उषा रिसॉर्ट निसर्गाच्या सान्निध्यात वीकेंड ते वेडिंग

विवेक मराठी    01-Oct-2022   
Total Views |
शहरातील धावपळीतून, दगदगीतून दमल्या-भागल्या जिवांसाठी निसर्गाच्या, शांततेच्या कुशीत शिरून निवांतपणा अनुभवणं हे स्वप्नवतच वाटतं. पण उषा रिसॉर्टसारखा एखादा पर्याय नक्कीच हे स्वप्न सत्यात उतरवू शकतो. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये 5 एकर परिसरातील विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर, 2000-5000 लोक बसू शकतील असं प्रशस्त लॉन, सर्व सुविधांनी सुसज्ज सुमारे 38 रूम्स, वेगवेगळ्या प्रांतांचे, उत्तम चवीचे खाद्यपदार्थ, आकर्षक सजावट, सर्व विधींची साग्रसंगीत तयारी अशा सर्व वैशिष्ट्यांनी सज्ज असं हे रिसॉर्ट आहे.

usharesort
संपर्क
9870794508, 9082304035, 9320584500, 9370035117, 8830755192
www.usharesort.com
 
डेस्टिनेशन वेडिंग हे विवाहसोहळ्याचं आजच्या काळातील रूप. जहाजात, उंच आकाशात, एखाद्या बेटावर अशी लक्ष वेधून घेणारी डेस्टिनेशन वेडिंग सगळ्यांच्याच आवाक्यात नसतात, तरी आपला लग्नसमारंभ संस्मरणीय बनवण्यासाठी एखाद्या वेगळ्या जागी जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं स्वप्न अनेक भावी जोडपी आणि त्यांचे कुटुंबीय पाहत असतात. आता तर हा सोहळा एक-दोन दिवसांचा न राहता, मेहंदी, संगीत, हळद, मुख्य लग्नविधी आणि पाठवणी किंवा वरात असा 4-5 दिवसांचा भव्य कार्यक्रमच असतो. त्यात सर्व आप्त, मित्रमंडळी यांना सहभाग घेता येईल, त्यासाठी लागणार्‍या सर्व सुखसोयी तिथे उपलब्ध असतील, सोहळ्याची रंगत वाढवणारा आणि नेहमीच्या शहरी वातावरणापेक्षा वेगळा परिसर आजूबाजूला असेल अशा जागेची निवड डेस्टिनेशन वेडिंगसाठी केली जाते. पालघरमधील निसर्गाच्या सान्निध्यातील उषा रिसॉर्ट याच कारणासाठी लोकप्रिय होत आहे.
 
 
usharesort
मुंबईपासून जवळच असलेलं पालघर आता विकासाच्या नव्या खुणा ल्यायला लागलं आहे. या पालघरमध्ये 5 एकर परिसरातील विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर, 2000-5000 लोक बसू शकतील असं प्रशस्त लॉन, सर्व सुविधांनी सुसज्ज सुमारे 38 रूम्स, वेगवेगळ्या प्रांतांचे, उत्तम चवीचे खाद्यपदार्थ, आकर्षक सजावट, सर्व विधींची साग्रसंगीत तयारी अशा सर्व वैशिष्ट्यांनी सज्ज असं हे रिसॉर्ट आहे. लग्नसमारंभ हे एक वेगळेपण झालं, त्याशिवाय अन्य समारंभ, सहली किंवा व्यावसायिक बैठका यासाठीही उषा रिसॉर्टला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
 
 
आजच्या या रिसॉर्टचा प्रवास मात्र साधारण 16 वर्षांपूर्वी सुरू झाला होता आणि त्याही आधी त्याचं बीज रुजलं होतं. एका उद्यमशील मराठी महिलेने तिच्या स्वप्नांना दिलेला आकार म्हणजे हे उषा रिसॉर्ट असं म्हणता येईल. या उद्योजिकेचं नाव आहे माया अरविंद फाटक. खरं तर एक साधी गृहिणी. सासर-माहेर दोन्हीकडच्या घरात सर्व नोकरदार मंडळी. त्यामुळे उद्योगाचा कोणताच वारसा नाही. होती ती व्यवसाय करण्याची आवड आणि त्यासाठी जोखीम उचलण्याची क्षमता. त्याबरोबर आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याची आणि ते खाऊ घालण्याची आवड. 1990 ते 1996पर्यंत माया फाटक यांचं कुटुंब डोंबिवलीत वास्तव्यास होतं. त्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या उद्योगांचा अनुभव घेतला. पण स्वप्न होतं ते हॉटेल व्यवसायात उतरायचं.
 

usharesort
 
1996ला त्यांनी डोंबिवलीत ‘क्रिस्प कॉर्नर’ नावाचं छोटं हॉटेल भागीदारीत सुरू केलं होतं. पण नंतर त्या त्यातून बाहेर पडल्या. 2000मध्ये मनोर गावात हॉटेलच्या जागेसाठी त्यांनी एक टेंडर भरलं होतं, ते मंजूर झालं. मुंबई-अहमदाबाद रोडवर असलेलं मनोर नकाशात कुठे आहे हेदेखील त्यांना माहीत नव्हतं. तिथे राज्य सरकारचे चार रूम्स आणि रेस्टॉरंट असलेलं मॉटेल होतं. 8 एकरची जागा होती. 2000 ते 2006पर्यंत त्यांनी त्या जागी व्यवसाय केला. त्यातून संपर्क वाढून ग्राहकवर्ग तयार झाला. ती जागा हायवेला लागून असली तरी तिथे लोडशेडिंगची समस्या होती. तसंच खडकाळ भाग असल्याने बोअर लागत नव्हती. हॉटेल चालवायचं तर पाणी ही मुख्य गरज असते. टँकरच्या पाण्यावर त्यांनी हॉटेल चालवलं. अशा अनेक समस्यांमुळे त्या वेगळ्या जागेच्या शोधात होत्या. आता जिथे रिसॉर्ट आहे, ती जागा त्यांना 2006मध्ये मिळाली. डॉ. नानिवडेकर यांची ती प्रॉपर्टी होती आणि त्या जागी हॉटेलच होतं. या जागेला बीच फ्रंट नव्हता, त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागला. ही जागा दुर्गम भागात होती आणि त्या वेळी पालघरमध्ये फारसा विकास झाला नव्हता. पण माया फाटक यांना दूरदृष्टी होती की या भागात पुढच्या काळात विकास होणार आहे. त्यांनी कर्ज काढून जागा घेतली. त्या वेळी केवळ चार रूम्स आणि डॉरमिटरी होती. आज तिथे 38 रूम्स आहेत, मोठा बँक्वेट हॉल आहे. पुढची पंधरा वर्षं त्यांनी या रिसॉर्टचा ग्राहकवर्ग तयार केला, वाढवला आणि जपलाही. ग्राहकांच्या गरजेनुसार बदल करण्याबाबत, आधुनिकता आणण्याबाबत त्यांनी व्यावसायिक भूमिका घेतली.
 

usharesort
 
 ‘उषा रिसॉर्ट’चे विश्व उभारणार्‍या माया फाटक सोबत मुलगा विक्रम फाटक
 
कोविड काळाने अनेकांचं मोठं नुकसान केलं. फाटक परिवार आणि उषा रिसॉर्ट यांनी तर आपला मौल्यवान हिराच गमावला. प्रत्येकाला मायेने खाऊपिऊ घालणार्‍या माया फाटक या अन्नपूर्णेने 1 डिसेंबर 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. या दु:खातून सावरत त्यांच्या मुलाने - विक्रम फाटक यांनी या उद्योगाची धुरा हाती घेतली. सोबतीला आणि मार्गदर्शन करायला जुने सहकारी-कर्मचारी होतेच. व्यवस्थापक अनिल नायर हे तर 22 वर्षांपासून या व्यवसायात सहकार्य करत होते.
 
 
व्यावसायिकता आणि माणसं जोडण्याची वृत्ती यांचा मिलाफ आईने कसा साकारला, हे विक्रम यांनी जवळून अनुभवलं होतं, त्यामुळे प्रवास कठीण असला तरी या अनुभवसंचिताने कधी अडखळू दिलं नाही. विक्रम फाटक सांगतात, “आई म्हणायची, आपलं मन जेव्हा हातातून त्या पदार्थात उतरतं, तेव्हा ती चव त्या पदार्थाला येते. आदरातिथ्य हे तिचं तत्त्वच होतं. आपल्याकडे येणार्‍या पाहुण्याला काय आवडेल याची तिला चांगलीच जाण असे. आमचे एक ग्राहक हे लखनऊचे नवाब आहेत. पालघरमधील इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये त्यांचा उद्योग आहे. त्यांना आईच्या हातचा शिरा आवडायचा. वेगवेगळ्या देशांत असलेल्या त्यांच्या क्लाएंट्सना ते आमच्याकडेच जेवायला घेऊन यायचे. अशा प्रकारच्या आदरातिथ्यातून आमचं पाहुण्यांशी एक खास नातं तयार होत असे आणि ते अजूनही टिकून आहे.

 
 
एकदा (2006मध्ये) इंडस्ट्रिअल इस्टेटमधील एका कंपनीत चिनी पाहुणे आले होते. त्यांना त्या त्या भागातील स्थानिक पदार्थ चाखण्याची आवड होती. ते आमच्याकडे जेवायला आले असता आईने त्यांना आपला मराठमोळ्या पद्धतीचा वरणभात वगैरे खाऊ घातला. त्यांनी तशी प्रतिक्रियाही लिहून दिली. अजूनही ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांचे कोणीही मित्र इथे येणार असतील तर ते त्यांना आमचं रिसॉर्ट सुचवतात.”
 
 
 
विक्रम यांनी इंजीनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतलं. आईच्या हातून व्यवसायाचे प्रत्यक्ष धडे घेतले असले, तरी औपचारिक शिक्षणासाठी त्यांनी एमबीए केलं. एलअँडटी व केपीएमजी अशा कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली, पण कल व्यवसायाकडे होता. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्री कमिशनचं सौरविषयक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हे प्रशिक्षण देणार्‍या श्रीकांती निलंगे यांच्याबरोबर काम सुरू केलं. सोलापूरमध्ये सौर प्रकल्प उभारण्याचं काम त्यांच्याकडे होतं. त्या कामासाठी विक्रम यांना तिथे पाठवण्यात आलं होतं. अशाच अनुभवातून त्यांनी स्वत:ची सोलार एनर्जीमधील फर्म सुरू केली. रिसॉर्टमधून लोकसंपर्क वाढलेला होताच. त्याचा उपयोग या व्यवसायातही झाला. अशाच एका संपर्कातून मनोरला पहिलं काम मिळालं. आतापर्यंत महाराष्ट्रभरात त्यांंनी 72 सौर इन्स्टॉलेशन्स केली आहेत. चंद्रपूर-वरोरा, उरण, सिंदखेड राजा आदी भागांतही त्यांनी काम केलं होतं. हा व्यवसाय सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये नवे बदल करण्याचं आव्हानही त्यांनी तितक्याच ताकदीने पेललं.
 
 

usharesort
 
आव्हानाचं संधीत रूपांतर करत विक्रम यांनी रिसॉर्टचा कायापालट केला. त्याविषयी ते सांगतात, “डेस्टिनेशन वेडिंग या 4-5 वर्षांत विकसित होत असलेल्या संकल्पनेचा विचार करून आम्ही त्याप्रमाणे सुविधा देण्यास सुरुवात केली. कारण पालघर-बोईसर-डहाणू या परिसरात तशा प्रकारची कोणतीही सुविधा नव्हती. संगीत, हळद, लग्नाचे विधी आणि रिसेप्शन असे चार दिवस डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन असतं. मुलीकडचे आणि मुलाकडचे मिळून साधारण 200 ते 400 जणांची राहण्याची सोय यात करावी लागते.
 
 
 
सुरुवातीला रूम्स कमी असल्याने वाडवळ, वंजारी, ब्राह्मण आदी स्थानिक समाजांतील छोट्या स्वरूपातील लग्न होत असत. डेस्टिनेशन वेडिंगसाठी बाहेरच्या ग्राहकांना आकर्षित करायचं, तर स्वच्छ, प्रशस्त खोल्या, अन्य सोयीसुविधा यांची व्यवस्था आवश्यक होती. म्हणून 2021मध्ये आम्ही रूम्स बांधण्यास सुरुवात केली आणि दोन टप्प्यात काम पूर्ण केलं. 20 खोल्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात करायला सुरुवात केली. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जेव्हा पहिले ग्राहक आले, तेव्हा त्यांना 20 रूम्स हव्या होत्या. त्यांनी रिसॉर्ट बुक केलं. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरच्या सिझनमध्ये 5-6 लग्नं झाली.
 
 
 
नोव्हेंबरमध्ये सुरू केलेलं दुसर्‍या टप्प्याचं काम मार्चमध्ये पूर्ण झालं. ते इतक्या लवकर झालं नसतं, पण जानेवारीमध्ये एक मारवाडी ग्राहक आले. त्यांना एप्रिलमध्ये लग्नासाठी 38 रूम्स हव्या होत्या. एवढ्या कमी कालावधीत 38 रूम्स आणि अन्य सोयीसुविधा उभारण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं. सर्व पुरवठादार, कंत्राटदार, कामगार यांना विश्वासात घेतलं. त्यांच्या मदतीने दिवसरात्र काम करून 38 रूम्स वेळेत तयार करून दिल्या. त्यामुळे ग्राहकही खूश झाले. एवढा मोठा सोहळा आमच्याकडे पहिल्यांदाच पार पडला. त्यातून आमचा आत्मविश्वासही वाढला.”
 
 
usharesort
 ‘उषा रिसॉर्ट’मधील एका लग्नसोहळ्यात वधु-वरांसह विक्रम फाटक, त्यांची पत्नी प्रज्वला फाटक आणि मुलगी प्रवी
 
अन्य एका लग्नसोहळ्याबाबतचा विलक्षण अनुभव विक्रम यांनी सांगितला. संघपरिवारातील मंडळींना असे अनुभव नवीन नसतील, परंतु अन्य लोकांना नक्कीच यातून काहीतरी शिकता येईल.
 
 
“संघाचे पालघर तालुक्याचे विभाग कार्यवाह रवींद्र रहाळकर यांच्या मुलीचं लग्न मे महिन्यात उषा रिसॉर्टमध्ये होतं. 250 ते 300 लोक या लग्नासाठी राहायला होते. लग्नाच्या व्यवस्थापनात रवींद्र रहाळकर यांचे सर्व सहकारी स्वयंसेवक स्वखुशीने सहभागी झाले होते. मी स्वत:ही संघस्वयंसेवक असल्याने त्यात माझाही आत्मीय सहभाग होता. संघशाखेत जी शिस्त अनुभवायला मिळते, तशी शिस्त त्या पूर्ण सोहळ्यात अनुभवायला मिळाली. पहिलं तर लग्नाचा मुहूर्त बरोबर गाठला गेला, जे अलीकडे फार क्वचित होतं. दुसरं म्हणजे आमच्याकडच्या पार्किंगमध्ये 150 ते 200 गाड्या व्यवस्थित बसतात. पण आपल्याकडे गाड्या लावण्याची बेशिस्त पद्धत असल्यामुळे सहसा तसं होत नसे. रहाळकरांच्या लग्नसमारंभात मात्र वेगळीच परिस्थिती होती. स्वयंसेवकच व्यवस्थेला असल्याने पार्किंगची सोय उत्तमरित्या पार पडली. एरव्ही ग्राहक स्वच्छतेच्या बाबतीत, प्रॉपर्टी हाताळण्याच्या बाबतीत फार जबाबदार नसतात. पण या लग्नात मात्र स्वच्छतेचं आणि शिस्तीचं दर्शन झालं. दहा वाजताच डीजे बंद झाला. चेकआउट टायमिंगच्या तासभर आधीच चेकआउट करण्यात आलं. आमच्या सर्व स्टाफलाही या अनुभवातून काही गोष्टी शिकता आल्या.”
आतापर्यंत या रिसॉर्टमध्ये 200 लग्नसोहळे साजरे झालेत. लग्नसोहळ्यांबरोबरच ज्यांना रम्य निसर्गाच्या सान्निध्यात आणि शांत वातावरणात सुट्टी घालवायची आहे, असे लोकही वीकेंड आणि अन्य सुट्ट्यांसाठी उषा रिसॉर्टचा पर्याय निवडतात. शिवाय येथून समुद्रकिनाराही जवळ आहे. स्वीमिंग पूल, रेन डान्स, इनडोअर गेम्स अशी मनोरंजनाची साधनंही आहेत. त्यामुळे ‘थिंक वेडिंग अँड वीकेंड, थिंक उषा रिसॉर्ट’ असंच या रिसॉर्टचं घोषवाक्य आहे.
 
 
 
विक्रम सांगतात, “आमच्याकडे काही लेखक येऊन 7-8 दिवस राहतात. आमच्याकडे तळं आणि त्याला लागून पर्णकुटी आहे. त्यात राहून आपलं लेखनकाम करायला त्यांना आवडतं. गाण्यांचे व्हिडिओ किंवा मालिका/चित्रपट यांचं चित्रीकरणही येथे होतं. या परिसरात अनेक आध्यात्मिक आश्रम आहेत. त्यांचे अनुयायीही निवासासाठी येतात.
 
 
 
 
येणारे ग्राहकही शांतताप्रिय असतात. काही ज्येष्ठ नागरिकांचे गट किंवा काही कौटुंबिक सहली उषा रिसॉर्टमध्ये येतात. आई असतानाची एक आठवण आहे. त्या वेळी असाच एक ग्रूप आला होता. रात्रीच्या वेळी दिवे गेले होते. काही ज्येष्ठ नागरिक आईबरोबर गप्पा मारत बसले होते. ते म्हणाले, “काही जनरेटर वगैरे सुरू करू नका. दिवसभर तो मोबाइल, गाणी सुरूच असतं. अशी शांतता शहरात अनुभवता येते का? मुलांना जरा इथलं चांदण्यांनी भरलेलं आकाश शांतपणे अनुभवू द्या.”
 
 
 
शहरातील धावपळीतून, दगदगीतून दमल्या-भागल्या जिवांसाठी निसर्गाच्या, शांततेच्या कुशीत शिरून निवांतपणा अनुभवणं हे स्वप्नवतच वाटतं. पण उषा रिसॉर्टसारखा एखादा पर्याय नक्कीच हे स्वप्न सत्यात उतरवू शकतो.

सपना कदम

गरवारे मधून पत्रकारितेचे पद्व्युत्तर शिक्षण. सध्या सा.विवेक येथे उपसंपादक म्हणून काम पाहतात. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.