विषारी वातावरणावर उपाय

लेखांक - 2

विवेक मराठी    12-Nov-2022   
Total Views |
 आपण लोकशाही व्यवस्थेत जगत आहोत. लोकशाहीचे राजकारण करीत आहोत. या लोकशाही राजकारणाचे काही मूलभूत सिद्धान्त आहेत. त्यातील पहिला सिद्धान्त असा की, राष्ट्रीय लक्ष्याबाबत सर्व राजकीय पक्षांची सहमती हवी. अभिव्यक्तीत एकवाक्यता असावी. राजकीय लोकशाहीचा पुढचा मूलभूत सिद्धान्त म्हणजे राजकीय पक्षांनी परस्परांशी शत्रुत्वाच्या भावनेने वागू नये. प्रतिस्पर्धी आपला विरोधक आहे, शत्रू नव्हे.
 
vivek
 
या लेखाची सुरुवात जगप्रसिद्ध इतिहास लेखक अरनॉल्ड टॉयनबी यांच्या एका अवतरणाने करू या. अनेक वाचकांच्या वाचनात मूळ इंग्लिश अवतरण आले असेल. त्याचा भावानुवाद येथे देत आहे - ‘ज्या अध्यायाची सुरुवात पश्चिमी जगाकडून झाली, त्याचा शेवट भारताकडून होणार आहे, ही गोष्ट आता सुस्पष्ट होत चालली आहे. हा शेवट मानवजातीच्या आत्मनाशात होणार नाही. मानवी इतिहासातील धोकादायक कालखंडातून आपण जात आहोत. भारतीय मार्ग हाच मानवजातीला वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे. सम्राट अशोक आणि महात्मा गांधी यांची अहिंसा आणि श्रीरामकृष्णांचा धर्मसमन्वयाचा मार्ग महत्त्वाचा आहे. या अणुयुगात मानवजात एक परिवार आहे, ही भावना आणि वृत्ती या थोर पुरुषांच्या शिकवणीतून प्राप्त होते. आत्मविनाशापासून वाचण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.’
 

त्याची संकल्पना काय?
सवलत मूल्य – रु. 225/-

https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 
 
 
मागील लेखात महाराष्ट्राच्या विषारी राजकीय वातावरणाविषयी लिहिले आहे. त्या वातावरणाचा आणि अरनॉल्ड टॉयनबी यांच्या वक्तव्याचा परस्पर संबंध आहे का? हा संबंध खूप मोठा आहे. अरनॉल्ड टॉयनबी हे हिंदू नव्हते. त्यामुळे ते हिंदुत्ववादी असण्याचा प्रश्न येत नाही. ते थोर इतिहासकार होते. इतिहासकार इतिहासाचे विश्लेषण करतो आणि आपले मत मांडतो, तसे मत त्यांनी मांडले आहे. हे मत अतिशय महत्त्वाचे आहे. भारताच्या नियतीची जाणीव करून देणारे आहे. आपला जन्म क्षुद्र राजकारण करण्यासाठी, विषारी वातावरण निर्माण करण्यासाठी झालेला नाही, हे सदैव लक्षात ठेवावे लागते. भारताला आपली नियती राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, अशा विविध माध्यमांतून व्यक्त करायची आहे. यासाठी सत्तेचे राजकारण जे करतात, अशा सर्व मंडळींनी अनेक गोेष्टी व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजेत.
 
 
 
आपण लोकशाही व्यवस्थेत जगत आहोत. लोकशाहीचे राजकारण करीत आहोत. या लोकशाही राजकारणाचे काही मूलभूत सिद्धान्त आहेत. त्यातील पहिला सिद्धान्त असा की, राष्ट्रीय लक्ष्याबाबत सर्व राजकीय पक्षांची सहमती हवी. अभिव्यक्तीत एकवाक्यता असावी. राजकीय पक्षांच्या विचारधारा आणि कार्यक्रम वेगवेगळे राहतात. लोकशाहीचा तो दुसरा मूलभूत आधार आहे. एकाच विचारधारेची आणि एकाच पक्षाची राजसत्ता म्हणजे एकपक्षीय लोकशाही, लोकशाहीच्या संकल्पनेत बसत नाही. म्हणून राजकीय पक्ष परस्परांचे स्पर्धक असावे लागतात. जनकल्याणाचे विविध कार्यक्रम लोकांपुढे ठेवणे हे त्यांचे काम आहे.
 
  
राजकीय लोकशाहीचा पुढचा मूलभूत सिद्धान्त म्हणजे राजकीय पक्षांनी परस्परांशी शत्रुत्वाच्या भावनेने वागू नये. प्रतिस्पर्धी आपला विरोधक आहे, शत्रू नव्हे. विरोधकाचे विचार खोडून काढणे हा राजकीय पक्षांचा कार्यक्रम असू शकतो. विरोधकांना साप, विंचू, डुक्कर, गाढव, पन्नास खोकेवाले, विश्वासघातकी, बायकोला साडी घेण्याची ऐपत नाही.. वगैरे वगैरे म्हणणेे ही लोकशाहीची भाषा नव्हे. तुम्ही ज्या मार्गाने निघाला आहात, तो मार्ग तुम्हाला रसातळाला घेऊन जाईल हे त्यांना आणि जनतेलाही सांगावे लागते. म्हणून लोकशाहीत कुठल्याही राजनेत्यावर त्याच्या परिवारावर, त्याच्या मुला-नातवंडांवर असभ्य भाषेत टीका करू नये. या बाबतीत सर्व राजकीय पक्षांची सहमती असणे फार आवश्यक आहे.
 
 
 
लोकशाहीतील राजकारण सत्ताप्राप्तीसाठी चालू असते. सत्ताप्राप्तीचे लोकशाहीतील दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा असते. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पंतप्रधान मीच होणार या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन अनेक जण राजकारण करतात. दुसरा प्रकार मला पक्षाला मोठे करायचे आहे, माझ्या पक्षाची आणि पक्षाच्या विचारधारेची सत्ता आणायची आहे, यासाठी सत्तेचे राजकारण केले जाते. जे सत्तेसाठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेचे राजकारण करतात, ते कोणत्याही विचाराशी कधीही प्रामाणिक राहत नाहीत. सोयीप्रमाणे ते वैचारिक भूमिका घेतात. काल आपण ज्याच्याशी शत्रुत्व केले, त्यांच्याशी मैत्रीदेखील करतात. त्याला वैचारिक अनीती असे म्हटले जाते. चांगल्या लोकशाहीचे हे लक्षण नाही. मी माझ्या विचाराने आणि माझ्या कार्यक्रमाच्या आधारे जनतेचे समर्थन मिळवीन आणि सत्ता हस्तगत करीन, हा पुरुषार्थाचा मार्ग आहे.
 
  
 
विचाराच्या आधारे जे पक्ष चालतात, ते पक्ष आपला विचार जनतेसमोर सतत मांडत राहतात. विचारांशी तडजोड करीत नाहीत. ते पक्ष संघटन बांधतात. कार्यकर्त्यांची फळी उभी करतात. सत्तेत आल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, हे कार्यकर्त्यांना समजावून सांगतात. असे पक्ष भारतात संख्येने कमी आहेत. भविष्यकाळात त्यांची वाढ झाली पाहिजे. आपला देश एकाच राजकीय विचारधारेवर कधी चालणार नाही. अरनॉल्ड टॉयनबी यांनी भारताचे जे लक्ष्य समोर ठेवले आहे, ते आम्ही कोणत्या राजकीय विचार आणि कार्यक्रमाद्वारे पूर्ण करणार आहोत, हे सांगणारे अखिल भारतीय आणखी चार-पाच पक्ष उभे राहिले पाहिजेत.
 
 
 
महाराष्ट्राचे राजकीय वातावरण विषारी बनण्याचे कारण आहे, समजून घ्यायला पाहिजे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, विचारांशी तडजोड, असंगाशी संग, जनहितापेक्षा धन गोळा करण्यावर भर, एकमेकांच्या भानगडी रोज बाहेर काढण्याचा हव्यास, जीभ सैल सोडून वाट्टेल ते बोलत राहणे, ब्राह्मणद्वेष निर्माण करणे, मुस्लीम आणि दलित बांधवांवर अविश्वास निर्माण करीत राहणे, परप्रातीयांचा द्वेष, स्त्रीवर्गाविषयी कुत्सित बोलणे हे गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रमाणाबाहेर वाढलेले आहे. कोणता राजकीय नेता काय बोलला हे सांगता येईल, पण आपल्याला अशा व्यक्तिगत पातळीवर जायचे नाही. हा चांगला तो वाईट अशी वर्गवारीही करायची नाही. स्नानगृहात सर्व वस्त्रहीन झाले आहेत, म्हणून एकाने दुसर्‍याला हसण्याचे काही कारण नाही.
 
 
vivek
 
अरनॉल्ड टॉयनबी 
 
महाराष्ट्रातील राजकारणाचे जे विषारी वातावरण चालू आहे, ते लवकरात लवकर समाप्त झाले पाहिजे. निकोप राजकीय स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेले आपण, मुळात कोण आहोत, याची ‘स्व-ओळख’ प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या मार्गांनी जाणारे आपण लोक आहोत, अनादी काळापासूनची ही आपली सवय आहे. वेगवेगळ्या मतांचा समन्वय साधणे हा आपला स्वभाव आहे. सर्वांच्या मतांचा आदर करण्याचा, उपासना स्वातंत्र्य देण्याचा आणि एकमेकांशी सहकार्य करत शांततामय जीवन जगण्याचा मार्ग आहे. अरनॉल्ड टॉयनबी यांनी सम्राट अशोकांचा उल्लेख केला आहे. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. युद्ध करणे सोडून दिले. धर्मप्रचारासाठी आपले आयुष्य खर्च केले. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रज्ञा, शील, करुणा या मार्गाचे अनुसरण केले. भगवंतांनी माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, शांती आणि सुख कसे प्राप्त केले पाहिजे, हे अनेक प्रवचनांतून सांगितले. त्यांना पाली भाषेत सुत्त असे म्हणतात. ‘करणीयमेत्त सुत्त’ हे अतिशय सुंदर सुत्त आहे. लक्षपूर्वक ऐकले आणि वाचले असता मन शांत झाल्याशिवाय राहत नाही. या सुत्ताचा मराठी अनुवाद असा -
 
 
 
शांतिपदाची प्राप्ती इच्छिणार्‍या कल्याणसाधन निपुण मनुष्याने ही इच्छा करावी की त्याने योग्य, सरळ व अत्यंत सभ्य बनावे, त्याची वाणी मधुर असावी व तो कोमल आणि निराभिमानी असावा. तो संतुष्ट असावा, प्रामाणिक उपायांनी जीवन जगणारा असावा, तो उचापती करणारा नसावा व तो समाधानी, सात-इंद्रिय, प्रज्ञावान, गंभीर व कुटुंबात अनासक्त असावा. त्याच्या हातून क्षुल्लकांत क्षुल्लकदेखील असे कृत्य न घडो, ज्याकरिता सुज्ञ लोक त्याला दोष लावतील. सर्व प्राणी सुखी, क्षमावान, आनंदी राहोत ही भावना त्याने नेहमी बाळगावी. भूचर अथवा जलचर, छोटे अथवा मोठे, मध्यम अथवा लहान, सूक्ष्म अथवा स्थूल, दृश्य अथवा अदृश्य, दूरस्थ अथवा जवळ, उत्पन्न झालेले अथवा उत्पन्न होणारे असे सर्व प्राणी सुखाने राहोत. कोणीही दुसर्‍याला फसवू नये, कोणीही दुसर्‍याचा अपमान करू नये, शत्रुत्वाच्या अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही अशी इच्छा न बाळगो ज्याने इतर दु:खी होतील. आपल्या प्राणाची पर्वा न करता, जसे आई आपल्या एकुलत्या एक मुलाचे रक्षण करते, त्याचप्रमाणे शांतिपदाची इच्छा करणार्‍या माणसाने प्राणिमात्रांबद्दल निस्सीम प्रेमभाव वाढवावा. वर, खाली आणि मध्ये राहणार्‍या सर्व लोकांनी प्राणिमात्रांबद्दल वैररहित व शत्रुत्वरहित मैत्री भावना बाळगावी. उभे असता, चालले असता, बसले असता, झोपले असता, जोपर्यंत जागे आहोत तोपर्यंत ही मैत्री भावना कायम ठेवावी, यालाच ‘ब्रह्मविहार’ असे म्हणतात. असा शीलवान व सम्यक दृष्टिसंपन्न मनुष्य कोणत्याही मोहजाळ्यात न पडता, काम, तृष्णेचा नाश करून, दु:खातून मुक्त होतो,
 
 
 
भगवंतांचे हे सुत्त समग्र जीवनासाठी आहे. राजकारण हा समग्र जीवनातील एक भाग आहे. राजकारणात स्पर्धा, पदाची लालसा, संपत्तीची लालसा, मानसन्मानाची लालसा असतेच. या लालसा जेव्हा हाताबाहेर जातात, तेव्हा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण होते. ‘करणीयमेत्त सुत्त’ यातील विचार हे त्यावरील उत्तम उपाय आहेत. हे उपाय वाचायला आणि ऐकायला अतिशय सोपे आणि गोड आहेत. भगवंतांनी त्याचे आचरण केले. असे आचरण करणारे पाच राजकीय नेते भारतात उभे राहिले, तर महाराष्ट्राचेच काय, भारताचे राजकीय वातावरण बदलून जाईल.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.