बिशप फ्रॅन्को मुलक्कल - निकालपत्र सदोष, मात्र मुक्तता निर्दोष

विवेक मराठी    19-Jan-2022   
Total Views |
@अ‍ॅड. विभावरी बिडवे  9822671110
कोट्टायम अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने बिशप फ्रॅन्को मुलक्कल याची ननवरील बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली असली तरी या निकालपत्रात अनेक दोष असून ते पूर्वग्रहदूषित असल्याचे लक्षात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांद्वारे प्रस्थापित झालेल्या कायद्याच्या अनेक न्यायतत्त्वांच्या विरोधात हे निकालपत्र कसे आहे, याकडे लक्ष वेधणारा अभ्यासपूर्ण लेख.

nanas

केरळमधील कोट्टायम अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी कॅथलिक बिशप फ्रॅन्को मुलक्कल ह्यांची ननवरील बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करणारा निर्णय दिला. पीडित ननबरोबर ह्या लढाईत तिच्या बाजूने असणारी नन अनुपमाने त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे म्हटले आहे. अत्यंत वरवरच्या असणार्‍या ह्या निकालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष, तर अनेक अवैध मुद्द्यांचा आधार घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांद्वारे प्रस्थापित झालेल्या कायद्याच्या अनेक न्यायतत्त्वांच्या विरोधात दिल्यामुळे निकाल सदोष झाला आहे. अपिलामध्ये खात्रीने न्याय मिळेल असे नक्की कोणते मुद्दे ह्यामध्ये आहेत?
 
जिल्हा न्यायाधीशांनी पीडित ननची साक्ष ‘एकमेव साक्ष’ (sole testimony) म्हणून ग्राह्य धरलेली नाही. ह्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे काही निकाल आधारभूत मानले आहेत. एखाद्या एकमेव साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरायला न्यायालयाला तशी कोणती आडकाठी नसते. मात्र ह्यापूर्वी तोंडी साक्षीचे तीन भाग केलेले आहेत. पूर्णपणे विश्वासार्ह, पूर्णपणे अविश्वसनीय आणि पूर्ण विश्वासार्हही नाही किंवा पूर्ण अविश्वसनीयही नाही. अशा वेळेस न्यायालयाला इतर ‘पुष्टीकारक पुरावा’ (corroborative evidence) आहे का, हे बघावे लागते. मात्र बलात्कारासारख्या आरोपामध्ये असा पुष्टीकारक पुरावा कोणता आहे, हे समजून त्याची चिकित्सा करणे हेच न्यायाधीशांचे महत्त्वाचे काम असते. न्यायालयाची त्यामध्येच चूक झालेली दिसते.
 
 
Falsus in uno falsus in omnibus (false in one thing, false in everything) असे एक न्यायतत्त्व आहे. ह्या विचाराने अत्याचारपीडित ननची पूर्णच साक्ष न्यायालयाने कचर्‍याच्या टोपलीत टाकून दिली आहे. मात्र ‘साक्षीचा काही भाग सदोष वाटला आणि इतर गुन्हा सिद्ध करण्याजोगा असला तरी तो ग्राह्य धरावा’ असे ह्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. धान्य भुश्यापासून निवडून काढणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे, असे वेळोवेळी म्हटले गेले आहे. जिल्हा न्यायाधीशांनी निकालात जयासीलन वि. तामिळनाडू सरकार (AIR 2009 SC 1901) ह्या निकालातील कोट घेतला आहे, मात्र तो हवा तितकाच निवडून घेतला आहे. जिल्हा न्यायाधीशांनी म्हटले आहे की, जेव्हा सत्य असत्याहून वेगळे काढणे शक्य नसते, जेव्हा धान्य आणि भुस्सा हे अविभाज्यपणे एकत्र झालेले असतात, तेव्हा एकमेव गोष्ट करू शकतो, ते म्हणजे पुरावा पूर्णार्थाने नाकारणे. मात्र जयासीलन केसमध्ये ह्याच्यापुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, जर अशा प्रकारे धान्य आणि भुस्सा वेगळा करण्याच्या प्रयत्नात एखादी नवी केस निर्माण झाली, तरच एखादी साक्ष किंवा एखादा पुरावा पूर्णत: अमान्य करावा. मात्र जिल्हा न्यायाधीशांना ननच्या साक्षीतील ज्या तथाकथित त्रुटी वाटल्या, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला तर कोणतीही नवी केस उभी राहत नाही. असे असताना जयासीलन केसमधील अर्धा ‘कोट’ घेऊन दिलेला हा निकाल अपिलास योग्य ठरेल.
 
इतरांकडे अत्याचारांची वाच्यता
 
‘ननची साक्ष ग्राह्य धरता येत नाही’ हा निकालाचा बहुतांश आधार आहे. ती साक्ष तांत्रिक कारणांवरून न्यायालयाने नाकारली आहे. ननने आपल्या साक्षीत बिशपने 5.5.2014 आणि 6.5.2014 अशा दोन दिवशी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सिस्टर लिझी वडक्कल (FCC) ज्यांना ती आध्यात्मिक माता म्हणते, त्यांना सांगितल्याचे नमूद केले आहे. सदर सिस्टर लिझी ह्यांनी न्यायालयात सरकारी साक्षीदार क्र. 2 (PW2) म्हणून साक्ष दिली आहे. ननने तिच्यावरील अत्याचाराबाबत सांगितल्याचे त्यांनी न्यायालयात कबूल केले आहे. मात्र न्यायालयाने हा पुरावा गुन्हा सिद्ध होण्यासाठी नाकारला, कारण ननने ह्या दोन दिवसांव्यतिरिक्त 2015नंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल आपल्या आध्यात्मिक मातेस कळविले नाही. न्यायालयाचे हे निरीक्षण पूर्वग्रहदूषित आणि स्टिरियोटाइप आहे. अमुक एका प्रसंगी एखादी व्यक्ती ठरावीकच वागेल असा अंदाज बांधून केलेले हे निरीक्षण आहे. सदर सिस्टर लिझी ह्यांनी बिशपविरुद्ध साक्ष दिल्यानंतर 2019मध्ये त्यांना बदली आदेश दिला गेला, हेसुद्धा इथे लक्षात घेण्याजोगे आहे. अशा संघर्षानंतरही सिस्टर लिझी ह्यांनी आपले विधान बदलले नाही, हे महत्त्वाचे आहे.

nanas 
 
ह्यानंतर पीडित ननने इतर नन्सना ह्या अत्याचाराबद्दल सांगितले, त्या PW3 आणि PW4 यांची न्यालायालात तपासणी झाली. पीडित ननच्या उदासीबद्दल विचारल्यावर तिने त्यांना कॉन्व्हेंटमध्ये बिशप येत आहेत हे सांगितले. त्यावर त्यांनी त्यांच्या येण्याने नन अस्वस्थ का होत आहे हे विचारल्यावर तिने त्यांना सांगितले की, “जर बिशप आले, तर मला त्यांच्याबरोबर झोपावे लागेल.” पीडित ननच्या न्यायालयातील साक्षीनुसार ती म्हणते की, मात्र मी त्यांच्याबरोबर झोपले हे मी त्यांना सांगितले नाही. (I will have to share the bed with him. I did not tell them that I have slept with him.)  मात्र इथे PW3 आणि PW4 ह्या आपल्याला बलात्काराबद्दल सांगितले होते असे म्हणतात. न्यायालयाने ह्या साक्षी परस्परविरोधी मानल्या. मात्र ननचे ‘मला त्यांच्याबरोबर झोपावे लागेल’ हे विधानच पूर्वी घडलेल्या लैंगिक अत्याचाराचे सूतोवाच करते आणि भविष्यातील भीती व्यक्त करते. इथे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे की नन ही संन्यस्त वा पवित्र असणे समाजाला अपेक्षित आहे, तिच्यावर ते बंधन आहे. ती तिच्या सहयोग्यांना ह्या संदर्भात सूक्ष्म तपशील द्यायला नक्कीच बिचकेल, घाबरेल. नन अनुपमा ह्यांनी आपल्या साक्षीत म्हटले की जर हे प्रकरण चर्चमध्ये मिटले असते, तर आम्ही तक्रार दाखल केली नसती. त्यांच्या ह्या विधानाने न्यायालयाने त्यांना अविश्वासार्ह मानले. खरे तर ह्या तक्रारीला चर्चअंतर्गतच न्याय मिळावा आणि प्रकरण बाहेर जाऊन चर्चची प्रतिष्ठा मलीन होऊ नये, म्हणून त्यांनी केलेले अनेक प्रयत्नच दिसून येतात. PW6 ह्यांनाही ननने सांगितले की तिच्यावर त्यांच्याबरोबर न झोपल्यामुळे (for not sharing bed with him) ते तिच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत आहेत. न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की इथे नन तिच्यावर बलात्कार झाल्याचे म्हणत नाही. न्यायालयाने आणखी एका पत्रासंदर्भात निरीक्षण नोंदवले की, कार्डिनल मार्क ह्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ननवर अनेक वेळा अत्याचार झाल्याचे तिने म्हटले. मात्र ते 13 वेळा झाले असे ती म्हणत नाही. अशा तांत्रिक मुद्द्यांवर न्यायालयाने ननची साक्ष तसेच इतर बळकटी देणारे पुरावे अमान्य करणे ही एक मोठी चूक आहे.
 
 
एफआयआरमध्येही पीडित ननने बलात्काराचा आरोप सिद्ध होण्यासंदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत, असे निकालात म्हटले आहे. मात्र ह्यावर ननने असे म्हटले आहे की, अशा प्राथमिक स्टेटमेंटमध्ये सगळे सूक्ष्म तपशील महिला पोलीस ऑफिसरला सांगणे सहज-सोपे (comfortable) वाटले नाही. तसेच हे स्टेटमेंट ‘असुरक्षित वातावरणात’ घेतले गेले होते, असेही तिने म्हटले आहे. इथेही न्यायालयाने नन, तिच्यावरची समाजाची बंधनं आणि स्टीरियोटाइप्स, ती ज्या परिस्थितीत आहे ते वातावरण ह्यांचा विचार न करता तिचे विधान स्पष्ट असायला हवे असा पूर्वग्रह करून घेतला. सर्वोच्च न्यायालयाने, ‘एफआयआर हा प्राथमिक रिपोर्ट असतो. त्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा अनेक तपशील नसतील तरी केस पूर्णपणे रद्दबातल होऊ शकत नाही.’ अशा आशयाचा निकाल दिला आहे. एफआयआर हा स्वतंत्र पुरावा नसतो, तर तो फक्त ‘पुष्टीकारक’ असतो. ह्यामध्ये ननने आपल्या विधानांमध्ये कालांतराने सुधारणा केली असे म्हटले आहे. मात्र ननने आपल्या प्राथमिक स्टेटमेंटमध्ये गुन्ह्याचे जे स्वरूप नमूद केले आहे, तेसुद्धा भारतीय दंडविधानाच्या कलम 375च्या व्याख्येमध्ये बसणारे आहे. म्हणजेच गुन्ह्याच्या व्याख्येप्रमाणे पुरेसे आहे.
 
 
शील अथवा चारित्र्य
 
सर्वोच्च न्यायालयाने पीडित महिलेचे शील ह्या केसमध्ये विचारात घेण्याचीही आवश्यकता नव्हती, किंबहुना स्त्रीचे चारित्र्य किंवा नैतिक वागणूक विचारात घेणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. भारतीय पुरावा कायदा 1872, कलम 53 अ नुसार कलम 376 अर्थात बलात्काराच्या केसेसमध्ये चारित्र्य अथवा पूर्वीचे लैंगिक अनुभव हे विचारात घेऊ नयेत (are not relevant) असे स्पष्ट नमूद आहे. इथे न्यायालयाने ननचे चारित्र्य दोन प्रकारे केसला जोडले आहे. ननच्या जया नामक चुलत बहिणीने तिच्यावर 2017मध्ये सदर ननचे आपल्या नवर्‍याबरोबर प्रकरण चालू आहे अशी कॉन्व्हेंट मंडळात तक्रार दाखल केली. न्यायालयासामोर मात्र जयाने आपण खोटी तक्रार दाखल केली होती असे म्हणून ती मागे घेतली. तिला तक्रारीचे कागद वा मोबाइल संभाषण ह्यापैकी काहीच पुरावा देता आला नाही, सिद्ध करता आले नाही. ते हरवले असल्याचे तिने सांगितले. इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे पीडित ननने बिशपविरुद्ध अंतर्गत तक्रारींना सुरुवात केल्यानंतर जयाने सदर तक्रार केली होती आणि नंतर खोटी म्हणून मागेही घेतली. पीडित ननच्या वैद्यकीय शारीरिक तपासणीमध्ये हायमेन तुटले असल्याचा निष्कर्ष निघाला. अशी तपासणी शारीरिक संबंध (संमतीने वा संमतीशिवाय) प्रस्थापित झाल्याचा पूर्णपणे नाही, तरी साहाय्यकारक पुरावा असतो. वैद्यकीय चाचणीचा हा निष्कर्ष कोणत्याही पुराव्याशिवाय आणि जयाने आपली तक्रार खोटी आहे हे सांगितल्यावरही जिल्हा न्यायाधीशांनी जयाच्या तक्रारीशी जोडला आहे. But defence contends that there was a complaint against the victim, by her own cousin that she had indulged in sexual intercourse with her husband असे न्यायाधीश कोणत्याही पुराव्याशिवाय म्हणतात. इतकेच नाही, तर जयाच्या तथाकथित तक्रारीमध्ये बिशपचा कोणतही हात नव्हता हे सिद्ध झाले आहे, असा निष्कर्षही आपल्या निकालात देतात. जयाची मूळ तक्रार, मोबाइल डेटा ह्यातील काहीही तिला न्यायालयात दाखल करता आले नाही आणि ते हरवले असल्याचे तिने म्हटले. एक खूप मोठा विरोधाभास म्हणजे पीडित ननच्या वाईट चारित्र्याबद्दल टिपण्णी करताना न्यायाधीशांनी आरोपी बिशपचे वाईट चारित्र्य विचारात घेणे गरजेचे नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. त्याहूनही अधिक म्हणजे तिच्यावरील सिद्ध न झालेल्या आरोपानुसार तिच्या चारित्र्याची चर्चा करणे आणि त्याचा संबंध तिच्या वैद्यकीय चाचणीशी जोडणे हे कालविसंगत, स्त्रियांसंदर्भात स्टिरीओटिपिकल आणि बेकायदेशीर आहे.
 
 
अंतर्गत तक्रारी आणि जयाची तक्रार
 
PW3 आणि PW4 ह्या आपल्या सहयोगी नन्सन पीडित ननने डिसेंबर 2016मध्येच आपल्यावरील अत्याचारांबद्दल माहिती दिली होती. मे 2017मध्ये PW7 आणि PW9 अर्थात बहीण आणि काका यांनाही तिने बलात्काराबद्दल सांगितले होते. आणि जयाची तक्रार ही 2017मधील आहे. थोडक्यात, पीडित ननने तक्रारी सुरू केल्यानंतर तिच्यावर बदलीसंदर्भात सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आणि प्रकरण अंतर्गत तक्रारींमध्ये मिटू न शकल्याने तिने गुन्हा दाखल केला, हे सिद्ध होत असताना न्यायालयाने उलटपक्षी तिच्यावरील जयाच्या तक्रारीमुळे तिने बिशप मुलक्कलवर आरोप करण्यास सुरुवात केली, हे सिद्ध करण्याचा खटाटोप केला आहे. त्यासाठी ननने ज्या भाषेत आपल्यावर होत असलेले अत्याचार इतर नन्स, तिचे जवळचे नातेवाईक ह्यांना कळवले, तसेच संभाव्य अत्याचारांविषयी भीती व्यक्त केली, त्या भाषेविषयी तांत्रिक दृष्टीकोन ठेवून त्यामध्ये बलात्कार हा शब्द नसल्याने न्यायालयाने ते अमान्य केले. पुरावा चिकित्सा करताना ननचे लैंगिकतेविषयक मुक्तपणे वाच्यता न येण्याजोगे स्थान व परिस्थिती आणि बिशप मुलक्कल ह्यांचे अधिकाराचे तसेच दैवी मानले जात असलेले स्थान लक्षात घेणे गरजेचे होते.
 
Fiduciary Position
 
आरोपीवर बलात्काराचा आरोप हा 376क नुसार आहे. सदर कलम म्हणते की, जो कोणी एखाद्या कारागृह, रिमांड होम व संस्थेतील आपल्या कस्टडीत असलेल्या महिलेला त्याच्या पदाचा गैरफायदा फायदा घेऊन फूस लावतो किंवा शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करतो, तो बलात्काराचा गुन्हा करतो. आपल्या अधिकृत पदाचा वापर करून अशी फूस लावणे हा कायद्याने स्वतंत्र गुन्हा मानला आहे. मात्र न्यायालयाने असे अधिकाराचे, ताकद असलेले पद आणि ह्यावर काहीएक भाष्य केले नाहीय. ह्यापूर्वीच्या अनेक निकालांमध्ये असे ‘विश्वासू संबंध’ (Fiduciary Position) असल्यामुळे किंवा अधिकाराचा गैरवापर करून शारीरिक संबंधांसाठी मिळवलेली संमती ही वैध संमती नसते, असे म्हटले आहे. भारतीय पुरावा कायद्याचे कलम 114 अ म्हणते की जेव्हा 376क नुसार (म्हणजे पदाचा वापर करून कस्टडीतील महिलेला फूस लावणे किंवा शारीरिक संबंधांसाठी प्रवृत्त करणे) हा गुन्हा असतो आणि जेव्हा शारीरिक संबंध सिद्ध झालेले असतात आणि प्रश्न फक्त स्त्रीची संमती होती अथवा नव्हती हा असतो आणि जेव्हा स्वत: स्त्रीच अशी संमती नव्हती असे पुराव्यामध्ये म्हणते, तेव्हा न्यायालयाने असे गृहीत धरायचे असते की संमती दिली गेली नव्हती. जेव्हा अशा प्रकारे पीडित स्त्रीच्या बाजूने गृहीत धरले जाते, तेव्हा सदर गोष्ट घडलेली नाही हे सिद्ध करण्याचा पुरावा देण्याची जबाबदारी आरोपीवर येते. (सामान्य नियमाप्रमाणे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी/(onus of proof) तक्रारदार/सरकारवर असते.) ह्याचा अर्थ ही संमती होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपी बिशपवर होती. मात्र न्यायालयाने ननच्या वैद्यकीय चाचणीनंतरही शारीरिक संबंध सिद्ध होत आहेत हे मानले नाहीच, ह्याउपर होत असल्यास तिच्यावर तिच्या चुलत बहिणीने आरोप केलेल्या (सिद्ध न झालेल्या, तक्रार खोटी होती हे मान्य केलेल्या) नवर्‍याबरोबरच्या प्रकरणाची वाच्यता केली.
 
 
न्यायालयाने पीडित ननसंदर्भात अधिक सौहार्दाने भूमिका घ्यायला हवी होती. तिने आपल्या अत्याचारांची अन्य व्यक्तींना माहिती देताना sharing of bedकिंवा लैंगिक अत्याचार असे वापरलेले शब्द किंवा न वापरलेला ‘बलात्कार’ हा शब्द तिचे आणि बिशप मुलक्कल ह्यांचे स्थान लक्षात घेऊन चिकित्सा करायला हवी होती. आपल्या समाजात लैंगिकतेविषयक स्पष्टपणे बोलले जात नाही, ह्या बाबीचा विचार जिल्हा न्यायाधीशांनी करायला हवा होता.
 
चर्च आणि लैंगिक शोषण
 
 
आपल्या अधिकाराचा वापर करून कॅथलिक चर्च धर्मगुरूंकडून आणि अधिकार्‍यांकडून होणारे नन्सवरचे, लहान बालकांचे लैंगिक शोषण ही गोष्ट जगाला नवी नाही. नुकतेच फ्रान्सच्या चर्चमधून 1950पासून साधारणपणे 3,200 चर्च पुजार्‍यांकडून आणि कर्मचार्‍यांकडून 3,30,000 बालकांचे लैंगिक शोषण झाले असल्याचे पुढे आले आले. त्यावर पोप फ्रान्सिस ह्यांनी मध्यंतरी व्हॅटिकनमध्ये संबोधित करताना ‘लाज’ आणि दु:ख व्यक्त केले. अशा परिस्थितीत अशी संस्था किंवा व्यवस्था समाजासाठी सुदृढ आहे का, ह्यावर विचारमंथन करायला हवे. नसल्यास त्यावर उपाय शोधायला हवेत.
 
 
आपल्यावरील अन्यायाविरोधात स्त्रिया पुढे येऊन आता संघर्ष करू लागल्या आहेत. त्यांना सुरक्षित वाटेल अशा पद्धतीने पुराव्याची चिकित्सा करून न्यायालयांनी न्यायदानाचे पवित्र कार्य करायला हवे.

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.