मुंबईतील अष्टविनायक

विवेक मराठी    07-Sep-2021
Total Views |
मुंबईतील घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालणार्‍या धकाधकीच्या दिनचर्येमुळे अष्टविनायक दर्शन शक्य होत नसले, तरी मुंबईतील या अष्टविनायकांचे दर्शन आपण जरूर घेऊ शकतो. या गणपतींची वैशिष्ट्ये व ते कोठे कोठे स्थापन केले आहेत याबद्दलची माहिती देणारा लेख...

ganpati_1  H x

मुं
बई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. शिवाय मुंबई ही मनोरंजनाची राजधानीही (बॉलिवूड) आहे, म्हणूनच तिला चंदेरी दुनिया म्हटले गेले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई एक आहे. देशातील एकूण कारखानदारी नोकरदारांपैकी वीस टक्क्यांहून अधिक लोक येथे राहतात. नोकरी-व्यवसायातील संधी आणि बॉलिवूडचे आकर्षण अशी स्वप्ने सत्यात उतरविणार्‍या मुंबईच्या या मायानगरीकडे भारतातून अनेक स्थलांतरित येत असतात. वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक येथे एकत्र नांदतात. हे सगळे समुदाय आपल्या संस्कृतीबरोबरच मुंबईच्या संस्कृतीत मिसळून जातात. या सर्व धर्मीयांना आपलीशी वाटणारी देवता म्हणजे गणपती.
चौदा विद्यांचा, चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या, बुद्धीचा अधिष्ठाता असलेल्या गणेशाची उपासना सर्वच जण भक्तिभावाने करतात. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणे मुंबईतही गणपतीची जागृत देवस्थाने आहेत. मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या - ज्याची ख्याती केवळ देशातच नाही, तर जगात असलेल्या ‘सिद्धिविनायक मंदिरा’बरोबरच गणपतीची अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध मंदिरे मुंबईत आहेत. त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या.
उद्यान गणेश, दादर


ganpati_2  H x
 
‘शिवाजी पार्क, दादर’ - राजकीय, सामाजिक, क्रीडा असे विविध आयाम असलेले आणि चोवीस तास माणसांची वर्दळ असलेले हे पार्क (उद्यान) मुंबईकरांसाठी आध्यात्मिक शांततेचेही ठिकाण ठरलेले आहे, ते येथे असलेल्या उद्यान गणेशमंदिरामुळे. या मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे 1966 साली एका व्यक्तीला वडाच्या झाडाखाली गणेशाची छोटी मूर्ती सापडली. ज्या वडाच्या झाडाखाली गणेशाची मूर्ती प्रकट झाली, त्याच ठिकाणी 1970 साली गणेशमंदिर बांधण्यात आले. ही गणेशाची मूर्ती उद्यानात सापडली असल्यामुळे या मंदिराला ‘उद्यान गणेशमंदिर’ असे नाव देण्यात आले. मंदिरात प्रवेश केल्यावर मनमोहक अशा बालगणेशमूर्तीचे दर्शन होते. उजवीकडे सोंड असलेली (सिद्धिविनायक), शंख, लाडू, हस्तिदंत, गदा धारण केलेली चतुर्हस्त अशी चांदीची बाल गणेशमूर्ती दिसते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस ऋद्धी-सिद्धी आणि लक्ष-लाभ उभे आहेत. मंदिराच्या बांधकामात राजस्थान व गुजरात येथील संगमरवराचा वापर करण्यात आला असून मंदिरातील सिंहासन आणि घुमट सोन्याने मढवलेले आहे. मुंबईतील दादर हे शहर आत्यंतिक गजबजलेले असूनदेखील ‘उद्यान गणेशमंदिर’ येथील परसिरातील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न करणारे आहे. मनोभावे देवाच्या दारी गेल्यावर जी मन:शांती प्राप्त होते, त्याचा अनुभव उद्यान गणेशाचे दर्शन घेतल्यावर निश्चितच होतो.
 
गणेशमंदिर, बोरिवली


ganpati_1  H x  
बोरिवली पश्चिमेकडील वझिरा नाका येथील गणेशमंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी कोळी बांधव, भंडारी समाज आणि स्थानिक ग्रामस्थच मंदिरात दर्शनासाठी येत असत. गेल्या काही काळात या मंदिराची ख्याती वाढल्याने मुंबईतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले आहेत. या ठिकाणी पाच मंदिरे आहेत. येथील गणेशाची मूर्ती उत्तर दिशेला असून बाजूला शितलादेवीची मूर्ती आहे. त्याशिवाय मारुती आणि स्थानिक ग्रामदेवता आलजी देव यांचीही मंदिरे आहे.
 
वांच्छा सिद्धिविनायक मंदिर, अंधेरी

ganpati_1  H x
 
मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभूंचे हे दैवत. या मंदिरातील गणेशमूर्ती संगमरवरी असून सोन्याचा मुकुटाने आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली आहे. 1927मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. ‘इच्छापूर्ती करणारा गणेश’ म्हणून वांच्छा (वांच्छा या शब्दाचा अर्थ इच्छा असा आहे) सिद्धिविनायक असे संबोधले जाते. या मंदिरात गणेशासह शिवशंकर, दत्तगुरू, मारुती आणि महालक्ष्मी यांचीही छोटी व सुबक मंदिरे आहेत.
 
पार्लेश्वर गणपती मंदिर, विलेपार्ले
 

ganpati_1  H x  
 
विलेपार्ले स्थानकानजीक पार्लेकरांचे श्रद्धास्थान असलेले पार्लेश्वर मंदिर आहे. मूळ मंदिर भगवान शंकराचे असले, तरी मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे. गणेशभक्त श्रद्धेने येथील गणपतीची पूजा करतात. या मंदिरातील गणेशमूर्ती पंचधातूची असून मूर्तीवर चांदीचे छत्र आहे.
 
फडके गणपती मंदिर, गिरगाव

ganpati_1  H x
मूळच्या अलिबाग येथील असलेल्या यशोदा गोविंद फडके यांनी 1890 साली फडकेवाडीत या गणेशमंदिराची स्थापना केली. पतीच्या अकाली निधनामुळे निपुत्रिक असलेल्या यशोदाबाईंनी गणपतीलाच आपले पुत्र मानले आणि मंदिराची उभारणी केली. गणेशाला आपला पुत्र समजून या मंदिरातच त्या आपला वेळ सत्कारणी लावत. त्यांच्या पश्चात त्यांच्या स्नेही आणि नातेवाइकांनी मंदिराची देखभाल केली. गाभार्‍यातील गणेशमूर्तीचे मखर आणि गाभार्‍याचा दरवाजा चांदीचा आहे.
गणेशमंदिर, धारावी

ganpati_1  H x

मायानगरी मुंबईच्या मध्य भागात वसलेल्या या झोपडपट्टीत सुमारे 15 लाखाहून अधिक लोक राहतात. पश्चिम माहिम आणि पूर्व शीव (सायन)दरम्यान 557 एकरात धारावीची झोपडपट्टी पसरली आहे. धारावीतील झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मुंबईत येणारे परप्रांतीयांचा लोंढा काही प्रमाणात धारावीत स्थिरावतो. अशाच स्थलांतरित लोकांनी येथे गणेेशमंदिराची उभारणी केली आहे. दक्षिण भारतातील अदी द्रविड या समाजाने 1913 साली धारावीतील या गणेशमंदिराची उभारणी केली. तामिळनाडूतील हा समाज मुंबईत आला आणि धारावीमध्ये राहून चामड्याचा व्यवसाय करू लागला. या समाजातील काही लोकांनी येथे मंदिराची स्थापना केली. शंभर वर्षांपूर्वी पूर्ण झालेले हे मंदिर पूर्वी पिंपळवृक्षाच्या खाली बांधण्यात आले. 1939 साली त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ गावापासून दूर राहणार्‍या या स्थलांतरित लोकांनी मुंबईच्या मायानगरीत तारणहार वाटणार्‍या विघ्नविनाशक, संकटमोचक गणेशाची स्थापना केली.
गणेशमंदिर, जोगेश्वरी


ganpati_1  H x
भारतात ठिकठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळतात. लेण्यांमधून वास्तुशिल्पांचे, चित्रांचे अनेक नमुने आपली संस्कृती अधोरेखित करताना दिसतात. मुंबईत मागाठाणे, कान्हेरी, मंडपेश्वर, जोगेश्वरी इत्यादी ठिकाणीदेखील लेण्या आहेत. येथील जोगेश्वरी लेणीत गणेशाचे रेखीव मंदिर आहे. गुहेत असलेल्या या मंदिराचे शिल्पसौंदर्य अप्रतिम आहे. गणेशमूर्ती दगडात कोरलेली असून मूर्तीला शेंदुराचे लेपन केलेले आहे. तसे पाहिले, तर जोगेश्वरी लेणी ही शैव लेणी म्हणून ओळखली जातात, परंतु या लेण्यांच्या प्रथमदर्शनीच गणेशाचे मंदिर पाहायला मिळतेे. येथील गणेशाची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. गुहेसमोरच कोरीव काम केलेले दोन खांब आपल्याला बघायला मिळतात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अनोखा संगम जोगेश्वरी लेणीतील गणेशमंदिरात अनुभवायला मिळतो.
काळा गणपती / संकल्पसिद्धी गणेशमंदिर, गोरेगाव

ganpati_1  H x

17 जुलै 1961 रोजी गणेशाची छोटी मूर्ती बसवून मंदिराची स्थापना करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र भट्ट यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. 1980 साली गणपती मंदिराचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी 1984मध्ये माघी गणेश चतुर्थीनंतर येणार्‍या संकष्टीला मंदिरात काळ्या रंगाची गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला ‘मुंबईतील काळा गणपती’ म्हणून ओळखले जाते.
मुंबईतील घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालणार्‍या धकाधकीच्या दिनचर्येमुळे अष्टविनायक दर्शन शक्य होत नसले, तरी मुंबईतील या अष्टविनायकांचे दर्शन आपण जरूर घेऊ शकतो.