शांताबाईंच्या स्मरणसंजीवनीने बहरलेले नुक्कड संमेलन

विवेक मराठी    07-Jan-2022
Total Views |
@नेहा लिमये 
ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे आणि त्यांच्या साहित्य निर्मितीचे वेध घेणारे नुक्कड साहित्य संमेलन 2 जानेवारी 2022 रोजी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन आयोजक टीममधील एक सदस्य व सहभागी नेहा लिमये यांनी शब्दबद्ध केलेला या संमेलनाचा वृत्तान्त.

nukkad
 
विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलन 2 जानेवारी 2022 रोजी पुण्यात पार पडलं. संमेलन करू या आणि ते प्रत्यक्ष करू या असं जेव्हा अर्चनाने सुचवलं, तेव्हा सगळ्या टीमचा उत्स्फूर्त होकार आला. त्यात निमित्त साहित्यसम्राज्ञी शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीचं. जिने शब्दांमधून इतकं काही भरभरून दिलं, त्या सरस्वतीची सेवा करायची संधी कोण गमावेल? प्राची, सायली, मयूर, अर्चना अशी विवेकची पूर्ण टीम झपाट्याने कामाला लागली, शांताबाईंच्या सगळ्या साहित्यप्रकारांचा पैस या संमेलनाच्या निमित्ताने मांडला जावा हे निश्चित झालं आणि एक देखणा कार्यक्रम आकाराला आला. यात आणखी एक सुवर्णयोग जुळून आला तो फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापना दिनाचा. हे संमेलन महाविद्यालयाच्या अँफीथिएटरमध्ये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेतले गेले. मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. आनंद काटीकर आणि विद्यार्थीही संमेलनात हर प्रकारे उत्साहाने सहभागी झाले.

 
प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी शांताबाई शेळकेंच्या निवडक आठवणी सांगत संमेलनाचं उद्घाटन केलं. शांताबाईंसारख्याच गोड हसू लाभलेल्या, अगदी आपल्यातल्या वाटाव्या अशा प्रतिभा रानडे यांनी बीजभाषणातून शांताबाईंच्या ‘धूळपाटी’मधले काही वेचे मांडत, त्यांच्याबद्दल वाटणारा आदर, आपुलकी व्यक्त केली आणि संधी असूनही इतर व्यग्रतेमुळे त्यांच्याबरोबर काम करता आलं नाही, याबद्दल खंतही व्यक्त केली. शांताबाईंनी लिहिलेल्या लावणीवर अफगाणिस्तानात सादर केलेल्या तमाशाबद्दल जेव्हा आपण शांताबाईंना दिलगिरीने सांगितलं, तेव्हा त्या कशा पटकन ‘दे टाळी’ म्हणाल्या, हे सांगताना प्रतिभाताईंच्या चेहर्‍यावरही तेच मिश्कील हसू होतं. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी यांनी महाविद्यालयाने मराठी रसिकांना दिलेल्या अनेक अध्यापक-अभ्यासक-लेखकांची परंपरा उलगडली, तर विवेकच्या महेश पोहनेरकरांनी प्रास्ताविकात संमेलनामागची भूमिका स्पष्ट केली.
 
 
 
पहिल्या सत्रात ‘चतुरस्र शांताबाई’ या परिसंवादात शांताबाईंनी हाताळलेल्या वेगवेगळ्या साहित्यप्रकारांचा परामर्श उत्तम प्रकारे घेण्यात आला. डॉ. रूपाली शिंदे, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, डॉ. वर्षा तोडमल आणि मानसी चिटणीस यांनी अनुक्रमे कथा, कादंबरी, ललित लेखन आणि अनुवाद यावर आपले विचार मांडले, तर संजीवनी शिंत्रे यांनी सत्राचं यथायोग्य समन्वयन पाहिलं. अभ्यासपूर्ण पद्धतीने अवलोकन करत डॉ. रूपाली शिंदे यांनी शांताबाईंच्या कथांची वैशिष्ट्यं मांडली - नात्यातली स्थित्यंतरं, एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाण्याचा स्वीकार करण्याआधीचा नेमका क्षण शांताबाई पकडतात; परंतु कथन, गोष्ट सांगणं यात समाजाचंही प्रतिबिंब दिसावं लागतं आणि त्यांच्या काळात घडणारी सामाजिक स्थित्यंतरं झपाट्याने बदलत गेल्यामुळे या कथा एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबतात, ही मर्यादाही त्यांनी स्पष्ट केली. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सुरुवातीचं हौशी लेखन आणि नंतरचं परिपक्व लेखन असे शांताबाईंच्या कादंबरी-लेखनाचे दोन पट उलगडून सांगितले. बहुतांशी लघु-कादंबरी स्वरूपात मोडणारं लेखन बारकावे टिपणारं आहे, निसर्गवर्णन, व्यक्तिचित्रं यांनी युक्त आहे, परंतु एकरेषीय असल्यामुळे कादंबरीच्या मोठ्या पटाच्या मानाने ते तितकं खोलात शिरत नाही. पुढे कविता-गीतं लिहीत गेल्यामुळे, मान्यता मिळत गेल्यामुळे शांताबाईंचं कथा- आणि कादंबरीलेखन मागेही पडलं आणि फारसं प्रचलित नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. शांताबाईंचं निसर्गावरचं, पशुपक्ष्यावरचं प्रेम त्यांच्या ललित लेखनात कसं दिसतं, याचा वेधक आढावा डॉ. वर्षा तोडमल यांनी घेतला. कवितेतलं गद्य रूप ललित आणि गद्यातल्या कविकल्पनांचं ललित त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलं. ‘इतर भाषांमधलं चांगलं साहित्य आपल्याकडे यायला हवं’ या ओढीतून शांताबाईंनी केलेले अनुवाद हे नुसतं भाषांतर नाही, तर आपल्या भाषेचा गोडवा जपत आशय व्यक्त करणं हे शांताबाईंनी लीलया पेललं, असं मत मानसी चिटणीस यांनी मांडलं. या सत्राच्या अध्यक्षा नीलिमा गुंडी यांनी शांताबाईंच्या सहवासातल्या गप्पांना उजाळा देत आपल्या स्पष्ट, खुसखुशीत शैलीत शांताबाईंच्या अफाट स्मरणशक्तीचे, प्रतिभाशक्तीचे आणि कल्पनाशक्तीचे अनेक दाखले दिले. निसर्गातल्या प्रतिमा, रुपकं वापरून त्यांची कविता बाह्य जगासाठी खुलत गेली, पण त्यांचा एकटेपणा, त्यातल्या वेदनेला झाकून ठेवण्यासाठी डोक्यावरून घेतलेला पदरही त्यांच्या कवितेत ठायी ठायी दिसतो. इतकी चतुरस्र साहित्यिक असूनही त्यांच्या साहित्यावर फारशी समीक्षा मात्र आढळत नाही आणि असलीच तर ‘स्मरणरंजन’ यावर येऊन संपते, ही खंत त्यांनी व्यक्त केली. शांताबाईंचं साहित्य स्मरणरंजन नसून स्मरणसंजीवन आहे, तेव्हा त्यांच्या ‘निवडक कथा’ किंवा इतर अप्रकाशित साहित्य शोधून प्रसिद्ध करावं, अशी अपेक्षा त्यांनी मांडली. यानंतर श्रोत्यांचं शंकानिरसन करून हे बौद्धिक मेजवानीचं सत्र संपलं.
 
 
nukkad

दुसर्‍या सत्रात शांताबाईंच्या निवडक कवितांवर आधारित ‘आठवणींचा बकुळगंध’ हा काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर झाला. या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी प्रास्ताविक करताना शांताबाईंच्या काही कविता उद्धृत करत त्यांच्या प्रवाही, सुमधुर शैलीचा उल्लेख केला. मयूर भावे आणि नेहा लिमये यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना शांताबाईंच्या कवितेतला अंतर्मुखपणा, चिंतनशीलता, शब्दांवरची पकड आणि भावार्थ उलगडल्यामुळे सादरीकरण नेटकं झालं. मयूर सरकाळे, स्नेहल सुरसे आणि मनस्वी पेंढारकर या नव्या पिढीच्या तरुणाईने अतिशय संयत, समजूतदारपणे कविता सादर केल्या. विशेषत: ‘पैठणी’ (स्नेहल), ‘तरुण मी’ (मनस्वी), ‘मलाच मी’ (मयूर सरकाळे), देणे (मयूर भावे) आणि ‘एकदा घडले तसे’ (नेहा लिमये) या कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. गझल, छंदोबद्ध, मुक्तछंद असे सगळे काव्यप्रकार शांताबाईंनी किती समर्थपणे हाताळले, याचा रसिकांनी पुन:प्रत्यय घेतला. सत्राचा समारोप करताना कवी अरुण म्हात्रे यांनी ‘आजची पिढीही कविता उत्तम सादर करते आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर याच कविता या पिढीला नव्याने उलगडत जातील’ या शब्दात अभिवाचकांचं कौतुक केलं. शेवटी, त्यांनी शांताबाईंवर केलेली कविता सादर केली, तेव्हा ‘घेऊ किती दो करांनी’ अशी सगळ्याच श्रोत्यांची अवस्था झाली.



nukkad

सकाळपासून प्रतीक्षा असलेल्या ‘तरी असेल गीत हे’ या तिसर्‍या सत्रात शांताबाईंची बहारदार गाणी सादर केली - चैत्राली अभ्यंकर आणि किरण अत्रे यांनी. मृदुभाषी सुजाता शेणई यांनी शांताबाई, मंगेशकर कुटुंबीय, बाबूजी (सुधीर फडके) असे सगळे दुवे निवेदनातून उलगडले. ‘जय शारदे वागीश्वरी’ या सरस्वती स्तवनाने सुरुवात करून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘माजे राणी माजे मोगा’, ‘जे वेड मजला लागले’, ‘रेशमाच्या रेघांनी’ अशी बहुविध ढंगांची गाणी सादर होत रसिकांची वाहवा मिळवत गेली. पण सगळ्यात लक्षवेधी ठरली चैत्रालीने सादर केलेली ‘हे श्यामसुंदर राजसा’ आणि ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ ही गाणी. चैत्राली अभ्यंकर आणि किरण अत्रे या द्वयीने सादर केलेल्या संगीतकार ‘आनंदघन’ अर्थात लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा मेडलेही रसिकांनी उचलून धरला. गाण्यांच्या दरम्यान होत असलेल्या ‘वन्स मोअर’ मागणीला प्रतिसाद देत चैत्रालीने ‘कोविड काळात यासाठीच आसुसलो होतो’ अशी प्रांजळ कबुलीही दिली. त्यांना सुयोग्य साथ दिली ओम्कार पाटणकर (कीबोर्ड), नरेंद्र चिपळूणकर (संवादिनी), ऋतुराज कोरे (तबला आणि ऑक्टोपॅड) या गुणी कलाकारांनी. सरस्वतीसाठी गाणं लिहिणार्‍या शांताबाई खुद्द ‘शब्दसरस्वती’ होत्या आणि म्हणून त्यांना हा कार्यक्रम अर्पण करतो आहोत, अशा भावना व्यक्त करत चैत्रालीने कार्यक्रमाचा शेवट ‘जय शारदे वागीश्वरी’च्याच तिसर्‍या कडव्याने केला, तेव्हा हे इथे संपूच नये असा ‘सूर’ प्रेक्षकांनी ‘लावला होता. या सुरांच्या मैफिलीला सत्राध्यक्ष म्हणून लाभले होते सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार.



nukkad

 
चौथ्या सत्रात ‘नुक्कड कथाविश्व’ या फेसबुक ब्लॉगवरच्या कथास्पर्धा विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना हेमंत कोठीकर यांनी “हास्यकथा, भयकथा, स्त्रीकथा, पुरुषकथा, पाऊसकथा असे अनेक कथाप्रकार हाताळले जातात ही स्तुत्य गोष्ट आहे; परंतु संख्यात्मकता असली तरी गुणात्मकता कमी पडते आहे, त्याकडे लेखकांनी लक्ष द्यावे” असे स्पष्ट केले. आपले वाचन चौफेर होईल, नव्या दमाच्या लेखकांपासून आपण काय शिकू शकतो हे जाणीवपूर्वक पाहून त्याप्रमाणे सकस लिखाण असलेल्या कथा नवीन वर्षात परीक्षकांकडे येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शांताबाईनी अनेक संगीतकारांसाठी गाणी लिहिली, त्यांच्या कविता संगीतबद्ध करणार्‍यांमध्ये कौशल इनामदार यांचे नाव अग्रक्रमावर आहे. त्यामुळे संमेलनाचा समारोप संगीतकार कौशल इनामदार यांच्या थोड्या गंभीर, थोड्या चिमटे काढणार्‍या शैलीत पण अतिशय समर्पक असा झाला. “भारत हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे आणि शांताबाई आपल्या कवितांमधून, गाण्यांमधून गोष्ट सांगतात - "Simple is not easy' त्यामुळे शांताबाईनी ‘सहज’ लिहिलेलं असलं तरी ते ‘सोपं’ नाही, तर अतिशय ‘खोल’ आहे आणि म्हणून त्या कालातीत आहेत” अशा शब्दात त्यांनी शांताबाईंबद्दलचा आदरभाव व्यक्त केला. त्यांच्याशी झालेल्या भेटीगाठीतले किस्से सांगून शांताबाईंमधल्या साधेपणाची आणि जुन्या परंपरा-गाणी-ओव्या-चाली यांच्या व्यासंगाची सफर कौशल यांनी रसिकांना घडवली. नवीन पिढी त्यांच्या कविता वाचते आहे, ऐकते आहे, प्रतिसाद देते आहे आणि हे आणखी 100-200 वर्षांनी पुढे वारसा पद्धतीने सुरू राहील आणि त्यातूनच भारताची मौखिक परंपरा पुढे जात राहील. हे ज्यांच्यामुळे साध्य होतं, त्या शांताबाईंना आणि मराठीतल्या इतर साहित्यिक नामक कुलदैवतांना अभिवादन करून कौशल इनामदार यांनी समारोप केला.
‘सा. विवेक’च्या डॉ. अर्चना कुडतरकर यांनी संमेलनासाठी हातभार लागलेल्या प्रत्येकाचा नामोल्लेख करून ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होईल का, उपस्थिती कशी असेल, कसं होईल अशी कुणकुण आयत्या वेळी असूनही मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल श्रोत्यांचेही आभार मानले.

 
नेटक्या नियोजनाचा, कान-डोळे-मन-मेंदू यांना तृप्त करणारा कार्यक्रम संपल्यानंतर सभागृह सोडताना प्रत्येकाच्या मनात शांताबाई निनादत होत्या यात वादच नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर -
 
 
असेन मी, नसेन मी,

तरी असेल गीत हे

फुलाफुलांत येथल्या

उद्या हसेल गीत हे।

शांताबाई शेळके या ‘वाग्विलासिनी’ला त्रिवार वंदन!!!
या संमेलनाला पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांनी प्रमुख प्रायोजक म्हणून तर राजहंस प्रकाशन, रसिक साहित्य आणि पद्मगंधा प्रकाशनने सहप्रयोजक म्हणून सहकार्य केले.