विनाशकाले....

विवेक मराठी    30-Sep-2021
Total Views |
पंजाब राखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते गमावण्यासाठी काँग्रेसने सिद्धूसारख्या वाचाळ वीराच्या हाती सूत्रे दिली. कपिल सिब्बलसारखे जुने जाणते नेते जेव्हा याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करतात, पक्षाध्यक्ष नसल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवतात, तेव्हा त्यावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सिब्बल यांनाच घेराव घालण्यात येतो, हे चित्र सध्याची पक्षस्थिती समोर ठेवणारे आहे. अशा काँग्रेसकडून मोदी पराभवाची अपेक्षा करणे हेच किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येते.

panjab_1  H x W
 
2014 साली सत्तेवर आल्यापासून केलेल्या कामांमुळे, त्यासाठी आखलेल्या धोरणांमुळे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नरेंद्र मोदी यांच्या नावाचा सातत्याने वाढत असलेला प्रभाव ही भारतातील विरोधकांची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. त्यातले काही मुळातच प्रादेशिक आहेत, तर काही नावापुरते राष्ट्रीय. मोदी विरोधातल्या अनेक पक्षांना ठरावीक राज्यापलीकडे कोणी ओळखतही नाही, त्यांचा प्रभाव वगैरे तर लांबची गोष्ट! तेव्हा मोदींचा पाडाव करण्यासाठी, या सगळ्या पक्षांच्या आशा केंद्रित झाल्या आहेत त्या नावापुरती राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस पक्षावर. हा पक्षच मोदी नावाचा झंझावात रोखू शकेल, या आशेने हे खुरटे पक्ष काँग्रेस नेतृत्वाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र या पक्षाची गतही त्या सगळ्यांसारखीच आहे, याची रोज नवीन उदाहरणे काँग्रेस पक्ष देतो आहे. पंजाबमध्ये चालू असलेला सावळा गोंधळ हे त्याचे ताजे उदाहरण. जेव्हा पक्षप्रमुखपदी असलेली व्यक्ती अन्य कोणत्याही योग्यतेेशिवाय केवळ वारसदार या एकमेव निकषावर जागा बळकावून बसलेली असते, तेव्हा त्याचे दुष्परिणाम पक्षाला, संघटनेला तत्काळ तर भोगावे लागतातच, तसेच ते दूरगामीही असतात. पक्ष लयाला नेण्याची ताकद अशा क्षमताहीन नेतृत्वात असते. आत्ता नेमके तेच काँग्रेसच्या बाबतीत घडते आहे.

 
देशातल्या 31 राज्यांपैकी आज फक्त 6 राज्यांत राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या काँग्रेसचा प्रत्यक्ष सत्तेत सहभाग आहे. त्यातही 3 राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात आहेत. ही आकडेवारी पक्षाच्या अधोगतीचे द्योतक आहे. आता तर या पक्षाचा आत्मविनाशाच्या दिशेने जलद गतीने प्रवास चालू आहे, असे पंजाबमध्ये उद्भवलेल्या सद्य:स्थितीवरून म्हणता येईल.
 
पंजाब हे देशाच्या सीमेवरचे राज्य म्हणून त्याचे महत्त्व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अनन्यसाधारण असे. याची जाण असणारे खमके नेतृत्व गेली 10 वर्षे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या रूपात या राज्याला लाभले. ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ मानून राज्यकारभार करणारे कॅप्टन मोदी-शहा यांच्याशीही सौहार्दाचे नाते असणारे. आणि हीच बाब काँग्रेस नेतृत्वाला खटकणारी. तेव्हा अशा जाणत्या आणि खंबीर नेतृत्वाच्या कामात अडथळे आणण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धू या अपरिपक्व व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याची अवदसा नेेतृत्वाला आठवली. काही महिन्यांपूर्वी हा निर्णय झाला, तेव्हा काँग्रेसमध्ये (उरलेल्या) जुन्या-जाणत्या कोणालाही तो मान्य नव्हता. पण आले पक्षश्रेष्ठींच्या मना, तेथे कोणाचे चालेना अशी गत असल्याने ते नाराजीचे सूर हवेत विरून गेले आणि सिद्धू यांना कॅप्टन यांच्याशी वितंडवाद घालण्यासाठी रान मोकळे मिळाले. सहनशक्तीच्या एका मर्यादेनंतर कॅप्टन अमरिंदर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अद्याप पक्ष सोडला नसला, तरी ‘माझ्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत’ असा इशाराही पक्षप्रमुखांना दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनुभवी नेतृत्वाने दिलेल्या इशार्‍यातले गांभीर्य लक्षात घेऊन पावले उचलण्याचे, पक्षहितासाठी त्यांचे मन वळवण्याचे शहाणपण राहुल गांधींनी दाखवले नाही. कॅप्टन राजीनामा देऊन पक्षाला आव्हान देऊ शकतात आणि ते आव्हान पेलणे पक्षाच्या कुवतीबाहेरचे ठरू शकते, हा विचार ना सिद्धू यांच्या मनाला शिवला, ना त्यांच्या पक्षप्रमुखांच्या. त्याचेच परिणाम पक्ष भोगतो आहे, भोगणार आहे. मात्र कॅप्टन यांच्या राजीनाम्याचे जराही दु:ख न करता, त्याबाबत सिद्धूंना जाब न विचारता पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी पहिला दलित मुख्यमंत्री बसवण्याच्या निर्णयाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी धन्यता मानली. हा बदल म्हणजे जणू काही आपलाच विजय आहे अशा भ्रमात असलेल्या सिद्धू यांच्या अपेक्षा वाढल्या. हे नवनियुक्त मुख्यमंत्री - चरणजितसिंह चन्नी आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेतील, अशा भ्रमात राहिलेल्या सिद्धूंचा अल्पावधीतच भ्रमनिरास झाला. गृहमंत्रिपदावर झालेल्या नियुक्तीवरून तर सिद्धू नाराज झालेच, शिवाय अमरिंदर सिंग यांच्या मर्जीतल्या काहींची मंत्रिपदी वर्णी लागल्यावर या नाराजीत वाढ झाली आणि नाराज सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याबरोबर काही आमदार, मंत्री यांनीही राजीनामे दिले. आपले उपद्रवमूल्य कामी येऊन आपली मनधरणी केली जाईल, अशी अटकळ यामागे असावी. म्हणूनच पद सोडले, तरी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली नाही. मात्र त्यांचा हा अंदाज चुकला. त्यांची मनधरणी होण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचे आदेश वरून देण्यात आले आहेत.
दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. ते तूर्तास भाजपाबरोबर गेले नाहीत, तरी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवून काँग्रेससह आप, अकाली दल यांनाही आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवतील. निवडणुकीनंतर भाजपा आणि कॅप्टन अमरिंदर यांच्यात युती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

थोडक्यात, एका हाताची बोटे पुरेशी ठरतील इतक्याच राज्यांत सत्तेचे दोर हातात असताना, पंजाब राखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते गमावण्यासाठी काँग्रेसने सिद्धूसारख्या वाचाळ वीराच्या हाती सूत्रे दिली. कपिल सिब्बलसारखे जुने जाणते नेते जेव्हा याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करतात, पक्षाध्यक्ष नसल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवतात, तेव्हा त्यावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सिब्बल यांनाच घेराव घालण्यात येतो, हे चित्र सध्याची पक्षस्थिती समोर ठेवणारे आहे. अशा काँग्रेसकडून मोदी पराभवाची अपेक्षा करणे हेच किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येते.
 
 
घराणेशाहीशिवाय काँग्रेस पक्ष टिकणार नाही हा त्याच्या कार्यकर्त्यांचा असलेला ठाम समज आणि घराणेशाही राहिली तर काँग्रेस राहणार नाही हे वास्तव, या दुविधेत पक्ष फसला आहे. मोडकळीला आलेले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, त्यात प्राण फुंकण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याऐवजी मोदींचा पराभव - मोदींचा द्वेष हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशीच अंदाधुंद वाटचाल चालू ठेवली, तर काँग्रेस आत्मविनाश करून घेईल, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
 
 
सिद्धूनंतर आता बिहारमधील युवा नेता कन्हैय्या कुमार आणि गुजरातचा जिग्नेश मेवानी या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हा काँग्रेस पक्ष डॅमेज कंट्रोल करण्याऐवजी आत्मविनाशासाठी उतावीळ झाला आहे, इतकेच सध्या म्हणता येईल. आणि त्यासाठीचे कंत्राट आउटसोर्स करून गांधी घराण्याचे वारसदार - काँग्रेसचे सूत्रधार निवांत आहेत.