सोशल मीडिया क्रांतीचा इतिहास

विवेक मराठी    22-Jan-2022
Total Views |
@अनुप कुलकर्णी 9130533577
   पूर्वीच्या काळी संदेश पाठवण्यासाठी किंवा अगदी आवश्यक कामांसाठीही प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा वापर केला जाई. या दंतकथा वगैरे आहेत, असेच आजच्या पिढीतील मुलांना वाटेल. कारणही तसेच आहे. आज आपण सातासमुद्रापलीकडील व्यक्तीशीही सेकंदाचाही विलंब न करता संपर्क साधू शकतो; एवढेच काय, तो ज्या अवस्थेत आहे, तसा त्याला पाहू शकतो. हे आहे आधुनिक जगतातील संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम अर्थातच सोशल मीडिया. हा लेख वाचणारे सर्वच जण त्याचे साक्षीदार आहेत. हा सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा झाला, याचा आढावा आपण या पाक्षिक सदरातून घेणार आहोत.
 
social media
आज प्रत्येक व्यक्ती दिवसभरात सरासरी 2 तास 24 मिनिटे सोशल मीडियाचा वापर करते. पण एक काळ असाही होता की आपल्याला सोशल मीडिया म्हणजे काय हेच माहीत नव्हते. आपले पूर्वज एकेकाळी संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर करायचे. जलद दळणवळणासाठी उंट, घोडे यांचासुद्धा वापर होत असे. एक तो काळ होता आणि एक आजचा काळ आहे, जिथे आपण कित्येक गोष्टींसाठी पूर्णपणे सोशल मीडियावर अवलंबून आहोत. ही क्रांती फार कमी वेळात घडली आहे आणि हा लेख वाचणारे सर्वच जण त्याचे साक्षीदार आहेत. सोशल मीडिया संबंधित लेखमालेच्या पहिल्या भागात आपण याच क्रांतीचा इतिहास जाणून घेऊ आणि हा सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा झाला, याचा आढावा घेऊ.
 
 
सोशल मीडिया म्हणजे नक्की काय? तर वेबसाइट्स किंवा अ‍ॅप्लिकेशन्स यासारखे माध्यम, जे वापरकर्त्यांना कंटेंट तयार करण्याची आणि इतरांबरोबर ते शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मेसेज, कॉमेंट यासारखे वेगवेगळे पर्याय इथे असतात. जेव्हा कॉम्प्युटर आले, तेव्हा ते एकमेकांशी जोडण्याची गरज निर्माण झाली आणि गरजेतून इंटरनेटचा जन्म झाला. जगातील पहिला ईमेल ‘रे टॉमलिंसन’ या व्यक्तीने 1971मध्ये पाठवला होता. आज दिवसाला कित्येक अब्ज ईमेल्सची देवाणघेवाण होते.
 
 
सोशल मीडियाचा पूर्वज म्हणता येईल अशा ‘बुलेटिन बोर्ड सिस्टिम’ची - BBSची सुरुवात 1978मध्ये झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी णीशपशीं आले. या दोन्हीमध्ये माहिती आदानप्रदान करता येत होती. मीटिंगच्या वेळा शेअर करणे, फाइल डाउनलोड करणे, मेसेज पाठवणे अशा सुविधा त्यात होत्या. सोशल मीडियाची खरी सुरुवात 1997मध्ये ‘सिक्स डिग्रीज’ या साइटपासून झाली, असे म्हणता येईल. सिक्स डिग्रीजवर प्रोफाइल तयार करणे, मित्र जोडणे, नवीन लोकांना या साइटवर येण्यासाठी आमंत्रण पाठवणे अशा सुविधा होत्या. त्याच वर्षी AOLसुद्धा सुरू झाले. यात एकमेकांना तत्काळ मेसेज पाठवता येत असत.
 
 
आज जे सोशल मीडियाचे स्वरूप आहे, त्याची सुरुवात झाली ती पहिली सोशल नेटवर्किंग साइट ‘फ्रेंडस्टर’पासून. 2002मध्ये आलेल्या या साइटने सोशल मीडियाचा चेहरामोहराच बदलून टाकला, कारण फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा सर्वप्रथम इथेच उपलब्ध झाली होती. अल्पावधीतच फ्रेंडस्टरला लोकप्रियता लाभली. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी या साइटचे नाव ऐकले असेल अथवा कदाचित वापरही केला असेल. पण पुढे अनेक प्रतिस्पर्धी या क्षेत्रात आल्याने फ्रेंडस्टरला आपले अस्तित्व टिकवता आले नाही आणि 2015मध्ये ही साइट कायमची बंद झाली. आज अस्तित्वात असणारी सर्वात जुनी नेटवर्किंग साइट कोणती आहे माहीत आहे? ती आहे लिंक्डइन! 2003मध्ये आलेल्या लिंक्डइनची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे. इतर सोशल मीडिया साइट्सपेक्षा लिंक्डइनचे स्वरूप थोडेसे वेगळे आहे. व्यवसाय आणि नोकरीसंबंधित या साइटवर कंपन्यांना आपले पेज तयार करून जॉब पोस्ट करता येतात, तसेच कर्मचार्‍यांची भरतीसुद्धा करता येते. याच वर्षी आणखी एक सोशल मीडिया साइट सुरू झाली होती व प्रचंड लोकप्रिय झाली होती, ती म्हणजे ‘मायस्पेस’! मायस्पेस सुरू झाल्यापासून अवघ्या दोनच वर्षांत ती सर्वात मोठी नेटवर्किंग साइट बनली. यात असंख्य अशा सुविधा दिल्या गेल्या होत्या, ज्याने तरुणाईला भूल पाडली - उदाहरणार्थ, यात कर्सरचा रंग बदलता येत असे, कुणी आपल्या प्रोफाइलवर आल्यास कुठले संगीत वाजावे हे ठरवता येत असे, विविध रंगाची बॅकग्राउंड बदलण्याचीसुद्धा यात सुविधा होती. याच काळात 2004मध्ये सुरू झालेल्या ‘ऑर्कुट’लाही बरीच लोकप्रियता मिळाली. ही साइट ब्राझिलमध्ये आणि भारतात सर्वात जास्त व्हिजिट मिळणारी साइट होती. भारतात सोशल मीडियाचा सुवर्णकाळ ऑर्कुटनेच आणला. पण मायस्पेस आणि ऑर्कुट या दोन्ही सोशल नेटवर्किंग साइट्स एवढ्या लोकप्रिय असूनही काळाच्या ओघात मागे का पडल्या? कारण आता पदार्पण झाले होते एका दिग्गज नेटवर्कचे - फेसबुक!
 
 
2004मध्ये मार्क झुकेरबर्गने फेसबुक सुरू केले, तेव्हा त्याला कदाचित कल्पनाही नसेल की फेसबुक इंटरनेट जगताची उलथापालथ करेल. सुरुवातीला फक्त हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा एवढाच हेतू फेसबुकच्या निर्मितीमागे होता. परंतु, कालांतराने याची कल्पना लोकांना इतकी आवडली की फेसबुक जगभरात पसरत जाऊन त्याने इतर नेटवर्किंग साइट्सची दुकानेच बंद करून टाकली! फेसबुकच्या वापरकर्त्यांना प्रचंड सुविधा उपलब्ध आहेत. इथे मित्रांशी, नातेवाइकांशी, एवढेच काय तर अनोळखी लोकांशीही संवाद साधता येतो. फेसबुकवर व्यवसाय वाढवता येतो, तसेच आपल्या दैनंदिन जीवनातल्या खाजगी गोष्टीही इतरांशी शेअर करता येतात. ‘न्यूजफीड’ हे फेसबुकचे फीचर क्रांती घडवणारे ठरले. याचा वापर करून अनेक देशांतील सरकारे निवडून आली किंवा पाडलीसुद्धा गेली. जनमत तयार करण्याचे, लोकांना एकत्र आणण्याचे किंवा फूट पाडण्याचे कामही फेसबुक सहजी करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेसबुक आपल्या वापरकर्त्यांच्या गरजा ओळखून वेळोवेळी स्वत:मध्ये सुधार घडवून आणते. हेच या साइटच्या यशाचे गमक आहे.
 

social media
 
फेसबुकखालोखाल दुसरी सर्वात लोकप्रिय नेटवर्किंग साइट म्हणजे ट्विटर. याला ‘मायक्रोब्लॉगिंग साइट’ म्हणूनही ओळखले जाते. ट्विटरवर कमी शब्दात पोस्ट टाकता येतात, ज्याला ‘ट्वीट’ असे म्हणतात. 2006मध्ये सुरू झालेली ही साइट आजही लोकप्रिय आहे. आपल्याला आपल्या आवडीच्या कलाकारांशी, नेत्यांशी थेट संवाद साधता येतो, या सुविधेमुळे ट्विटर लोकप्रिय झाले. ऑनलाइन बातम्या देणारे माध्यम असेही ट्विटरला समजले जाते. इथले ट्रेंड होणारे हॅशटॅग रेडिओ किंवा टीव्हीपेक्षाही जास्त वेगाने काही क्षणात जगभर पोहोचतात. आपण मायक्रोब्लॉग साइटबाबत बोलत आहोत, तर tumblrचा उल्लेख करायलाच हवा. टंबलर ही साइट मायक्रोब्लॉग आणि सोशल मीडिया नेटवर्क यांचे मिश्रण म्हणता येईल. पण इथे अपलोड होणार्‍या अश्लील फोटोमुळे या साइटवर अनेक देशात बंदी आणली गेली. विषय फोटोंचा निघाला आहे, तर एक नजर इन्स्टाग्रामवरही टाकू या. सोशल मीडियावर मध्यंतरी एक विनोद गाजला होता - ‘पूर्वीची पिढी ग्रामीण बोली बोलत असे, पण आत्ताची पिढी इन्स्टाग्रामीण बोली बोलते.’ हे शब्दश: खरे आहे! तरुणाईला इन्स्टाग्रामने प्रचंड वेड लावले आहे. 2010मध्ये सुरू झालेली ही साइट आपल्या हटके अंदाजामुळे इतकी लोकप्रिय झाली की अल्पावधीतच फेसबुक आणि ट्विटर यांच्या जोडीला येऊन बसली. फेसबुकने जरी इन्स्टाग्राम विकत घेतले असले, तरी दोन्ही साइट्स वेगवेगळ्याच समजल्या जातात. दोन्हीचा उद्देशही वेगळा आहे. इन्स्टाग्राम फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी ओळखले जाते. इथेही हॅशटॅगचा भरपूर वापर केला जातो, एकमेकांच्या फोटोवर लाइक, कॉमेंट करता येतात आणि मेसेजही पाठवता येतात. इन्स्टाग्रामने एक पाऊल पुढे टाकून ‘स्टोरी’ ही संकल्पना सुरू केली. एक फोटो किंवा व्हिडिओ विशिष्ट विभागात पोस्ट केल्यास तो चोवीस तास तिथे झळकत असतो. आपले लेटेस्ट अपडेट देण्यासाठी याचा वापर केला जातो आणि हीच संकल्पना पुढे स्नॅपचॅटनेसुद्धा उचलली. 2011मध्ये सुरू झालेले स्नॅपचॅट हे मल्टिमीडिया मेसेजिंग अ‍ॅप आहे. इथे विविध फिल्टर्स उपलब्ध असल्याने स्नॅपचॅटसुद्धा तरुणाईमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे.
 

g 
 
आता सोशल मीडिया विश्वात एवढ्या घडामोडी घडत असताना गूगलसारखी दिग्गज कंपनी या क्षेत्रातही उतरणार, हे साहजिकच होते. इतर नेटवर्किंग साइट्सची, विशेषत: फेसबुकची लोकप्रियता पाहून त्याला टक्कर देण्यासाठी गुगलने आणले ‘गूगल प्लस’! याला संक्षिप्त स्वरूपात G+ असे संबोधले जाते. मोठा गाजावाजा करून आलेले जी प्लस मात्र फेसबुकसमोर टिकू शकले नाही. फेसबुकच्या फ्रेंडलिस्टप्रमाणे जी प्लसवर सर्कल्स नावाची संकल्पना होती. बर्‍याच गोष्टी फेसबुकप्रमाणेच होत्या. परंतु लोकांनी याला अत्यंत थंड प्रतिसाद दिला. शेवटी जी प्लस कायमचे बंद झाले. तर हा आहे आपला सोशल मीडियाचा आजपर्यंतचा प्रवास. या उपरोल्लेखित नेटवर्किंग साइट्सशिवाय यूट्यूब, पिंटरेस्ट, फ्लिकर, कोरा, टिकटॉक, रेडिट हेसुद्धा लोकप्रिय आहेत. व्हॉट्सअ‍ॅप नेटवर्किंग साइट या विभागात येत नसले, तरी तेही सोशल मीडियाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
 
 
सोशल मीडियाशिवाय आजच्या काळात जगण्याची कल्पनाही करता येत नाही, इतका तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा हिस्सा बनला आहे. माहिती मिळवण्याचा उत्तम स्रोत, आपले विचार मांडण्याचे अधिकृत व्यासपीठ, आनंद किंवा दु:ख वाटून घेण्याचे हक्काचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. संकटात मित्रांना हाक मारण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो आणि खोट्या बातम्या पसरवून इतरांना संकटात टाकण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो. सोशल मीडिया प्रोफाइल म्हणजे वैयक्तिक रोजनिशी आहे, जी कुणालाही वाचता येते. इथे एकमेकांना न भेटताही सणवार साजरे करता येतात. दूर अंतरावर असणारे आपले जवळचे नातेवाईक सोशल मीडियामुळे दूर वाटत नाहीत. परंतु एकाच घरात असणार्‍या सदस्यांनीही संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा, इतपत याने आपल्या आयुष्यावर पकड घेतली आहे. या नवीन जीवनशैलीला टाळता येणे शक्य नसले, तरी याचा योग्य वापर करणे मात्र आपल्याच हाती आहे.