स्वयंचलित चमत्‘कार’!

विवेक मराठी    17-Sep-2021
Total Views |
 
पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी चालकविरहित स्वयंचलित कार तयार केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, बीएलडीसी मोटर्सचा वापर, ऊर्जेसाठी लिथियम आयर्न बॅटरीचा वापर, लीडर कॅमेरा, मायक्रोप्रोसेसर, सेन्सर आणि स्वयंचलित क्रियेचे नियंत्रण करणारी यंत्रणा ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. त्यानिमित्त ही कार बनविणार्‍या चमूतील एक सुधांशू मणेरीकर यांच्याशी संवाद साधून ही कार बनविण्याची एकूणच प्रक्रिया, या कारचे वेगळेपण, उपयोग आणि त्याच्या वापरातील तांत्रिक अडचणी इ. माहिती जाणून घेतली.


tec_2  H x W: 0 
 
ण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी चालकविरहित स्वयंचलित वाहन तयार केल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली आणि त्यांना भेटून त्यांचे कौतुक करायची भावना मनात प्रबळ झाली. कामाच्या भाऊगर्दीत ही बाब जवळजवळ विसरल्यात जमा झाली असतानाच हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेशजी पतंगे यांचा दूरध्वनी आला आणि “या संदर्भात लेख तयार करशील का?” असे त्यांनी विचारले. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ हाच विचार मनात आला. त्यांनी सुधांशू मणेरीकर याचा संपर्क दिला आणि ही भेट प्रत्यक्षात आली.
 
 
सुधांशूची भेट घेताना माझ्या मनात काही शंका होत्या. वाहन चालविताना समोर येणारे गतिरोधक, छोटेमोठे खड्डे आणि मध्येच घुसणारी दुचाकी वाहने, केवळ हात दाखवून अथवा न दाखविताही बेधडक रस्ता ओलांडणारे पादचारी अशा अनेक अडचणी चालकासमोर दत्त म्हणून उभ्या राहतात. अशा वेळी चालकदेखील गांगरतो आणि अपघात होतात. त्यामुळे चालकविरहित वाहनाचे स्वप्न आपल्याकडील रस्त्यांवर कसे साकार होणार, याबद्दल मी साशंक होतो. सुधांशूशी झालेल्या मनमोकळ्या चर्चेमधून हे सारे ढग आपोआप निवळले.
 
 
सुधांशूने आरंभीच सांगितले की, “खरे म्हणजे अशा स्वयंचलित वाहनाचे सहा टप्पे असतात. यातील शून्य टप्पा म्हणजे चालकाद्वारे चालविले जाणारे वाहन आणि सहावा टप्पा म्हणजे पूर्णत: स्वयंचलित वाहन.” यातील तिसर्‍या-चौथ्या टप्प्यातील वाहन (गोल्फ कार्ट) बनविण्याचा यशस्वी प्रयत्न या चमूने केला आहे. एक गंमत म्हणजे या वाहनाला चालकरहित म्हटले जात असले, तरी नियंत्रण करण्यासाठी व लक्ष ठेवण्यासाठी या वाहनात चालक लागतच असतो. जेव्हा यंत्रणेला असे भासते की आता चालकानेच वाहनाचे नियंत्रण हातात घेतले पाहिजे, तेव्हा ती यंत्रणा चालकाला तसा संकेत देते. अचानक मार्गात एखादी बाधा उत्पन्न झाल्यामुळे हा प्रसंग ओढवतो.
 
 
ही यंत्रणा असलेले वाहन प्रचलनात आणायचे असेल, तर सिग्नलची आणि लेनची शिस्त, तसेच वाहतुकीचे सर्व नियम कटाक्षाने पाळण्याची शिस्त नागरिकांमध्ये असणे अपेक्षित आहे. ज्या देशात अशी शिस्त आहे, तेथे तिसर्‍या ते चौथ्या टप्प्यातील वाहन नागरिक वापरत आहेत. आपल्याकडे मात्र ही जागरूकता येण्यासाठी कदाचित 2035 उजाडेल, असेही मत सुधांशूने व्यक्त केले. मात्र जेथे वाहनांची वर्दळ कमी असते, अशा परिसरात वापरण्यायोग्य वाहन बनविण्याच्या विचारात या चमूने हा प्रकल्प हाती घेतला. विमानतळावर अथवा गोल्फ कोर्सवर वापरण्यात येणारी आणि विद्युत ऊर्जेवर चालणारी सहा आसनी कार या चमूने बनविलेली आहे. या कारमध्ये पुढचे दृश्य लक्षात घेण्यासाठी कॅमेरा सेन्सर बसविण्यात आलेला आहे. ही कार आधी एकच माणसासाठी बनविण्याचा विचार होता, पण महाविद्यालयाच्या सूचनेनुसार या परिसरात वापरता येण्याजोगी अशी सहा आसनी कार चमूने बनविली आहे.
 
 
महामारी असल्यामुळे त्या काळात महाविद्यालयात जाऊन कार बनविणे शक्यच नव्हते, त्यामुळे सुधांशूचे वडील जेथे जनरल मॅनेजर आहेत, त्या स्पेशल सिस्टिम्स या कंपनीच्या जागेत ही संपूर्ण कार बनविण्यात आली. प्रत्येक भाग नेमका कसा असावा, त्याची क्षमता, रचना कशी असावी याचा या चमूने बारकाईने अभ्यास केला आणि परस्परांत कामांची विभागणी केली. या कारचे संपूर्ण डिझाइन बनवून मग त्यानुसार सर्व स्पेअर पार्ट्स विकत आणण्यात आले आणि मग त्यानुसार ही गाडी बनविण्यात आली. ही गाडी चालते कशी? तर महाविद्यालय परिसराचा संपूर्ण नकाशा या यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, जाण्यायेण्याचे उपलब्ध मार्ग त्यात दर्शविण्यात आलेले आहेत आणि मग त्याला अनुसरून ही गाडी मार्गक्रमण करत असते. ही गाडी ज्या प्रदेशात वापरायची असेल, तेथील जीपीएस यंत्रणा तिला जोडणे आवश्यक राहील. सहा मीटर्सच्या अंतरात एखादी बाधादायक वस्तू अथवा प्राणी आल्यास ही यंत्रणा संकेत देत असते.
 

tec_1  H x W: 0
 
सुधांशू मणेरीकर याच्यासह यश केसकर, शुभांग कुलकर्णी, सौरभ दमकले, प्रत्यक्ष पांडे, प्रेरणा कोलीपाका अशा एकूण चार अभियांत्रिकीचे आणि दोन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड टेलिकम्युनिकेशन्सचे असा सहा जणांचा हा चमू होता. यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. गणेश काकंडीकर, माइर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, प्रा. ओम्कार कुलकर्णी, श्रीकांत यादव यांचे या चमूला मार्गदर्शन लाभले आहे. अशा प्रकल्पांवर खर्च करण्यासाठी खूप निधी लागत असतो, त्यामुळे या प्रकल्पांच्या प्रायोजकांचेही योगदान महत्त्वाचे असते. या प्रकल्पासाठी प्रायोजक म्हणून महाविद्यालयाबरोबरच स्पेशल सिस्टिम्स, डिझाइन टेक आणि ग्लोबल इंडिया ट्रस्ट यांचे योगदान लाभले आहे.
 
 
कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, बीएलडीसी मोटर्सचा वापर, ऊर्जेसाठी लिथियम आयर्न बॅटरीचा वापर, लीडर कॅमेरा, मायक्रोप्रोसेसर, सेन्सर आणि स्वयंचलित क्रियेचे नियंत्रण करणारी यंत्रणा ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. या गाडीची पॉवर 3 किलोवॅट असून चार तासांत बॅटरीचे पूर्ण चार्जिंग होते व एका चार्जिंगमध्ये ही कार 40 किलोमीटर एवढा प्रवास करू शकते.
लक्षात येणारी बाब म्हणजे अशी तंत्रज्ञ मंडळीसुद्धा एका अर्थाने हिरोच असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रोत्साहन आणि कौतुक हे प्रेरणादायक घटक असतात. शिवाय असा नवा प्रयास करणार्‍या मंडळींचा उत्साह वाढविण्याकडेसुद्धा समाजाचे विविधांगी नेतृत्व करणार्‍या लोकांचा कल असणे आवश्यक आहे. पण जागतिक स्पर्धांत सुवर्णपदक मिळविणार्‍यांचेच कौतुक करता करता आपल्याकडील मंडळींचा उत्साह थंड होतो. देशाचा सर्वक्षेत्रीय विकास आपल्याला अपेक्षित असेल, तर अशा सर्वच क्षेत्रांत आगळेवेगळे कर्तृत्व गाजविणार्‍यांचा उचित सन्मान करण्याची खरेच गरज असते. आर्थिक दृष्टीने पारितोषिकांची खैरात झाली नाही, तरी पाठीवर कौतुकाची थाप ही नक्कीच नवी लढाई लढण्याचे बळ देत असते. विवेकच्या माध्यमातून या तंत्रज्ञ तरुणाईची दखल घेण्यामागे हीच भूमिका आहे.
 
 
सुधांशूने चार वर्षांचा मॅकेनिकल इंजीनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला तसेच त्याच्या चमूतील काही सहकार्‍यांनाही चांगल्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या लागल्या आहेत. त्याला आणि त्याच्या सहकार्‍यांना भावी वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!!