धन्य धन्य धन्ना भगत

विवेक मराठी    09-Aug-2021
Total Views |
धन्ना भगत यांनी समाजाला कोणता उपदेश केला? ते म्हणाले की, ‘आपला देवावर अतूट विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे. आपण भावभक्तीच्या बळावरच परमेश्वराशी नाते जोडू शकतो. या जगात भगवंताच्या इच्छेनेच सर्व घडामोडी होत असतात. अशा देवाची कोणीही भीती बाळगू नये. आपल्या हृदयात देवाबाबत प्रेमच असले पाहिजे. तोच आपला तारणहार आणि मायबाप आहे.’

sant_1  H x W:  
लोकमान्य टिळकलिखित गीतारहस्य या प्रसिद्ध ग्रंथात ‘अध्यात्म’ नामक नववे प्रकरण आहे. यामध्ये लोकमान्य सांगतात - ‘अद्वैत वेदान्ताचे हेच सिद्धान्त गीतेत दिलेले असून एका जुन्या कवीने -
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रन्थकोटिभि:।
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:॥
‘कोट्यवधी ग्रंथांचे सार अर्ध्या श्लोकात सांगतो - (1) ब्रह्म सत्य, (2) जग म्हणजे जगातील सर्व नामरूपे मिथ्या किंवा नाशवंत, आणि (3) मनुष्याचा आत्मा व ब्रह्म ही मुळात एकच आहेत, दोन नाहीत, असे सर्व अद्वैत वेदान्ताचे सार वर्णिले आहे.’
या ठिकाणी हे भाष्य देण्याची कारणे दोन आहेत. एक म्हणजे, रामानंदाचार्यांच्या प्रसिद्ध बारा पट्टशिष्यांतील थोर शिष्योत्तम धन्ना जाट हे आपल्या रचनेत असे सांगतात - ‘हे मानवा, भगवंतापासून आपला द्वैतभाव जोपासत तू कित्येक जन्म वाया घालविले आहेस. हे शरीर, संपदा आणि ऐहिक वैभव सारे काही नाशिवंत आहे. तुझा लोभ आणि विषयभोगाची लालसा यामुळेच या विश्वाचा निर्माता असणार्‍या भगवंताशी तुझी ताटातूट झालेली आहे. तरीसुद्धा अजूनही याच पापवासनाच्या आकर्षणातून मानवाची सुटका होत नाही, ही फार खेदाची गोष्ट आहे. भौतिक सुखाची साधने गोळा करण्याच्या आणि ऐहिक लालसेच्या कामात तो इतका बुडला आहे की नामसंकीर्तनाचे महत्त्व तो पार विसरून गेला आहे. भगवंताचे नाव हीच खरी दैवी संपदा आहे आणि मानवाने तीच गोळा करायला हवी, कारण ही संपदाच त्याची खरी आध्यात्मिक उन्नती घडवून आणते.’ धन्ना जाट यांची ही रचना शिखांचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथसाहेबमध्ये समाविष्ट केलेली आहे.
आता आपण दुसर्‍या कारणाकडे वळू या. धन्ना भगत हे जातीने जाट होते आणि त्यांची रचना आढळते ती शिखांच्या गुरुग्रंथसाहेबमध्ये. शिवाय ते महान वैष्णव रामानंदाचार्यांचे पट्टशिष्य होते. या सर्व गोष्टी एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पुरेशा आहेत. पण ते पूर्ण होऊ नये, म्हणून काही लोक जीव तोडून झटत आहेत. आपल्याकडे टिळा, भस्म आणि गंध लावण्याच्या पद्धतीत भरपूर फरक असला, तरी परमोच्च ईश्वरी तत्त्व म्हणजे परब्रह्म एकच आहे, ही गोष्ट सर्वच जण मान्य करतात. हा अद्वैत सिद्धान्तच आपल्या भारतीय विचारधारेचा मूलाधार आहे. अध्यात्म म्हणजे हेच अद्वैत हे लोकमान्यांनी गीतेची साक्ष काढून सांगितले आहे.
एक मराठी कवी आपल्या दलित मास्तरांना उद्देशून असा प्रश्न विचारतो -
‘उभ्याच आहेत रेषा भागाकाराच्या वेशीच्या
मास्तर, तुम्ही जोडलेले वर्तुळ कुठे आहे?’
- भागाकाराचे चिन्हसुद्धा कसे विचित्र आहे. यामध्ये एक रेषा दोन बिंदूंना वेगळे करत असते. हीच जणू भागाकाराची वेस आहे आणि ती समाजात वेशीच्या आतील व वेशीच्या बाहेरचे असे दोन उभे तट पाडते.
आज आपण संतांनासुद्धा असा प्रश्न विचारू शकतो. कारण सर्व संतांनी एकमुखाने जीव म्हणजे सर्व भूतमात्र आणि भगवंत म्हणजे ब्रह्म यांच्या एकत्वाचा सिद्धान्त मांडला. हा सिद्धान्त मांडत असताना त्यांना जात, धर्म, भाषा, प्रांत, देश, खंड यांच्या सीमारेषा आडव्या आल्या नाहीत. पण आजचे तथाकथित विद्वान अशा भेदभावाच्या रेषा आखण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे संतविचाराची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्यावाचून पर्याय नाही. या भेदभावाच्या रेषा कशा आखल्या जातात?
‘जाट एकता’ घडविण्यासाठी एक मंच प्रयत्नशील आहे. त्यांचा प्रचार काय सांगतो ते पाहा - ‘धन्ना भगत यांचा इतिहास अन्य बिगरब्राह्मण महापुरुषांप्रमाणे दंतकथांमध्ये सामावून गेला आहे. धन्ना, दादू, कबीर, रैदास, कर्माबाई इत्यादी संतांच्या मागे बिगरब्राह्मण संघटना स्थापन होऊ शकली नाही, म्हणून त्यांची वाणी दोहे आणि भजनाच्या माध्यमातून शेतकरीवर्गाच्या घराघरांतून गायिली जाते... अन्य संतांच्या अनुयायांत ब्राह्मणधर्मापासून वेगळे होण्याची हिंमत नसल्यामुळे ते ब्राह्मणधर्माच्या आसपासच अध्यात्माचा शोध घेत राहिले. याच दुर्बळ मानसिकतेमुळे ब्राह्मणधर्म व्यवस्थेच्या मगरमिठीतून त्यांची सुटका होऊ शकली नाही आणि या संतांच्या जागृतीकार्यांमध्ये कपोलकल्पित चमत्कारांच्या कहाण्यांची जोड देऊन भ्रम निर्माण करण्यात आला... धन्ना जाट हे मूर्तिपूजेचे विरोधक होते. पण त्यांच्या जीवनात अशा काही गोष्टींचे बेमालूम मिश्रण करण्यात आले की त्यामुळे ब्राह्मणशाहीला विरोध करणारे लोक त्यांच्या चळवळीतून बाजूला पडले.’
पुढील वाक्य तर अगदी विनोदी आहे - ‘इस्लामी कट्टरपंथींच्या आणि मौलवींच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी निर्माण झालेले सूफी संत मोइनुद्दिन चिश्ती आणि निजामुद्दिन अवलिया यांच्या बाबतीतही हेच घडले.’ पाहा! म्हणजे या देशात सगुण भक्तिचळवळ निर्माण करणारे मूर्तिपूजक ते खरे ब्राह्मणशाहीवादी आणि मूर्तिभंजकांचा वारसा पुढे नेणारे सूफी ते मात्र मानवतावादी!!
धन्ना जाट यांच्या चरित्रातील दंतकथा म्हणून येणारा भाग कोणता आहे? तर, जसे नामदेवांचे वर्णन केले जाते की -
नोहे हा सामान्य महिमा संतांचा।
नैवेद्य हातीचा मूर्ति जेवे॥
म्हणजे, संत नामदेवाने विठोबाला नैवेद्य जेवू घातला होता असे वर्णन वारकरी संप्रदायात आढळते. तशीच कथा धन्ना जाट यांच्या बाबतीत सांगितली जाते. शाळिग्रामरूपी भगवंताने आपला नैवेद्य ग्रहण केला नाही, म्हणून बालक धन्ना अत्यंत दु:खी होतो आणि तो पुन्हा पुन्हा देवाच्या पाया पडून त्याला नैवेद्य खाण्यासाठी विनवितो. भगवंत जोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही तोपर्यंत आपणही अन्नपाण्याचा त्याग करावा, असे धन्ना ठरवितो. त्याची भोळी भक्ती पाहून देव प्रकट होतात आणि त्याच्या हातचा नैवेद्य खातात. याचे वर्णन पुढील पदात करण्यात आले आहे -
‘बार बार पाँव परै, अरै, भूख प्यास तजी,
धरै हियै साँचौ भाव पाई प्रभु प्यारियै।
छाक नित आवै निकै, भोग को लगावै,
जोई छोड सोई पावै, प्रीति रीति कछु न्यारियै॥’
थोडक्यात, प्रभुप्रीतीची न्यारीच रीत आहे, असे या घटनेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भक्तमाल’ ग्रंथात नाभादास यांनी हे वर्णन केले आहे आणि त्यांच्या या ‘छप्पय’ रचनेवर भाष्य करताना प्रियादास यांनी वरील रचना केलेली आहे.
मात्र भक्तिचळवळीशी फटकून राहण्याचे व्रत घेतलेले लोक याबाबत काय म्हणतात ते पाहा - ‘धन्ना भगत सांगतात की, दगडाच्या मूर्तीत देव मुळीच नसतो. जर दगडाची पूजा करायची असेल तर माळरानात पूजा करण्यासाठी खूपच दगड पडले आहेत. पण ब्राह्मणवादी लोकांनी खुद्द धन्ना भगत यांच्या हातूनच दगडाच्या मूर्तीला नैवेद्य खाऊ घातला आहे.’
असे सांगून हेच लोक पुढे आवाहन करतात - ‘आपल्याला धन्ना भगत यांचे खरे चरित्र आणि खरे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले संत आणि महापुरुष यांच्या विचारांकडे ब्राह्मणवादी मानसिकतेमधून बाहेर पडूनच पाहायला हवे. गुप्तकाळ हा काही ‘स्वर्ण’काळ नव्हता, तो तर ‘सवर्ण’काळ होता. या सवर्णांच्या विरोधात या महान संतांनी बंड पुकारले होते. हे संत एखाद्या विशिष्ट जातिधर्मापुरते मर्यादित नव्हते, तर ब्राह्मणशाहीच्या जोखडाखाली चिरडून गेलेल्या बहुजनवर्गाचे नेतृत्व करणारे हे संत होते. या संतांनी एकमुखाने सांगितले की, ज्याला आपण भगवंत अथवा ईश्वर म्हणतो, तो तर या सृष्टीच्या कणाकणांत भरलेला आहे आणि तो कुणालाही सुलभपणे प्राप्त होऊ शकतो. ईश्वर म्हणजे सवर्णांनी जेरबंद करून ठेवलेला अपराधी नव्हे की त्याला भेटण्यासाठी तुम्हाला धर्मगुरूंची आणि पुरोहितांची परवानगी काढावी लागणार!’
एका विशिष्ट समाजाच्या एकतेबाबत बोलताना आपण समाजात मात्र फुटीरतावादी विचार पेरत आहोत, याचे या लोकांना भानही नसते. ईश्वर हा कणाकणांत भरलेला आहे असे एका तोंडाने सांगायचे आणि वर एका विशिष्ट समाजावर टीकासुद्धा करायची, असा दुतोंडीपणा यांच्या विचारात दिसून येतो.
संतांचे चमत्कार सोडून त्यांच्या विचारांचे आपण पाईक झालो पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण सामाजिक समरसता आणि एकोपा वाढीसाठी ते विचार कसे उपयुक्त राहतील, हे आपण सतत पाहिले पाहिजे. जे या संतांच्या मनातसुद्धा आलेले नसतील अशा गोष्टींचे भाष्यकार सध्या लोक बनले आहेत. स्वत: संतांनीही तत्कालीन कुप्रथांवर टीका केलेली आहे, मात्र अशी टीका करताना संतांची भूमिका ही मातृहृदयाचीच होती. आपले बाळ सुधारावे म्हणूनच आई त्याला कठोर वचने सुनावत असते आणि क्वचितप्रसंगी फटकासुद्धा देत असते. त्यामागे कोणताच दुष्ट हेतू नसतो.
धन्ना भगत यांनी समाजाला कोणता उपदेश केला? ते म्हणाले की, ‘आपला देवावर अतूट विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे. आपण भावभक्तीच्या बळावरच परमेश्वराशी नाते जोडू शकतो.’ सामान्य लोकांना हे समजावून सांगण्यासाठी धन्ना भगत काही उदाहरणे देतात. धन्ना भगत असे सांगतात, ‘भगवंत हा सर्वव्यापी आहे. दगडाच्या आत बसलेल्या लहानसहान जीवजंतूंचेही तो पोषण करतो. (येथे पुन्हा संत रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेचा दृष्टान्त देता येतो, जेथे दगड फोडल्यानंतर आतून जिवंत बेडूक आढळतो.) मातेच्या गर्भाशयात असलेल्या गर्भाचेही तोच पोषण करतो. या जगात भगवंताच्या इच्छेनेच सर्व घडामोडी होत असतात. अशा देवाची कोणीही भीती बाळगू नये. आपल्या हृदयात देवाबाबत प्रेमच असले पाहिजे. तोच आपला तारणहार आणि मायबाप आहे.’
धन्ना भगत यांच्याबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे ऐहिकाचे भान असलेला हा संत आहे. त्यामुळे आपल्या संसारासाठी भगवंताकडे काही मागताना त्याला मुळीच संकोच वाटत नाही.
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी।
पुरवावी आळी मायबापे॥
असे संत तुकाराम म्हणतात आणि पुढे गृहस्थाश्रमातील लोकांना ते असा उपदेश करतात -
मेळवूनि धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी॥
 
त्यामुळे संतांनी ऐहिक जगताकडे पूर्ण पाठ फिरविली होती हे म्हणणे धादांत असत्य आहे. केवळ त्यांना ऐहिक जगताची नश्वरता कळलेली होती आणि ती त्यांनी समाजाच्या ध्यानात आणून देण्यासाठी आटापिटा केला, एवढेच त्यात तथ्य आहे. त्यामुळे आदिग्रंथात संकलित एका पदात भगवंताची आरती करताना धन्ना भगत देवाला म्हणतात -
‘तुजला ओवाळू गोपाळा।
कार्य तयांचे सावरशी, जे भजती तुजला॥
डाळ शिधा आणिक तूप दे।
मजला आनंदे नांदू दे॥
वस्त्र चांगले अन् जोडा दे।
नांगरल्या भूमी धान्य पिकू दे॥
दुधासाठी दे म्हशी गोमाता।
घोडी चांगली देई आता॥
घरी असावी चांगली गृहिणी।
सेवक धन्ना तू पुरवि मागणी॥’
असे म्हणतात की, ‘भूखे भजन न होय गोपाला!’ म्हणजे रिकाम्या पोटी परमार्थ होत नाही. दासबोध ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या समासात विमल लक्षण सांगताना समर्थ रामदासदेखील म्हणतात -
प्रपंच सांडुनि परमार्थ केला। अन्न मिळेना खावयाला॥
मग त्या करंट्याला। परमार्थ कैचा॥
म्हणजे समर्थांनी करंटा म्हणून अविवेकी माणसाची संभावना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर धन्ना भगत यांचे सांगणे काहीच गैर नाही.
गुरू अर्जुन देव यांनी श्री गुरुग्रंथसाहेबमध्ये धन्ना भगत यांच्याबद्दल असे सांगितले आहे -
‘हे ऐकून धन्ना जाट भगवंताच्या सेवेत रत झाला. तो विश्वंभर परमात्मा मग तया भेटला. धन्नाशी इतुका आशीर्वाद लाभला. (पृ. 488)’
‘नामदेव, जयदेव, कबीर, त्रिलोचन आणिक निम्न जातीचा रैदास चांभार, सेना न्हावी आणि धन्ना यावर कृपा झाली. जे संतांच्या संगतीला लागले ते ईश्वराप्रती पोहोचले. (पृ. 835)’
‘हे मना, नामसंकीर्तन कर! नाम घेई भगवंताचे आणि तरुनी जावे पार! शेतकरी धन्ना आणि डाकू वाल्मिक गुरुमुख झाला आणि तरुनी गेला. (पृ. 995)’
 
अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात इ.स. 1415मध्ये राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील धुवन नावाच्या गावात धन्ना भगत यांचा जन्म झाला. संत नामदेव, संत कबीर, संत रैदास, संत सेना न्हावी यांची चरित्रे ऐकून धन्ना यांच्या मनातही भगवद्भक्तीची भावना जागृत झाली. यांच्याप्रमाणे आपणही परमेश्वराची भक्ती करावी आणि देवाला आपलेसे करावे असे त्यांना वाटले. त्यांचे मनोरथ भगवंताने खरोखर सिद्धीस नेले.
 
अनेक संतचरित्रांत एकसारखे दाखले आढळतात. संत एकनाथांच्या घरी भगवंत श्रीखंड्या नावाचा सेवक बनून कावडीने पाणी वाहत असे, ही गोष्ट महाराष्ट्रातील सर्वांना ठाऊक आहे. धन्ना जाट यांच्याकडेही भगवंत ‘सौझिया’ या नावाने सेवक बनून त्यांच्या शेताची राखण करीत असे, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. येथे चमत्काराची पाठराखण करण्याची भावना नाही, पण पारमार्थिक क्षेत्रात धन्ना भगत यांची उंची केवढी मोठी होती, हे सांगण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.