महात्मा कांचिपूर्ण आणि धर्मात्मा महापूर्ण

विवेक मराठी    05-Jul-2021
Total Views |

आपल्या समाजात कोणत्याच काळी संपूर्ण नकारात्मक अथवा सकारात्मक अशी एकसुरी परिस्थिती नव्हती. पण आपण सकारात्मक घटनांना स्वीकारून त्याच्या प्रकाशात वाटचाल करायला हवी. आपले आदर्श रामानुज, कांचिपूर्ण आणि महापूर्ण यांच्यासारखेच महात्मा असायला हवेत, हाच संदेश यातून अधोरेखित होतो.

ramanuchary_1  

विशिष्टाद्वैत मताचा प्रचार करणारे महान संत म्हणून आचार्य रामानुज हे सर्वपरिचित आहेत. ज्या वेळी देशामध्ये अराजकाची स्थिती माजली होती, त्या काळात देशात धार्मिक पायावर एकात्मतेची भावना बलवान करण्याचे महाप्रयास करणारे संत असाही त्यांचा परिचय आहे. स्वामी विवेकानंद रामानुजाचार्यांबद्दल असे सांगतात - “त्यांनी ब्राह्मणापासून चांडाळांपर्यंत असे सर्वांसाठी सर्वोच्च आध्यात्मिक उपासनेचे महाद्वार उघडले. हेच त्यांचे कार्य होय.”

रामानुजाचार्यांचे जीवन पाहताना आपल्याला सहजच संत नामदेव यांची आठवण होते. येथे आपण नामदेवांप्रमाणेच भगवंताशी आत्मसंवाद साधणार्या महात्मा कांचिपूर्ण या तथाकथित शूद्रवंशात जन्मलेल्या महान संताचा परिचय करून घेणार आहोत. भगवान वरदराजांशी अर्थात महाविष्णूंशी कांचिपूर्ण यांचा नित्य संवाद होत असे. कांचिपूर्ण हे पुनमल्ली नावाच्या गावात राहत असत. ते दररोज आपल्या गावाहून पेरुम्पुदूर मार्गे कांचीपुरम येथे जात असत तेथे भगवान वरदराजांचे दर्शन घेऊन पूजापाठ झाल्यावर घरी परतत असत. कडक उन्हाळा असो वा पावसाळा की हिवाळा, सर्व ॠतूंमध्ये त्यांचा हा नित्यनेम ते कसोशीने पाळत असत. त्यांची महान भगवद्भक्ती पाहून सर्व लोक त्यांना अवतारी पुरुषच मानत. वैकुंठाहून थेट भूलोकी आलेला हा भगवान वरदराजांचा सेवक आहे, अशीच सर्वांची त्यांच्याबाबत भावना होती. त्यांचे हे माहात्म्य जाणूनच रामानुजाचार्यांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेण्याचे ठरविले होते.

रामानुजाचार्य हे कांचीपुरम येथील प्रसिद्ध विद्वान यादव प्रकाश यांच्याकडे राहून वेदाभ्यास करीत असत. यादव प्रकाश हे अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे असल्यामुळे रामानुज यांचे त्यांच्याशी वारंवार मतभेद होत गेले आणि शेवटी त्यांना स्वगृही परतावे लागले. कांचिपूर्ण या नामदेवरूपी संताच्या चरणी रामानुज यांनी लोटांगण घातले आणि शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा, अशी विनवणी केली.

कांचिपूर्ण म्हणाले, “आपण ब्राह्मण कुलात जन्माला आला आहात आणि मी हीन कुळात जन्मलेलो आहे. आपला गुरू होण्याची पात्रता माझ्या अंगी नाही.”

रामानुज म्हणाले, “जे उच्च कुळात जन्मलेले आहेत, त्यांच्या ठायी तुमच्याप्रमाणे अलौकिक भावभक्ती नाही. त्यामुळे वस्तुत: ते आपल्यापेक्षा हीन आहेत. आपल्यासारखा महान ज्ञानी गुरू मिळणे हेच माझ्यासाठी भाग्याचे लक्षण आहे. आपली शास्त्रे असे सांगतात की, केवळ ईश्वरच अंतिम सत्य आहे. ईश्वरसेवा करणे हाच परम पुरुषार्थ आहे. जे ज्ञान भगवद्भक्तीला जन्म देत नाही आणि केवळ ज्ञानगत अहंकाराला जन्म देते, ते सर्व मिथ्या ज्ञान आहे. ते लोकच खरे अज्ञानी असतात. आपण तर सर्व शास्त्रांचे सार ग्रहण केले आहे. गाढवाने आपल्या पाठीवरून चंदन जरी वाहून नेले तरी त्याचा त्याला काही उपयोग नसतो, त्याप्रमाणे हे अहंकारी लोक केवळ आपल्या डोक्यावर ओझे वाहत आहेत.”

रामानुजाचार्यांचे हे वचन आपल्यालासाकरेच्या गोण्या बैलाचिया पाठी। तयाशी शेवटी करबाडे॥या तुकोबारायांच्या उक्तीची आठवण करून देते. पण त्या काळातवेदांचा अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी वहावा भार माथा॥अशी तुकोबारायांची भूमिका घेणे कांचिपूर्ण यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी केवळ आशीर्वाद देऊनच रामानुजाचार्यांची बोळवण केली.

काय गंमत असते पाहा! संत कबीर हे म्लेंच्छ कुळात जन्मले आहेत असे मानून लोकापवादामुळे रामानंदाचार्य त्यांना गुरुपदेश करीत नव्हते. तेव्हा त्यांच्या चरणरजांचा प्रसाद मिळावा म्हणून संत कबीर रामानंदांच्या मार्गात गंगाघाटाच्या पायरीवर झोपले होते. कांचिपूर्ण यांचा अनुग्रह लाभण्यासाठी रामानुजांनी अशीच युक्ती योजली. त्यांनी विचार केला की, ‘साक्षात वरदराज अखंड ज्यांच्यासोबत असतो, अशा व्यक्तीच्या यातिकुळाचा काय विचार करावा? ज्यांची प्रेमळ नजर पडली तर एखादा हीन कुळातील व्यक्तीसुद्धा ब्राह्मणाहून पवित्र बनतो, अशा महापुरुषांच्या उष्ट्या पत्रावळीचा लाभ जरी आपल्याला मिळाला तर आपण धन्य होऊ!’

याच भावनेने रामानुज यांनी कांचिपूर्ण यांना आपल्या घरी भोजनास येण्याचे आमंत्रण दिले. कांचिपूर्ण यांनी मोठ्या आनंदाने होकार दिला, पण रामानुज यांचा अंतस्थ हेतू त्यांना आपोआप कळला होता. रामानुज यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी ताबडतोब घरी जाऊन ही बातमी आपल्या पत्नीला सांगितली. रामानुज यांच्या पत्नीचे नाव होते रक्षांबा. ही पतिपत्नीची जोडगोळी म्हणजे अगदी सॉक्रेटिस आणि झांटिपी शोभावी तशीच होती. रक्षांबा ही स्वतःला उच्च ब्राह्मणकुलीन स्त्री मानत असे. तिला अन्य वर्णांच्या लोकांचा खूप तिटकारा होता. पण आपल्या पतीच्या वेडेपणापुढे तिची मात्रा चालत नसे. तिने दुसर्या दिवशी भोजनासाठी सर्व सिद्धता केली आणि कांचिपूर्ण यांना जेवायला आणण्यासाठी रामानुज यांनी प्रस्थान ठेवले.

कांचिपूर्ण रामानुज यांचा मनसुबा ओळखून होते. ते ज्या वाटेने नेहमी कांचिपूर्ण यांच्या घरी येत, ती वगळून आडवाटेने पटकन कांचिपूर्ण रामानुजांच्या घरी पोहोचले. भोजन नुकतेच तयार झाले होते.

रक्षांबा म्हणाली, “माझे पती आपल्याला बोलावून आणण्यासाठी आपल्याकडेच गेले आहेत. तुमची चुकामूक कशी झाली? ते आल्यावर आपल्याला जेवायला वाढते.”

कांचिपूर्ण म्हणाले, “मला फार घाई आहे. मला देवपूजेसाठी वरदराजाच्या दर्शनाला जायचे आहे. तेव्हा लगेच भोजन उरकावे लागेल.”

रक्षांबाने लगबगीने त्यांना जेवायला वाढले. आपले भोजन आटोपून कांचिपूर्ण यांनी ती पत्रावळ उचलून दूर नेऊन टाकली खाली पडलेले अन्नकण वेचून ती जागासुद्धा सारवून टाकली. मग ते आल्या पावली परत गेले.

रक्षांबाने मग उरलेले सर्व अन्न शेजारी राहणार्या एका शूद्र जातीच्या कुटुंबाला नेऊन दिले. सर्व भांडी नीट घासून घेतली आणि मग आपल्यासाठी रामानुज यांच्यासाठी स्वयंपाक आरंभला. तेवढ्यात कांचिपूर्ण यांची भेट घडल्यामुळे निराश झालेले रामानुज घरी परतले. त्यांनी पत्नीला विचारले असता घडलेली सर्व हकीकत त्यांना कळली.

कांचिपूर्ण यांचे भोजन झाले, तरी त्यांचे काहीतरी उरलेसुरले अन्न मला खाण्यासाठी देऊ शकतेस का?” असा प्रश्न रामानुज यांनी विचारला असता त्यांची पत्नी रक्षांबा हिने उपरोधाने म्हटले, “त्या हीन व्यक्तीचे उष्टे खाण्याचे डोहाळे होते का तुमचे? पण मी बरे ते होऊ देईन! मी तो सर्व स्वयंपाक टाकून दिला आणि आपल्या दोघांसाठी पुन्हा शुचिर्भूत होऊन नवीन स्वयंपाक करीत आहे.”

रामानुज यांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि ते दु:खाने पत्नीला म्हणाले, “अग, महात्मा कांचिपूर्ण यांच्यासारख्या भक्तराजांशी तू असा हीनपणाचा व्यवहार करून आपला मूर्खपणा सिद्ध केला आहेस. त्याचबरोबर तुझ्या क्षुद्र मनोवृत्तीचाही परिचय करून दिला आहेस. तुला सारासारविवेक काहीच कळत नाही. कांचिपूर्ण यांचा महाप्रसाद माझ्या नशिबात नसल्यामुळेच हे सर्व घडले आहे.”

त्यानंतर सहा महिने कांचिपूर्ण यांनी तिरुपतीलाच मुक्काम केला जेव्हा ते गावी परतले, तेव्हा रामानुजांनी पुन्हा त्यांची भेट घेतली. कांचिपूर्ण यांच्या पायावर लोटांगण घालून त्यांनी आपली आध्यात्मिक जिज्ञासा त्यांच्यासमोर प्रकट केली. तेव्हा कांचिपूर्ण म्हणाले, “मी वरदराज भगवान यांना विचारून आपले शंकासमाधान अवश्य करीन!’

जेव्हा कांचिपूर्ण यांचा वरदराज भगवानांशी संवाद झाला, तेव्हा भगवंतांनी रामानुजला आपला संदेश देण्यास त्यांना सांगितले. त्यानुसार कांचिपूर्ण यांनी भगवंताचा दिव्य संदेश रामानुज यांना सांगितला. तो असा - ‘मी मायेच्या योगाने जग निर्मिले असून मीच परब्रह्म आहे. त्यामुळे जीव आणि असा भेद दिसून येतो. ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांनी मला अनन्य भावाने शरण यावे. अंतकाळी ज्याला माझे स्मरण घडले, त्यालाही नक्कीच मोक्ष मिळतो. अशा भक्तांना निर्वाणाच्या वेळी मी माझे परमपद देतो. हे रामानुज, तू महात्मा महापूर्ण यांना शरण जावे.’

महापूर्ण यांचे तामिळ नाव पेरिय नंबी असे आहे. त्यांचे वास्तव्य रंगनाथ मंदिर येथे होते. हे मंदिर शूद्र मानले गेलेल्या आळवार संत तिरुमंगै आळवार म्हणजेच संत परकालन यांनी बांधले होते आणि त्या काळात तेथील गादीवर संत यामुनाचार्य म्हणजेच राजा आळवंदार हे विराजमान होते. यामुनाचार्य यांना आपल्या अंतकाळी रामानुज यांना आपला उत्तराधिकारी नेमण्याची इच्छा होती. त्यामुळे रामानुज यांना बोलावण्यासाठी त्यांनी महापूर्ण यांना रवाना केले. पण ईश्वराची इच्छा वेगळी असल्यामुळे रामानुज यामुनाचार्यांच्या निधनानंतरच तेथे पोहोचले आणि यामुनाचार्यांची भेट झाल्यामुळे निराश होऊन पुन: आपल्या गावी परतले.

मात्र यामुनाचार्यांच्या गादीवर रामानुज यांनाच बसविण्याचा निर्णय झाल्यामुळे महापूर्ण आपल्या पत्नीसहित त्यांच्या भेटीसाठी रामानुजांच्या गावी आले. तेव्हा रामानुज यांनी भगवंताची इच्छा महापूर्ण यांना सांगितली तत्काळ गुरुपदेश द्यावा अशी विनंती केली. महापूर्ण यांनी रामानुजांना अनुग्रह देऊन त्यांच्याच घरी वास्तव्य केले.

रामानुज यांच्या पत्नीला वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार असल्यामुळे हे जोडपे तिच्या डोळ्यात खुपू लागले. पण पतीसमोर तिची काही मात्रा चालत नव्हती. एके दिवशी रक्षांबा गुरुपत्नीसोबतच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली. तेथे गुरुपत्नीच्या कळशीतील चार थेंब पाणी चुकून रक्षांबाच्या कळशीवर उडाले. ते पाहून रक्षांबाचा ज्वालामुखी उफाळला. रक्षांबा म्हणाली, “अग आंधळे, तुला दिसत नाही का? माझे पाणी तू अपवित्र करून टाकले आहेस. ते आता वाया गेले आहे. तुला काहीच कळत नाही. गुरुपत्नी झाली म्हणून माझ्या डोक्यावर बसशील का? माझा नवरा बावळट आहे. त्याच्यामुळे माझ्या कुळाला हा कलंक लागला आहे.”

जेव्हा महापूर्ण यांना आपल्या पत्नीच्या अपमानाबाबत कळले, तेव्हा त्यांनी रामानुज यांच्या घराचा तत्काळ त्याग केला आणि ते पत्नीसह श्रीरंगमला परतले. या घटनेमुळे रामानुज यांचे मन संसाराला विटले. त्यांनी आपल्या ओळखीच्या माणसाकरवी आपल्या पत्नीला खोटा निरोप पाठविला. त्या माणसाने रक्षांबाला असा निरोप दिला की, तुझ्या बहिणीचे लग्न ठरले असून तुला लग्नघरी ताबडतोब बोलावले आहे. माहेरच्या ओढीने रक्षांबा लगबगीने माहेरी निघून गेली आणि रामानुज यांनीही आपल्या घरादाराचा त्याग केला. ते महात्मा कांचिपूर्ण यांच्यासमवेत भगवान वरदराज यांच्या मंदिरात गेले आणि तेथेच संन्यास ग्रहण केला. रामानुजाचार्य यांचे महत्कार्य हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

आपण लक्षात घेतले पाहिजे की रामानुजांच्या जीवनावर शूद्र जातीचे मानले गेलेल्या कांचिपूर्ण यांचा फार मोठा प्रभाव होता. महात्मा महापूर्ण यांनासुद्धा काही विद्वान शूद्र जातीचे मानतात. त्यांनी शूद्र समाजातील आपल्या सहकार्याचा अंत्यसंस्कार केला होता. या घटनेनंतर जातीचा अभिमान आणि अहंकार बाळगणार्या अन्य सहकार्यांनीमहापूर्ण यांनी धर्म बुडविलाअशी हाकाटी करून त्यांची साथ सोडली होती. ही बातमी कळल्यावर रामानुज यांनी महापूर्ण यांची भेट घेतली. त्या वेळेस रामानुज यांनी महापूर्ण यांना विचारले, “धर्म म्हणजे काय?”

महापूर्ण यांनी उत्तर दिले, “महापुरुष जे आचरण करतात तो धर्म होय. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

महापूर्ण यांच्यानंतर काही शतकांनी ज्ञानेश्वर माउली यांनी याच गीताश्लोकावर भाष्य करताना असे सांगितले आहे - ‘येथ वडील जे आचरती। तया नाम धर्मु ठेवती॥

महापूर्ण धर्माचरणाबद्दल सांगतात - “भगवान रामचंद्र यांनी तिर्यक योनीत जन्मलेल्या जटायूचा अंत्यसंस्कार केला आहे. एवढेच काय, प्रत्यक्ष धर्मराज युधिष्ठिर उच्च वर्णाचा असूनही तो शूद्र जातीच्या महात्मा विदुराची पूजा करीत असे. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि धर्मराज यांनी आचरण करून दाखविला आहे तोच खरा धर्म आहे. ईश्वरभक्ताची कोणतीच जात नसते, ते सर्व वर्णांपेक्षाही सर्वश्रेष्ठ असतात.”

महात्मा कांचिपूर्ण आणि महापूर्ण यांच्या कथेवरून आपल्याला असा बोध होतो की, आपल्या देशाचातमोयुगीआणितमोगुणीइतिहास आपल्याला जसा शिकविला जातो, तसाच नेमका असेलच असे नाही. शूद्र मानले जाणार्या जातीतील कांचिपूर्ण भगवान वरदराज यांचे सर्वश्रेष्ठ भक्त मानले जाते, त्यांना दर्शनास अथवा पूजनास कोणताच अडथळा केला जात नाही. त्यांना रामानुज आपल्या घरी भोजनास बोलावतात, त्याचप्रमाणे हीन वर्णाच्या महापूर्ण यांना आपले गुरू करून घेतात, गुरू महापूर्ण आणि त्यांची पत्नी यांना सन्मानाने आपल्या घरात ठेवून घेतात यासाठी कुणी त्यांना बहिष्कृत करीत नाहीत अथवा वाळीतही टाकत नाहीत. त्याच वेळी खोटा वर्णाभिमान बाळगणारी रामानुज यांची पत्नी रक्षांबा ही गुरुपत्नीला केवळ आपले पाणी अपवित्र केल्याचा आरोप करून दूषणे देते, हेसुद्धा याच कथेत आपल्याला दिसते.

यावरून असे सिद्ध होते की, आपल्या समाजात कोणत्याच काळी संपूर्ण नकारात्मक अथवा सकारात्मक अशी एकसुरी परिस्थिती नव्हती. एकमेकांना कमी लेखणे, एकमेकांचा तिरस्कार करणे अशा घटना समाजात सर्वकाळ घडत असतात. पण आपण सकारात्मक घटनांना स्वीकारून त्याच्या प्रकाशात वाटचाल करायला हवी. आपले आदर्श रामानुज, कांचिपूर्ण आणि महापूर्ण यांच्यासारखेच महात्मा असायला हवेत, हाच संदेश यातून अधोरेखित होतो.