सड्यावरून फिरताना...

विवेक मराठी    09-Sep-2021
Total Views |
@हर्षद तुळपुळे  9405955608
 
 
उन्हाळ्यात अत्यंत रुक्ष, रखरखीत दिसणारे कोकणातले कातळसडे पावसाळा सुरू झाला की हिरवेगार होतात आणि रंगीबेरंगी रानफुलांनी बहरतात. केवळ ‘उजाड माळरानं’ या चश्म्यातून न बघता ‘परिसंस्था’ म्हणून सड्यांचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. दोन-तीन महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी असणारं सड्यांचं हे रंगीबेरंगी रूप लेखणीतून साकारण्याचा हा प्रयत्न...


kokan_4  H x W:

निसर्गाची रूपं ऋतूनुसार बदलत असतात. काही ‘सदाहरित’ पट्टे सोडले, तर बराच भूभाग पावसाळ्यात हिरवागार दिसतो, तर उन्हाळ्यात पिवळा-करडा दिसतो. भारतात परिसंस्थांची विविधता भरपूर आढळते. इथे सदाहरित, पानझडी अशी सगळ्या प्रकारची जंगलं आहेत; गवताळ कुरणं आहेत, सरोवरं आहेत, नद्या आहेत, वाळवंट आहेत, समुद्रकिनारा आहे, शेतजमिनी आहेत, बागा आहेत, सगळं सगळं आहे! काही नाही असं नाही. पण यामध्ये एका भूरूपाचं नाव सहसा घेतलं जात नाही - किंबहुना ‘परिसंस्था’ (Ecosystem) म्हणून त्याचं महत्त्व फारसं जाणून घेतलेलं नाही, ते म्हणजे ‘सडा’.
 
 
‘परिसंस्था’ ही अनेक जैविक आणि अजैविक घटकांची गुंफण असते. ‘जंगल’ म्हटलं की तिथे ‘वृक्ष’ हा प्रमुख घटक असतो आणि त्याच्या जोडीने वेली, झुडपं, गवत, पालापाचोळा, खडक, तळी, वन्य प्राणी, सूक्ष्मजीव, कीटक यांची एक सुंदर रेलचेल बघायला मिळते. पर्यावरणप्रेमींकडून बरेचदा जंगल ही निसर्गाची आदर्श रचना मानली जाते. तशी ती आहे याबद्दल काही वादच नाही, पण त्याचबरोबर अन्य परिसंस्थाही तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि त्याही माणसाला काही ना काही सेवा पुरवत असतात. ‘सडा’ ही अशीच एक दुर्लक्षित परिसंस्था. आत्तापर्यंत ‘उजाड माळरानं’, ‘ओसाड जमिनी’ अशी ओळख असलेल्या आणि सरकारदरबारीही ‘पडीक जमिनी’ (Wastelands) अशी नोंद असलेल्या या सड्यांचा अलीकडे ‘परिसंस्था’ म्हणून शास्त्रीय अभ्यास होऊ लागला आहे. या अभ्यासातून निसर्गाचं हे अचंबित करणारं अनोखं रूप उलगडत जात आहे. रॉक आउटक्रॉप नेटवर्क, निसर्गयात्री, बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी अशा काही संस्था आणि शास्त्रज्ञ यावर भरपूर संशोधन करत आहेत.
 
 
सडा या परिसंस्थेचा आधार म्हणजे खडक. खडकांच्या प्रकारानुसार भारतात मुख्यत: तीन प्रकारचे सडे आढळतात - ग्रॅनाइटचे सडे, बेसाल्टची पठारं आणि जांभ्या दगडाचे सडे. खडकाच्या प्रकारानुसार आणि त्या त्या प्रदेशातल्या हवामानानुसार व पाऊसमानानुसार सड्यांवर जीववैविध्य आढळतं. सड्यांवर माती फार तुरळक प्रमाणात असते. त्यामुळे थेट दगडातून डोकं वर काढणार्‍या विविध प्रकारच्या वनस्पती सड्यांना सजवतात. पश्चिम घाटात महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पसरलेल्या जांभ्या दगडाचे सडे जीवविविधतेच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत. सडा ही एक परिवर्तनशील परिसंस्था आहे. उन्हाळ्यात रुक्ष वाटणारे सडे पावसाळा सुरू झाला की रंगीबेरंगी रानफुलांनी बहरतात. सह्याद्रीतल्या सड्यांवरची पावसाळी रानफुलं म्हणजे निसर्गप्रेमींना पर्वणी असते.
 
 
ही रानफुलं गुलाब, मोगरा, सोनचाफा, अनंत या पाळीव फुलांसारखी सुगंधी नसतात, परंतु सुंदर मात्र असतात. शिवाय ही सर्व अल्पजीवी (Ephemeral) या गटात मोडतात. पावसाळ्यातले काही दिवसंच ही फुलं फुलतात, त्यांच्या बिया जमिनीवर पडून राहतात आणि त्या थेट पुढील पावसाळ्यात रुजतात. या वनस्पती रुजण्याचा आणि फुलं फुलण्याचा एक विशिष्ट क्रम असतो. शिवाय त्यांचा आढळ परिसरपरत्वे बदलतो. सर्वसाधारणपणे जून महिन्यात पहिला पाऊस पडून गेला की सड्यांवर गवताची रुजवण सुरू होते. या गवतातून ‘आषाढ आमरी’ (habenaria grandifloriformis) हे पांढरंशुभ्र सुंदर फूल डोकं वर काढतं. जमिनीलगत गोल पान आणि वीतभर उंची असणारी ही वनस्पती पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम 15-20 दिवस सड्यांवर पाहायला मिळते. त्यानंतर ती आपोआप निघून जाते. पावसाळी झाडं-वेली कशा मर्यादाशील असतात पाहा ना! काही दिवसच त्या परिसरात स्वत:चा तोरा मिरवतात आणि नंतर बाकीच्यांना वाढायला देऊन आपणहोऊन माघार घेतात! आषाढ आमरीच्या मागोमाग जांभळ्या रंगाची बारीक टिकलीसारखी दिसणारी चार पाकळ्यांची ‘पादरी’ची फुलं (neonotis foetida) सड्यांवर दिसायला लागतात. या फुलांना किंचित दुर्गंध असतो. (म्हणूनच त्यांना कदाचित हे नाव पडलं असावं!). ही फुलं तुलनेने बराच काळ (सुमारे अडीच-तीन महिने) टिकतात. काळ्या कातळांवर या फुलांचा सुंदर गालिचा बघायला मिळतो.
 
 
साधारणपणे 15 जुलै ते 15 सप्टेंबर हा काळ म्हणजे सड्यांवर जणू रंगोत्सव असतो! या काळात कोकणातले बहुतांश सडे ‘सोनकी’च्या (enecio grahamii) फुलांनी पिवळेधमक होऊन जातात. वार्‍याबरोबर डोलणारा उंच पिवळा फुलोरा बघताना अक्षरश: समाधी लागते. गणपतीच्या सजावटीसाठी कोकणात हा पिवळा फुलोरा सररास वापरला जातो. फुलोर्‍याच्या घोसांनी मंडप्या सजवल्या जातात.
 


kokan_2  H x W:
 
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारं निळी पापणी (Utricularia) हे मध्ये पांढरा ठिपका असणारं जांभळ्या रंगाचं फूल सडेसौंदर्यात भर घालतं. या फुलाला ‘सीतेची आसवं’ असंही म्हणतात. रावण सीतेला पळवून नेत असताना सीतेचे अश्रू जमिनीवर पडले आणि त्याची ही फुलं बनली, अशी दंतकथा आहे. ही वनस्पती कीटकभक्षक आहे. मकरंद शोषण्यासाठी एखादा कीटक या फुलावर बसला की त्याच्या पाकळ्या मिटतात आणि तो कीटक या वनस्पतीच्या भक्ष्यस्थानी पडतो. निळी पापणीच्या सहवासातच ‘पाणगेंद’ (eriocaulon) ही पांढर्या. टोपीसारखं फूल असणारी वनस्पती विशेषत: तळ्याच्या कडेने उगवते. यांचाही एक जांभळा-पांढरा गालिचा तयार झालेला दिसतो. याच्या जोडीला मध्ये ‘तुतारी’ (Rhamphicarpa scaposa)ची पांढरीशुभ्र धोतर्‍यासारखी दिसणारी, परंतु जेमतेम बोटभर उंचीची फुलं सड्यांची शोभा वाढवतात. या फुलाचा देठ किंचित वक्र असल्यामुळे त्याचा आकार तुतारीसारखा दिसतो, म्हणून या फुलाला हे नाव पडलं असावं. या वनस्पतीचे जगभरात 400 प्रकार असून त्यांपैकी सुमारे 15 प्रकार कोकणात आढळतात.
 
 
गुलाबी रंगाची बारीकशी फुलं असलेलं ‘गवती दवबिंदू’ (drosera indica) ही आणखी एक कीटकभक्षक वनस्पती गवतात मध्ये मध्ये दिसते. Camptorhiza indica ळपवळलर हीसुद्धा रत्नागिरीतली प्रदेशनिष्ठ (Highly Endemic) वनस्पती आहे. सप्टेंबर महिना सरायला लागतो, तशी नवरात्रात घराच्या दारावर ज्यांचे घोस बांधतात, ती ‘कुर्डू’ची फुलं (Celocia argentea) आता सड्यांवर डोलू लागतात. तीन पाकळ्यांची आकाशी रंगाची Murdannia semiteres,, गुलाबी रंगाची दोन पाकळ्यांची जमिनीलगत दिसणारी ढाल गोधडी (indigofera dalzellii), गडद लाल-मातकट रंगाच्या जाड देठातून डोकं वर काढणारी बंबाकू (Striga generioids), चार पाकळ्यांची जांभळी चिरायत (Exacum pumilium), तशाच आकाराची गुलाबी रंगाची युफोर्बिया (Euforbia), रस्त्याच्या कडेला हळदव्या रंगाची दिसणारी कवळा (Smithia sensitiva) अशी कितीतरी रंगीबेरंगी रानफुलं सड्यावरून चक्कर टाकताना नजरेस पडतात.
 
 
दोन फुलांचा इथे विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे कापरी कमळ (Corynandra Elegans) आणि एकदांडी (dipcadi concanense). ही फुलं पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ (Endemic) आहेत, म्हणजेच ती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत, तर फक्त कोकणातल्या सड्यांवर आणि तीही काही ठरावीक भागांतच आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या करेल-निवेलीच्या, तसंच नाणारच्या सड्यावर ही फुलं विपुल प्रमाणात आहेत. कापरी कमळ हे तुलनेने मोठं अतिशय मनमोहक दिसणारं फूल साधारणत: जुलै महिन्यात कोकणातल्या काही तुरळक सड्यांवर पाहायला मिळतं. सड्यांवर खोलगट भागात जिथे मातीचा संचय झालेला असतो, तिथे ही फुलं मुख्यत: दिसतात. एकच दांडी असलेलं आणि म्हणून ‘एकदांडी’ असं नाव पडलेलं पांढरंशुभ्र फूल काही क्वचित ठिकाणीच आढळतं. स्थानिक लोक याला ‘डोकाचं फूल’ असंही म्हणतात.
 
 
kokan_3  H x W:

सड्यावरून फिरत फिरत थोडं झुडपी भागात आलो की थोडी मोठ्या आकाराची आकर्षक रंगांची पावसाळी रानफुलं पाहायला मिळतात. तेरडा (Impatiens balsmina), पेंडगुळ (Ixora coccinea), मुरुडशेंग (Helicteres isora), टाकळा (cassia tora), रानभेंडी (Abelmoschus manihot), पुनर्नवा (Boerhavia diffusa), भारंगी (Clerodendrum serratum), रानतीळ (Sesamum orientale), कोष्ठ (Costus speciosus), अग्निशिखा/कळलावी (Gloriosa superba), काटलं (Momordica dioica)... बघावीत तितकी थोडी!
 
'रानफुलं' हा सडा या परिसंस्थेचा एक घटक झाला. 'परिसंस्था' म्हणून एखाद्या परिसराचा अभ्यास करताना विविध घटकांमधला आंतरसंबंध लक्षात घ्यावा लागतो. कोकणातले सडे म्हटलं की इथला जांभा दगड, दगडातल्या भेगा, त्यांतून झिरपणारं पाणी, सड्यांवरची छोटी-मोठी तळी आणि त्यातली जीवविविधता, रानफुलांचा आढळ, या रानफ़ुलांमुळे सड्यांवर होणारी कीटकांची आवक, सड्यांवर आढळणार्याि गवत प्रजाती, या गवताचा गुरांना होणार उपयोग, सड्यांवर होणारी शेती या सगळ्या घटकांचा परस्परसंबंध अभ्यासणं आणि सड्याच्या आजूबाजूला राहणार्यार लोकांना त्यापासून मिळणार्याप परिसंस्था सेवा (Ecosystem Services) यांचं मोजमाप करणं हा खूप मोठा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे.
 
 
kokan_1  H x W:
निसर्गाकडून माणसाला फुकट मिळणार्याा सेवांना परिसंस्था सेवा (Ecosystem Services) म्हणतात. संयुक्त राष्ट्रांच्या Millennium Ecosystem Assessmentमध्ये हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला. या निसर्गाकडून फुकट मिळणार्याM सेवांचं मूल्य कुठे राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जात नाही आणि म्हणून आर्थिक विकास करताना या सेवांचा र्हायस किती होतो आहे त्याची गणती कुठे होत नाही. जंगल, नद्या या परिसंस्थांच्या बाबतीत असे अभ्यास काही प्रमाणात होत आहेत, परंतु सडा या परिसंस्थेच्या बाबतीत असे अभ्यास झालेले नाहीत. गावपातळीवर ते होण्याची गरज आहे. आपल्या परिसरात एखादा मोठा सडा असेल, तर त्याचं एकूण क्षेत्र किती आहे, कुठल्या कुठल्या वनस्पती प्रजाती तिथे किती प्रमाणात आढळतात, कीटकांचे अधिवास तिथे किती प्रमाणात आहेत, सड्यावर पाणी मुरण्याच्या जागा कुठे कुठे आहेत, सड्यावर किती प्रमाणात गुरं चरतात, आजूबाजूच्या पशुपालकांना सड्यावरून चार्याठचा पुरवठा किती होतो, सड्याच्या आजूबाजूला विहिरी किती आहेत, या विहिरींना पाणीपुरवठा होण्यात सड्यांचं महत्त्व काय आहे, असे अनेक प्रश्न घेऊन 'सडा' या परिसंस्थेचा सर्वंकष अभ्यास होऊ शकतो, किंबहुना होण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयातले विद्यार्थी, तसंच ग्रामस्थ यात सहभागी होऊ शकतात.
 
 
 
संशोधक आणि ग्रामस्थ एकत्र येऊन स्थानिक पातळीवर असे परिसराभ्यास होणं हे निसर्गसंवर्धनाची दिशा ठरवण्यासाठी फार गरजेचं आहे.

.