एक कथा, चार सिद्धान्त

विवेक मराठी    01-Jan-2022   
Total Views |
चार सिद्धान्त आंतरराष्ट्रीय राजकारणाचे शाश्वत सिद्धान्त आहेत. पहिला सिद्धान्त राजाच्या प्राथमिक कर्तव्याविषयी आहे. राजा याचा अर्थ आजच्या भाषेत शासन चालविणारे सरकार. दुसरा सिद्धान्त युद्ध कशासाठी करायचे. शत्रू लहान असतानाच त्याला नष्ट केले पाहिजे, हा. चौथा सिद्धान्त आपली शक्ती बघावी, शत्रूची शक्ती बघावी आणि मग आक्रमण करावे. तिसरा सिद्धान्त ज्या कोणाला राष्ट्रीय राजनीती करायची आहे, अशा सर्वांनी मूळ पंचतंत्र (संक्षिप्त नव्हे) काळजीपूर्वक वाचले पाहिजे. राजनीतिशास्त्राचे ते ज्ञानभंडार आहे.

One story
 
पंचतंत्रातील कथा अनेकांनी वाचलेल्या असतात. न वाचलेलाही एखादा वाचक असू शकतो. या सर्व कथा राजनीतीचे शिक्षण देणार्‍या आहेत. पशू-पक्षी-प्राणी या कथेत बोलत असतात, त्यामुळे या कथा लहान मुलांसाठी आहेत, असा अनेकांचा गोड गैरसमज झालेला असतो. या कथा लहान मुलांसाठी आहेत, असे मानून काही लेखक मुलांच्या गोष्टी लिहीत असताना त्यात या गोष्टी टाकतात आणि शेवटी कथेचे तात्पर्य सांगतात. मला व्यक्तिश: पंचतंत्रातील कुठलीही कथा लहान मुलांसाठी आहे, असे वाटत नाही.
 
 
एकाच कथेचे उदाहरण घेऊ या. या कथेत भासुरक नावाचा एक सिंह आहे. पोट भरण्यासाठी तो अनेक प्राण्यांना मारत असे. प्राण्यांचे प्रतिनिधी मंडळ त्याला जाऊन भेटले आणि सांगितले की, “तुम्ही मनात येईल तसे प्राणी मारू नका. आपण करार करू या, आमच्यापैकी रोज एक प्राणी तुमच्या आहारासाठी आम्ही पाठवू.” भासुरक म्हणाला, “ठीक आहे.”
 
 
एके दिवशी एका सशाची पाळी होती. तो रमतगमत एका अर्थाने मरायला जात होता. जाता जाता त्याला एक विहीर लागली. त्याने विहिरीत डोकावून पाहिले, त्याला आपले प्रतिबिंब दिसले. नंतर त्याच्या मनात कल्पना आली की, या भासुरक सिंहाला येथे आणून ठार करता येईल. भासुरकाने त्याला विचारले, “तू एवढा उशिरा का आलास? एक तर तू एवढा लहान, त्यात माझे पोट कसे भरणार?” तेव्हा तो ससा म्हणाला, “आम्ही तिघे जण येत होतो, वाटेत दोघांना दुसर्‍या सिंहाने खाऊन टाकले. तो म्हणत होता, या जंगलाचा मीच राजा आहे. त्या दुसर्‍या सिंहाला सांग, हिंमत असेल तर माझ्याशी लढाई कर.”


online पुस्तक खरेदी करण्यासाठी 

जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत
https://www.vivekprakashan.in/books/global-power-struggle-and-india/

‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे लिखित पुस्तक आहे. जागतिक सत्तासंघर्षात आर्य चाणक्य यांची परराष्ट्र नीती ते आजचे पंतप्रधान मोदी यांची (आणि माजी सर्व पंतप्रधानांची) परराष्ट्र नीती व्हाया स्वामी विवेकानंद/म. गांधी यांचे नेमके स्थान काय किंवा काय भूमिका राहिली, याचा या पुस्तकात थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे…..

किमत फक्त २२५ /- रु.

https://www.vivekprakashan.in/books/global-power-struggle-and-india/

 
 
हे ऐकल्यानंतर भासुरक खवळला. तो सशाबरोबर विहिरीकडे आला. पाण्यात त्याचे प्रतिबिंब पडले. हाच दुसरा सिंह आहे, असे समजून भासुरकाने डरकाळी फोडली. विहिरीतून मोठा प्रतिध्वनी आला. त्याला मारण्यासाठी भासुरकाने पाण्यात उडी मारली आणि तो बुडून मेला. अशी ही कथा थोडक्यात आहे.
 
 
या कथेत भासुरक आणि ससा यांच्यातील संवाद दिले आहेत. दोघेही जण राजनीतीचे शाश्वत सिद्धान्त एकमेकांना सांगत आहेत आणि कथाकाराने अत्यंत कौशल्याने कथेत हे सिद्धान्त गुंफले आहेत. पहिला सिद्धान्त प्राण्यांचे शिष्टमंडळ जेव्हा येते, तेव्हा ते राजाचा राजधर्म सांगतात, तो असा - महाराज, राजाचे कर्तव्य शासन करण्याचे असून प्रजेला पिडण्याचे नाही. ज्याप्रमाणे बीला कोंब फुटतात, तिचा वृक्ष होतो, वृक्षाला फळे लागतात त्याप्रमाणे ज्या प्रजेचे राजा रक्षण करतो, ती प्रजा राजाशी एकनिष्ठ राहते. त्याला मदत करते.’ प्रत्यक्षातील एक उदाहरण घेऊ या. झार निकोलस दुसरा हा रशियाचा शेवटचा झार होता. त्याने प्रजेला खूप पिडले. 9 जानेवारी 1905ला आपली गार्‍हाणी राजाला सांगण्यासाठी राजधानी पिटर्सबर्ग इथे मोठा मोर्चा निघाला. राजाने त्याचे गार्‍हाणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर गोळ्या घातल्या. एकाच दिवशी शेकडो लोक ठार झाले. 9 जानेवारी 1905 रोजी झारच्या सिंहासनाचा लोकमान्यतेचा खांब कोसळून पडला. 1917ला रशियन क्रांती झाली आणि 1918ला झार निकोलस, त्याची पाच मुले आणि पत्नी यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.
 

One story 
 
या कथेतील दुसरा सिद्धान्त असा आहे - दुसर्‍या सिंहाशी लढायला जाताना भासुरक म्हणतो, ‘आपले पूर्वज असे म्हणतात की, युद्ध केल्याने प्रदेश, मैत्री आणि सोनं प्राप्त होत असते. शहाणे राजे यापैकी काही मिळणार नसेल, तर युद्ध करीत नाहीत.’ पुन्हा झार निकोलस दुसर्‍याचे उदाहरण घेऊ या. 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. या महायुद्धात रशियाला पडण्याचे काही कारण नव्हते. ना त्यांना भूमी मिळणार होती, ना मित्र मिळणार होते, ना सोने मिळणार होते. झार निकोलस युद्धात पडला. त्याचे पाच-सहा लाख सैनिक ठार झाले. शेवटी राजगादी गेली आणि मरण वाट्याला आले.
 
 
या कथेतील तिसरा सिद्धान्त भासुरकच सांगतो, तो असा - शत्रू लहान असतानाच त्याला नष्ट केले पाहिजे. तसेच रोग लहान असतानाच त्याच्यावर उपाय केला पाहिजे. असे केले नाही तर, ते वाढत जातात आणि ते नंतर आपल्यालाच खाऊन टाकतात. 1948 साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. भारतीय सैन्याने त्यांचा पराभव केला. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा सर्व प्रदेश आपले सैन्य मुक्त करू शकत होते. पंडित नेहरूंनी अचानक युद्धविराम घोषित केला, आज एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तो जिंकून परत घेणे दिवसेंदिवस कठीण होत जात आहे.
 

One story 
 
या कथेतील चौथा सिद्धान्त असा आहे की, शत्रूशी लढायला जाण्यापूर्वी आपल्या सामर्थ्याचा आपण विचार केला पाहिजे, त्याचप्रमाणे शत्रूच्या सामर्थ्याचादेखील विचार केला पाहिजे. जो काहीही विचार न करता लढायला जातो, त्याचा अग्नीत पडलेल्या गवताप्रमाणे नाश होतो. पंडित नेहरू यांनी चीनच्या बाबतीत उत्तर सीमेवर ‘फॉरवर्ड पॉलिसी’चे धोरण आखले. तेव्हा चीन आपल्या प्रदेशात घुसत होता, त्याला अटकाव करण्यासाठी आपल्या प्रदेशात पुढे जाऊन लष्करी चौक्या बांधण्याचे आदेश नेहरूंनी दिले. आपली शक्ती काय आहे, चीनची शक्ती काय आहे याचा त्यांनी विचार केला नाही. चीनने काही काळ पुढे सरकणार्‍या भारतीय सैन्याला येऊ दिले आणि नंतर ऑक्टोबर 1962मध्ये प्रचंड ताकदीनिशी प्रतिहल्ला केला. भारतीय सेनेचा दारुण पराभव झाला. पंचतंत्रातील कथेचा हा सिद्धान्त प्रत्यक्षात आपण अनुभवला.
 
 
हे चार सिद्धान्त आंतरराष्ट्रीय राजकारणाचे शाश्वत सिद्धान्त आहेत. पहिला सिद्धान्त राजाच्या प्राथमिक कर्तव्याविषयी आहे. राजा याचा अर्थ आजच्या भाषेत शासन चालविणारे सरकार. दुसरा सिद्धान्त युद्ध कशासाठी करायचे, याचा आहे. दुसर्‍याच्या भानगडी आपल्या गळ्यात बांधून जर युद्ध केले, तर त्याचा राजीव गांधी होतो. श्रीलंकेत राजीव गांधींनी शांतिसेना पाठविली आणि आपले जवान हकनाक तिथे मरू लागले. अमेरिकेने व्हिएतनाम युद्ध वीस वर्षे लढले. 35 ते 40 हजार सैनिक ठार झाले. ना भूमी मिळाली, ना सोने मिळाले. शेवटी माघार घ्यावी लागली. तिसरा सिद्धात शत्रू कमजोर असतानाच त्याला ठोकून काढले पाहिजे, तो बलवान झाल्यानंतर त्याच्याशी लढता येत नाही. कोरियाच्या युद्धात चीन उतरला. चीनपेक्षा अमेरिका आधुनिक शस्त्रांनी अत्यंत प्रबळ होते. अमेरिकेने चीनविरुद्ध या शस्त्रांचा वापर केला नाही. आज चीन अमेरिकेला आव्हान देण्याच्या भूमिकेत उभा आहे. चौथा सिद्धान्त आपली शक्ती बघावी, शत्रूची शक्ती बघावी आणि मग आक्रमण करावे. 1812 साली नेपोलियनने आठ लाख सैन्य घेऊन रशियावर स्वारी केली. तोपर्यंत नेपोलियन अजिंक्य होता. रशियात त्याचे अन्न-पाण्यावाचून प्रचंड हाल झाले. त्याचे सैनिक स्वत:चेच घोडे मारून खाऊ लागले. आठ लाखातून 80 हजार सैन्य परत आले, उर्वरित सर्व मेले.
 
 
म्हणून ज्या कोणाला राष्ट्रीय राजनीती करायची आहे, अशा सर्वांनी मूळ पंचतंत्र (संक्षिप्त नव्हे) काळजीपूर्वक वाचले पाहिजे. राजनीतिशास्त्राचे ते ज्ञानभंडार आहे.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.