इहवाद, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र

विवेक मराठी    31-Oct-2022   
Total Views |
‘हिंदुत्वा’ची संकल्पना भारतातील इहवादी मूल्यांचे संरक्षण करेल, तर ‘हिंदू राष्ट्रा’ची संकल्पना त्यात नवा अर्थ भरून ती अधिक स्थायी व अर्थपूर्ण बनवेल. आज जगभरात हिंदूंनी आपल्या कर्तृत्वाने आपला ठसा उमटविला आहे. परंतु आपण ज्या सांस्कृतिक संचितातून घडलो, त्याची त्यांना कल्पना नसते. त्याने धार्मिक कर्मकांडे केलेली असतात, पाहिलेली असतात, पण त्यामागच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा त्याला पत्ता नसतो. त्यांना हा वारसा समजेल हे कसे घडवून आणायचे, ही त्याची व्यावहारिक बाजू आहे. या दोन्हींवर आज विचारमंथनाची गरज आहे.
 
rss
 
रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन याने 312 साली ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यानंतर ख्रिश्चन धर्माला राजमान्यता मिळाली व नंतर पुढच्या रोमन सम्राटांच्या काळात तो रोमन साम्राज्याचा राजधर्म बनला. त्यानंतर सर्व युरोपवर ख्रिश्चन धर्माचे अधिराज्य स्थापन झाले. रोमन साम्राज्य अस्ताला गेल्यानंतरचा सुमारे पाचशे वर्षांचा काळ हा युरोपचे अंधारयुग म्हणून मानला जातो. या काळात बुद्धिवादावर धर्मश्रद्धांनी मात केली, मानवाची बौद्धिक व वैज्ञानिक प्रगती थांबली, समाजजीवनाची सर्व सूत्रे पोपच्या व ख्रिश्चन धर्मगुरूंच्या हाती गेली. जीवनाच्या ऐहिक व पारमार्थिक या दोन्ही क्षेत्रांवर त्यांचा प्रभाव निर्माण झाला. त्यानंतर पुढच्या सुमारे पाचशे वर्षांत, व्यापारवृद्धी व धर्मवृद्धी या प्रेरणांमुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार जगभर होऊ लागला. भारताच्या शोधात अमेरिकेला पोहोचलेला कोलंबस किंवा भारतात आलेला वास्को द गामा ही त्यातील दोन प्रमुख उदाहरणे. परंतु नंतर जसजसे नवनवे वैज्ञानिक शोध लागू लागले, तसतसे धार्मिक श्रद्धांना आव्हान मिळू लागले. धार्मिक श्रद्धांपेक्षा विज्ञानसिद्ध तर्कवादाला अधिक महत्त्व मिळू लागले. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक व तत्त्वज्ञ रेने देकार्त याने धार्मिक श्रद्धांचे क्षेत्र व ऐहिक जीवनाचे क्षेत्र वेगवेगळे आहे, असे सांगून धर्माच्या कक्षेपासून ऐहिक जीवनाची कक्षा वेगळी केली व इहवादाच्या प्रगतीची सर्व दारे खुली केली. त्यामुळे धर्मावरील श्रद्धा ही व्यक्तिगत बाब बनली व समाजनियमनाच्या विविध क्षेत्रांचे नियमन करण्याचे अधिकार राजसत्तेकडे आले. त्यानंतर राजसत्तेच्या संकल्पनेचा विकास सुरू झाला व त्याची परिणती आजच्या लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, मानवताधिष्ठित समता व नैतिकता, मूलभूत नागरी हक्क व बहुमतावर आधारित कायद्याचे राज्य या चतु:सूत्रीत झाली. या चतु:सूत्रीलाच आपण इहवादी राज्य किंवा आधुनिक सिव्हिल सोसायटीच्या संकल्पना समजतो. आपल्याकडे प्रत्येकाने ‘सेक्युलर’ या शब्दाचे आपापल्या सोयीनुसार अर्थ लावले आहेत. परंतु त्याचा खरा अर्थ ‘मानवाने कोणत्याही धर्मश्रद्धेविना आपल्या सामूहिक बुद्धीने, मानवतेच्या मूल्यांवर अधिष्ठित असलेले आणि आपल्या व समाजाच्या हित-अहिताचा विचार करून घेतलेले निर्णय म्हणजे इहवाद’ असा आहे.

साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान

https://www.evivek.com/hindutva-granth/

 
 
जेव्हा युरोपमध्ये, विशेषत: पश्चिम युरोपमध्ये इहवादी विचारांचा प्रभाव वाढू लागला, तसतसे सेक्युलॅरिझम हे अत्यंत महत्त्वाचे राजकीय तत्त्वज्ञान बनले. हे तत्त्वज्ञान प्रभावी बनण्यापूर्वी नैतिकतेच्या संकल्पना धार्मिक आचाराशी निगडित होत्या. त्या संकल्पनांनी आता धार्मिक संकल्पनांशी फारकत घेऊन त्या मानवताधिष्ठित बनल्या. भारतात जेव्हा इंग्रजी राजवट दृढमूल झाली व 1857च्या इंग्रजांच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा या जीवनमूल्यांचा आपल्या लोकांना परिचय होऊ लागला. तोवर हिंदू समाजावर श्रुती-स्मृतींचा व मुस्लीम समाजावर शरियतचा प्रभाव होता. स्मृती व शरियत यांचा मूल्यात्मक आधार इहवादी मूल्यांपेक्षा वेगळा, धार्मिक श्रद्धांचा होता. असे असले, तरी आधुनिक इहवादी विचारप्रवाहाला हिंदू व मुस्लीम समाजांचा मिळालेला प्रतिसाद भिन्न होता. श्रुतीस्मृतीपुराणोक्त हिंदू धर्मव्यवहारात जात व वर्णाधिष्ठित विषमतेला मानणारा होता, तर आधुनिक इहवादी विचार हे जन्माधिष्ठित समतेचे मूल्य मानणार्‍या मानवतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित होते. परंतु हिंदू समाजात आपल्या समाजविचारांत बदल घडवून आणण्यास विरोध झाला असला, तरी एक-दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर तो कमी झाला व समताधिष्ठित विचारांना मोठ्या प्रमाणात यशही आले. याचे कारण भारतभरातील सर्व भाषांत जी भक्ती चळवळ निर्माण झाली, तिने आध्यात्मिक पातळीवर समतेचा पुरस्कार करून मानवताधिष्ठित समतेची मानसिकता तयार केली होती. इहवादी विचारांनी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यावहारिक चौकट तयार करून दिली. याचा परिणाम भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने इहवादी तत्त्वज्ञानावर आधारित राज्यघटनेचा स्वीकार केला. आज त्याच मूल्यचौकटीच्या आधारावर देशाचा व्यवहार सुरू आहे. याच्या उलट प्रतिक्रिया मुस्लीम समाजाची होती. त्या समाजाने शरियतमध्ये बदल करायला नकार दिला. शरियतचे पालन करणे म्हणजेच आपले वेगळे धार्मिक अस्तित्व राखणे असा त्या समाजाने अर्थ केला. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात जो हिंदू-मुस्लीम संघर्ष झाला, त्याला जसा धर्माधिष्ठित वर्चस्ववादाचा संदर्भ होता, तसाच तो मूल्यात्मकही होता. हिंदू समाजाची परिवर्तनाच्या प्रक्रियेला पचवून पुढे जाण्याची जी मानसिकता आहे, ती मुस्लीम समाजात नसल्याने जसजसा स्वातंत्र्याचा दिवस जवळ येत गेला, तसा या दोन्ही समाजांतील सांस्कृतिक फरक अधिकाधिक अधोरेखित होत गेला. भारताने स्वातंत्र्यानंतर इहवादी राज्यघटनेचा स्वीकार केला, पण पाकिस्तानने स्वत:ला धर्माधिष्ठित इस्लामी देश म्हणून घोषित केले. त्याचे पाकिस्तानवर काय परिणाम झाले आहेत, याचे जग साक्षीदार आहे.
 
 

rss
 
श्रीरामजन्मभूमी लढ्यानंतर, विशेषत: मोदी पंतप्रधान बनल्यानंतर ‘हिंदुत्व’ या संकल्पनेची वृत्तपत्रीय चर्चा बरीच सुरू आहे. परंतु ‘हिंदुत्व‘ या संकल्पनेचा वैचारिक आशय काय आहे? तिचा हिंदू धार्मिकतेशी कोणता संबंध आहे? तिचे इहवादी विचारांशी काय नाते आहे? ‘हिंदू राष्ट्र’ व ‘ हिंदुत्व’ या संकल्पना एकच आहेत की त्या भिन्न आहेत? ही संकल्पना एक परिपूर्ण राजकीय तत्त्वज्ञान म्हणून विकसित होऊ शकते का? तसे असेल तर त्याचे स्वरूप कोणते असेल? आदी मुद्द्यांवर पुरेशा गांभीर्याने चर्चा झालेली नाही. याची नेहमीचीच दोन कारणे आहेत - पहिले कारण म्हणजे अजूनही स्वत:ला डाव्या किंवा सेक्युलर म्हणविणार्‍या विचारवंतांना ‘हिंदुत्व’ ही भावनिक अभिव्यक्ती वाटते, यामागे सुसूत्र विचारांचा एखादा आकृतिबंध आहे असे वाटत नाही. हिंदुत्ववादी चळवळीला त्याची गरज वाटत नाही. असा आकृतिबंध तयार करणे हे निरुपयोगी काम आहे व ज्यांना दुसरा उद्योग नाही ते रिकामटेकडे लोक करतील, अशी त्यांची सर्वसाधारण धारणा असते. सुस्पष्ट तात्त्विक आकृतिबंध नसल्याचा अभाव आपल्याला कृतिशीलतेतून भरून काढता येईल, यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे या तिन्ही संकल्पनांच्या परस्पर संबंधांच्या आकृतिबंधावर प्राथमिक कामही झालेले नाही. ते कामही खूप मोठे, महत्त्वाचे व आव्हानात्मक आहे. या संबंधातील काही निरीक्षणे नोंदविणे एवढाच या लेखाचा मर्यादित हेतू आहे.
 
 
 
इंग्रजी सत्तेबरोबर युरोपीय आधुनिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा भारतीय सुशिक्षितांना परिचय झाला. जर आपल्याला स्वातंत्र्याची मागणी करायची असेल, तर त्याआधी सर्व भारतीयांना कवेत घेणारी राष्ट्रीय व्याख्या असली पाहिजे, याची आवश्यकता निर्माण झाली. भारतात हिंदू व मुस्लीम हे दोन प्रमुख समाज आहेत. त्या दोन समाजांना कवेत घेणारी हिंदी राष्ट्रवादाची व्याख्या काँग्रेसने तयार केली. परंतु ही व्याख्या मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी मान्य केली नाही. त्यांनी मुस्लीम समाज हे स्वतंत्र राष्ट्र असल्याचा दावा केला. काँग्रेसने मुस्लीम समाजाला सोबत ठेवण्याकरिता अनेक तडजोडी केल्या, परंतु मुस्लीम लीगने त्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे हिंदू समाजापुढे दोनच तार्किक पर्याय उभे होते. इतिहासकाळातील गुलामी स्वीकारत, मुस्लीम समाजाचे नेतृत्व मान्य करून दुय्यम भूमिका स्वीकारणे किंवा हिंदू समाजदेखील स्वबळावर आपल्या राष्ट्राची निर्मिती करू शकतो हे सिद्ध करून दाखविणे. काँग्रेसने हे दोन तर्कशुद्ध निष्कर्ष बाजूला ठेवून कधीही साध्य न होणार्‍या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारित हिंदी राष्ट्रवादाचा प्रयोग तसाच पुढे सुरू ठेवला. या प्रयोगाची परिणती प्रचंड नरसंहारात व देशाच्या फाळणीत झाली.
 
 
 
rss
 
मुस्लीम समाजाच्या वागण्यामुळे जे तर्कशुद्ध पर्याय निर्माण झाले होते, त्यातील हिंदूंनी मुस्लिमांची गुलामी नाकारून हिंदू स्वबळावर राष्ट्रनिर्मिती करू शकतात, यावर विश्वास ठेवणारी चळवळ म्हणजे हिंदुत्वाची चळवळ व त्या चळवळीचा विचार म्हणजे हिंदुत्वाचा विचार. समाजातील एकात्मभाव ही आधुनिक राष्ट्रवादाची किमान अट. अनेकविध जाती, संप्रदाय, भाषा असलेल्या हिंदू समाजात असा एकात्म भाव आहे का? हा यातील कळीचा प्रश्न होता. लोकमान्य टिळकांनी प्रथम हिंदू समाजाला एक राजकीय समाज म्हणून ओळख करून दिली. ते काँग्रेेसचे नेते असले, तरी त्यांना वास्तवाचे भान होते. त्यांनीही लखनौ करार करून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रयत्न केले. पण ते करीत असताना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू, मुस्लीम व ब्रिटन हे तीन पक्ष आहेत व ब्रिटिश सत्तेला पराभूत करण्यासाठी हिंदू व मुस्लीम या दोन पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडली. या भूमिकेतच हिंदू हा एक राजकीय घटक आहे हे त्यांनी गृहीत धरले होते. परंतु त्या वेळी हिंदू समाजाची स्थिती एवढी विसकळीत, अनेक जाती, प्रथा, परंपरा, भाषा यांनी अराजकसदृश बनलेली होती की या सर्वातून एखाद्या आधुनिक राष्ट्राची उभारणी करता येईल ही कविकल्पनाच वाटावी.
 
 
 
लो. टिळकांनी हिंदू समाजातील राजकीय चेतना जागृत केली, तरी हिंदू राष्ट्राची संकल्पना सुस्पष्ट करण्याचे श्रेय हे डॉक्टर हेडगेवार व स्वा. सावरकर यांना जाते. डॉक्टर हेडगेवारांनी किंवा नंतर संघाने हिंदू समाजाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याआधी लो. टिळकांनी ‘वेदप्रामाण्य मानणारा तो हिंदू’ अशी केलेली व्याख्या मोठ्या संख्येतील हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या कक्षेतून बाहेर ठेवणारी होती. रा.स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघाला रूढार्थाने हिंदू समजल्या जाणार्‍या हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे, असे स्पष्ट करून कोणत्याही शाब्दिक व्याख्येमुळे होणार्‍या अव्याप्ती किंवा अतिव्याप्तीच्या दोषापासून संघाला दूर ठेवले. संघाने हिंदू हा शब्द धर्मापेक्षा संस्कृती या अर्थाने उपयोगात आणला. स्वा. सावरकरांनी हिंदू राष्ट्रवादाकरिता ‘हिंदुत्व’ हा नवा शब्द निर्माण केला व हिंदू समाजातील विविध परंपरा, जाती, संप्रदाय, देवदेवता, आचार, श्रुती, स्मृती, पुराणे यांच्या पलीकडे जाऊन, हिंदू समाजाच्या ऐतिहासिक वाटचालीतून, समान शत्रू-मित्र भावातून, हिंदू समाजात जो एकात्मभाव निर्माण झाला आहे, तो एकात्मभाव हिंदू राष्ट्राचा आधारभूत घटक मानून त्यावर आपल्या ‘हिंदुत्वाच्या’ सिद्धान्ताची उभारणी केली. आपल्या ‘हिंदुत्वाच्या’ तत्त्वज्ञानाने काँग्रेेसच्या हिंदी राष्ट्रवादाला पर्याय निर्माण केला.
 
 
rss
 
 
भारताला स्वातंत्र्य मिळत असताना जी राज्यघटना तयार झाली, त्याचे स्वाभाविकच नेतृत्व काँग्रेेसकडेच होते. पण ते नेतृत्व हिंदू महासभेने केले असते, तरी या राज्यघटनेत 370वे कलम किंवा अल्पसंख्याकांविषयक तरतुदी वगळता फारसा बदल झाला असता असे नाही. राज्यघटना निर्माण होण्याआधी चार-पाच वर्षे हिंदू महासभेने संभाव्य घटनेचा जो मसुदा प्रकाशित केला, तो यापेक्षा वेगळा नव्हता. भारताने राज्यघटना स्वीकारली त्या दिवसाचे सावरकरांनी ‘सुवर्णदिन’ म्हणून वर्णन केले व या राज्यघटनेने हिंदू समाजातील अस्पृश्यता संपविली याबद्दल कौतुकही केले. लो. टिळकांनीही या राज्यघटनेच्या पन्नास-एक वर्षे आधी संभाव्य राज्यघटनेचा मसुदा बनविला होता, त्याचेही स्वरूप विद्यमान राज्यघटनेप्रमाणेच होते. त्यामुळे राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे, त्याची मूलभूत तत्त्वे काय असावीत याबाबत काँग्रेस व हिंदू महासभा यांच्यात मूलभूत मतभेद नव्हते. ते मतभेद होते ते राष्ट्र उभारणी कोणत्या समाजाला गृहीत धरून करावी, याबाबत राष्ट्र केवळ लिखित घटनेवर उभे राहत नाही, तर ती घटना टिकविण्यासाठी तशा प्रकारचे राष्ट्रीय मानस असावे लागते. मूल्ये अधांतरी जगू शकत नाहीत, त्यामागे एखादा समाज उभा असावा लागतो. त्यासाठी हिंदू समाजाला केंद्रीभूत ठेवून हे राष्ट्रमानस घडविले पाहिजे, ही हिंदुत्ववादी भूमिका आहे. फारशा तात्त्विक चर्चेत न पडता असे म्हणता येईल की राज्यघटनेतील इहवादी मूल्ये मुस्लीम नेत्यांना मान्यच नव्हती व ते त्यांनी लपवूनही ठेवले नव्हते. त्यामुळे हिंदू समाजाचे मानस कसे घडते यावर या राज्यघटनेचे यश अवलंबून होते. कोणताही समाज सांस्कृतिक पोकळीत जगत नाही. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हिंदू समाजाची मानसिकता ही हिंदू सांस्कृतिक संचितामुळे निर्माण झाली आहे व काळानुसार त्यात परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर त्या आधारावरच घडविता येईल अशी संघाची भूमिका आहे. त्यामुळे वर वर्णन केलेली जी लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, मानवताधिष्ठित समता व नैतिकता व मूलभूत मानवी हक्क व बहुमतावर आधारित कायद्याचे राज्य या चतु:सूत्रीबद्दल मतभेद नाहीत, तर ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात कशी आणायची याबाबत आहेत. यासाठी प्रत्यक्ष व्यवहारात, ही मूल्ये जो समाज मानतो तो अधिक कसा शक्तिशाली बनेल व ज्या समाजाचा या मूल्यांना विरोध आहे त्यांच्यात परिवर्तन कसे होईल, याचा विचार शहाणा माणूस करेल. पण स्वातंत्र्यानंतर सेक्युलॅरिझमच्या नावाखाली उलटा प्रवास सुरू झाला. हिंदू समाज कसा दुबळा होईल व मुस्लीम समाज कसा अधिकाधिक संघटित होईल, अशी धोरणे आखली गेली. प्रचलित शब्दात सांगायचे तर ‘हिंदुत्व’ हे झालेले त्याचे स्वाभाविक र्लेीीीश लेीीशलींळेप आहे. याला बहुसंख्याकांची हुकूमशाही म्हणण्याइतका हास्यास्पद युक्तिवाद दुसरा असूच शकत नाही. समाजात सहअस्तित्वाची भावना असली पाहिजे, हिंसेच्या द्वारे किंवा प्रलोभनाने धर्मांतर करता कामा नये, आधुनिक इहवादी विचारांवर समाजधारणा झाली पाहिजे, धर्मांधतेला विरोध केला पाहिजे असा बहुसंख्याक समाजाने आग्रह धरला, तर ती त्यांची हुकूमशाही कशी ठरते?
 
 
rss
 
जर ‘हिंदुत्व’ विचार व त्या आधारे झालेली चळवळ हे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर आधुनिक राष्ट्रवादाच्या वाटचालीचे र्लेीीीश लेीीशलींळेप असेल, तर हिंदू राष्ट्राचा विचार त्याच्या परिघापलीकडचा विचार आहे. देकार्तने आधिभौतिक जगाचे व भौतिक जगाचे नियम वेगळे आहेत असे सांगून मूल्य संकल्पनांचे द्वैत तयार केले. आजचे समाजमानस आणि बौद्धिक जग या द्वैतात घुसमटले आहे. उपनिषदे, गीता आदी हिंदूंचे समजले जाणारे धर्मग्रंथ हे एखाद्या विशिष्ट धर्म, संप्रदाय, आचरण पद्धत किंवा देवदेवता यांचा पुरस्कार करणारे नाहीत, तर मानवी मनाची कोडी उलगडणारे व वैश्विक शक्तीची अनुभूती देणारे तत्त्वज्ञान ते सांगतात. ज्याप्रमाणे विज्ञान हे भौतिक क्षेत्रातले प्रयोगसिद्ध सिद्धान्त मानते, तसेच हिंदूंच्या आधिभौतिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील सूत्रे ही प्रयोगसिद्ध व कोणाही व्यक्तीला अनुभवता येणारी आहेत. जगभर योगाचा जो प्रसार झाला, तो याला साक्षी आहे. हा प्रसार कोणी सैन्यबळावर किंवा पैशाची लालूच दाखवून केला नाही, तर ज्या प्रत्येक व्यक्तीला त्याची अनुभूती आली, तो त्याचा स्वयंप्रेरणेने प्रचारक बनला. हजारो वर्षांच्या कालखंडात मूलभूत मूल्यांची चौकट कायम ठेवून हिंदू संस्कृतीमध्ये जे कालानुरूप परिवर्तन घडले, त्याचे कारण भारताच्या सांस्कृतिक संचिताच्या समृद्धीत आहे. या सांस्कृतिक संचिताच्या आधारे भौतिक व आधिभौतिक या दोन्ही क्षेत्रांत सुसंवाद निर्माण करून मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करता येईल हे उदाहरण जगापुढे ठेवणे ही हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे. विद्यमान विचारांची व व्यवस्थेची चौकट मोडण्यासाठी संघर्ष करून ‘हिंदुत्व’ विचारांच्या आधारे र्लेीीीश लेीीशलींळेप करावे लागले. हिंदू राष्ट्र ही संघर्ष करून लादायची गोष्ट नसून विकसित करण्याची गोष्ट आहे. एखादा समाज आपल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे भौतिक व आधिभौतिक अशा दोन्ही क्षेत्रांत प्रगती करू शकतो व समृद्ध बनू शकतो असे उदाहरण समोर असेल, तर जग तसे स्वाभाविकच आचरण करेल. ‘हिंदुत्व’ ही हिंदू समाजरक्षणाची संकल्पना आहे, तर हे रक्षण का करायचे हे सांगणारी ‘हिंदू राष्ट्र’ ही संकल्पना आहे. हिंदू संस्कृती उदार व सर्वसमावेशक आहे, पण ‘हिंदुत्व’ ही संकुचित संकल्पना आहे असा आरोप करणार्‍या मंडळींनी तर शाळा-महाविद्यालयांतून हिंदू संस्कृतीचे शिक्षण देण्यास पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे उदारमतवादी असलेल्या हिंदू संस्कृतीचा लोकांना परिचयच झाला नाही, तर त्या संस्कृतीतील उदारमतवाद लोकांना कळेल कसा? खरी गोष्ट अशी आहे की ‘हिंदुत्वा’ची संकल्पना भारतातील इहवादी मूल्यांचे संरक्षण करेल, तर ‘हिंदू राष्ट्रा’ची संकल्पना त्यात नवा अर्थ भरून ती अधिक स्थायी व अर्थपूर्ण बनवेल. आज जगभरात हिंदूंनी आपल्या कर्तृत्वाने आपला ठसा उमटविला आहे. परंतु आपण ज्या सांस्कृतिक संचितातून घडलो, त्याची त्यांना कल्पना नसते. त्याने धार्मिक कर्मकांडे केलेली असतात, पाहिलेली असतात, पण त्यामागच्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा त्याला पत्ता नसतो. त्यांना हा वारसा समजेल हे कसे घडवून आणायचे, ही त्याची व्यावहारिक बाजू आहे. या दोन्हींवर आज विचारमंथनाची गरज आहे.
 

दिलीप करंबेळकर

दिलीप दामोदर करंबेळकर

मूळ गाव : पट्टणकुडी

शिक्षण    : बीएस्सी, एम.बी.ए.

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कोल्हापूर व गोव (1976-1980) कालावधीत होते.

मराठी साप्ताकिक विवेक, दैनिक मुंबई तरुण भारत,शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प यांचे प्रबंध संपादक आहेत, तसेच त्रैमासिक ज्येष्ठपर्व, वैद्यराजचे ते सल्लागार आहेत.

विवेक व्यासपीठ व सेवाभावी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त.

सामाजिक अभ्यास आणि समाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण यासाठी कार्यरत असणाऱ्या स्पार्क या संस्थेचे संचालक

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संचालक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष.

श्रीरामजन्मभूमी  लढयाचा अन्वयार्थ विकृत मानसिकतेचा पंचनामा व भारत - पाकिस्तान: एक सांस्कृतिक युध्द ही पुस्तके प्रकाशित.