कोकणावरील पूरसंकट आणि संघाचे आपत्ती व्यवस्थापन

विवेक मराठी    30-Jul-2021
Total Views |
चिपळूण, महाड येथील पूरसंकटानंतर संघाचे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य सुरू झाले आहे. जनकल्याण समिती, संघ, अभाविप, राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी सर्व संघटना विविध प्रकारे या मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. काही ट्रस्ट्सचा, स्थानिक संस्थांचाही खूप सहभाग मिळाला आहे. महाराष्ट्रातून बाकी मदत मिळत आहे.

RSS_4  H x W: 0

सेवा है यज्ञकुंड, समिधासम हम जले।
 
गेल्या आठवड्यात ढगफुटी होऊन कोकणात, मुंबईत व पश्चिम महाराष्ट्रात जनजीवन ठप्प झाले. गावोगावी प्रचंड नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून गावेच्या गावे ढिगार्‍याखाली गेली. अचानक आलेला हा पूर इतका प्रचंड होता की पुराच्या पाण्यात माणसे, जनावरे, लोकांचे सगळे संसार वाहून गेले. कोकणातील महाड, चिपळूण या शहरांना, नदीकिनार्‍यांवरील गावांना, वस्त्यांना पुराचा मोठा दणका बसला आहे. अशा संकटसमयी रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी संकट हेरून नेहमीप्रमाणे आपत्ती निवारणाचे कार्य सुरू केले.
 
 
कोकणात 22 नद्या आहेत. दि. 21पासून सुरू असणार्‍या अतिमुसळधार पावसाने यातील अनेक नद्यांची धोक्याची पातळी पार होऊ लागली होती. पावसाची संततधार चालूच असल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालली होती. शेवटी चिपळूण बाजारपेठेत बारा ते चौदा फूट पाण्याची पातळी गाठून 24 तासांनंतर पाणी उतरू लागले. एका रात्रीत अक्षरश: काही तासांत पाणी भरल्यामुळे जानमाल, वाहने, जनावरे यांची सुरक्षितता करायला चिपळूणकरांना अजिबात संधी मिळाली नाही. त्यामुळे आज चिपळूण शहरात आणि आजूबाजूच्या गावांत जानमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक माणसे, प्राणी पुरात अक्षरश: वाहून गेले. वस्तूंच्या नुकसानाचा तर अंदाज बांधता येणे सर्वथा अशक्य आहे.
अशा परिस्थितीत पूर ओसरताच संघव्यवस्था कामाला लागल्या. संघ ही नित्य सिद्ध शक्ती आहे व संकटसमयी संघकार्यकर्ते सर्वप्रथम सेवा कार्य सुरू करतात, याचा परत एकदा प्रत्यय आला. आता माणसांना जगवणे, शक्य त्यांना वाचवणे हे पहिले काम सुरू झाले. त्यासाठी पहिले तीन दिवस तयार अन्न पोहोचवले जाऊ लागले. आजूबाजूच्या शहरांतून, गावांतून कार्यकर्ते मदत घेऊन येऊ लागले. गावात स्वच्छता मोहीम सुरू झाली. सार्वजनिक ठिकाणांवरचा चिखलगाळ काढणे, अत्यंत गरजू म्हातार्‍या, अपंग माणसांना स्वच्छतेसाठी मदत, अन्नपाण्याची, निवार्‍याची सोय करण्यासाठी सर्वेक्षण करणे, याद्या बनवणे, मदत योग्य जागी पोहोचेल अशी व्यवस्था उभी करणे अशी कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली. यासाठी विविध गावांत आठ ठिकाणी मदतकेंद्रे उभी राहिली. त्यात स्थानिक कार्यकर्ते, तरुण मंडळी अशा लोकांनाही सहभागी करून घेतले गेले. त्यामुळे नक्की कोणाला आणि कसली मदत आवश्यक आहे याचा लाइव्ह अपडेट मिळत राहिला आणि मदत पोहोचवणे सोपे आणि अधिकाधिक उपयुक्त होत गेले. संघाच्या गटरचनेचा उपयोग अशा वेळी सर्वाधिक होत असतो. चिपळूणकरांना आणि स्वयंसेवकांना सध्या त्याचेच प्रत्यंतर मिळते आहे.


RSS_3  H x W: 0

पहिले तीन दिवस तर अन्न शिजवायलाही योग्य, सुकी अशी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे आसपासच्या शहरांना ही जबाबदारी वाटून दिली. नंतर तयार अन्नाची गरज कमी ़झाली आहे हे लक्षात येताच चार जणांच्या कुटुंबात 15 दिवस भाजीपोळी, डाळभात असे जेवण मिळेल अशी किट्स बनवणे हे काम हातात घेतले. आतापर्यंत अशी सहा हजार किट्स वितरित करून झाली आहेत. घरांची साफसफाई झाल्यावरही घरभर ओल आहेच. त्यामुळे चटई, बेडशीट, चादर, नॅपकिन्स, टॉवेल्स इत्यादी साहित्याची 2000 किट्स वितरित केली गेली आहेत. बाकी पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे वगैरे सटरफटर वस्तूंची तर काही गणनाच केलेली नाही.
या सगळ्या कामांसाठी संघाने एक अतिशय चांगली व्यवस्था लावली, ती म्हणजे मदतकेंद्रावर मदत मागायला आलेल्या लोकांनाच त्यांच्या आसपास राहणार्‍या इतर गरजूंची यादी बनवायचे काम दिले. त्यामुळे कोणाला काय मदत दिली जात आहे आणि कोणाच्या सांगण्यानुसार, याचे गणन करता आले. लोकांच्या गरजांचा अंदाज येणेही सोपे गेले. कोणालाही वस्तू अतिरिक्त न होता अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचता येऊ लागले. यात आता असे लक्षात येत होते की विविध संस्था मदत पोहोचवत आहेत, पण त्या संपर्कास सोईस्कर अशा वाड्यांवरच पोहोचत आहेत. त्यामुळे जिथे रस्ते, पूल तुटले आहेत, अशा ठिकाणी आपली मदत पोहोचवण्यास आपण सुरुवात केली. पुढे असे लक्षात आले की महिलांसंबंधित अनेक अडचणी आहेत. त्यामुळे रत्नागिरीतून आलेली 50 महिलांची टीम याच कामाला लागली. गरजांच्या याद्या बनल्या. त्यानुसार पॅड्स, इनरवेअर्स इत्यादी साहित्य मागवून ते वाटले जाऊ लागले. अभाविपने आरोग्य विभागाची जबाबदारी उचलली. मदतीसाठी आलेल्या डॉक्टर्सना बरोबर घेऊन जागोजागी जाऊन ते शिबिरे लावत आहेत. अशा सहा टीम्स आहेत. आणखी वाढतील. रोज एकेक टीम 300-300 रुग्ण तपासते आहे. आरोग्य सुविधांसाठी आता पुढचे आव्हान म्हणजे फंगल इन्फेक्शन आणि डायरिया. त्यानुसार उपाययोजना सुरू झाली आहेच.

 
या सगळ्या अवघड काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप उपयोग करून घेतला जात आहे. एक हेल्पलाइन सुरू केली गेली आहे. तिथे नागरिक आपल्या गरजा नोंदवत आहेत. मदतकेंद्रातून तिथे आवश्यक ती मदत तत्काळ पोहोचेल अशी सोयही केली जात आहे.


RSS_2  H x W: 0

यापुढे छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. तसेच नदीकिनार्‍यांवरील पूर्णपणे नष्ट झालेल्या किंवा भयंकर नासधूस झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्याचेही काम हाती घ्यायचे आहे. प्लास्टिक बाटल्यांनी इतके दिवस पाणीपुरवठा होत असल्याने चिपळुणात प्लास्टिक बाटल्यांचा मोठा कचरा सतत होतो आहे. त्यामुळे दोन प्लास्टिक बाटल्या चपट्या करायचे यंत्र बसवून गाव प्लास्टिकमुक्त करणे हे उद्दिष्टही समोर ठेवले आहे. बाटल्या क्रश करण्याची मशीनरी उपलब्ध करवून घेऊन तो प्रकल्प सुरू करणार आहोत.

 
बाधित प्राणी, गुरेढोरे यांच्यावर उपचार सुरू केले गेले आहेत. त्यांच्या चार्‍याचा प्रश्नही हातात घेणे आवश्यक झाले आहे.
जनकल्याण समिती, संघ, अभाविप, राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी सर्व संघटना विविध प्रकारे या मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. काही ट्रस्ट्सचा, स्थानिक संस्थांचाही खूप सहभाग मिळाला आहे. महाराष्ट्रातून बाकी मदत येते आहेच.




RSS_1  H x W: 0
गेले आठ दिवस चिपळूणच्या गद्रे हायस्कूलमध्ये 250 पुरुष आणि 60-70 महिला कार्यकर्ते अखंड काम करत आहेत. संघ कोणतेही काम समाजाचा सहभाग घेऊन यशस्वी करून दाखवतो.
‘संकटकाळी संघ कामास येतो’ याचा अनुभव ठायी ठायी येतोय.