बिन चेहर्‍याचा महाराष्ट्र

विवेक मराठी    31-Jan-2022   
Total Views |
महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणायलाच पाहिजे. आणि परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग निवडणुकांच्या इतिहासाने सर्वांपुढे ठेवलेला आहे. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाचे काम काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी करू शकत नाहीत. कारण हे तिघेही या सत्तेत आहेत. हे काम भाजपाला करायचे आहे. भाजपाची सक्षमता त्याच्या वैचारिक बांधिलकीत आणि वैचारिक बांधिलकी असणार्‍या कार्यकर्तावर्गात आहे. या सर्वांना सर्वसमावेशक आणि समाजाची विवेकशक्ती जागृत करणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. तिची पूर्तता झाल्यास परिवर्तन अटळ आहे.


bjp
महाराष्ट्रात राजकीय स्थिरता आहे. अधिकारावर असलेले शासन आपला कार्यकाळ पूर्ण करील. आजतरी या शासनाला कोणता धोका आहे, असे दिसत नाही. याचा अर्थ महाराष्ट्राची राजकीय स्थिती किंवा महाराष्ट्रातील राजकीय समाज आनंदी आहे, असा होत नाही. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री, त्या राज्याच्या अधिकारावर असताना चेहरा असतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री असेपर्यंत उत्तर प्रदेशचा चेहरा आहेत. ममता बॅनर्जी प. बंगालचा चेहरा आहेत. बीजू पटनायक ओरिसाचा चेहरा आहेत आणि अरविंद केजरीवाल दिल्लीचा चेहरा आहेत. महाराष्ट्र बिनचेहर्‍याचा राजकीय घटक आहे.
 
 
मुख्यमंत्री महाराष्ट्राचा चेहरा झालेले नाहीत, उपमुख्यमंत्रीदेखील नाहीत आणि तिसर्‍या क्रमांकावरील नेतेदेखील नाहीत. याचे कारण असे की, महाराष्ट्राचे शासन विचारधारेचे शासन नाही. विचारधारेचे शासन नसल्यामुळे विचारावर आधारित कार्यक्रमांचे शासन नाही. विचारावर आधारित कार्यक्रमांचे शासन नसल्यामुळे कार्यकर्त्यांपुढे कोणताही ध्येयवाद नाही, कोणता विचार नाही. तरी हे सरकार टिकणार आहे. त्याचे एकमेव कारण सत्तेचे अनंत फायदे असतात. घटक पक्षांना हे फायदे सोडून द्यायचे नाहीत. फायद्याचा स्वार्थ हे महाराष्ट्रातील राजकीय स्थिरतेचे एकमेव कारण आहे. लोकशाही राजवटीचा हा चमत्कार आहे.
 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री असेपर्यंत उत्तर प्रदेशचा चेहरा आहेत. ममता बॅनर्जी प. बंगालचा चेहरा आहेत. बीजू पटनायक ओरिसाचा चेहरा आहेत आणि अरविंद केजरीवाल दिल्लीचा चेहरा आहेत. महाराष्ट्र बिनचेहर्‍याचा राजकीय घटक आहे.
महाराष्ट्राचा राजकीय समाज एकूण परिस्थितीबाबत अस्वस्थ आहे. इथे ‘राजकीय समाज’ असा शब्दप्रयोग केलेला आहे, त्याचा अर्थ थोडा समजून घेऊ या. राजकीय समाज याचा अर्थ ज्या समाजात थोडीबहुत राजकीय जागृती आहे, राजकीय नीतिमत्तेविषयी ज्यांना आस्था आहे आणि ज्यांना असे वाटते की, लोकशाहीतील शासन कमीत कमी भ्रष्टाचार करणारे आणि लोकाभिमुख असले पाहिजे, तो समाज. राजकीयदृष्ट्या उदासीन असणारा फार मोठा वर्ग समाजात असतो. त्याची मानसिकता अशी असते की, कुणी का सत्तेवर येईना, मला त्याच्याशी काय करायचे.. मी, माझी नोकरी, माझे कुटुंब एवढ्यापुरताच मी विचार करणार. अशा वर्गातील व्यक्तींची मानसिकता बदलणे हे दीर्घकाळाचे काम आहे. त्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल.
 
 
महाराष्ट्रातील या राजकीय समाजाला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन हवे आहे. जे काही चालले आहे, ते राजकीय नैतिकतेत न बसणारे आणि राज्यघटनेच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. राज्यघटनेतील नियमांचे पालन ही वेगळी गोष्ट आहे आणि राज्यघटनेतील मूल्यांचे जतन ही वेगळी गोष्ट आहे. राज्यघटनेची मूल्ये राजकीय नीतिमत्ता पाळायला सांगतात. घटनात्मक नीतीचे पालन करायला सांगतात. ते या शासनाकडून झालेले नाही. संख्येच्या नियमाने ते सत्तेवर आहेत. नैतिकतेच्या नियमाने असत्याच्या गर्तेत आहेत. या परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय समाज परिवर्तन आणू इच्छितो.
 
 
bjp
या परिवर्तनाचे माध्यम कोण होणार? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. परिवर्तनाचे माध्यम अत्यंत सक्षम होण्यासाठी ते लोकांना जाणवेल अशा प्रकारे त्याचे अस्तित्व दिसावे लागते. हे माध्यम सतत क्रियाशील असावे लागते. असा सक्षम चेहरा महाराष्ट्रापुढे गेल्या तीन वर्षांत पुढे आलेला नाही. हे वास्तव अनेकांना कदाचित पटणार नाही किंवा एवढे स्पष्ट लिहिल्याबद्दल अनेकांना आवडणारदेखील नाही, पण कोणाच्या आवडी-निवडीचा प्रश्न बाजूला ठेवून फक्त वस्तुनिष्ठ विचार केला, तर वर दिलेली परिस्थिती काही बदलत नाही.
 
 
समाजाचे राजकीय नेतृत्व कसे उभे राहते? याविषयी अब्राहम लिंकनने काही सूत्रे सांगितली. समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारा विषय शोधला पाहिजे, हा विषय घेऊन समाज ढवळून काढला पाहिजे, तो विषय शेवटपर्यंत नेला पाहिजे आणि तो नेत असताना जे कष्ट करावे लागतील, जी आव्हाने स्वीकारावी लागतील ती स्वीकारली पाहिजेत. नरेंद्र मोदी यांचे उदाहरण घेऊ या. त्यांनी समाजाची विवेकबुद्धी जागृत करणारे विषय 2014च्या निवडणुकीपासून मांडायला सुरुवात केली. अन्यायग्रस्त हिंदू, विकासोन्मुख तरुण असे विषय त्यांनी राजकीय भाषेत मांडले. ते लोकांच्या मनाला जाऊन भिडले आणि लोकांनी त्यांना दिल्लीचे तख्त देऊन टाकले. लोकशाहीत क्रांतीची भाषा कोणी करीत नाहीत, पण क्रांती म्हणजे परिवर्तन असा अर्थ केला, तर मोदींनी देशात वैचारिक परिवर्तन केले आणि सत्तापरिवर्तनही केले.
 
1985ची निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर झाली. 1991च्या निवडणुकीत ही लाट हवेत विरून गेली. एवढे राजकीय ज्ञान सर्वांना असणे आवश्यक आहे. मोदींच्या पुण्याईवर महाराष्ट्राची निवडणूक जिंकू या भ्रमातून लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे.
महाराष्ट्रात अनेक नेत्यांना असे वाटते की, आता आपल्याला करण्यासारखे काही काम राहिलेले नाही. मोदींची हवा, मोदींची लाट, मोदींच्या सभा झाल्या की निवडणुका जिंकता येतील. पंतप्रधान मोदींविषयी पराकोटीचा आदर बाळगूनही हे सांगायला पाहिजे की, पुढची विधानसभा निवडणूक मोदी लाटेवर जिंकता येणार नाही. राजकीय लाटेचा सिद्धान्त हे सांगतो की, ही लाट कायमस्वरूपाची राहत नाही. एकच लाट पुन:पुन्हा निर्माण करता येत नाही. 1985ची निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर झाली. 1991च्या निवडणुकीत ही लाट हवेत विरून गेली. एवढे राजकीय ज्ञान सर्वांना असणे आवश्यक आहे. मोदींच्या पुण्याईवर महाराष्ट्राची निवडणूक जिंकू या भ्रमातून लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे.
 
 
निवडणुका आपल्या कर्तृत्वावर जिंकायच्या असतात. जे लोकप्रतिनिधी लोककल्याणाची कामे निरंतर करतात आणि ज्यांचा लोकसंपर्क हा जिवंत संपर्क असतो, ते आपल्या कर्तृत्वाने निवडून येतात. अशांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी असते. बाकी सर्व पक्षनेतृत्वाच्या नेतृत्वगुणामुळे निवडून येतात. मतदार पक्षाला आणि पक्षाचा चेहरा असणार्‍या नेत्याला मतदान करीत असतो. उमेदवार कोण आहे याचा तो फारसा विचार करीत नाही. म्हणून ज्यांना सत्तापरिवर्तन घडवून आणायचे आहे, त्यांनी लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करणारा विषय कोणता? हे निश्चित केले पाहिजे. तो घेऊन लोकशाही मार्गाने महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे आणि परिवर्तनाचा विश्वासही निर्माण केला पाहिजे आणि पर्यायदेखील समोर ठेवला पाहिजे.
 
 
bjp
 
महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हटला, तर 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे झाली. सर्व लोकांना स्पर्श करणारा तेव्हाचा विषय होता, ‘महाराष्ट्राची अस्मिता.’ पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्काचा प्रश्न हाती घेतला आणि 1986 सालानंतर हिंदुत्वाचा विषय घेतला. ते महाराष्ट्राचा चेहरा झाले. 1995च्या सुमारास गोपीनाथराव मुंडे यांनी परिवर्तन यात्रा काढून दाऊद इब्राहिम आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय खेडोपाडी नेला. लोकांची विवेकशक्ती जागृत करणारा हा विषय झाला. त्यामुळे सत्तापरिवर्तन झाले. म्हणून विवेकशक्ती जागृतीला पर्याय नाही.
 
 
आज महाराष्ट्रात काय चालू आहे? एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करण्याचे राजकीय नाटक चालू असते. यातील काही लोक तोंडाळ आहेत. त्यांच्या जिभेला लगाम नाही, वाणीला संयम नाही आणि बोलण्याला विचारांचा आणि नैतिकतेचा आधार नाही. जे मनात येईल ते बोलत राहतात. मोदींना ठार करण्यापासून ते विश्वासघातकी, शब्द न पाळणारे, कोट्यवधी रुपये हडप करणारे अशी यादी पानभर करता येईल. हे क्रिया-प्रतिक्रियांचे राजकारण कोणताही ध्येयवाद देत नाही, विचार देत नाही की समाजाची विवेकशक्ती जागृत करू शकत नाही. अशा राजकारणाचा लोकांना वीट आलेला आहे. लोक आता असे बोलू लागले आहेत की, अमूक-अमूक नेत्याला सांगा की, ‘जरा तोंडाला पट्टी बांध. प्रत्येक ठिकाणी तोंड उघडलेच पाहिजे, याची गरज नाही.’ ‘वक्तव्य देताना जरा विचार करून द्या.’ पक्षाचे पद मिळाले म्हणजे काहीही बोलण्याचा परवाना मिळाला, असे होत नाही.
 
 
ज्या नेत्यांना स्तुतिपाठकाच्या गराड्यात राहण्याची सवय लागलेली असते, ते आपल्या वक्तव्यावर प्रसन्न असतात. कारण त्यांचे चेले त्यांची स्तुती करतात. असे नेतृत्व सत्तापरिवर्तन कसे करणार? समाजाची विवेकशक्ती कशी जागृत करणार? महाराष्ट्राचा राजकीय विचार केला, तर महाराष्ट्र ढवळून काढावा असे अनेक प्रश्न आहेत. पालघरला साधूंची हत्या झाली. एक संधी गेली. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्याविरुद्ध पत्रक काढण्यापलीकडे काय झाले? कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, त्यांचे संसार उघड्यावर आले, त्यांचा प्रश्न कोणी हाती घ्यायचा? भटके-विमुक्त समाज हा भटकंती करतो आणि आपली उपजीविका करतो. कोरोना काळात त्याची भटकंती बंद झाली, तो कसा जगत असेल, काय खात असेल या प्रश्नाचा विचार कोणी करायचा? वनवासी पाडे शहरापासून दूर असतात. वाहतुकीच्या व्यवस्था तिथे नाहीत. कोरोना काळात त्यांचीही उपासमार होऊ लागली. त्यांचा प्रश्न कोणी हातात घ्यायचा? तंत्रज्ञानाच्या विकासामुळे समाजस्थिती बदलत राहते. अर्थकारणाची क्षेत्रे बदलतात. आयटी क्षेत्रात मुंबईतच किमान 15 ते 20 लाख युवक काम करीत असतील. त्यांचे संघटन नाही. कामाच्या तासावर मर्यादा नाहीत. आणि नोकरीची सुरक्षितता नाही. या युवकांकडे कोण लक्ष देणार? हे प्रश्न सोडून हा नेता काय बोलला, तो नेता काय म्हणाला, त्याच्या भानगडी कोणत्या, त्याने किती पैसे खाल्ले, यावर चर्चा चालू असते, ज्याच्याशी सामान्य माणसाला काहीही देणेघेणे नाही.
 
 
जेव्हा समान लक्ष्य नसते, तेव्हा लक्ष्याकडे जाण्याचा मार्गदेखील समान निर्माण होत नाही. प्रत्येकाचे लक्ष्य वेगवेगळे आणि प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा हा स्थिती निर्माण होते. आजचा लोकप्रतिनिधी कसा विचार करतो? येणार्‍या निवडणुकीत मला पुन्हा तिकीट कसे मिळेल, हा त्याच्या सर्वाधिक चिंतेचा विषय असतो. आपल्याला प्रतिस्पर्धी उभा राहणार नाही, याची तो काळजी घेतो. तिकीट देऊ शकणार्‍या नेत्याशी तो मधुर संबंध निर्माण करतो. इथून गटबाजीला प्रारंभ होतो. जिथे गटबाजी तिथे तटबंदी निर्माण होते. एकदिशा मार्ग राहत नाही.
 
 
महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणायलाच पाहिजे. आणि परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग निवडणुकांच्या इतिहासाने सर्वांपुढे ठेवलेला आहे. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. समाज कधीही एका राजकीय विचाराचा नसतो. समाजामध्ये हितसंबंधांचे गट असतात आणि राज्यसत्तेकडून या प्रत्येक गटाच्या अपेक्षा असतात. ते गट जातीचे असतात, आर्थिक असतात, धार्मिक असतात, स्त्रियांचे असतात, शेतकर्‍यांचा गट असतो, शेतमजुरांचा गट असतो. अशी गटांची संख्या खूप असते. जो राजकीय नेता आणि जो राजकीय पक्ष या गटांच्या हितसंबंधातून सामायिक हितसंबंधांची विषय सूची तयार करू शकतो, त्याचा विजय ठरलेला आहे. त्याला कुठल्या लाटेची आवश्यकता राहणार नाही.
 
 
महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाचे काम काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी करू शकत नाहीत. कारण हे तिघेही या सत्तेत आहेत. हे काम भाजपाला करायचे आहे. भाजपाची सक्षमता त्याच्या वैचारिक बांधिलकीत आणि वैचारिक बांधिलकी असणार्‍या कार्यकर्तावर्गात आहे. या सर्वांना सर्वसमावेशक आणि समाजाची विवेकशक्ती जागृत करणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. तिची पूर्तता झाल्यास परिवर्तन अटळ आहे.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.