सारे शहर में आप सा कोई नही

विवेक मराठी    08-Jul-2021
Total Views |

@प्रिया प्रभुदेसाई

नियतीची कठोरता विनातक्रार स्विकारण्याची जिद्द त्यांनी आपल्या शोकनायकांना दिली, म्हणून त्या दुबळ्या वाटल्या नाहीत. जी भूमिका त्यांनी निवडली त्यात ते मिसळून गेले. एकरूप झाले, त्यामुळे त्या भूमिकेच्या सर्व पैलूंना त्यांनी न्याय दिला. ओथंबलेला आवाज, योग्य ठिकाणी पॉज घेण्याची समज ही त्यांची खासियत इतर अभिनेत्यांसाठी अभ्यासाचा विषय बनली. आपल्या कर्तृत्वाने, अभिनयाने दिलीप कुमार जिवंतपणीच एक आख्यायिका बनले होते.

dilip kumar_1  

मृत्यू हा अत्यंत उर्मट आणि आगंतुक अतिथी आहे. येताना यजमानांची परवानगी घेणे त्याला माहीत नाही. आपल्या येण्याचे स्वागत होईल की नाही, याचीही त्याला पर्वा नाही. तो आयुष्याचा एक भाग आहे असे आपण म्हणतो खरे, पण जीवनात तीच एक गोष्ट निश्चित असताना त्याची तयारी करणे आपल्याला जमत नाही.

तर्कशुद्ध
विचार केला तर माहीत असते, अनेक वेळा मृत्यू ही सुटका आहे. ते वृद्ध झाले होते, रोगग्रस्त होते, वेदनांतून त्यांची मुक्तता झाली हे चांगलेच आहे. आपण आपले, दुसर्यांचे सांत्वन करतो. पण आयुष्याने दिलेल्या धड्यांत अजूनही मरणाची अपरिहार्यता स्वीकारणे सर्वांना जमत नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीचे आद्य शोकनायक दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी घेऊन कालची सकाळ उगवली. शोकनायक हा किताब त्यांना उगाच मिळाला नाही. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दु:खदायक काय असेल तर तो जीवनाचा अंत. आयुष्याचा आधार तुटल्यानंतर, मृत्यूला सामोरे जाताना, मृत्यूचे हृदयद्रावक, अंधारमय चित्र त्यांनी अत्यंत प्रभावीरित्या असंख्य चित्रपटांतून रंगवले आहे. त्यांनी साकारलेली, मेला, मुसाफिर, गंगाजमुना, देवदास, अंदाज या चित्रपटतील मृत्यूची दृश्ये हे चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट मरण-क्षण आहेत. ह्या दृश्यांनी अगणित वेळा प्रेक्षकांचे डोळे ओले केले आहेत. या प्रत्येक चित्रपटातील मृत्यूने खरे तर त्यांना त्यांच्या वेळेच्या आधीच अजरामर केले आहे. तरीही शोकनायक ही त्यांची परिपूर्ण ओळख नाही. अभिनयाच्या असंख्य छटा असलेले त्यांचे चित्रपट हे नवरसाचे दर्शन घडवणारे आहेत. आझाद, कोहिनूर, पैगाम, लीडर, मुघल आझम, राम और शाम, गंगाजमुना असे अनेक चित्रपट, ज्यात दिलीपकुमारने रंगवलेल्या व्यक्तिरेखा ह्या अभिनयाचा वस्तुपाठ म्हणून गणल्या जातील. काही मोजके चित्रपट आणि त्यातील त्यांच्या भूमिकेचा इथे दिलेला परिचय अपुरा आहे, याची मला जाणीव आहे; पण असंख्य हिर्यांतून मोजकेच हिरे निवडणे कसलेल्या जवाहिर्यालासुद्धा कठीण आहे.


dilip kumar_2  

देवदास (देवदास)

मार्ग चुकल्याने, स्वत:च्याच नाशाला कारणीभूत होणारे शाश्वत प्रेम म्हणजे देवदास. शरदचंद्र चॅटर्जी यांच्या या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचे अनेक भाषांत रूपांतर झाले. अनेक गाजलेल्या नायकांनी रुपेरी पडद्यावर देवदासला आपला चेहरा दिला. पण या अहंकारी, हट्टी, तापट, चंचल व्यक्तिरेखेला त्याच्या वैगुण्यासकट देवत्व मिळवून दिले, त्यात बिमल रॉय यांचे दिग्दर्शन आणि दिलीपकुमार यांचा अभिनय याचा मोलाचा वाटा आहे.

देवदास या चित्रपटात, मेला, बाबुल, अंदाज, दीदार या चित्रपटांत रंगवलेल्या शोकनायकाचा परमोच्च बिंदू गाठला गेला. सगळ्या दोषांसकट मनात घर करून राहणारा दिलीपकुमार यांचा देवदास हा अत्यंत मानवी आहे, म्हणून त्याचा राग येत नाही, कीवसुद्धा येत नाही. प्रत्येक वेळा पाहताना हृदय पिळवटून टाकण्याचे सामर्थ्य या देवदासमध्ये आहे.

निर्णय घेण्याची क्षमता नसलेला एक क्षण, देवदासच्या आयुष्याची वाताहत होण्यास करणीभूत ठरतो. पारोचे त्याच्यावर अपार प्रेम आहे, त्याच्यासाठी काहीही करायची तिची तयारी आहे. जगाची तिला पर्वा नाही. पण ती कणखर आहे, तशीच स्वाभिमानी आहे. देवदासचा नकार आल्यावर ती आईवडिलांच्या इच्छेपोटी लग्न करते आणि हरलेला, खचलेला देवदास स्वत:ला दारूत बुडवतो. चंद्रमुखीबद्दल त्याला आदर आहे, तिच्या प्रेमाची जाणीव आहे, पण तिला स्वत:च्या हृदयात स्थान देणे त्याला शक्य नाही. खरे तर अजिबात कणा नसलली ही व्यक्तिरेखा, पण दिलीपकुमार यांनी रंगवलेल्या करुण रसाने या भूमिकेची व्याप्ती मोठी झाली आहे.

कौन कंबख्त बर्दाश्त होने के लिये शराब पीता है, मै तो पीता हूँ की सास ले सकूंह्या संवादातील दु:खाच्या अमर्यादित तीव्रेतेने दारूलाही वलय मिळवून दिले. दु:खाचे महाकाव्यच जणू त्यांनी आपल्या अभिनयाने रचले.

काळोखी रात्र, अंत नसलेला रस्ता, एक एकाकी आत्मा अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर आहे.

पारो, मै गया हूँकुणालाही ते पुटपुटणे ऐकू येत नाही. पण ऐकताही हृदयाला स्पर्शून जाणारा संवाद मी अजून कुठेही ऐकला नाही.


dilip kumar_1   

आन (जय)

चढेल, उर्मट राजकन्या, एक सामान्य युवक आणि कारस्थानी खलनायक यांची ही कहाणी शेक्सपिअरच्या टेमिंग ऑफ श्रूया नाटकावर आधारित आहे. कहाणीचा सारांश म्हणजे प्रेम सगळ्या अडचणीवर मात करते. गरीब मुलगा विरुद्ध श्रीमंत मुलगी, भव्य सेट, तलवारबाजी, उत्कृष्ट संगीत, प्रेम आणि ॅक्शन यांचे मिश्रण असलेला हा तसा सामान्य करमणूकप्रधान चित्रपट.

दिलीपकुमार यांच्या प्रतिमेला शोभणारा हा चित्रपट नव्हताच. खरे तर हे आव्हान होते. अपयशी, दुर्दैवी प्रेमीच्या भूमिकेतून बाहेर पडून त्यांनी तलवार हातात घेतली, घोडेस्वारी केली, नायिकेला वठणीवर आणायला दादागिरी केली. त्यांनी एकीकडे म्हटले आहे की ही भूमिका त्यांना फार आवडली नव्हती. असेलही, पण पडद्यावर मात्र त्या नाखुशीचा मागमूसही दिसत नाही. त्यांच्या स्वत:च्या स्वभावाच्या आणि प्रतिमेच्या विरुद्ध ही भूमिका आहे. आन अतिशय गाजला. तामिळमध्ये डब झालेला हा पहिला चित्रपट आहे. फ्रेंच भाषेत डब होण्याचे सौभाग्य ह्या चित्रपटाला मिळाले.


dilip kumar_1  

मधुमती (देवेंद्र/आनंद)

बिमल रॉय दिग्दर्शित मधुमती हा चित्रपट, ऋत्विक घटक यांच्या कथेवर आधारित होता. ही पुनर्जन्मावर आधारित एक संगीतमय रहस्यकथा आहे. भूतकथा असेल तर पावसाचे अस्तित्व असतेच. चित्रपटाच्या सुरुवातीलाच धुंवाधार पाऊस आहे. वादळी रात्र, जुनीपुराणी हवेली, पहिल्यांदाच भेट दिली असली तरी जागोजागी असणार्या ओळखीच्या खुणा. पावसाच्या सोबतीने देवेंद्रचा गतजन्म पडद्यावर साकारू लागतो. देवेंद्राची जागा आता आनंद घेतो.

आनंद हा नावाप्रमाणेच आनंदी तरुण. त्याला गरिबांविषयी आस्था आहे. तो धीट आहे. सुशिक्षित आहे. शहरातून श्यामनगरच्या टिंबर इस्टेटमध्ये मॅनेजर म्हणून आला आहे. इथे एका वनकन्येशी - मधुमतीशी त्याची ओळख होते. प्रेम फुलते आणि त्याला एका दुष्टाची नजर लागते. मधुमतीचा दुर्दैवी अंत होतो. त्यानंतर तिच्या मृत्यूचा शोध आणि अपराध्याला शासन यावर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपट नायिकेचा असूनही दिलीपने आपली भूमिका सफाईदारपणे निभावली आहे.

सुरुवातीचा आत्मविश्वासाने वावरणारा आनंदी तरुण, नंतर मधुमतीच्या अकस्मात नाहीसे होण्याने खचलेला, गोंधळलेला, भांबावलेला आनंद. मधूच्या नाहीसे होण्यामागे उग्रनारायणाचा हात असल्याचे समजल्यावर बदलाच्या आगीने पेटून उठलेला आनंद नि बदला घेऊनही त्यातली निरर्थकता जाणवल्यावर, जगण्याची इच्छा गमावून बसलेला आनंद. स्वत:वर फोकस नसेल, तरी उत्तम अभिनेत्याचा पगडा राहतोच हे सिद्ध करणारी ही भूमिका.


dilip kumar_1  

नया दौर (शंकर)

सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारे जे काही चित्रपट स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झाले, त्यातला एक चित्रपटनया दौर’. गावातील माणसांचा विकास साधतानाच सर्वंकष यांत्रिकीकरणाला विरोध अशी या चित्रपटची थीम होती. विकास अशा दिशेने होऊ नये, ज्यायोगे पैशाच्या ताकदीपुढे माणसाच्या माणुसकीचा र्हास होईल, हा मुद्दा या चित्रपटात फार प्रभावी पद्धतीने मांडला गेला. याचबरोबर दोन मित्र, त्यांच्यातील प्रेम, त्यात दुरावा येण्यास कारणीभूत ठरलेली स्त्री, त्यामुळे झालेला प्रेमाचा त्रिकोण असे अनेक पैलू या कथेला होते.

दिलीपकुमारने यात एका टांगेवाल्याची (शंकर) भूमिका केली आहे. नेहमीच्या शोकनायकापेक्षा ही भूमिका वेगळी आहे. तो मोकळा आहे, काहीसा आक्रमक आहे, जिद्दी आहे. रजनीला आपले प्रेम सांगताना तो कचरत नाही. तिची चेष्टामस्करी करणारा शंकर हा दिलीपने रंगवलेल्या इतर अंतर्मुख प्रियकारांपेक्षा खूप वेगळा आहे. किशनशी (अजित) त्याची खरी मैत्री आहे. त्याने गैरसमज करून घेतला म्हणून दुखावलेला शंकर, रजनी नसती तर आमच्यात दुरावा आला नसता हे समजून रजनीवर चिडणारा शंकर, भावनेच्या भरात पैजेचे आव्हान स्वीकारणारा शंकर, डगमगून जाता जिद्दीने गावकर्यांना एकत्र आणून पैज जिंकणारा शंकर.. वास्तवात येणार्या या परिकथेला वास्तववादी बनवण्यात दिलीपकुमार यांच्या अभिनयाचा मोठा वाटा आहे.

अंदाज (दिलीप)

1949 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या वेळचे तीन टॉप स्टार्स एकत्र आणले - राज कपूर, दिलीपकुमार आणि नर्गिस. राज कपूर आणि दिलीपकुमार एकत्र असलेला हा पहिला आणि शेवटचा चित्रपट. पडद्यामागची मैत्री मात्र शेवटपर्यंत अबाधित होती.

पडद्यावरचा हा पहिला गाजलेला त्रिकोण. दिलीप आणि नीना यांची मैत्री असते. घनिष्ठ मैत्री. नीना परदेशात वाढली असल्याने त्या मैत्रीत मोकळेपणा असतो. या मैत्रीचा अर्थ दिलीप चुकीचा घेतो. तो नीनाच्या प्रेमात पडतो आणि तिचेही आपल्यावर प्रेम आहे हे गृहीत धरतो. निनाचे राजनवर प्रेम असते. दिलीपसाठी हा धक्का असहनीय असतो. तो नैराश्येत ओढला जातो. नीनाची मैत्री खोटी नाही, पण तिचे दिलीपवर प्रेम नाही. प्लेटॉनिक प्रेम असू शकते का? एक तरुण आणि तरुणी केवळ मैत्रीच्या नजरेने एकमेकांकडे पाहू शकतात का? हा विचारच तेव्हा भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन होता.

चित्रपटतील पात्रे त्याला अपवाद नाहीत. राजनच्या मनात शंकेचे वादळ निर्माण होते. दिलीपला प्रेमभंगाचे दु: आहे, तर राजनला विश्वासघाताचे. या संशयकल्लोळाची शोकांतिकेकडे वाटचाल होणे अटळ आहे. एकतर्फी प्रेम करणार्या प्रेमिकाची भूमिका दिलीपकुमार यांच्या वाट्याला आली. अतिशय संयतपणे नि कुठेही मेलोड्रामा करता त्यांनी ही भूमिका वठवली आहे.

प्रेमातली असोशी, तिच्यासाठी काहीही करायची तयारी, एकाच वेळी लाघवी आणि गुदमरून टाकणारी. ती तीव्रता दडपवणारी. “तू कहे अगर जीवनभर, मैं गीत सुनाता जाऊँहे गीत केवळ त्याच्या डोळ्यातील आर्तता पाहण्यासाठी पाहावे.


dilip kumar_1  

मुघल आझम (राजपुत्र सलीम)

मुघल आझम हा चित्रपट भावना, नाट्य आणि थरार याचा योग्य मेळ असलेली शोकांतिका आहे. के. असिफ यांचे हे स्वप्न साकारायला अनेक वर्षे लागली, पण जे काही सिनेपडद्यावर चित्रित झाले, ती भव्यता शब्दात मांडणे अशक्य आहे. सम्राट अकबराविरुद्ध बंड करणारा राजपुत्र सलीम आणि सौंदर्यवती नर्तिका अनारकली यांची ही प्रेमकहाणी. सलीमची भूमिका साकारणे सोपे नव्हते. गादीचा वारस तर आहे, पण वडिलांचा करिश्मा मागे टाकणे त्याला शक्य नाही, त्याची तेवढी कर्तबगारी नाही. लहानपणातच वाईट संगत मिळाल्याने, त्याला सुधारवण्यासाठी लांब ठेवले आहे.

 

त्यामुळे मुळातच वडिलांबद्दल एक अढी मनात बसली आहे . राजपुत्र प्रेम तर करू शकतात, पण लग्न नाही. सलीमला मात्र नकार घेण्याची सवय नाही. आईचे प्रेम, वडिलांप्रती, पर्यायाने राज्याप्रती असलेलं कर्तव्य त्याला अडवू शकत नाही. नियतीने आखलेल्या पटावर सामान्यांचा बळी जाणे हे क्रमप्राप्त आहे.

 

राजकुमाराच्या रूपात असलेल्या दिलीपला या चित्रपटात एकही गीत नाही. त्या भूमिकेचा आब ठेवण्यासाठी हे आवश्यक होते. पृथ्वीराज कपूर आणि दिलीपकुमार यांची जुगलबंदी हेसुद्धा या चित्रपटचे मोठे आकर्षण आहे.

 

हे काही मोजके चित्रपट मी इथे मांडले. पण गंगाजमुना, मेला, जोगन, अमर, दाग, मुसाफिर.. किती नावे घायची! कारुण्यरसाला त्यांनी प्रतिष्ठा दिली. नियतीची कठोरता विनातक्रार स्वीकारण्याची जिद्द त्यांनी आपल्या शोकनायकांना दिली, म्हणून त्या दुबळ्या वाटल्या नाहीत. जी भूमिका त्यांनी निवडली, त्यात ते मिसळून गेले. एकरूप झाले, त्यामुळे त्या भूमिकेच्या सर्व पैलूंना त्यांनी न्याय दिला. पात्रांना वाटणार्या संवेदनांचा त्यांनी मागोवा घेतला म्हणून असेल, या सर्व भूमिकांना अमरत्व प्राप्त झाले.

भावनांची तीव्रता व्यक्त करताना हालचालींचा कमीत कमी वापर करणे, भावनेने ओथंबलेला आवाज, योग्य ठिकाणी पॉज घेण्याची समज ही त्यांची खासियत इतर अभिनेत्यांसाठी अभ्यासाचा विषय बनली. आपल्या कर्तृत्वाने, अभिनयाने दिलीपकुमार जिवंतपणीच एक आख्यायिका बनले होते. कालची बातमी काही अनपेक्षित नव्हती, तरीही उदास करून गेली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाची काल सांगता झाली. शेवटची कडी तुटली. देहाचा प्रवास जरी संपला, तरीही दिलीपजी राहतील. लोकांच्या स्मरणात, त्यांनी रंगवलेल्या, पडद्यापेक्षाही मोठ्या झालेल्या त्यांच्या भूमिकांत, त्यांच्या गीतांत नेहमीच राहतील.