चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू।

विवेक मराठी    18-Nov-2022   
Total Views |
@विद्याधर मा. ताठे 9881909775
  
आषाढी वारीला हरिनामाचा गजर करीत महाराष्ट्रातील विविध गावांतून पायी पंढरपूरला जातात, तशाच आळंदीच्या कार्तिक वारीसाठी - म्हणजे संत ज्ञानदेवांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेकडो वारकरी दिंड्या आळंदीला पायी येतात. ही वारकर्‍यांची भक्ती उपासना आहे, वारकर्‍यांचे व्रत आहे. वारकर्‍यांच्या आनंदाचा वार्षिक उत्सव आहे. ‘चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥’ अशी ओढ वारकरी मनाला दिवाळीनंतरच लागलेली असते.
 
sanjivan samadhi sohala alandi
 
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र।
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र।
तया आठविता महापुण्य राशी।
नमस्कार माझा ज्ञानदेवांसी ॥
 
 
 
पंढरीच्या विठ्ठलभक्तांच्या - म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भावविश्वामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र पंढरीएवढेच विविध संतमंडळींच्या स्थानांचे-गावांचे एक विशेष श्रद्धाभावाचे अढळ स्थान आहे. संत ज्ञानदेवांची ‘आळंदी’, जगद्गुरू श्री तुकोबांचे ‘देहू’, श्रीगुरू निवृत्तीनाथांचे ‘त्र्यंबकेश्वर’, संत नामदेवांचे ‘नरसी’, संत कान्होपात्रा-संत दामाजींचे ‘मंगळवेढा’, संत एकनाथांचे ‘पैठण’, संत मुक्ताईचे ‘मेहुण’, संत सावतामाळीचे ‘अरण’, संत गोरोबा कुंभारांचे ‘तेर’, संत जनाबाईंचे ‘गंगाखेड’. या संतक्षेत्रांची वारी करणे हा वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माचाच एक अविभाज्य भाग आहे. पण या सर्व संतस्थानांमध्ये ज्ञानदेवांच्या इंद्रायणीकाठी वसलेल्या व मूळ सिद्धेश्वरांचे सिद्धपीठ असलेल्या आळंदीचे माहात्म्य विशेष आहे. अठरापगड जातींतील सकल संतांच्या मंगल उपस्थितीत (इ.स. 1296) संत ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली होती, त्यामुळे सकल संतांच्या आणि वारकरी बांधवांच्या भावविश्वात ‘आळंदी क्षेत्राला’ वेगळेच हृद्य, भावरम्य स्थान आहे. वारकरी भाविक दर महिन्याच्या शुक्ल एकादशीला पंढरीची न चुकता वारी करतात, तसेच दर महिन्यातील वद्य पक्षातील एकादशीला आळंदीची वारी करतात. पंढरीच्या मासिक वारीप्रमाणे आळंदीची मासिक वारी करणारे हजारो वारकरी आहेत. हा वारकर्‍यांच्या नित्य आचारधर्माचाच भाग आहे. अन्य संतांच्या क्षेत्राला वारकरी बांधव त्या त्या संतांच्या पुण्यतिथीला भेट देतात. हा वारकर्‍यांच्या प्रासंगिक नित्यनेमाचा भाग आहे.
 
 
 
पंढरीच्या आषाढी, कार्तिक वारीप्रमाणेच संत तुकोबांच्या पुण्यतिथीनिमित देहूची फाल्गुन वद्य द्वितीयेची वारी लाखो वारकरी न चुकता करतात. तसेच फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथांच्या पुण्यतिथीनिमित्त पैठणची वारीही करतात. संत नामदेवांची पुण्यतिथी आषाढ वद्य पक्षात पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातच साजरी होते. याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा पाया घालणार्‍या संतशिरोमणी संत ज्ञानदेवांची पुण्यतिथी श्रीक्षेत्र आळंदी येथे कार्तिक वद्य त्रयोदशीला भजन, प्रवचन, कीर्तन, दिंडी, नगर प्रदक्षिणा या सांप्रदायिक, धार्मिक विधीद्वारे मोठ्या भक्तिभावाने दर वर्षी साजरी होते. त्यानिमित आळंदीला वारकरी वैष्णववीरांचा अलोट मेळाच भरतो. सुमारे तीन-चार लाख भाविक या वारीसाठी आळंदीत जमतात.
 
 
पुण्यतिथीनिमित्त ‘हरिनाम सप्ताह’
 
 
कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्या असा सात दिवसांचा ‘हरिनाम सप्ताह’ आळंदीच्या श्री ज्ञानदेव समाधी मंदिरात साजरा होतो. या समाधी मंदिरालाच ‘देऊळ वाडा’ म्हणतात. या हरिनाम सप्ताहामध्ये विविध वारकरी फडांचे प्रतिनिधी, मानकरी, सेवेकरी यांचे भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. अष्टमीच्या दिवशी सकाळी ज्ञानदेव समाधी मंदिराच्या महाद्वारातील पायरीवरील थोर ज्ञानदेवभक्त ह.भ.प. हैबतबाबा अरफळकर यांच्या पादुकांची पूजा व तेथेच कीर्तन सोहळा होऊन ‘ज्ञानदेव समाधी सोहळ्या’च्या हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ होतो. पुढे 7 दिवस समाधी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागर अशा विविध वारकरी फडांच्या सेवा होतात. कार्तिक त्रयोदशी हा संत ज्ञानदेवांचा समाधी दिन, पुण्यतिथीचा दिवस. त्या दिवशी समाधीची पूजा व भक्तांद्वारे अभिषेक होतात. संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराज यांच्याकडे या मुख्य दिवशीची परंपरागत मानाची कीर्तनसेवा असते. आळंदीच्या इंद्रायणीच्या काठावर विविध वारकरी फडांमध्ये, मठांमध्ये संत नामदेव विरचित ‘ज्ञानदेव समाधी सोहळ्यावरील अभंगाचे’ गायन होते आणि ज्ञानदेव समाधी सोहळा हरिनाम सप्ताहाची सांगता करून सारे वारकरी देहूस तुकोबांच्या दर्शनास जातात, अशी प्रथा आहे.
 
 
 
पंढरीच्या आषाढी वारीला जशा वारकरी दिंड्या, विविध संतांच्या पालख्या भजन करीत, हरिनामाचा गजर करीत महाराष्ट्रातील विविध गावांतून पायी पंढरपूरला जातात, तशाच आळंदीच्या कार्तिक वारीसाठी - म्हणजे संत ज्ञानदेवांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेकडो वारकरी दिंड्या आळंदीला पायी येतात. ही वारकर्‍यांची भक्ती उपासना आहे, वारकर्‍यांचे व्रत आहे. वारकर्‍यांच्या आनंदाचा वार्षिक उत्सव आहे. ‘चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥’ अशी संत ज्ञानदेवभेटीची ओढ वारकरी मनाला दसरा-दिवाळीनंतरच लागलेली असते. कार्तिक शुक्ल पक्षातील प्रबोधिनी, देवोत्थान एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूरची कार्तिक वारी होते. वारकरी दिंड्या पौर्णिमेला गोपाळकाल्याचा कीर्तन सोहळा पार पाडून पंढरीचा निरोप घेतात आणि आळंदीच्या दिशेने पायी वाटचाल सुरू करतात. केवळ 7 ते 8 दिवसांत पंढरपूर ते आळंदी सुमारे 250 कि.मी. अंतर पायी भजन करीत पूर्ण करतात आणि कार्तिक वद्य सप्तमीला आळंदीत पोहोचतात.
 
 
sanjivan samadhi sohala alandi
 
कार्तिक महिन्यातील दोन एकादशांपैकी पहिल्या शुक्ल एकादशीला ‘पंढरीची वारी’ (कार्तिक महायात्रा), तर दुसर्‍या वद्य एकादशीला आळंदीची वारी (यात्रा) असते. त्यामुळे कार्तिक महिना वारकरी समाजात विशेष महत्त्वाचा मानला जातो. पण या एकाच महिन्यात होणार्‍या दोन वारी (यात्रा)मध्ये खूप फरक आहे आणि तो भावगम्य आहे. पंढरीच्या आषाढी वारीला विठ्ठलाचे भक्त-संत आळंदीहून पंढरपूरला जातात, तर आळंदीच्या वारीला थेट भगवान विठ्ठल पंढरपूर आळंदीस येतो अशी वारकर्‍यांची श्रद्धा, धारणा आहे. लाडक्या भक्ताच्या (ज्ञानदेवांच्या) पुण्यतिथी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाची मूर्ती पालखीतून हरिनामाचा गजर करीत आळंदीला येते. थोडक्यात, पंढरीची वारी ही ‘देवाची वारी’ म्हणतात, तर आळंदीची वारी ‘भक्तांची-संतांची वारी’ म्हणून ओळखली जाते.
 
 
विविध संतांचे ‘आळंदी माहात्म्य’ कथन
 
 
संत ज्ञानदेव-नामदेवांच्या संत मांदियाळीमध्ये अठरापगड जातींचे संत होते. त्या प्रत्येक संताने व उत्तरकालीन संत एकनाथ (1533-99), संत तुकाराम (1608-1650) यांनी आळंदीचा व ज्ञानदेवांचा अपार महिमा गायलेला आहे. संत मांदियाळीतील संत सेनामहाराज एकाच अभंगात ‘ज्ञानदेव’ व ‘आळंदी क्षेत्र’ दोन्हीचा गौरव करताना म्हणतात,
 
 
1) विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर ॥1॥
चला जाऊ अलंकापुरा। संतजनांच्या माहेरा ॥
 
- संत सेना.
 
 
2) नामा म्हणे देवराव। महिमा सांगतसे भाव।
धन्य अलंकापुरी गाव। आदि ठाव वरिष्ट।
हे शिवपीठ शिवाचे। हेचि पूर्वस्थान अगस्तीचे॥
 
- संत नामदेव.
 
 
असा आळंदीचा महिमा संतश्रेष्ठ नामदेवमहाराज यांनी गायलेला आहे. आळंदी हे अगस्ती ऋषींची तपोभूमी आहे. ते प्राचीन शिवपीठ आहे. आजही ज्ञानेश्वर समाधीशेजारीच सिद्धेश्वराचे प्राचीन देऊळ आहे. संतसाहित्यात आळंदीचे नाव ‘अलंकापुरी’ असेे आहे. हा सारा क्षेत्रमहिमा संत नामदेवांनी एका अभंगात वर्णिलेला आहे. तो असा -
 
 
3) क्षेत्र महिमा अति अद्भूत। आदि सिद्धेश्वर कुलदैवत।
तो हा सिद्धेश्वर अगाध। महायोगेश्वर निजबोध।
अलंकापुरी पाटणी॥
- संत नामदेव
 
 
 
संत ज्ञानेश्वर-नामदेव उत्तरकालीन संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनीही ज्ञानदेवांची व आळंदीची थोरवी गायलेली आहे, हे विशेष आहे.
 
 
4) जोडोनिया दोनी हात। जगी जाणवितो मात।
एकदा जा रे अलंकापुरा। ...
- संत एकनाथ
 
 
 
sanjivan samadhi sohala alandi
 
संत एकनाथ दोन्ही हात जोडून भाविकांना विनंती करतात की एकदा तरी आळंदीला जा. कारण त्यांना खात्री आहे की मग पुढे तुम्ही वारंवार आपोआप जात राहाल. कारण आळंदीला भावरूप ज्ञानदेव आहेत. तो ‘साधकांचा मायबाप’ आहे. आळंदीचे ज्ञानदेव समाधीस्थान हा चैतन्याचा गाभारा आहे. अद्वयानंद वैभवाचे अमृतस्थान आहे. संत एकनाथांप्रमाणेच संत तुकारामही आळंदीला भेट देण्याची विनवणी करतात. ती अशी -
 
 
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू।
होतील संतांचिया भेटी। सांगो सुखाचिया गोष्टी॥
 
 
संत तुकोबांचे शिष्य संत निळोबा तर श्रीक्षेत्र पंढरपूरहून आळंदीचा महिमा मोठा आहे असे सांगतात. देवापेक्षा भक्त श्रेष्ठ, देवभूमीपेक्षा संतभूमी श्रेष्ठ अशा भावावस्थेतून प्रकटलेला संत निळोबाराय यांचा अभंग पाहा -
 
 
यात्रे (वारी) अलंकापुरा येती। ते ते आवडती विठ्ठला॥
पांडुरंगे प्रसन्नपणे। केले देणे हे ज्ञाना॥
भूवैकुंठे पंढरपूर। त्याहुनि थोर महिमा या॥
निळा म्हणे जाणोनी संत। येती धावत प्रतिवर्षी॥
 
 
आळंदी वारीचे भावात्मक वैशिष्ट्य
 
 
संत ज्ञानदेवांच्या पुण्यतिथी दिनी आळंदी येथे भरणार्‍या ‘वारी’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य - वेगळेपण म्हणजे आळंदीची ह.भ.प. हैबतबाबा अरफळकर यांची दिंडी आजही अश्विन वद्य नवमी दिनी पंढरपुरात जाऊन ज्ञानदेव पुण्यतिथी सोहळ्यास यावे म्हणून विठ्ठल देवतेला निमंत्रण देते. यातील विशेष श्रद्धेचा भाग म्हणजे ही दिंडी विठ्ठल मंदिरात थेट न जाता संत प्रल्हादमहाराज बडवे यांच्या वाड्यात जाते व तेथे विठ्ठलाला निमंत्रण देऊन मग प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरातील विग्रहापुढे निमंत्रण दिले जाते आणि या निमंत्रणाचा मान राखून दर वर्षी भगवान विठ्ठल भावरूपाने आळंदीला जातात. अलीकडे काही वर्षे झाली, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीद्वारे एका भव्य विठ्ठलमूर्तीची पालखीच पंढरपूरहून आळंदीला जाते.
 
 
 
एवढेच नव्हे, तर ज्ञानदेव समाधी सोहळ्यानंतर भगवान विठ्ठलाला भक्त विरहाचे दुःखही होते आणि आळंदी वारी झाल्यावर विठ्ठल पंढरपूरच्या मंदिरात परत न येता पंढरपूरजवळील चंद्रभागा नदीपात्रातील ‘विष्णुपद’ या ठिकाणी जाऊन पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर राहतात. या काळात सारे विठ्ठलभक्त दर्शनासाठी विष्णुपदाला जातात, अशी पंढरपुरामध्ये भावना आहे. असो. शेवटी भक्ती हे अपार श्रद्धेचे व अतूट विश्वासाचे विश्व आहे. तेथील भावविश्वाला व त्या विश्वातील श्रद्धा-परंपरांना विशेष महत्त्व आहे.
 
 
संत ज्ञानदेवांनी आपल्या इष्टकार्याची - अवतारकार्याची पूर्ती होताच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी सर्व संत मांदियाळीच्या उपस्थितीत, भजन-कीर्तन सोहळा पार पाडून संजीवन समाधी घेतली. इ.स. 1296 साली हा सोहळा झाला. आज त्यास चालू वर्षी 826 वर्षे होऊन गेली आहेत. पण वारकर्‍यांच्या मनमंदिरात, भावविश्वात संत ज्ञानदेव आजही मोठ्या श्रद्धाभावाने विराजमान आहेत. हीच ज्ञानदेवांची अनंत, अगाध थोरवी आहे. ‘संत ज्ञानदेव समाधी’ सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी संतसांगाती नामदेव यांनी अनेक अभंगातून वर्णन केलेले आहे. ते सर्व अभंग पुण्यतिथीच्या दिनी आळंदी वारीत गायले जातात. जिज्ञासूंनी संत नामदेवांच्या अभंग गाथेतील ‘ज्ञानदेव समाधी’ हे अभंग प्रकरण मुळातून वाचावे, ही विनवणी करून, त्या अभंगातील अंतिम करुणार्द्र अभंगचरणाने या अलंकापुरी पुण्यभूमी स्मरण लेखास पूर्ण विराम देतो -
 
 
नामा म्हणे आता लोपला दिनकर।
 
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.