आर्य आक्रमण सिद्धान्त खोडून काढणारी दिनदर्शिका

विवेक मराठी    06-Jan-2022   
Total Views |
आर्य आक्रमण सिद्धान्त सत्य आहे असे दाखवणारा एकही पुरावा उपलब्ध नाही. पण हा सिद्धान्त मिथ्य आहे हे दाखवणारे अनेक पुरावे आहेत. त्यापैकी बारा पुरावे आयआयटी खरगपूरने 2022च्या दिनदर्शिकेमध्ये मांडले आहेत. भारतीय इतिहासाच्या पुन:स्थापनेच्या उपक्रमातील एक पाऊल म्हणजे आयआयटी खरगपूरची 2022ची दिनदर्शिका.

calendar
 
आर्य आक्रमण सिद्धान्त असे सांगतो की ‘मध्य आशियामधून आर्यांच्या टोळ्या घोडे व रथ घेऊन हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतात आल्या. त्यांनी सिंधूच्या खोर्‍यातील लोकांवर हल्ला करून त्यांना तेथून दक्षिणेला हाकलले. हे आर्य सरस्वती नदीच्या काठावर स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथांची रचना केली.’ हा सिद्धान्त युरोपीय शास्त्रज्ञांनी मांडला आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील इतिहासकारांनी त्यांचीच री ओढली.
 
 
आर्य आक्रमण सिद्धान्त सत्य आहे असे दाखवणारा एकही पुरावा उपलब्ध नाही. पण हा सिद्धान्त मिथ्य आहे हे दाखवणारे अनेक पुरावे आहेत. त्यापैकी बारा पुरावे आयआयटी खरगपूरने 2022च्या दिनदर्शिकेमध्ये मांडले आहेत. या दिनदर्शिकेमध्ये असे काय आहे, ज्यामुळे डाव्यांना पोटशूळ उठला? या लेखातून जाणून घेऊ.
 
 
पूर्वपीठिका
 
 
बायबलमध्ये लिहिलेले प्रत्येक वाक्य सत्य आहे असे युरोपमधील मोठमोठे विचारवंत मानत असत. बायबलमध्ये लिहिलेली प्रत्येक घटना ऐतिहासिक आहे अशी त्यांची अंधश्रद्धा होती. बायबलमध्ये सांगितल्यानुसार - गॉडने इ.स. पूर्व 4000मध्ये जग निर्माण केले, त्यानंतर 7 दिवसांत जीवसृष्टी तयार केली, शेवटच्या दिवशी आदम आणि ईव्ह या मानवांची निर्मिती केली; ते दोघे अमर्त्य होते, पण गॉडच्या आज्ञेविरुद्ध त्यांनी बागेतील फळ खाल्ल्यावर ते मर्त्य झाले.. इत्यादी गोष्टींवर त्यांचा दृढ विश्वास होता. बायबलमध्ये गॉडने त्याला मानणार्‍यांना सांगितले, तुम्ही जगावर राज्य करा! Genesis 1:28.. हा वसाहतवादाचे मुख्य आधार होता.
 

calendar
 
बायबलच्या जेनेसिस पुस्तकात नोहाची कथा सांगितली आहे. नोहाला तीन मुलगे होते - जाफेथ (Japheth), शेम (Shem) आणि हॅम (Ham). एकदा हॅमने वडिलांना पाहू नये अशा अवस्थेत पहिले. त्यामुळे नोहा संतापला. त्याने हॅमच्या मुलाला कॅननला शाप दिला - तुझे वंशज गुलाम होतील! Genesis 9. जाफेथ, शेम आणि हॅमचे वंशज वेगवेगळ्या दिशांना निघून गेले.
 
 
बायबलमध्ये आणखी एक कथा येते - ‘"Tower of Babelची. (Genesis 11:1-9 ) ही कथा सांगते, सर्व मानवांनी एकत्र येऊन एक उंच मनोरा उभा करण्यास सुरुवात केली. ते सर्व जण एकच भाषा बोलत असत. हा मनोरा हेवनमध्ये पोहोचेल इतका उंच करायचा त्यांचा मानस होता. त्यांच्या या उद्दिष्टाने गॉड संतापला. त्याने म्हटले, या लोकांना एकच भाषा बोलता येते, त्यामुळे ते आता कोणतीही कामे करू शकतील. गॉडने मानवांना शाप दिला, आता तुम्ही सगळे जण वेगवेगळी भाषा बोलाल. तुम्हाला एकमेकांची भाषा कळणार नाही! तुम्ही एकत्र येऊन कामे करू शकणार नाही! असे म्हणून गॉडने सर्व मानवांना जगभर विखुरले.
 
 
या दोन कथांवरून युरोपीय लोकांचा समज झाला की मानवाची उत्पत्ती मध्यपूर्वेत झाली असून तिथून मानव (त्या वेळी माहीत असलेल्या) जगभर पसरले. ते प्रत्येक ठिकाणी वेगळी भाषा घेऊन गेले. जाफेथचे वंशज गोर्‍या कातडीचे (White) होते, जे युरोपमध्ये गेले. शेमचे पिवळ्या कातडीचे (Yellow) वंशज आशियामध्ये गेले आणि हॅमचे/कॅननचे काळ्या कातडीचे (Black) वंशज आफ्रिकेत गेले, असे ते मानत. मानवाच्या या विविध रंगांच्या ‘रेस’, त्यांच्या विविध ‘भाषा’ आणि मानवाचे मध्यपूर्वेतून सर्वत्र स्थलांतर हे विचार युरोपीय लोकांच्या मनात खोलवर रुजले होते. ब्रिटिश भारतात यायच्या आधीच त्यांचे ठरले होते की भारतातील मानव पश्चिमेकडून भारतात आला व त्याने येताना त्याच्याबरोबर भाषा आणली.
 
 
युरोपीय रेसिझम
 
 
16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये त्यांचे राज्य स्थापन केले. नंतर 1757 ब्रिटिशांनी प्लासीची लढाई जिंकली आणि ‘ब्रिटिश राज’च्या पर्वाला सुरुवात झाली. यांच्या राज्यकाळात अनेक ब्रिटिश, फ्रेंच व जर्मन भाषाशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ बायबलच्या चश्म्यातून भारतीयांचा अभ्यास करू लागले. त्यांच्या या अभ्यासातील काही महत्त्वाचे टप्पे-
थॉमस स्टिफन्स (1549-1619) हा ब्रिटिश मिशनरी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी गोव्यात आला होता. भारतीय भाषा पाहून तो आश्चर्यचकित झाला. कारण येथील शब्द युरोपीय शब्दांसारखे होते - उदा., सर्प /serpent, सप्त /septum (seven), अष्ट octo (eight), अस्थी /osteo, जरा / geriatric इत्यादी. त्याने याबद्दल पत्रांद्वारे युरोपमधील शास्त्रज्ञांना लिहिले.
 

calendar
 विलियम जोन्स
विलियम जोन्स (1746-1794) या ब्रिटिश अधिकार्‍याने 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीक, लॅटिन, जर्मन, फारसी, संस्कृत, बंगाली आदी भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यामधून त्याने मांडले की या सर्व भाषांमध्ये साम्य असून त्या एकाच कुळातल्या आहेत. या एकाच कुळातील भाषांची जननी एक अतिप्राचीन प्रोटो इंडो युरोपियन भाषा असावी. यांच्यापैकी संस्कृत सर्वोत्तम आहे. अशी उत्तम भाषा गोर्‍या लोकांचीच असू शकते, त्यामुळे संस्कृत भाषा पूर्वीच्या गोर्‍या लोकांनी भारतात आणली असावी.
 
 
 
युरोपमध्ये 1848मध्ये तेथील मध्यम व निम्नवर्गीय (मिडल क्लास आणि लोअर क्लास) सामान्य जनतेने क्रांती घडवून आणली. या क्रांतीने पूर्वी जी सत्ता फक्त युरोपीय राजघराण्यात होती, ती सत्ता सामन्यांच्या हाती येऊ लागली. ऑस्ट्रिया, हंगेरी येथील निम्नवर्गीय गोर्‍या लोकांची गुलामी (Serfdom) संपुष्टात आली. कैक राजघराणी संपुष्टात आली. कैक राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारली. या घडामोडींनी युरोपमधील राजघराणी हादरून गेली.
 
 
Gobineau (1816-1882) - हा एका फ्रेंच राजघराण्यातील सदस्य होता. 1848च्या क्रांतीने, राजघराण्यातून सामन्यांकडे सत्ता जात असलेली पाहून गोबिनौ हतबल झाला होता. त्याने बायबलचा आधार घेत मानवांची व्हाइट, यलो  व ब्लॅक  रेसमध्ये विभागणी केली. त्याने असे मत मांडले की व्हाइट रेसमध्येसुद्धा ‘आर्य’ रेसचे मानव सर्वोत्तम होते. युरोपमधील सर्व राजघराणी ‘आर्यन’ रेसची होती. त्याने लिहिलेल्या Inequality of the Human Races ठरलशी या निबंधात तो म्हणतो, राजघराण्यातील लोक उच्च रेसचे असून, सामान्य जन हे नीच रेसचे आहेत. त्याच्या मतांचा युरोपीय लोकांवर मोठा पगडा होता.
 
 
Houston Stewart Chamberlain (1855 - 1927) - गोबिनौच्या विचारांनी प्रभावित झालेला हा ब्रिटिश तत्त्वज्ञ. याने रेसची संकल्पना पुढे नेली. याने म्हटले की - युरोपचे महाबलाढ्य रोमन साम्राज्य (जे याच्या म्हणण्यानुसार ‘आर्य’वंशीय होते) ते ज्यूंमुळे अधोगतीला गेले. तसेच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला तो ज्यूंमुळे झाला. असे एक नाही, तर अनेक गोष्टींचे खापर त्याने ज्यूंच्या माथी फोडले. आधीच ख्रिश्चन लोकांच्या मनात ज्यूंविषयी द्वेष होता, त्यामध्ये चेंबरलेनने ही वैज्ञानिक(?) भर घातली. पुढे चेंबरलेन हिटलरचा मार्गदर्शक झाला. अनार्य ज्यूंविषयी व अनार्य जिप्सी लोकांविषयी याने हिटलरच्या मनात आत्यंतिक द्वेष पेरला. याला ‘हिटलरचा जॉन दि बाप्टिस्ट’ म्हटले गेले. द्वितीय महायुद्धातील भयानक नरसंहाराला हा ‘शुद्ध आर्यन रेस’चा सिद्धान्त कारणीभूत ठरला.
 
 
इथे लक्षात घ्यायला हवे की भारतीय दृष्टीला गौरवर्णीय अर्जुन सुंदर दिसतो आणि कृष्णवर्णीय राम, कृष्ण, सीता, द्रौपदीसुद्धा नितांतसुंदर दिसतात. भारतीय भाषेतील ‘आर्य’ हा आदरवाचक शब्द आहे. येथील बायका सासर्‍यांना आदराने ‘आर्य’ आणि नवर्‍याला ‘आर्यपुत्र’ म्हणत. गौतम बुद्धाने आपल्या चार सिद्धान्तांना ‘चार आर्य सत्य’ म्हटले. एकूणच ‘आर्य’ हा शब्द भारताने कोणत्याही जमातीसाठी वापरला नाही. भारतीयांनी कधीही काळे-गोरे असा भेद केला नाही.
 
 
 
युरोपच्या चश्म्यातून भारत
 
 
ब्रिटिशांना भारतात दोन प्रकारच्या भाषा दिसून आल्या - उत्तर भारतातील आर्य भाषा आणि दक्षिण भारतातील द्रविड भाषा. तसेच या दोन्ही लोकांच्या रंगात फरक होता. उत्तर भारतीय गोरे होते, तर दक्षिणेकडचे काळे. त्यांनी निष्कर्ष काढला की - भारतात दोन प्रकारची लोक (नेशन) आहेत - आर्य व द्रविड. तसेच उत्तर भारतातील ‘आर्य’ भाषा युरोपीय भाषांसारख्या होत्या. त्यामुळे उत्तर भारतातील लोक युरोपीय लोकांप्रमाणे ‘आर्यन’ रेसचे होते, तर दक्षिणेकडचे द्रविड रेसचे होते.
 
 
मॅक्स म्युलर, व्हीलर आदी विचारवंतांनी वरील संशोधनावर आधारित आर्य आक्रमण सिद्धान्त मांडला. या सिद्धान्तानुसार - आर्य भाषा बोलणारा एक समूह मध्यपूर्वेतून भारतात आला होता आणि एक समूह युरोपमध्ये गेला. म्हणून युरोप व उत्तर भारतातील भाषा सारख्या होत्या. उत्तर भारतातील लोक मध्यपूर्वेतून आलेले, गोर्‍या कातडीचे आर्य होते. पण त्यांच्यानुसार भारतातील आर्यांनी द्रविडांबरोबर interbreeding केल्यामुळे युरोपीय आर्य लोकांइतके ‘शुद्ध’ राहिले नव्हते.
 
 
बायबलनुसार इ.स. पूर्व 4,000मध्ये गॉडने जग निर्माण केले. बायबलवर अंधविश्वास असणार्‍या संशोधकांना (Biblical literalistना) आर्यांना इ.स. पूर्व 1500च्या आधी भारतात आणणे शक्य नव्हते. कारण, बायबलमधील पूर, नोहाची कथा, बेबलचा मनोरा आदी घटना घडायला वेळ देणे आवश्यक होते. म्हणून आर्य आक्रमणाच्या सिद्धान्तात त्यांनी मांडले की - मध्यपूर्वेतील आर्य रेसचे लोक इ.स. पूवर्र् 1500मध्ये भारतात आले, त्यांनी ब्लॅक रेसच्या द्रविडांना दक्षिणेला हाकलले व स्वत: गंगा-यमुना नदीच्या खोर्‍यात राहायला लागले. त्यानंतर त्यांनी वेद, उपनिषदे वगैरेची रचना केली.
 
 
हा सिद्धान्त मांडल्यावर 40 वर्षांनी मोहनजोदाडो व हरप्पा या सिंधूच्या खोर्‍यातील प्राचीन संस्कृतीची स्थाने सापडली. तेव्हा हा सिद्धान्त बदलला व आर्यांना गंगेच्या खोर्‍यात आणण्याऐवजी सिंधूच्या खोर्‍यात आणले. इ.स. पूवर्र् 1900च्या दरम्यान सरस्वती-सिंधू संकृतीचा र्‍हास झाला होता, म्हणून आर्यांना इ.स. पूर्व 1500ऐवजी इ.स. पूवर्र् 1900मध्ये भारतात आणले.
 
 
या सिद्धान्तानुसार सिंधूच्या खोर्‍यातील संस्कृती वेगळी होती व आर्यांनी आणलेली संस्कृती वेगळी होती, म्हणून तिथे मिळालेल्या अवशेषातून दिसणारी संस्कृती ही वैदिक साहित्यात वर्णन केलेल्या वा भारतातील आजच्या संस्कृतीपेक्षा वेगळी असायला हवी होती. पण..
 
 
calendar
आयआयटी खरगपूरची 2022ची दिनदर्शिका
 
 
आयआयटी खरगपूरमध्ये Indian Knowledge System (IKS) या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच या केंद्राचे उद्घाटन केले. असेच एक केंद्र आयआयटी गांधीनगर येथे काही वर्षांपूर्वी सुरू झाले. आयकेएस केंद्राद्वारे भारतीय ज्ञानव्यवस्था शिकवली जाईल. यामध्ये प्रामुख्याने प्राचीन नौकानयनशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, संस्कृत, सांख्य, न्याय, रसायन, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, नाट्यशास्त्र आदी विषय असतील.
 
 
आयआयटी खरगपूरची 2022ची दिनदर्शिका भारतीय ज्ञानव्यवस्थेला समर्पित केली असून, या दिनदर्शिकेमध्ये आर्य आक्रमणाचा सिद्धान्त खोटा असल्याचा दाखवणारे बारा पुरावे दिले आहेत.
 
 
1. आर्य आक्रमणाचा सिद्धान्त सांगतो की आर्य पश्चिमेकडून भारतात आले. पण ऋग्वेदात नद्यांचे वर्णन पूर्वेकडून पश्चिमेकडे केले आहे. सरस्वती-सिंधूच्या खोर्‍यातील सप्तसिंधूंचा उगम पूर्वेला हिमालयात असून वहन पश्चिमेकडे आहे. मनुष्यवस्तीचे पुरावेसुद्धा आधी पूर्वेला मिळतात आणि तिथून हळूहळू पश्चिमेकडे सरकताना दिसतात. ऋग्वेदात व नंतरच्या उपनिषदात गंगा-गोमती-शरयू या नद्यांच्या खोर्‍यातील संस्कृती वर्णली आहे. पूर्वेकडून पश्चिमेला झालेल्या संस्कृतीच्या प्रवासाकडे पाश्चिमात्य विद्वानांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे.
 
 
2. भारतात असलेला कर्मसिद्धान्त व पुनर्जन्माचा सिद्धान्त युरोप, युरेशिया, मध्यपूर्व अशा कोणत्याही संस्कृतीमध्ये दिसत नाही. अर्थात जर आर्य पश्चिमेकडून आले असतील, तर त्यांनी सोबत कोणते तत्त्वज्ञान आणले?
 
 
3. वेदांनी मांडलेला योग आणि क्षेम, ध्यान आणि समाधी, कर्म आणि धर्म हे विचार जर आर्यांचे होते, तर असे विचार त्यांनी युरोपातही न्यायला हवे होते. पण तसे झालेले दिसत नाही.
 
 
4. सहा ऋतूंच्या कालचक्राची कल्पना केवळ भारतच जन्म घेऊ शकते, कारण केवळ इथेच सहा ऋतू आहेत. युरोप, मध्य पूर्व, युरेशिया आदी ठिकाणी केवळ चार ऋतू आहेत. अर्थात असे सहा ऋतूंचे कालचक्र आर्य पश्चिमेकडून घेऊन आले असे म्हणणे हास्यास्पद आहे.
 

calendar
 
5. स्वामी विवेकानंदांनी आर्य आक्रमण सिद्धान्ताविषयी म्हटले - - Progress of Civilization, The East and The West - आर्य आक्रमणाचा सिद्धान्त ही निरर्थक बडबड आहे. पश्चिमेकडून आर्य आले काय आणि त्यांनी येथील लोकांना हाकलून इथे वस्ती केली काय, सगळेच म्हणणे फोल आहे. वेदातल्या एकातरी सूक्तामध्ये आम्ही पश्चिमेकडून आलो असे कुठल्या ऋषींनी म्हटले आहे काय? तरीसुद्धा असे धादांत खोटे सिद्धान्त आमच्या मुलांना शाळेत शिकवले जात आहेत, हे अत्यंत वाईट आहे.
 
 
6. मातृभक्ती, स्त्रीशक्तीची भक्ती सिंधूच्या खोर्‍यात दिसते, वेदांमध्ये दिसते आणि आजही भारतात ती रुजलेली आहे. अशी मातृशक्तीची पूजा अब्राह्मिक धर्मात दिसत नाही. मग आर्यांनी ती फक्त भारतात आणली हे म्हणणे साफ खोटे ठरते.
 
 
7. ऋग्वेदात आणि यजुर्वेदात शिवाची स्तुती आली आहे. तरीसुद्धा युरोपीय विचारवंतांनी शिव हा आर्यांच्या आधीचा देव होता असे जाणूनबुजून सांगितले. पण सत्य असे आहे की शिव हा सरस्वती-सिंधूच्या खोर्‍यातील देव आहे, तसाच तो वैदिक देवसुद्धा आहे.
 
 
8. वैदिक ऋषींनी मांडलेले तत्त्वज्ञान हे समता, प्रजासत्ताक, प्रेम, औदार्य, अहिंसा शिकवणारे आहे. पण आर्य आक्रमण सिद्धान्त सांगतो की हे तत्त्वज्ञान इतरांना नामशेष करणार्‍या आक्रमक टोळ्यांनी रचले आहे! जे अशक्य आहे.
 
 
दिनदर्शिकेमध्ये याशिवाय युरोपमध्ये ‘आर्यन रेस’च्या संकल्पनेचा उदय आणि आर्य आक्रमण सिद्धान्त मांडण्याची युरोपीय संशोधकांची घाई दाखवली आहे. आर्य आक्रमण सिद्धान्त मिथ्या असल्याचे श्री अरबिंदोंचे व स्वामी विवेकानंदांचे मत दिले आहे. आर्य आक्रमण सिद्धान्त खोडणारी अनेक पुस्तके दिली आहेत -
 
 
Story of Civilization: Our Oriental Heritage - Will Durant
The East and The West - Swami Vivekanand
The Invasion That Never Was - Michel Danino
The Wonder That Was India - - L Basham
The Decline Of The West - Oswald Spengler
 
 
भारताच्या इतिहासाची पुन:स्थापना
 
 
भारताचा इतिहास पूर्वी मौखिक परंपरेने जपला होता. तो रामायणात, महाभारतात व पुराणात ग्रथितदेखील केला होता. पण युरोपीय लोकांचा भर लिखित शब्दावर असल्याने, त्यांनी भारताचा इतिहास नाकारला. रामायण, महाभारत व पुराणांना इतिहास न म्हणता मिथक/एपिक/महाकाव्य म्हटले. आपला ऐतिहासिक काळ जो वेदांपासून, रामायणापासून सुरू व्हायचा, तो सम्राट अशोकापासून सुरू झाला. आर्य आक्रमण सिद्धान्ताद्वारे त्यांनी ठसवले की भारतीय वैदिक संस्कृती ही पाश्चिमात्य लोकांनी आणली होती. वैदिक साहित्य इ.स. पूर्व 2000नंतर रचले गेले. आधी बायबल आणि नंतर वेद, हे दाखवण्यासाठी केलेला आटापिटा. या सिद्धान्ताने भारतात इ.स. पूर्व 2000आधी जे काही घडले, त्याच्याशी आजच्या भारतीयांचा काहीच संबध नव्हता असेही बिंबवले. शिवाय या सिद्धान्ताने भारतीयांना आर्य व द्रविड अशा दोन गटात विभागून त्यांच्यात भांडणे लावून त्यांच्यावर राज्य करणे ब्रिटिशांना सोयीचे होते.
 
 
 
2014मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून, इंग्रजांनी केलेल्या या क्लृप्त्या एक एक करत सोडवल्या जात आहेत. सप्टेंबर 2019मध्ये केंद्र सरकारने https://vedicheritage.gov.in ही वैदिक साहित्य, त्याचा अर्थ आणि वेदांच्या गायनाचे नमुने असलेली साइट प्रसिद्ध केली. जानेवारी 2020मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मोहनजोदाडो - हरप्पा न म्हणता सरस्वती-सिंधू संस्कृती हे नाव उच्चारले. पाच प्राचीन साइट्सवर - राखीगढी (हरयाणा), हस्तिनापूर (उत्तर प्रदेश), शिवसागर (आसाम), ढोलावीरा (गुजरात) व आदिचन्नलूर (तामिळनाडू) येथे संग्रहालय बांधण्यासाठी तरतूद केली. लोथल (गुजरात) येथे 2020पासून Maritime Museum बांधकाम चालू झाले आहे. मार्च 2020मध्ये तीन संस्कृत विद्यापीठांना (राष्ट्रीय संस्कृत संस्थान, श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती) केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता दिली गेली. यामुळे विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार असून, त्यांना स्वत:चे अभ्यासक्रम, पदवी प्रमाणपत्रे, दूरस्थ शिक्षणाचे कार्यक्रम तयार करता येतील. National Education Policy अंतर्गत भारतीय संस्कृती, भाषा आणि कला यांच्या शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. याद्वारे संस्कृत भाषा, प्राकृत भाषा, म्युजियम, उत्खननशास्त्र, पुराणवस्तूंचे संवर्धन आदीचे पदवी शिक्षण उपलब्ध होणार आहेत. आयआयटीसारख्या श्रेष्ठ शैक्षणिक संस्थेत भारतीय विज्ञान व्यवस्था केंद्र सुरू करणे हासुद्धा त्यातील एक भाग आहे.
 
 
भारतीय इतिहासाच्या पुन:स्थापनेच्या उपक्रमातील एक पाऊल म्हणजे आयआयटी खरगपूरची 2022ची दिनदर्शिका. अभिनंदनीय! स्पृहणीय! आणि कौतुकास्पद!
 
 
संदर्भ -
1. RACISM : - Short History - George M. Fredrickson
2. BibleStudyTools.com

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com