विदर्भातील प्राचीन गणेशमंदिरे

विवेक मराठी    07-Sep-2021
Total Views |
विदर्भात जसे वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, रामदासी संप्रदाय, नाथसंप्रदाय यांची ठाणी आहेत, तसा गाणपत्य संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे. गणपतीस आराध्य दैवत समजणार्‍या भक्तांना गाणपत्य असे म्हणतात. गणपती अनेकांचे कुलदैवत आहे आणि आदास्याचे श्री शमीविघ्नेश देवालय याच गाणपत्य संप्रदायातील उपास्य दैवत आहे. विदर्भात श्रीगणेशाची 840हून अधिक मंदिरे आहेत. म्हणजेच एका अर्थाने गाव तेथे गणपती असे समीकरण दिसते.

ganpati_1  H x
गणपती हे भारतीय संस्कृतीत पंचपंचउष:काली पडलेले, एक पावन आणि नितांतसुंदर स्वप्न आहे. त्या स्वप्नातच ही गणपतीची मंगलमूर्ती साकारलेली आहे. भक्ताच्या अंतश्चक्षूपुढे उभे होणारे त्या वरदमूर्तीचे ध्यान वर्णन करायला शब्द कमी पडतात. संकटांचे निवारण करण्यास सदैव सिद्ध असलेल्या गजाननाचा तो विशाल भालप्रदेश (कपाळ), गंडस्थळ, आगामी आपत्तींना अचूक हेरणारे त्याचे नेत्र, सूक्ष्म दृष्टी, मदोन्मत्त राक्षसाला लीलया उखडून फेकणारी, खडकावर आदळणारी ती सामर्थ्यशाली देवता आहे. गणपती अथर्वशीर्षात गणेशस्तवनात त्या देवतेस ‘बुद्धीची देवता’ (सा एषा: गणेशविद्या - अथर्वशीर्ष - गणपती) असण्याचा मान आहे. थोडक्यात, श्रीगणेश ही देवता सुखकर्ता दु:खहर्ता आहे. भारतात कुठल्याही खेड्यात, जंगल-कपारीत जा, वनवासी क्षेत्रात जा, तेथे हमखास दोन देवळे आढळतात. त्यातील एक गणेशाचे देऊळ हमखास असतेच. अशाच विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले आदास्याचे शमीविघ्नेश आणि एकमेवाद्वितीय असलेले रामटेक येथील अठराभुज श्रीगणेशमंदिराबद्दल जाणून घेऊ या.
 
 
विदर्भात जसे वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, रामदासी संप्रदाय, नाथसंप्रदाय यांची ठाणी आहेत, तसा गाणपत्य संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे. गणपतीस आराध्य दैवत समजणार्‍या भक्तांना गाणपत्य असे म्हणतात. गणपती अनेकांचे कुलदैवत आहे आणि आदास्याचे श्री शमीविघ्नेश देवालय याच गाणपत्य संप्रदायातील उपास्य दैवत आहे. विदर्भात श्रीगणेशाची 840हून अधिक मंदिरे आहेत. म्हणजेच एका अर्थाने गाव तेथे गणपती असे समीकरण दिसते. गणपती ही बुद्धीची, विद्वत्तेची देवता आहे, असे श्री गणपती अथर्वशीर्षात म्हटले आहे व ते खरेही आहे.
 
 
विदर्भातील श्रीगणेशाचे सर्वात प्राचीन स्थान म्हणून आदासा ओळखले जाते. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यामध्ये श्रीक्षेत्र आदासा हे स्थान आहे. येथील प्रतिमा 1500 वर्षे प्राचीन आहे. वामन पुराणात, मुद्गल पुराणात या तीर्थक्षेत्राचा उल्लेख येतो. याबद्दलची कथा अशी की महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमीविघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तिन्ही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली, त्या ठिकाणी मुद्गल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थापना केली. तेच हे अदोष अर्थात आदासा क्षेत्र आहे आणि ही गणेशप्रतिमा विदर्भातील अष्टगणेश स्थानांत मोडतेच आणि विदर्भातील अष्टगणेशांचा राजा ठरते. इ.स.च्या चौथ्या शतकात विदर्भात वाकाटक राजवंश राज्य करीत होता. त्या राजवंशाच्या काळातील एक भव्य व विशाल वास्तूचे पुरावशेष नुकतेच मनसरच्या उत्खननात उघडकीस आलेले आहेत.
 

ganpati_1  H x
 
नागपूरवरून फेटरी-कळमेश्वरमार्गे धापेवाडा गाठावे व धापेवाड्याच्या कोलबास्वामी मंदिरास अवश्य भेट द्यावी. तेथील विठ्ठल-रुखमाईच्या प्रतिमा व देवळाच्या भिंतीवरील रंगीत चित्र जरूर पाहावीत. धापेवाड्यापासून मोहरीच्या हिरव्यागार शेतातून निसर्गाचा आनंद लुटत लुटत जमल्यास पायी पायी आदास्यास यावे. पायी जाण्यात एक वेगळीच मजा आहे. हे अंतर 5 कि.मी. असून निसर्गाने आदास्यास पूर्ण वरदहस्त दिला आहे. दुरूनच एक पांढरा ठिपका दिसतो, तेच आदास्याचे भव्य व प्राचीन मंदिर. गावात शिरताच गोंडसे पाटलाचा भव्य प्रासादतुल्य वाडा दिसतो. पूर्वी तेथे गाड्यांची पार्किंगची व्यवस्था होती. पण आता मात्र शासनाच्या कृपेने सर्व वाहने (दुचाकी-चारचाकी) थेट वरपर्यंत अगदी देवालयापर्यंत जाऊ शकतात. श्रीगणेशाचे दर्शन घेण्यास निदान 10 फूट खाली उतरावे लागते. गावातूनही सुंदर सुबक व प्रशस्त पायर्‍या आहेत. दर्शनी भागात दगडाच्या अंबारीसारखे प्रवेशद्वार असून आतील सभामंडप आकाशगामी (म्हणजे आकाशातील - जशिप ीें ीज्ञू) आहे.
 
 
 
बोगदेवजा बोळीतून आत गेल्यानंतर गर्भगृहातील भीमकाय श्रीगणेशप्रतिमा नजरेत भरते. मुळात प्रतिमा 13 फूट 7 इंच उंच असून ती नृत्यमुद्रेत आहे. श्रीप्रतिमेस तीन ठिकाणी वाक असल्याने तिला त्रिभंग प्रतिमा म्हणतात. गणेशास माळ घालण्यासाठी मध्यभागी एका काष्ठासनावर उभे राहावे लागते. प्रतिमेचे भाव शांत-सौम्य असून नेत्र बारीक आहेत. चतुर्हस्त प्रतिमा नृत्यमुद्रेत असून भालावर (म्हणजे कपाळावर) चंद्रकोर आहे, म्हणून तर गणेशास भालचंद्र म्हणतात. अंकुश मोदक व वरदामय मुद्रेतील प्रतिमा पाहताच भक्त आपोआप नतमस्तक होतो. गर्भगृह थोडे छोटे असून त्यात केवळ 8-10च भक्त एका वेळेस आरती करू शकतात. प्रतिमेचे मस्तक हत्तीचे असून प्रतिमेवर अंगचा मुकुट नाही. प्राचीन प्रतिमा ओळखायची असेल, तर हेच त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ गंडस्थळ व मध्यभागी मेंदू केंद्र असून माहुत त्याच जागेवर अंकुशाचा आघात करून हत्तीस आपली भाषा (आज्ञा) शिकवतो. आदास्याची प्रतिमा अत्यंत प्राचीन आहे. शेंदुराच्या लेपनामुळे मात्र मूळ स्वरूप आकळत नाही. गाभार्‍यात घनगंभीर आवाजात श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणताना वेगळीच अनुभूती जाणवते. वर्षभर प्रदोष अंगारकीस व संकष्टी चतुर्थीस यात्रा असते. त्याने गावास रोजगाराचा आधार दिलेला आहे, जणू शमीविघ्नेश म्हणजेच आदास्याचे ग्रामदैवत होय.

 
देवालय हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे असले, तरी इ.स.च्या 16व्या शतकात गोंड नृपतींनी देवळाचा जीर्णोद्धार केल्याचे दिसते. प्रवेशद्वारावर त्यांचे चिन्ह असलेले चषक (मद्यचषकसदृश) दिसतात. मधली मेहरूपी कमानही ऐटदार आहे. प्रतिमा भव्य असली, तरी प्रमाणबद्ध आहेच. श्रीमंत भोसलेराजांनी मात्र बाजूला शिखरयुक्त मंडोवर बांधले. डावीकडून वर चढून हे शिखर पाहता येते. येथे 50 ते 100 तीर्थयात्री बसून जेवणाचा आनंद घेऊ शकतात. मंदिर अतीव सुंदर असून वरच्या भागातून संपूर्ण आदासा गाव, त्यातील शेतीचे पट्टे, वृक्षसंकुल व वाहने सुंदर दिसतात. शासनाने या स्थानास पर्यटनाचा दर्जा दिल्याने सर्व सोई (डांबरी रस्ते, विद्युत, पेयजल, आरोग्य केंद्र, दुकान, माहिती केंद्र) उत्तम आहेत. नागपूरचे व आसपासचे हजारो भक्त मंदिरास भेट देतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले असे ठिकाण सुट्टीच्या निमित्ताने कायम गजबजलेले दिसते.


ganpati_2  H x
 
भारतात एकमेवाद्वितीय असलेल्या अठराभुज श्रीगणेशाच्या प्राचीन मंदिराची माहिती आपण जाणून घेऊ या. रामटेक तसे प्राचीन स्थान आणि आता मनसरच्या जागतिक दर्जाच्या उत्खननाने या रामटेकच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. विदर्भातील अष्टविनायकांपकी एक असलेल्या रामटेकच्या अष्टादशभुज गणपतीचे वर्णन अनेक पुराणांत केलेले आहे. मुळात रामटेक हे स्थान अनेकार्थांनी प्रसिद्ध आहे. अठरा भुजा गणपतीचे असेच एक मंदिर आहे. मंदिराला तीन उत्तराभिमुख गाभारे असून तिन्ही गाभार्‍यांत गणपतीच्याच मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात. या तिन्ही गाभार्‍यांवर गणेशपट्टीच्या ठिकाणी कीर्तिमुखे कोरलेली दिसतात.

गणेशप्रतिमेकडे पाहताच अवघ्या शरीरास डोळे फुटावे व मन तृप्त होईपर्यंत ही साजरी गोजरी प्रतिमा पाहत राहावी असे वाटते. या प्रतिमेस संस्कृतात ‘अष्टादशभुज गणपती’ असे म्हणतात. प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात चमत्कारिक असून वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. प्रतिमा शेंदूरलेपित असल्याने आकळता येत नाही. मूर्तीचे 18 हात अगदी स्पष्ट दिसतात. प्रत्येक हातात काय काय आयुष (शस्त्र) वस्तू आहेत, ते मात्र आकळते. प्रतिमा 3 फूट 7 इंच असून पाठशिळा सुटी आहे. प्रतिमा उठावात कोरली असून मुकुट, गंडस्थळ, शूर्पकर्ण, लघुनेत्र, भालप्रदेश, सोंडेची दक्षिण वाममुद्रा (वेटोळे), उजवा पाय दुमडलेला असून डावा मात्र पद्मासनात आहे. पण तरीही ही प्रतिमा वाम ललितासन मुद्रेत असावी, असे वाटते. उदरबंध नाभिकमल लंबोदर मुख्य हात मोदकग्रहण (अपूप) मुद्रेत दिसतो. सोंडेची बळी मात्र मोठी सुंदर असून मोदकमक्ष मुद्रेत सोंड वळवलेली दिसते.


ganpati_3  H x
 
अष्टादशभुजा नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. एका हातात मोदक आणि दुसर्‍या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानांचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे वर्णन वाचनात येते; तर अठरा सिद्धींमुळे विघ्नेश्वर म्हणून या गणपतीचे पूजन करतात, असे पुराणात सांगितले आहे. उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे याला सिद्धिविनायक असेही म्हटले जाते. या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार केलेला असल्यामुळे नवीन बांधकाम केलेले मंदिर आपल्याला दिसते. अठरा हातांची ही मूर्ती इथून जवळच असलेल्या रामसागर अर्थात खिंडसी तलावात रघुजी भोसल्यांच्या काळात सापडली, असे इथे सांगितले जाते. मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. विदर्भातील अष्टविनायक गणपतीची ही मोठी भव्य परंपरा आहे. अनेक वैदर्भीय माणसे याची यात्रा करतात. याच अष्टविनायक यात्रेत हे दोन्ही गणपती येतात. प्रत्येकाने आवर्जून बघावे असे हे स्थान आहे.
॥ जय गणेश ॥