पितृहृदयी

त्यांच्या सहवासात येणार्या प्रत्येक तरुण मुलाला/मुलीला ते ‘ए बाबा’ म्हणण्याचा आग्रह करत. अक्षरश: हजारो मुलामुलींचे ते बाबा होते. मातृत्वाचा परीघ विशाल असलेल्या स्त्रिया माहीत होत्या, पण पितृत्वही इतकं विशाल असतं, असू शकतं हे समजलं ते बाबांमुळे - डॉ. अनिल अवचटांमुळे.

विवेक मराठी    27-Jan-2022   
Total Views |

anil-awachat 
 
जेव्हा डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या 'मुक्तिपत्रे' या पुस्तकाची हस्तलिखित प्रत करण्यासाठी मी होकार दिला, तेव्हाच कधीतरी माझी आणि डॉ. अनिल अवचटांची भेट होणार हे निश्चित झालं. या भेटीच्या नुसत्या कल्पनेनेही मला खूप आनंद झाला होता. ही गोष्ट साधारण २०००च्या दरम्यानची. आवडत्या लेखकाची प्रत्यक्ष भेट, तीही इतकी सहजी होण्याचे दिवस नव्हते ते. संपर्काची साधनं आणि भेटीच्या शक्यता दोन्ही कमीच असत. मी त्यांच्या लेखनाची अगदी शाळेत असल्यापासून वाचक होते, चाहती होते. साधं, सरळ, स्पर्शून जाणारं आणि वाचकाला अंतर्मुख करणारं त्यांचं लेखन मनावर खूप परिणाम करत असे. लेखन.. मग ते सामाजिक विषयावरचं/प्रश्नावरचं असो की पालक म्हणून त्यांनी केलेला डोळस प्रवास असो की त्यांच्या आणि सुनंदाताईच्या समंजस सहजीवनाचं प्रतिबिंब असलेलं लेखन असो... त्यांच्या लेखनाने माझ्यातल्या वाचकाला केवळ रिझवलं नाही, तर मला माणूस म्हणूनही घडवलं आहे.
 
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मुक्तिपत्रे या पत्ररूप कादंबरीची हस्तलिखित प्रत तयार करताना मुक्तांगण हे काम किती महत्त्वाचं आहे, याची खूप खोलवर जाणीव होत गेली. या पुस्तकाचं एकेक प्रकरण रेकॉर्ड करायचं आणि त्याची चांगल्या हस्ताक्षरात कॉपी तयार करून द्यायची, हे माझ्या कामाचं स्वरूप. तसं पाहिलं तर अगदीच किरकोळ. पण ते करताना मी त्या विषयात इतकी गुंतले की, त्या लेखनप्रक्रियेचा एक भागच होऊन गेले. प्रत्येक प्रकरणाची हस्तलिखित प्रत छपाईला जाण्यापूर्वी वाचनासाठी डॉ. अनिल अवचटांकडे जाते आणि ते माझ्या नेटक्या अक्षराचं कौतुक करतात, असं डॉक्टर नाडकर्णींनी सांगितल्याने मला फार आनंद झाला होता. ज्या लेखकाविषयी माझ्या मनात नितांत आदराची भावना होती, त्यांना माझ्या हस्ताक्षराचं वाटलेलं कौतुक मला सुखावून गेलं होतं. या लेखन प्रवासात मुक्तांगण आणि डॉ. अनिल अवचटांचीही भेट झाली. त्या भेटीत मी फार काही बोलल्याचं आठवत नाही. मात्र मुक्तांगणविषयी बाबा जे बोलत होते, ते एकाग्रतेने ऐकत होते. (‘मला बाबा म्हणायचं" हा प्रेमळ आदेश अनेकांसारखा त्यांनी मलाही दिला. तो पाळण्यात मलाही आनंदच होता. लेखक म्हणून असलेला जिव्हाळा या संबोधनाने आपसूक वाढला. पण माझी जीभ ‘अहो बाबा’वरून ‘ए बाबा’वर यायला मात्र तयार झाली नाही. त्यांनी खूप आग्रह करूनही ते मला कधी जमलं नाही खरं!) त्या भेटीत त्यांच्या तोंडून माझ्या हस्ताक्षराचं कौतुक ऐकलं. "अगं इतक्या चांगल्या हस्ताक्षरातले कागद टाकावेसे वाटत नाहीत. मी सध्या ते पाठकोरे कागद म्हणून वापरतो." बोलता बोलता ते म्हणाले. छान वाटलं मला. ‘मुक्तिपत्रे’मुळे डॉ. अनिल अवचट या माझ्या आवडत्या लेखकापर्यंत इतक्या सहज जाऊन पोहोचले, ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी.
 
त्या निमित्ताने मुक्तांगणच्या कामाचा झालेला परिचय अनेकांपर्यंत पोहोचवायला हवा, हे मनात होतं. ती संधी मला नंतर मुंबई तरुण भारतमध्ये काम करताना मिळाली. मुंबई तरुण भारतच्या २००२च्या दिवाळी अंकात या व्यसनमुक्ती केंद्राचा परिचय करून देणारा दीर्घ लेख लिहिण्याची माझी इच्छा संपादकांना बोलून दाखवली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. "अतिशय महत्त्वाचं काम आहे ते. आपल्याकडे आलं पाहिजे. जरूर लिहा." त्यांनी संमती दिल्यावर मी बाबांना - डॉ. अवचटांना फोन केला. दैनिकाचं नाव ऐकल्यावर त्यांना वाटलेलं आश्चर्य आवाजातून पोहोचलं माझ्यापर्यंत. पण त्यांनीही लगेच या लेखासाठी होकार दिला. या लेखाच्या निमित्ताने माझं पुन्हा एकदा मुक्तांगण पाहणं झालं. बाबांची भेट झाली. या लेखामुळे व्यसनमुक्ती केंद्राची सविस्तर माहिती अनेकांपर्यंत पोहोचवता येणार, याचा मला आनंद होता. बाबांनाही त्या लेखाने समाधान वाटलं. भिन्न विचारधारेचा पुरस्कार करणार्याम अंकात त्यांच्या कामाविषयी इतका मोठा लेख छापला जातो, याचीही त्यांनी नोंद घेतली असावी. म्हणूनच "या लेखाची माहिती पुस्तिका होऊ शकते इतका चांगला झाला आहे" अशी मनमोकळी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
या लेखानंतर बाबांशी क्वचित कधी फोनवर बोलण्याइतकं धारिष्ट्य मला आलं. मी ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती आहे आणि पत्रकारितेसाठी मी मुंबई तरुण भारतची निवड केली आहे, याची कल्पना असूनही आमच्यात चांगला संवाद होता, हे विशेष. त्यानंतर एकदा बैठकीसाठी मी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीत असताना मोबाइलवर बाबांचा फोन आला, "कुठेयस गं? तुझ्या गावात आलोय एका कार्यक्रमासाठी." फोन आल्यामुळे झालेल्या आनंदाचं एका क्षणात हळहळीत रूपांतर झालं. "काय सांगता बाबा? पण मी तुमच्या गावात आहे, ज्ञान प्रबोधिनीत. पुढचे दोन दिवस इथेच असणार आहे." मी सांगितलं. आमची भेट हुकल्यामुळे मला वाटत असलेलं वाईट पोहोचलं बहुधा त्यांच्यापर्यंत. ते समजुतीच्या सुरात म्हणाले, "अगं, काही हरकत नाही. मी आज रात्रीच परतणार आहे पुण्यात. उद्या दुपारी मोकळी असशील तर ये घरी गप्पा मारायला.." बाबांनी दिलेलं निमंत्रण नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.
 
दुसर्याग दिवशी मी त्यांच्या घरी गेले आणि सहजपणे ज्या गप्पा सुरू झाल्या, त्या पुढे जवळजवळ तास दीड तास रंगल्या. खास माझ्या पाहुणचारासाठी त्यांनी स्वत: इडली सांबार केलं होतं. गप्पा मारत मारत आग्रहपूर्वक ते मला खाऊ घातलं. मग खास माझ्यासाठी त्यांनी बासरीवादन केलं. मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटावा अशी अविस्मरणीय भेट होती ती. बासरीवादनानंतर बोलता बोलता ओरिगामीच्या एक/दोन पिटुकल्या वस्तू करून हातावर ठेवल्या आणि एक सुरेखसं मोराचं चित्र माझ्यासमोर काढून भेट म्हणून दिलं. हे सगळं कमी म्हणून की काय, मला प्रबोधिनीपर्यंत सोडायला त्यांनी गाडी बाहेर काढली. रस्त्यातही आमच्या गप्पा चालू होत्या. एका सिग्नलला गाडी थांबलेली असताना, "गाणं म्हणता येतं का गं तुला?" त्यांनी विचारलं. "नाही हो... पण गाणी ऐकायला आवडतात मला." असं मी सांगितल्यावर अतिशय मोकळ्या आवाजात त्यांनी ‘रिमझिम गिरे सावन...’ म्हणायला सुरुवात केली.
 
गाणं झाल्यावर अचानक ते म्हणाले, "रागावणार नसशील तर एक विचारायचं आहे तुला. विचारू?" मी म्हटलं, "अगदी जरूर. मी अजिबात रागावणार नाही." ते काय विचारणार याचा मला अंदाज होता, खरं तर प्रतीक्षाच होती.
 
गुजरातमध्ये नुकतीच गोध्रा दंगल होऊन गेली होती. बाबांनी विचारलं, "गोध्रा दंगलीबद्दल तुझं काय मत?" प्रश्न अपेक्षित असला तरी क्षणभर थांबले नि म्हटलं, "खरं उत्तर देऊ? चालेल ना?" त्यांनी परवानगी दिली. मग मी शांतपणे उत्तर दिलं, "बाबा, घडलेल्या दोन्ही घटना दु:खद होत्या असं मला वाटतं. दंगल ही मुळात क्रियेला आलेली प्रतिक्रिया होती, असं माझं मत आहे. त्याआधी जे घडलं ते घडलंच नसतं, तर...." यावर त्यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. पुढे विचारलं, "तू ही अशी मोकळ्या विचारांची. मग ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती किंवा मुंबई तरुण भारतमध्ये पत्रकार. तिथे तुझ्या स्वातंत्र्याचा संकोच होतो असं नाही वाटत?"
"अजिबातच नाही बाबा. मला असं का वाटावं? या दोन्ही ठिकाणी काम करणं ही मी विचारपूर्वक केलेली निवड आहे. माझ्यावर कोणी लादलेलं नाही हे. त्यामुळे माझ्यासाठी ही दोन्ही कामं अभिमानाने सांगण्यासारखी आहेत. यातून मी माणूस म्हणून घडते आहे आणि दोन्हीकडे मला काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मुक्तांगणवर लेख लिहायला माझ्या संपादकांनी मला दिलेली परवानगी आणि तो जशाच्या तसा छापला जाणं, या दोन्ही गोष्टी त्याच्याच द्योतक नाहीत का?" माझ्या उत्तराने ते विचारात पडले असावेत. कदाचित पटलंही असावं. एक नक्की की, या प्रश्नोत्तरांच्या वेळी संवादात आलेला किंचितसा तणाव फार काळ टिकला नाही. अगदी हसतखेळत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
 
त्यानंतर काहीच तासांनी माझा मोबाइल वाजला. पलीकडे बाबा होते. का बरं केला असावा फोन? असा विचार करतच मी फोन उचलला, "मी बाबा बोलतोय गं. छान वाटलं तुला भेटून, तुझ्याशी गप्पा मारून हे सांगायला फोन केलाय."
"मलाही खूप छान वाटलं बाबा, खरंच.. लेखक म्हणून मी तुमच्या लेखनाची चाहती होतेच, पण माणूस म्हणूनही तुम्ही खूप छान आहात, हे गेल्या काही दिवसांत अनुभवलं." मी अगदी मनापासून सांगितलं.
 
"आणि हो, माझ्या मघाचच्या प्रश्नांनी दुखावली गेलीस का, हेही विचारायचं होतं मला. दुखावली असशील तर सॉरी. तू दोन्ही ठिकाणी खूप मनापासून काम करते आहेस हे पटलं मला." हे खूपच अनपेक्षित होतं माझ्यासाठी. त्यावर काय बोलावं कळेना.
"बाबा, सॉरी म्हणू नका. मला खरंच राग आलेला नाही तुमचा. उलट माझी वैचारिक पार्श्वभूमी कळल्यावरही माझ्याबद्दलचा तुमचा जिव्हाळा कमी झाला नाही आणि तुमच्या मनातले प्रश्न मोकळेपणी विचारलंत, हे खूप आवडलंय मला."
ते हसले नि म्हणाले, "तशी शहाणी मुलगी आहेस तू.. फक्त ए बाबा म्हणायचं काही मनावर घेत नाहीस."
 
"ते मात्र खरंच नाही जमायचं बाबा. त्यासाठी मला माफ करा." या वाक्यावर आमचं संभाषण संपलं.
 
त्यानंतर गेल्या वीसेक वर्षांत आमची पुन्हा गाठभेटही नाही की फोनवर संपर्क नाही. तरीही त्यांच्याविषयीची आपुलकी कधी कमी झाली नाही. आज त्यांच्या आठवणी जागवताना जणू काही कालच घडलेले प्रसंग असावेत असे डोळ्यासमोर येऊन गेले.
वात्सल्याचा मूर्तिमंत आविष्कार असलेला एक लेखकमाणूस - खर्या अर्थाने ‘बाप’माणूस आपल्यातून निघून गेला, ही हानी कधीही भरून न येण्याजोगी.
 
अश्विनी मयेकर 
Mobile  : 9594961865
साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक आहेत.

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.