासा वाटू लागला. सढळ हाताने खर्च करून उत्तमोत्तम स्थापत्यकर्मी व कारागीर पदरी ठेवणे त्यांना अजिबातच अवघड नव्हते. हे नवश्रीमंत व्यापारी पार्श्वभूमीचे शासक कारागीरांना किंवा स्थापत्यकारांना आपल्या मर्जीनुसार राबवून घेणारे शासक नव्हते. उलट आता इथे कारागीरांना त्यांच्या कामाकरिता उत्तम मोबदला मिळण्याच्या संधी होत्या. आपल्या प्रतिभेच्या जोरावर आपले वेगळेपण सिद्ध करायची ही ईर्ष्या ‘रेनिसाँ’ची जन्मदात्री ठरली. इटलीतील अन्य शहरांमध्येदेखील व्यापारी आपले महाल सुशोभित करण्याकरिता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध कारागीरांना भरघोस उत्तेजन देऊ लागले. इटलीतील अनेक धनाढ्य नगरांमध्ये अवाढव्य कॅथेड्रल, चर्चेस, नगरातील सार्वजनिक वावराची ठिकाणे यांना शोभा आणण्याकरिता हे सौंदर्याचे आणि कलेचे भोक्ते असलेले व्यापारी, तसेच स्थानिक शासक उत्तेजन देऊ लागले. लवकरच युरोपमध्ये अन्यत्रदेखील या सौंदर्यदृष्टीची साथ पसरू लागली.
 
साधारण इ.स. 1400 ते 1598 या कालावधीत स्पेनमध्ये, इ.स. 1494 ते 1590 या कालखंडात फ्रान्समध्ये, तर इ.स. 1511 ते 1603 या कालावधीत इंग्लंडमध्ये या ‘रेनिसाँ’चे लोण पसरले, असे मानले जाते. इ.स. 1600नंतर जिथे याची सुरुवात झाली, त्या इटलीत ही चळवळ जरी मंदावू लागली, तरी पूर्वीची चाकोरी पार पुसली गेली होती. सौंदर्यदृष्टी लाभलेल्या प्रतिभावंतांनी एका नवीन युगाची नांदी घडवून आणली होती.
‘रेनिसाँ’ला क्रांती म्हणता येणार नाही. मुळात क्रांती म्हणजे अल्पावधीत होणारे लक्षणीय परिवर्तन अथवा बदल. रक्तहीन क्रांती, औद्योगिक क्रांती, वैचारिक क्रांती असे क्रांतीचे विविध प्रकार आपण ऐकून असतो. सर्वसाधारणपणे या क्रांतीनंतर अचानक बदललेले चित्र अथवा परिस्थिती कशी असेल याचा अंदाज अगोदर येत नाही. अनेकदा क्रांती यशस्वी झाली, तरी त्यानंतर झालेले परिणाम हाताळताना आणि बदल पचवून पुन्हा घडी बसविताना त्रेधा उडालेली आढळून येते. ‘रेनिसाँ’मध्ये याच्या उलट चित्र आहे. अगोदर कुठेही न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या अनेकविध आयामांचा स्वप्रतिभेने वेध घेऊन ते प्रत्यक्षात उतरविणार्‍या प्रतिभावंतांनी घडवून आणलेले हे प्रवर्तन होते. या प्रवर्तनातून पुढे युरोपमध्ये अनेक पर्व उदयास आली. एकीकडे ‘रेनिसाँ’चा शब्दश: अर्थ आहे पुनर्जन्म, पण साध्य मात्र झाले असे आविष्करण, जे अगोदर कधीही अस्तित्वात नव्हते.
भारत देशाच्या गौरवशाली परंपरेचा पुनर्जन्म घडावा, या हेतूने प्रेरित होऊन आपल्याकडूनही आपापल्या कार्यक्षेत्रात प्रतिभेचे असे आविष्करण होऊ शकते. हाच आपला व्यक्तिगत ‘रेनिसाँ’, नाही का?