Dismantling Global Hindutva एक फसलेला डाव

विवेक मराठी    16-Sep-2021
Total Views |
@विकास देशपांडे
 
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये Dismantling of Global Hindutva हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. परंतु ही परिषद नक्की कोणती संघटना आयोजित करत आहे ही किमान बातमी जाहीर पत्रकात नव्हती. या परिषदेचे परिणाम मात्र उलटेच झाले. हिंदू समाज अधिक एकवटला. डाव्यांचे सगळ्यात आवडीची म्हणजे प्रसिद्धी तीदेखील परिषदेस मिळाली नाही. कोणत्याही वृत्तपत्राने साधी दखलही घेतली नाही.

Dismnatling Global Hindut
A conference is a gathering of people who singly can do nothing, but together can decide that nothing can be done.
विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या दशकातील अमेरिकन विनोदकर्ता फ्रेड अ‍ॅलेन या वक्त्याचे हे उद्गार भारतीय डाव्या - कम्युनिस्ट पक्षीय चळवळ्यांनी Dismantling Global Hindutva (DGH) अशी आंतर्जालीय परिषद ठेवून सप्रमाण सिद्ध करून दाखवले.

कार्यक्रमाची रूपरेखा

साधारण 2-3 महिन्यांपूर्वी अचानक ट्विटर, फेसबुक यासारख्या समाजमाध्यमांमध्ये Dismantling of Global Hindutva हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हा तीन दिवसांचा कार्यक्रम 10 ते 12 सप्टेंबर, अर्थात अमेरिकन दहशतवादी हल्ल्यास 20 वर्षे होत असताना आणि अफगाणिस्तानात परत तालिबानी राज्य अधिकृत होत असताना ठेवण्यात आला.
 
कार्यक्रमातील परिसंवादाचे विषय हे जातिभेद, लिंगभेद, लैंगिकता, राजकीय अर्थकारण, विज्ञान आणि प्रोपोगंडा अर्थात अपप्रचार या संदर्भात आहेत, म्हणून लिहिले गेले. थोडक्यात या सर्व गोष्टींचा हिंदुत्व शब्दाशी काही संबंध नसताना जोडण्याचा आणि त्याचा गाजावाजा करण्याचा प्रयत्न हा ह्या परिषदेचा मूळ गाभा होता.
परिषद नक्की कोणती संघटना आयोजित करत आहे ही किमान बातमी जाहीर पत्रकात नव्हती. पण आनंद पटवर्धन, आयेशा किडवाई, बानू सुब्रह्मण्यम, कविता कृष्णन असे अनेक डाव्या विचारवंतांच्या समूहात नावारूपाला आलेल्यांची नावे जाहीर केली गेली होती. या नावांमध्ये आश्चर्य काहीच नव्हते. पण त्या पत्रकात जाहीर केल्या गेलेल्या एका दाव्यानुसार त्यात चाळीसच्या वर प्रामुख्याने अमेरिकेतील आणि युरोपातील नामवंत विद्यापीठे ह्या परिषदेचे सहायोजक आहेत असे लिहिले गेले होते.
अमेरिकन विद्यापीठातील डिपार्टमेंट्स आणि प्राध्यापक त्यांना हवे असलेल्या परिषदांना, भाषणांना अथवा इतर कार्यक्रमांना सहज पाठिंबा देऊ शकतात. तो त्यांचा अधिकार असतो. पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून कुठलेही विद्यापीठ हे सहसा कुठल्याच कार्यक्रमाला असा पाठिंबा जाहीर करत नाहीत. तरीदेखील या परिषदेने असे आधी चाळीस, मग साठ विद्यापीठे आम्हाला पाठिंबा देत आहेत अशी वाक्यरचना करून त्यांचे लोगोसुद्धा कार्यक्रमाच्या पत्रकांमध्ये जाहिरात करताना लावले.

 
Dismantlingसारख्या हिंसक शब्दाने परिषदेचे नाव ठेवले गेले आणि त्याचीच पुढची पायरी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दिसतील अशा प्रकारचे गणवेशधारी स्वयंसेवकांची चित्रे काढून त्या चित्रातील एका व्यक्तीस हातोडीने उखडून काढताना दाखवले गेले होते.
 
हे सारे करण्यामागचा हेतू काय असावा?
 
भारतातील डाव्यांचा हिंदुत्वाबद्दलचा वैचारिक विरोध अक्षरश: जगजाहीर आहे. तात्त्विक अथवा वैचारिक विरोध असणे हे समजण्यासारखे आहे. पण अशा परिषदांच्या मागेदेखील राजकारण आणि वैयक्तिक अर्थकारण (पोटापाण्यासाठीचे राजकारण) ही प्रमुख कारणे असावीत.
 
 
हिंदुत्वाला एकंदरीत टोकाचा विरोध हा 90च्या दशकापर्यंत नव्हता. कदाचित रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेस विरोध वाढीस लागला. 1992मध्ये 6 डिसेंबरनंतर अमेरिकेतील एमआयटी, हार्वर्ड या आणि इतर नामवंत विद्यापीठांत स्थानिक विद्यार्थी संघटनांच्या नावावर असे अनेक कार्यक्रम झाले होते.


Dismnatling Global Hindut
 
पण वाजपेयी सरकार प्रथम आले, तसे ते येऊ शकते हे कळल्यावर डाव्यांना सर्वप्रथम खर्‍या अर्थाने जाग आली. स्वत: सत्तेत येण्यापेक्षा आपल्याला वैचारिक गोष्टी आणि मानसन्मान देणारी सरकारे असली की काळजीचे काही कारण नाही, याला पहिल्यांदा धक्का बसला आणि त्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 12 वर्षे जागतिक आटापिटा करूनदेखील त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत बहुमताने सरकार आले, तेव्हा आता आपल्या स्वार्थाचे काही खरे नाही हे लक्षात आले. शेवटी हा पोटापाण्याचा प्रश्न होता आणि स्वत:चे विचार पसरवण्यात तयार झालेल्या अडथळ्याचा होता. 2014 साली तयार झालेला अडथळा हा 2019मध्ये अधिकच मोठा झाला. ज्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवून जगाची दारे बंद केली होती, त्याच व्यक्तीला जग पायघड्या घालून बोलवायला लागले. एकूणच आता आवाज परत जगजाहीर करण्यासाठी वापरणे गरजेचे झाले होते. म्हणूनच जरी परिषद हिंदुत्ववादाच्या विरोधात असली, तरी त्यात अर्थातच शक्य तितके सध्याचे भारतीय राजकारण, म्हणजे मोदी-भाजपापासून ते किसान आंदोलन आणि सीएएपर्यंत सर्व काही होते.
 
 
यात आणखी एक गोष्ट - पाश्चात्त्य, म्हणजे विशेषत: अमेरिकन विद्यापीठात होणारा हिंदू धर्माचा तथाकथित अभ्यास. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आधी ब्रिटन-युरोपमध्ये आणि आता अमेरिकेत हिंदू धर्माच्या वेद-शास्त्र-पुराणांपासून ते आचार पद्धतीपर्यंत सर्वांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे चुकीचे अर्थ लावून हिंदू धर्म आणि भारत-भारतीय यांची बदनामी केली गेली आहे. हे सर्व संशोधन हे भारतीय डाव्यांच्या पचनी पडणारे होते आणि आहे. त्यामुळे त्याचा वापर करणे, त्यात सक्रिय असलेल्या अमेरिकन प्राध्यापकांनाही मानसन्मान देत अशा कार्यक्रमांत सामील करून घेणे आणि आपली जागतिक वैधता वाढवणे हा एक मुद्दा.

 
कम्युनिस्ट विचारसरणीमुळे मानवी मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात विचार असले, तरी त्या मूलभूत स्वातंत्र्याच्या पूर्णपणे बाजूने असलेल्या अमेरिकेच्या चूक-बरोबर जे काही असेल त्याच्याशी संबंध जोडण्यात भारतीय डावे पुढे आहेत. या परिषदेतील अनेक विषय अमेरिकन स्थानिक समाजकारणासंदर्भात सध्या चर्चिले जात आहेत. ते तसेच्या तसे भारताच्या नाही, तर जागतिक हिंदुत्वाच्या संदर्भात कसे काय लागू शकतील? पण पाश्चात्त्य कल्पना आहे म्हणजे बरोबरच असणार, असे कम्युनिस्ट ठरवत असताना पाहिले की त्या विचारसरणीची काय अवस्था झाली आहे हे लक्षात येते. अर्थात जेव्हा स्वत:चे मूळ कधी अभ्यासायचे आणि आचारायचे नसले की हे असेच होणार.
 
Dismnatling Global Hindut

हिंदू जागृती आणि हिंदुविरोध

अमेरिकेच्या लोकसंख्येच्या साधारण 1 टक्का हिंदू आहेत असा अंदाज आहे. म्हणजे एकूण हिंदू लोकसंख्या साधारणपणे 30 लाख असावी. हिंदू धर्म हा कधीच संस्थात्मक नव्हता हे जितके सत्य आहे, तितकेच हिंदू धर्माच्या नानाविध संस्था असतात हेदेखील सत्य आहे. हिंदू धर्म पाळायची प्रत्येकाची पद्धतही अगदी व्यक्तिगत पातळीवर वेगळी असू शकते. त्यात अमेरिकेत राहिलेला, सांस्कृतिकदृष्ट्या पौर्वात्य-पाश्चात्त्य सरमिसळ झालेला, कधी राजकीय-सामाजिक संदर्भात उजवा असलेला, तर कधी डावा असलेला आणि आणखी एक अमेरिकन भर म्हणजे कधी रिपब्लिकन तर कधी डेमोक्रॅट असलेला हिंदू हा वरकरणी एकसंघ असू शकत नाही. कदाचित भारतीय डाव्या-कम्युनिस्ट परिषद संघटकांना हाच मुद्दा त्यांच्या बाजूचा वाटला... त्यात त्यांच्या दृष्टीने ते हिंदुत्वाला नावे ठेवत होते, हिंदू धर्माला नाही. पण झाले वेगळेच. जे इतर वेळेस आपण बरे आपले काम बरे म्हणतात असे भारतीय हिंदूसुद्धा या परिषदेच्या उद्देशाने दुखावले आणि संतापले.
 
 
हिंदू अमेरिका फाउंडेशन (एचएएफ) ही हिंदू मानवी हक्कांसंदर्भात काम करणारी संघटना आणि कोहना - CoHNA (Coalition of Hindus of North America) या संघटनांनी आपापली ईमेल कॅम्पेन चालू केली. हिंदू स्वयंसेवक संघ अमेरिकेने (एचएचएसने) या परिषदेचा जाहीर निषेध करत, सभोवतालच्या समाजात हिंदुद्वेष वाढण्यात याचे दूरगामी परिणाम होतील असे जाहीर केले. एचएसएसने भाषण-विचारस्वातंत्र्य याचा आदर करत त्यांचा कार्यक्रम रद्द (सध्याच्या डाव्या पद्धतीत कॅन्सल कल्चर) अशी मागणी केली नाही. उलट आपल्या सभासदांना आणि एकूणच हिंदू समाजाला स्वामी विवेकानंदांच्या Tolerance आणि Universal Aceptance या त्यांनी जगाला उद्देशून 9/11/1893ला सांगितलेल्या दोन तत्त्वांची आठवण करून त्याचेच आचरण करावे, असे सांगितले.

 
भाषण-विचारस्वातंत्र्याचा हक्क हा सर्वांना असतो आणि तो जबाबदारीने आपणदेखील पाळायला हवा, हे ध्यानात घेऊन एचएचएस स्वयंसेवकांनी सर्व विद्यापीठांच्या अध्यक्षांना ईमेल करून त्यांनी या परिषदेस असा पाठिंबा दिला आहे का म्हणून विचारले. आशा 300,000 ईमेल पाठवल्या गेल्या. एचएएफ आणि CoHNAकडूनसुद्धा तशाच पद्धतीची मागणी करणार्‍या ईमेल गेल्या. एकंदरीत सुमारे 12 लाख ईमेल पाठवल्या गेल्या. त्याव्यतिरिक्त अनेक विद्यार्थी, पालक आदींनीदेखील विद्यापीठांकडे विचारणा केली. त्याव्यतिरिक्त अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने तमाम मंदिरांकडून सह्या घेऊन आपला जाहीर निषेध नोंदवला. परिणामी अनेक विद्यापीठांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली. काहींनी लेखी उत्तरे देऊन स्पष्ट केले की त्यांच्या संमतीशिवाय विद्यापीठाचे नाव आणि लोगो वापरला गेला होता आणि त्यांनी परिषदकर्त्यांना ते काढून टाकायला संगितले. परिणामी शेवटी विद्यापीठांचे लोगो काढले गेले. फक्त ज्या डिपार्टमेंट्सनी अथवा प्राध्यापकांनी पाठिंबा दिला, त्यांचीच नावे राहिली.
 
हिंदुत्व म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हणल्याप्रमाणे way of life आहे. ‘त्व’ म्हणजे वृत्ती, जबाबदारी, जसे ते मातृत्व, पितृत्व आदी मध्ये येते. त्यात जसे राजकारण नसते, तसे आमच्या हिंदुत्वातही तुम्हाला वाटते ते राजकारण घुसवू नका, असा हिंदूंचा आग्रह होता. 
"हिंदुत्वाची बदनामी करण्यात या डाव्या लोकांनी तीन दिवस खर्च केले, पण त्यातून इतकेच समोर आले की हिंदुत्व व हिंदुइझम वा हिंदू धर्म वेगळे करता येणे शक्य नाही व यांचा खरा मत्सर हिंदू धर्माविषयीच आहे. तसेच भारत व हिंदुत्व यांचेही विलगीकरण शक्य नसल्याने थेट भारताच्याच विभाजनाची भाषा करणाऱ्या वक्त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजकांनी व्यासपीठ दिले होते, हे भारतीयांनी कधीही विसरू नये. तसेच ज्या मोजक्या विद्यापीठांनी या कार्यक्रमास व पर्यायाने हिंदू धर्मास व भारताच्या सार्वभौमत्वावरील आघातास पाठिंबा दिला, तेथे आपले पाल्य/आप्त पाठवावेत का? हाही विचार सुज्ञांनी जरूर करावा."
- शार्दुल टाकळकर
 आजपर्यंत हिंदू संघटनांना अथवा समाजाला हिंदुत्वावरून कधी परिषद घ्यावीशी वाटली नव्हती. पण तशी कधी न केल्याने आणि जर ही हिंदुत्वाविरोधी परिषद करून दिली तर त्याचा परिणाम म्हणून लोकांना तेच खरे वाटेल हे लक्षात घेऊन गेल्या आंतरजालावर महिन्याभरात 3-4 परिषदा यशस्वीपणे पार पडल्या. त्याव्यतिरिक्त अनेक परिसंवाद आणि मुलखाती झाल्या, लेख लिहिले गेले. ह्या गंभीर प्रश्नावर जरा सौम्य विनोद करत टिप्पणी करायची झाली, तर असे म्हणता येईल की हिंदू संघटनांना जे करायला वेळ लागत होता, ते काम डाव्यांनी आभासी विश्वातील एक परिषद नुसती जाहीर करून, करून दाखवले! हिंदू समाज एकदम जागृत झाला. आता आव्हान आहे ते अशी जागृती टिकवण्याची..
 
.
अमेरिकन हिंदू समाज आणि संस्था यांची पुढील वाटचाल
 
आज एकत्र झालेला हिंदू समाज हा उद्या वर उल्लेखलेल्या एखाद्या हिंदू संघटनेत सक्रिय होईलच असे नाही. पण तसे जरी झाले नाही, तरी आपल्या हिंदू म्हणून असलेल्या ओळखीवर नकळत हल्ला होऊ शकतो, इतके समजले आहे. आता संस्थात्मक पातळीवर या संदर्भात जागृती करत ठेवणे महत्त्वाचे ठरत आहे. ही जागृती केवळ अमेरिकन हिंदू समाजाचीच नसेल, तर त्यात हिंदू नसलेले अमेरिकन्ससुद्धा असतील. अमेरिकन राजकरणी, समाजकारणी, विद्वान आदींशी संपर्क साधून त्यांनासुद्धा ह्या विषयातील माहिती, हिंदुद्वेषाचे (हिंदुफोबियाचे) होऊ शकणारे संभाव्य परिणाम सांगणे गरजेचे आहे. त्या संदर्भात काही संस्थांनी भेटीगाठी घेऊन आपल्या व्यथा राजकीय व्यक्तींसमोर मांडल्या आहेत. ही नुसती सुरुवात आहे. हिंदू समाज हा हिंदुस्वभावानुसार कुणाच्या विरोधात वागत नाही... डाव्या कम्युनिस्टांशीसुद्धा त्यांचे भांडण नाही. पण ते आहे ते खोटे बोलून हिंदू समाजाबद्दल गैरसमज पसरवण्याच्या वृत्तीकडे आहे. Live and let live असे जर वागणार नसतील तर त्याला वैचारिक विरोध करण्याची गरज राहील आणि ती पुरी केली जाईल, इतका संदेश या परिषदेच्या निमित्ताने त्या संघटकांना मिळाला असेल अशी आशा करू या. पण ती कदाचित नुसतीच आशा असेल असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.
 
 
या परिषदकर्त्यांनी नक्की काय मिळवले?
 
खरे म्हणजे काहीच मिळवले नाही. हिंदू समाज एकवटला. डाव्यांचे सगळ्यात आवडीची म्हणजे प्रसिद्धी तीदेखील विशेष अशी या परिषदेस मिळाली नाही. हा लेख लिहीत असताना अजून तरी कुठल्याच वृत्तपत्रात वृत्तान्त आलेला दिसला नव्हता. विद्यापीठांनी लोगो काढायला सांगितल्यामुळे खोटे बोलले अशी नाचक्की झाली. ट्विटरनेदेखील तक्रारीत लक्ष घालून त्यांच्या काही ट्वीट्स द्वेष पसरवत आहेत असे मान्य केले. सगळ्यात वाईट म्हणजे सतत अ‍ॅकॅडमिक conference म्हणाले खरे, पण अशा conferenceचे नियम, पद्धती न पाळल्याने, त्याची गुणात्मकताही रसातळास पोहोचली.
 
तात्पर्य
 
हिंदुत्वाचा आणि त्याला तात्त्विकदृष्ट्या नावारूपाला आणणार्‍या सावरकरांचा द्वेष करण्यात भारतीय डावे कम्युनिस्ट विचारवंत धन्यता मानतात. म्हणून एक तुलना करावीशी वाटते.
 
सावरकरांनी 1952मध्ये ‘अभिनव भारत’ या सशस्त्र क्रांतिकार्यासाठी वाहिलेल्या संघटनेची सांगता करताना म्हटले होते, ‘परसत्तेच्या आपत्तीतून आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य-संपादन करण्यास्तव प्रक्षोभ, असंतोष, उत्क्षोभ, निर्बंधभंग, शस्त्राचार, गुप्त कट इत्यादी साधने योजणारी विध्वंसक क्रांतिप्रवृत्ती त्या कालापुरतीच काय ती धर्म्य असते; परंतु जनतेत ती क्रांतिप्रवृत्ती जर तशीच मूळ धरून राहू दिली, तर केव्हा केव्हा आपद्धर्मालाच नित्यधर्म समजण्याची भयंकर भूल जनतेच्या हातून घडते...जेव्हा स्वातंत्र्य संपादन हे आपले प्रथम साध्य सिद्ध होते, तेव्हा सशस्त्र वा नि:शस्त्र प्रतिकारक जनतेत संचरविलेल्या वरील सर्व विध्वंसक क्रांतिप्रवृत्तीचे तत्काल विसर्जन करणे हे आपल्या यशस्वी झालेल्या राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य होय. कारण आता आपले साध्य स्वातंत्र्यसंरक्षण हे आहे, राष्ट्रसंवर्धन हे आहे. आता निर्बंधतुच्छता नव्हे, तर निर्बंधशीलता, विध्वंसक नव्हे तर विधायक प्रवृत्ती, हा राष्ट्रधर्म आहे.’
 
 
थोडक्यात, क्रांती हे साधन आहे, साध्य नाही हे सावरकर जाणून होते. पण कम्युनिझमचा जन्मच क्रांती करण्याकरता झाला असल्याने, डाव्यांना ती कधी आणि कशी थांबवावी हे कळत नाही. साध्य न ठरवता ते साधन वापरत आहेत. हिंदुत्वविरोधातील ही परिषद हे त्याचेच एक नवे रूप होते. ते यशस्वी होण्याची शक्यता नव्हती, पण जगभर पसरलेल्या हिंदू समाजास नुकसान करू शकले असते. पण वास्तवात समाजासाठी काम करण्याऐवजी नुसते द्वेष पसरवणे चालून घ्यायचे दिवस संपले आहेत हे त्यांना कळेल, तो त्यांच्यासाठी सुदिन! तोपर्यंत रामदासांच्या पंक्तीच लागू होतात -
 
सकळ अवगुणामध्ये अवगुण। आपले अवगुण वाटती गुण।
मोठे पाप करंटपण। चुकेना की॥
अचूक यत्न करवेना। म्हणौन केले ते सजेना।
आपला अवगुण जाणवेना। काही केल्या॥
 
 
vvdeshpande@gmail.com