भैरवनाथ ठोंबरे आणि जमनालाल बजाज पुरस्कार

विवेक मराठी    18-Sep-2021
Total Views |
मराठवाड्यातील अग्रगण्य साखर कारखानदार भैरवनाथ ठोंबरे यांना यंदाचा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर झाला आहे. केवळ उत्तम व्यावसायिक उद्योजक नव्हे, तर नैतिकतेने केलेला उद्योग व सामाजिक बांधिलकीचा असलेला व्यवहार यासाठी हा विशेष गौरव केला जातो. ठोंबरे यांनी मागासलेल्या क्षेत्रात याविषयी एक उच्च मापदंड प्रस्थापित केला आहे. त्याची रोचक कथा येथे प्रस्तुत करीत आहे.

purskar_2  H x
 
1960च्या दशकातील ही कथा आहे. मराठवाड्याचे हळूहळू उर्वरित महाराष्ट्राशी मिलन होत होते. तथापि शेकडो वर्षांच्या निजामशाहीचे अत्याचार सहन केलेल्या जनतेचे समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत अतिशय मागासलेपण होते. शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्वच दृष्टींनी हा भाग उर्वरित महाराष्ट्राच्या सुमारे 80-100 वर्षे मागे होता. मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) हा जिल्हा तर अतिमागासलेला. निसर्गाचाच नव्हे, तर समाजजीवनात सर्वत्र दुष्काळच भरलेला! अशा वेळेला भैरवनाथ ठोंबरे हा 15-16 वर्षांचा युवक हाताशी काहीही नसताना साखर कारखानदार होण्याचे स्वप्न पाहत होता.

ठोंबरे यांचे मूळ गाव रांजणी, ता. कळंब, जि. धाराशिव, पूर्णपणे वैराण भाग. दुष्काळ व त्यामुळे दारिद्य्र पाचवीला पूजलेले. म्हणूनच गावातले प्राथमिक शिक्षण संपल्यावर स्वाभाविकपणे गुरे राखण्याचे काम त्यांच्यावर सोपविले गेले. सुदैवाने त्यांचे आजोबा (आईचे वडील) शिक्षणाचे महत्त्व जाणत होते. त्यांनी जवळच प. महाराष्ट्रातील बार्शी, जि. सोलापूर येथे नादारीवर भैरवनाथ यांची माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था केली.
 
 
त्याच काळात त्या भागातून पिकविला जाणारा ऊस सोलापूर जिल्ह्यातील वालचंदनगर येथील साखर कारखान्यात पाठविला जात असे. योगायोगाने अशा भरल्या गाडीच्या उसावर बसून वालचंदनगरला ऊस पोहोचविण्याचे काम भैरवनाथ यांना करावे लागले. साखर कारखान्याचा तो भव्य पसारा पाहून भैरवनाथांच्या मनात आकांक्षा उत्पन्न झाली. एक ना एक दिवस असा साखर कारखाना मी उभा करीन! या महत्त्वाकांक्षेचे बीज त्या वेळी त्यांच्या मनात रोवले गेले.
 
जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली. हे शिक्षणही नादारीवरच झाले. त्यानंतर नव्यानेच सुरू झालेल्या एम.बी.ए. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून तेथे त्यांनी प्रवेश घेतला. हा अवघड अभ्यासक्रम त्यांनी उत्तम रितीने पूर्ण केला. त्यानंतर स्वाभाविकपणे मोठ्या उद्योगात उच्चभ्रू नोकरी समोर वाढून ठेवली होती. हिंदुस्थान पेट्रोलियम या मोठ्या आस्थापनेमधील नोकरी करत असतानाच, वर्षभरातच त्यांनी आपल्या मूलभूत विचाराकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. ही उत्तम नोकरी सोडून जेव्हा त्यांनी अंबेजोगाई येथील साखर कारखान्यात मुख्य हिशोबनीस पदासाठी मुलाखत दिली, त्या वेळी तेथील प्रमुख त्यांना म्हणाले, “राष्ट्रीय पातळीवरील कारखान्यातील नोकरी सोडून या क्षेत्रात कशाला येता? हे असुरक्षित आणि बेभरवशाचे सहकारी क्षेत्र आहे.”
 
परंतु आपण ज्या भागातून आलो, तेथील समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी व आर्थिक उन्नती करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, अशी तीव्र भावना मनात ठेवून भैरवनाथ यांनी पुढील वाटचाल सुरू केली.
पुढील सुमारे 12-15 वर्षे त्यांनी विविध साखर कारखान्यांत कार्यकारी संचालक या पदावरून अतिशय उत्तम कामगिरी बजाविली. त्यातील उल्लेखनीय म्हणजे विलासराव देशमुख यांचा मांजरा सहकारी कारखाना व गोपिनाथराव मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी कारखाना. या दोन्ही कारखान्यांना भैरवनाथ ठोंबरे यांनी देशातील साखर उद्योगात उच्च स्थान प्राप्त करून दिले. या दोन्ही ठिकाणी त्यांना अनेक व्यक्तिगत सन्मान, तसेच या कारखान्यांनाही विशेष पारितोषिके प्राप्त झाली. या काळात त्यांनी आपल्या विचाराला व व्यवहाराला सहकारातील राजकारणाचा स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे या दोन्ही नेत्यांनी त्यांना मुख्य कार्यकारी संचालक म्हणून पूर्णपणे मोकळीक दिली.
 
खाजगीकरणाच्या समुद्रमंथनातील अमृत
 
बी.बी. ठोंबरे आणि मी, दोघांनी च.इ.अ.चे शिक्षण एकत्र घेतले. च.इ.अ.च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेत असताना बहुतेक सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर व्यावसायिक क्षेत्रात असलेले मोठे पगार आणि आकर्षक सोयीसुविधा असत. त्या काळातही ठोंबरे यांच्या मनात आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या ग्रामीण बांधवांच्या विकासाकरता कसा करता येईल, हाच विचार होता. त्या अनुषंगाने आमच्या चर्चा चालत असत. साखर उद्योगाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा व गावाचा विकास करता येऊ शकतो, याचा अनुभव ठोंबरे यांनी घेतला आणि त्या माध्यमातून त्यांनी आर्थिक तसेच सामाजिक परिवर्तन करण्याचा संकल्प केला. महाराष्ट्रातील केवळ साखर क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर ग्रामीण विकासाचे आदर्श केंद्र म्हणून त्यांनी आपल्या कारखान्याच्या परिसराचा विकास केला आहे. खाजगीकरणाचे धोरण आल्यानंतर त्यांनी स्वत:चा खाजगी कारखाना उभा केला. त्यांच्या कारखान्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्या वेळी मी म्हटले होते, “खाजगीकरणामुळे आज देशात समुद्रमंथन सुरू आहे. समुद्रमंथनातून विष आणि अमृत असे दोन्ही बाहेर येतात. खाजगीकरणाच्या या समुद्रमंथनातून हर्षद मेहतासारख्या विघातक प्रवृत्ती आणि ठोंबरे यांच्यासारखे अमृत बाहेर आले आहे.”
 
 
- दिलीप करंबेळकर
 
प्रबंध संपादक, विवेक समूह
   
 
याचे एक मार्मिक उदाहरण सांगण्यासारखे आहे. ते मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक असताना दर वर्षीप्रमाणे भागधारकांकडून ऊस येत होता. यातील एक प्रमुख भागधारक विलासराव देशमुख यांचे कट्टर राजकीय विरोधक होते. मांजरा कारखान्यातील अन्य अधिकार्‍यांनी या भागधारकाचा ऊस घेणार नाही अशी भूमिका घेतली. ती कायद्याला व नैतिकतेला धरून नव्हती. ठोंबरे यांच्याकडे विषय आला असताना हा ऊस घेतला पाहिजे याचा त्यांनी आग्रह धरला. विलासराव देशमुख यांच्यापर्यंत हा विषय गेला. तेथेही ठोंबरे ठाम राहिले व वेळ आल्यास त्यासाठी मी पदही सोडेन असे सूचित केले. विलासराव देशमुखांनी ठोंबरे यांचा सल्ला उचलून धरला व संबंधिताचा ऊस नियमित पद्धतीने स्वीकारला गेला. ठोंबरे यांना आता मिळालेल्या जमनालाल बजाज पुरस्काराचे बीज या घटनेमध्ये सामावलेले आहे, असे मला वाटते.
 
भैरवनाथ ठोंबरे यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे वळण आले 1998 साली. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आले, तेव्हा अटलजींच्या सरकारने अगदी सुरुवातीलाच साखर कारखान्यांच्या बाबतीत एक मूलगामी क्रांतिकारक निर्णय घेतला. त्या वेळेपर्यंत खाजगीरित्या साखर कारखाना काढण्यास अजिबात परवानगी नव्हती. सहकारी क्षेत्राचे ‘लायसेन्स राज’ होते! अटलजींनी ते क्षेत्र निर्बंधमुक्त केले, त्याच दिवशी भैरवनाथ ठोंबरे यांचा खाजगी साखर कारखान्याचा पहिला प्रस्ताव शासनाकडे दाखल झाला. ठोंबरे यांच्या मनात पुढील कामाचा व जीवनक्रमाचा जणू काही पूर्ण आराखडाच व्यवस्थित तयार होता. आपले मूळ गाव रांजणी हेच केंद्र निश्चित करून त्यांनी अत्यंत गतीने भागधारक व भाग भांडवल गोळा केले. गेल्या 15 वर्षांच्या अनुभवावरून त्याच तत्परतेने साखर कारखान्याच्या जुन्या उपलब्ध सामग्रीतून कमी किमतीत कारखान्याची उभारणी केली. या क्षेत्राचा तळापासूनचा पूर्वानुभव व दीर्घ कार्यकालात निर्माण केलेली विश्वासार्हता याच्या आधारावर, दोन वर्षांत साखर कारखाना कार्यरत झाला. हा एक विक्रमच होता. त्यानंतर गेल्या 20-22 वर्षांत या माध्यमातून भैरवनाथ ठोंबरे यांनी चौफेर प्रगती केली. जे करीन ते तंत्रदृष्ट्या उत्तम करीन, स्थानिक समाजाचा लाभ होईल त्या पद्धतीने करीन, नैतिकता व प्रामाणिकपणा याला पर्याय नाही व सामूहिकतेने सर्वांगीण प्रगती करून साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ज्या अपप्रवृत्ती बोकाळल्या आहेत त्याचा प्रादुर्भाव होणार नाही, या सूत्रांच्या आधारे ही नेत्रदीपक प्रगती झाली. जमनालाल बजाज पुरस्कार मिळत असताना संबंधित समितीने याच निकषांचा परामर्श घेतला आहे.


purskar_1  H x
 
‘जमनालाल बजाज पुरस्कार’ हा गेल्या 50 वर्षांच्या वर कालावधीत, निवडलेल्या मध्यम किंवा मोठ्या उद्योगाला दिला जातो. जे.आर.डी. टाटा यांच्यासारख्या अग्रगण्य भारतरत्न, राष्ट्रभक्त उद्योगपतीच्या नेतृत्वाखाली या पुरस्काराची संकल्पना मांडली गेली. त्यांना सहयोगी होते सर्वश्री गोदरेज, महिंद्रा व बजाज हे उद्योगपती-उद्योजक. कोण किती मोठा ‘धंदा’ करतो यापेक्षा ‘कसा’ करतोय या निकषावर पुरस्कार देण्यासाठी निवड केली जाते. निवड समितीवर निवृत्त न्यायाधीश व उद्योग क्षेत्रातले या पद्धतीने विचार करणारे अग्रगण्य लोक असतात. सर्व नियमांचे पालन करून, पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतला जातो. प्रत्यक्ष मुलाखतीतून व्यवसायातील सामाजिक भान व नवनवीन कल्पक उपक्रम याची दखल घेतली जाते.
 
ठोंबरे यांच्या मुलाखतीतील दखल घेतलेल्या एका विशेष उपक्रमाचे मी वर्णन करू इच्छितो. गेल्या 20-22 वर्षांत ठोंबरे यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे दीड लाख कुटुंबे जोडली गेली आहेत. त्यांचे सर्वार्थाने आर्थिक व अन्य उन्नयन झाले आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी ठोंबरे यांच्या लक्षात आले की, घरात पैसा पुष्कळ येतो, पण परिवारातल्या पालकांची, वृद्धांची हेळसांड होत आहे. त्यावर त्यांनी वर्ष 2005पासून अभिनव उपक्रम सुरू केला. प्रत्येक कर्मचार्‍याच्या वेतनातून 10 टक्के रक्कम कापली जाऊन त्या परिवारातील पालकांच्या किंवा वृद्धांच्या नावे वेगळ्या खात्यात भरली जाते. याचा विलक्षण परिणाम झाला. वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व व्यवहार या दोन्हींत आमूलाग्र बदल झाला. पुरस्कार समितीने या विषयाची विशेष दखल घेतली असणार. कल्पक सामाजिक बांधिलकीचे हे ठोस उदाहरण आहे.
 
अशाच सामाजिक बांधिलकीचे दुसरे उदाहरण सांगता येईल. गेल्या दीड वर्षापासून आपण सर्व जण कोरोना अनुभवत आहोत, भोगत आहोत आणि सहन करत आहोत. साखर कारखाना आणि कोरोना यांचा काय संबंध? तसे तर रांजणीच्या साखर कारखाना संकुलात सर्वांसाठी रुग्णालय व्यवस्था आहेच. पण कोरोना काळात झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याची ठोंबरे यांनी दखल घेतली. शासनाने काही सूचित करण्यापूर्वीच साखर कारखान्याच्या आवारात ऑक्सिजन प्लँट उभा राहिला. उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाला व आजूबाजूच्या अन्य रुग्णालयांनासुद्धा तो ऑक्सिजन सहज उपलब्ध होऊ शकतो.
 
एखाद्या सामाजिक आपत्तीची तत्काळ दखल घेणे व आपण यात काय करू शकतो याचा विचार व आवश्यक ती कृती तत्काळ करणे, हा भैरवनाथ ठोंबरे व त्यांचा व्यापक परिवार यांचा स्वभावधर्म बनून गेला आहे.
गेल्या 20-22 वर्षांत ‘नॅचरल’ या नावाने चालणार्‍या उद्योग समूहात दोन साखर कारखाने व अन्य मोठे 30-32 वेगवेगळे स्थायी प्रकल्प चालतात. जिज्ञासूंनी त्याची माहिती घ्यावी, दखल घ्यावी, जमल्यास प्रत्यक्ष पाहावे. एका ‘वैराण’ भूमीचे सुखद ‘हिरवेगार नंदनवन’ कसे बनते, याचे तेथे दर्शन घडते. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून आपण ग्रामविकासाची किंवा ग्रामीण जीवनाच्या सुखद परिवर्तनाची प्रचिती घेऊ शकतो.
 
ठोंबरे यांच्याबरोबरच्या माझ्या सहवासातील दोन विशेष प्रकल्पांचा उल्लेख करून मी हा विषय संपवितो. 2014-15 या दोन वर्षी लातूर-उस्मानाबाद परिसरात भीषण पाणीटंचाई व दुष्काळ यांचा सामना करावा लागला. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला, हे अद्भुत त्या वेळी घडले. त्या संकटात आम्ही काही निवडक मित्रांनी ‘जलयुक्त लातूर’ ही चळवळ राबविली. यामध्ये मांजरा नदीचे सुमारे 16 कि.मी. लांबीचे पात्र रुंद व खोल करण्याचे भगीरथ प्रयत्न यशस्वी केले. भैरवनाथ ठोंबरे यांचा या कामात मुक्त सहभाग होता.
 
 
तसेच विवेकानंद रुग्णालयातर्फे चालणार्‍या कर्करोग केंद्रातील रुग्णांच्या सोईसाठी एक विशाल सेवासदन बांधण्याचा संकल्प झाला. त्या समितीचे अध्यक्ष या नात्याने भैरवनाथ ठोंबरे यांनी स्वेच्छेने जबाबदारी स्वीकारली. सुमारे तीन वर्षांच्या अथक प्रयत्नातून हा प्रकल्प आता कार्यान्वित होत आहे.
 
साखर कारखाना परिसरात चालणारी दूध डेअरी, सहकारी पतसंस्था, सहकारी मॉल, जैविक खत कारखाना, विद्युत्निर्मिती, इथेनॉल निर्मिती, पोलाद कारखाना, पूर्ण शिक्षण संकुल ते रेशीम उद्योग असे असंख्य प्रयास सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी यशस्वीरित्या राबविले जात आहेत. जमनालाल बजाज पुरस्कार प्राप्तीच्या निमित्ताने भैरवनाथ ठोंबरे यांचे अभिनंदन आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना अखंड प्रेरणा मिळत राहो, ही सदिच्छा!