ईशान्येचे क्रीडारंग

विवेक मराठी    14-Aug-2021
Total Views |
 बिकट परिस्थितीचा उन्नतीसाठी कसा वापर करून घ्यावा, हे ईशान्य भारतातील लोकांकडून शिकण्यासारखे आहे. आपली शक्तिस्थळे ओळखून, त्यावर प्रचंड मेहनत घेऊन हे लोक आपल्याला आणि आपल्याबरोबर आपल्या समाजाला अशा उंचीवर नेऊन ठेवीत आहेत की पाहणारा विस्मयचकित होईल. ‘समोर येईल त्या अडचणीची पायरी करून मी वर चढेन’ या ईशान्य भारतीयांच्या ‘किलिंग स्पिरिट’मुळे आजवर आणि यापुढेही त्यांच्याकडून भारतीय समाजाला अनेकविध पदकांची वाढती अपेक्षा आहे.

olyampic_1  H x
23 जुलै ते 8 ऑगस्ट टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमुळे जगभरातील सगळ्या क्रीडाप्रेमी विश्वात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे. विविध क्रीडाप्रकार, जागतिक उच्चांक, प्रशिक्षणे, खेळाडूंनी गाजवलेले पराक्रम, त्यांची जीवनशैली, सुवर्णपदक मिळाले ते क्षण, त्यांची ट्वीट्स अशा लाखो गोष्टींची सध्या सोशल व प्रमुख मीडियांत रेलचेल आहे. भारतीय जनमानसाला सुखावणारे अनेक सुंदर क्षण या स्पर्धेने दिले आहेत. भारतीय खेळाडू कांस्य, रौप्य, सुवर्ण अशा सात पदकांचे मानकरी ठरले आहेत.

कौतुकास्पद बाब म्हणजे यातील दोन पदके ईशान्य भारतीय महिलांनी भारताला मिळवून दिलेली आहेत. वैयक्तिक क्रीडाप्रकारात मणिपूरच्या 27 वर्षीय मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमधील रौप्यपदक जिंकून भारतीय पदकांची मालिका सुरू केली. पुढे आसामच्या लवलिना बोर्गाहेनने मुष्टियुद्धात कांस्यपदक जिंकले. पी.व्ही. सिंधू, रविकुमार दाहिया, पुरुष हॉकी टीम, बजरंग पुनिया यांची पदके, तसेच नीरज चोप्राचे देदीप्यमान सुवर्णपदक भारतीय बाळगोपाळांच्या डोळ्यांत आज नवी स्वप्ने रुजवत आहे.
ईशान्य भारताच्या क्रीडाविश्वातील यशस्वी घोडदौडीचा आढावा घ्यायचा, तर सिक्कीमचा फुटबॉलपटू - ‘सिक्किमी स्नायपर’ बायचुंग भुतिया याचे नाव सुरुवातीला येतेच.

38 वर्षीय ‘मॅग्निफिसंट मेरी’ म्हणून ओळखली जाणारी मणिपूरची मेरी कोम ही तर हौशी (राशींर्शीी) मुष्टियुद्धात सहा वेळा अव्वल ठरलेली जगातील एकमेव महिला आहे. तिच्या जीवनपटामुळे तर भारतीय तरुण रक्ताला क्रीडाविश्वाची काही वेगळीच झिंग चढू लागली.

त्रिपुराच्या दीपा करमाकरचे जिमनॅस्टिक्समधले कसब पाहून भल्याभल्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.
जिच्याकडे धावण्यासाठी चांगले बूटही नव्हते, अशा हिमा दासच्या नावाने आंतरराष्ट्रीय कंपन्या आज आपले बूट विकत आहेत.
ईशान्येतील राज्यांतील गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी करणार्‍या सोमदेव बर्मन, शिवा थापा, बोमबायलादेवी लैश्राम, जेजे ललपेक्लुआ, सुशीला चानू, जयंत तालुकदार, संजीता चानू, चेक्रोवोलू स्वुरो, लैश्राम सरितादेवी, देबेंद्रा सिंग... अशी किती खेळाडूंची नावे घ्यावी?

याचा मागोवा घेत गेले की काही महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनास येऊ लागतात. ईशान्य भारतातील क्रीडाप्रतिभेला वाव मिळावा, म्हणून भारत सरकारने गेल्या सहा वर्षांत विशेष प्रयत्न केलेले आपल्या लक्षात येतात. यातील ‘सीमावर्ती भूभाग विकास कार्यक्रमाअंतर्गत’ ईशान्येतील सीमावर्ती जिल्ह्यांत मुष्टियुद्ध, तिरंदाजी, नेमबाजी आणि मार्शल आर्ट या क्रीडाप्रकारांची आवड रुजावी, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले गेले आहेत. अरुणाचल प्रदेशचे खासदार मा. मंत्री किरेन रिजीजू क्रीडामंत्री असताना त्यांनीही अनेक गोष्टींचे बारकाईने नियोजन केले.
 
olyampic_2  H x
त्यांनी ईशान्येत साहसी क्रीडाप्रकारांचे पर्यटन सुरू केले. गटका, कलारीपयट्टू, थांग-ता आणि मल्लखांब या चार खेळांना राष्ट्रीय खेळांत स्थान देऊन त्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना मोठा आधार मिळवून दिला. खेळांमध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणजे बीसीसीआयला त्यांनी नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या देखरेखीखाली आणले. राष्ट्रीय पुरस्कारांच्या रकमेत माजी मंत्र्यांनी जाहीर केलेली वाढ अतिशय उत्साहवर्धक आणि आनंददायक, तसेच आवश्यक होती. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रक्कम आधीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 7.5 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांवर गेली आहे. अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य लाइफटाइम पुरस्कारांची रक्कम 5 लाखांवरून 15 लाख झाली आहे. किरेन रिजीजू यांनी क्रीडाक्षेत्रासाठी वाढवलेले बजेट हीसुद्धा खेळाच्या क्षेत्राच्या विकासातील एक महत्त्वाची पायरी ठरत आहे. त्यांनी सुरू केलेली ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ आता चांगलीच मूळ धरू लागली आहे. ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाची व्याप्तीही दिवसागणिक वाढतेच आहे. या योजनेत संपूर्ण भारतातील 14 वर्षांखालील व 17 वर्षांखालील दोन वयोगटांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची तरतूद आहे, जेणेकरून खेळांमध्ये मुला-मुलींना मोठ्या प्रमाणावर सहभागी होता येईल. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळेल, या दृष्टीने आर्थिक नियोजन केले गेले आहे. खेळाच्या क्षेत्रातली मा. मंत्री राज्यवर्धन राठोड यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे.

जेव्हा खेळांसाठी निधी उपलब्ध करणे आणि त्याचा वापर करणे असा विषय येतो, तेव्हा ईशान्येकडील राज्यांचा उत्साह काही औरच असतो. राजीव गांधी खेल अभियान (आरजीकेए) आणि नागरी क्रीडा पायाभूत सुविधा योजना (यूएसआयएस) अंतर्गत ईशान्येच्या राज्यांत 2014-16मध्ये 191 कोटी खर्च झाले, राष्ट्रीय मागणीच्या 17.2% ईशान्येकडून आली. 16-17 सालच्या आकड्यांनुसार आसामच्या बजेटमधील 35% खर्च शिक्षण व क्रीडा क्षेत्रासाठी ठेवण्यात आला होता. इतर राज्यांची या क्षेत्रासाठीची सरासरी 15.6% आहे. यावरून ईशान्य भारत क्रीडा क्षेत्रासाठी किती मेहनत घेतो, याला किती प्राधान्य देतो हे आपल्या लक्षात येईल. अर्थात भारताला ईशान्येने मिळवून दिलेल्या पदकांतून आपल्याला याचे सुपरिणाम दिसून येतच आहेत

ईशान्य भारतातील अर्थकारण प्रामुख्याने शारीरिक मेहनतीवर अवलंबून आहे. इथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. अगदी लहान मुलांपासून ते म्हातार्‍याकोतार्‍यांपर्यंत सगळे काही ना काही शारीरिक मेहनतीच्या उद्योगात दिवसभर व्यग्र असतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमतेची पूर्वतयारी आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू होते असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. तसेच ईशान्य भारतातील जनजातीय समाजांतील अनेक उत्सवांत, लग्नकार्यांत विविध खेळांचे खूप महत्त्व आहे. लग्नकार्यात लांब उडी, उंच उडी, भालाफेक, धनुष्यबाण असे खेळ तर अनेक ठिकाणी असतात. तिथले अनेक नृत्यप्रकारही शारीरिक चपळता, प्रसंगावधान, सावधानता आवश्यक असणारे आहेत. छोट्या छोट्या हजारो वाड्यावस्त्यांवर राहणारे हे समाज एकमेकांशी जुळवून घेणे, टीम स्पिरिट इत्यादी अंगभूत गुणांच्या जोरावरच तर पृथ्वीतलावर आतापर्यंत टिकून आहेत. त्यांचा नैसर्गिक आहार हाही त्यांच्या एकूण शारीरिक क्षमतांच्या बाबतीतला महत्त्वाचा घटक आहे. फारसे मसाले न वापरता नैसर्गिकरित्या बनलेले अन्न हे इथले सामान्य जेवण आहे. इथे रोजच्या आहारात सामिष आहाराचाही समावेश केला जातो.

ईशान्य भारतीय समाजात मला प्रामुख्याने जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची ‘स्वत:च्या अस्मितेसाठी चाललेली धडपड’. या जगाच्या पसार्‍यात आपले नाव ठळकपणे उठून दिसावे, अशी तीव्र भावना मला विशेषत: तरुण पिढीत जाणवली. कधी ती चित्रविचित्र प्रकारे रंगवलेल्या, कापलेल्या केसांतून, जागोजागी केलेल्या गोंदणांतून प्रतीत होते, कधी फुटीरतावादी चळवळींचा आकार घेते, तर कधी मेरी कोम, हिमा दास, बायचुंग भुतिया किंवा मीराबाई, लवलिना यांचे रूप घेते आणि सगळ्या जगाला भारतीय शक्तीचा परिचय करून देते.
 
आलेल्या बिकट परिस्थितीचा उन्नतीसाठी कसा वापर करून घ्यावा, हे या लोकांकडून शिकावे. आपली शक्तिस्थळे ओळखून, त्यावर प्रचंड मेहनत घेऊन हे लोक आपल्याला आणि आपल्याबरोबर आपल्या समाजाला अशा उंचीवर नेऊन ठेवीत आहेत की पाहणारा विस्मयचकित होईल.
 
सामान्य जगाला लागू असणारे कोणतेही नियम यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यापासून रोखू शकत नाहीत. मग कसल्याही साधनांची कमतरता असो, तीन तीन मुलांचे मातृत्व असो, भाषासंस्कृतीतली तफावत असो की सुरुवातीला असणारी न्यूनगंडाची भावना असो.. ‘समोर येईल त्या अडचणीची पायरी करून मी वर चढेन’ या ईशान्य भारतीयांच्या ’किलिंग स्पिरिट’मुळे आजवर आणि यापुढेही त्यांच्याकडून भारतीय समाजाला अनेकविध पदकांची वाढती अपेक्षा आहे.