फतव्यांमागची प्रतिगामी मानसिकता

विवेक मराठी    24-Nov-2022
Total Views |
कोणत्याही मशिदीत मुस्लीम स्त्रीला मुस्लीम पुरुषांच्या बरोबरीने नमाज पढायला आजही मज्जाव आहे. त्यांच्यासाठी वेगळी जागा असते. तिहेरी तलाक, हलाल, हिजाब यासारख्या जुलमी आणि कालबाह्य परंपरांचा त्याग करण्याऐवजी या समाजाचे कट्टर धार्मिक नेते त्याचे समर्थन करत असतात. या सगळ्यामुळे मुस्लीम समाजातील मुली वंचनेचे आणि अभावाचे जिणे जगत आहेत आणि त्याच वेळी बाईला अशीच वागणूक द्यायची असते असे संस्कार मुस्लीम मुलांवर घडत आहेत.
majjid
 
 
पुरानी दिल्ली परिसरात सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात उभारण्यात आलेली जामा मशीद एक ऐतिहासिक वास्तू आहे. भारतावरील मुघल वर्चस्वाचे ते एक प्रतीक आहेे. जगभरातून येणारे पर्यटकही या मशिदीला आवर्जून भेट देत असतात. केवळ ऐतिहासिकदृष्ट्याच तिचे महत्त्व आहे असे नाही, तर आजही विविध विषयांवर जामा मशिदीच्या इमामांचे मत मुस्लीम समाजात गांभीर्याने घेतले जाते. या मशिदीच्या व्यवस्थापनाने अलीकडेच एक फतवा (नियम) जारी करून, मशीद परिसरात मुलींना एकेकटी वा समूहाने प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. ‘जामा मस्जिद में लडकी या लडकियों का अकेले दाखला मना है ।’ अशी देवनागरी व उर्दूतील धातूची पट्टी या मशिदीच्या तीन प्रवेशद्वारांवर ठोकण्यात आलेली आहे आणि त्यावर ‘मुस्लीम समाजातील मुलींसाठी’ असा स्पष्ट उल्लेख नसल्याने हा सरसकट सर्वधर्मीय मुलींसाठी फतवा आहे असेही म्हणता येईल. हा फतवा म्हणजे मुस्लीम समाजातील धार्मिक नेत्यांच्या कट्टर प्रतिगामित्वाचे लक्षण आहे. याविरोधात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय मुस्लीम मंच या संघटनांच्या नेत्यांनी जाहीर निषेध नोंदवला असला, तरी आपल्याकडच्या मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी वा पुरोगामित्वाचे कातडे पांघरलेल्या वाचाळ विचारवंतांनी मात्र फक्त बातमी देण्याचे कर्तव्य बजावले आहे. कदाचित यावर टीका करणे हे त्यांच्या पत्रकारितेत बसत नसावे. या फतव्याला त्यांचे समर्थन आहे असे समजावे की त्यांच्या मानसिक दौर्बल्याचे प्रतीक?
काही वर्षांपूर्वी झालेल्या शबरीमला प्रकरणात डाव्या चळवळीतले फार हिरिरीने उतरले होते. जामा मशीद प्रकरणी त्या आघाडीवर अद्याप तरी सामसूम दिसते आहे. इतकेच नव्हे, तर शबरीमला निर्णयाविरोधात मुस्लीम स्त्रियाही रस्त्यावर आल्या होत्या. आता जामा मशिदीने घातलेल्या बंदीला विरोध करण्यासाठी त्या रस्त्यावर येतील का?
 
 
मुळात जामा मशीद ही खाजगी मालमत्ता नाही. ती सरकारच्या वक्फ बोर्डाखाली येते. असे असताना जामा मशिदीचे व्यवस्थापन अशा पाट्या लावू शकते का? येऊ इच्छिणार्‍यांवर असे नियम लादू शकते का? हा प्रश्न आहे. या परिसरात होणार्‍या टिकटॉक व्हिडिओजना बंदी घालायची होती, असे त्यामागचे कारण सांगितले जाते. पण त्याला रोखण्याचा हा उपाय नव्हे. त्यासाठी व्हिडिओग्राफीवर आणि फोटोग्राफीवर बंदी घालता येईल आणि त्याची कडक अंमलबजावणीही करता येईल. स्त्री कुटुंबाबरोबर आलेली चालेल, पण एकेकट्या वा फक्त स्त्रियांना यायला मज्जाव करणे हे तर पूर्णपणे अतार्किक आहे. आणि जामा मशीद परिसरात चित्रीकरणाला बंदी असेल तर हिंदी चित्रपटातील गीतांचे इथे झालेले चित्रीकरण कोणत्या मुद्द्यावर समर्थनीय ठरते? वानगीदाखल एक उदाहरण द्यायचे, तर कुर्बान या चित्रपटातील सैफ-करीनावर या परिसरात चित्रित झालेले गाणे.
 
 
 
लोकशाहीने चालणार्‍या आपल्या देशात पुरुषाइतकाच महिलेलाही प्रार्थनेचा अधिकार संविधानाने दिला आहे. तसेच, या मशिदीत येणार्‍या महिला - मग त्या अन्यधर्मीय पर्यटक असतील वा इस्लामच्या अनुयायी, त्यांच्याकडून, ‘मशिदीत प्रवेश करताना डोके झाकून घ्यावे’ या नियमाचे उल्लंघन कधीच झाल्याचे ऐकिवात नाही वा त्याविरोधात कोणी कधी नाराजीही व्यक्त केलेली नाही. अशा सूचनांचे पालन करणे म्हणजे एक प्रकारचा आदरभाव व्यक्त करणे असते. ते कोणत्याही धर्म/पंथाबाबत दिसून येते. अगदी शिखांच्या गुरुद्वारात जाताना कोणत्याही धर्माची व्यक्ती जेव्हा डोके झाकूनच जाते, तेव्हा त्यामागेही हीच आदराची भावना असते.
तेव्हा असे काही वादग्रस्त नियम करण्याऐवजी मुस्लीम मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलांच्या बरोबरीने शालेय व उच्च शिक्षणाचीही संधी देणे याकडे मुस्लीम समाजात ज्यांच्या शब्दाला मान आहे त्यांनी लक्ष द्यायला हवे. मात्र त्याऐवजी, व्यभिचारांच्या आरोपांनी बदनाम झालेल्या मदरशांमध्ये या मुस्लीम मुलींना शिकायला पाठवले जाते आणि मशिदीसारख्या धार्मिक स्थळी येण्यापासून फुटकळ कारण पुढे करत रोखले जाते.
 
 
 
कोणत्याही मशिदीत मुस्लीम स्त्रीला मुस्लीम पुरुषांच्या बरोबरीने नमाज पढायला आजही मज्जाव आहे. त्यांच्यासाठी वेगळी जागा असते. तिहेरी तलाक, हलाल, हिजाब यासारख्या जुलमी आणि कालबाह्य परंपरांचा त्याग करण्याऐवजी या समाजाचे कट्टर धार्मिक नेते त्याचे समर्थन करत असतात. या सगळ्यामुळे मुस्लीम समाजातील मुली वंचनेचे आणि अभावाचे जिणे जगत आहेत आणि त्याच वेळी बाईला अशीच वागणूक द्यायची असते असे संस्कार मुस्लीम मुलांवर घडत आहेत.
 
 
 
शबरीमला प्रकरणावरून रण माजवणार्‍या आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करणार्‍या प्रसारमाध्यमांनी आणि बुद्धी गहाण टाकलेल्या तथाकथित पुरोगामींनी जामा मशीद प्रकरणीही जनजागृतीसाठी पुढे यायला हवे. तसे झाले, तर या सर्वांना स्त्री सन्मानाची किती चाड आहे हे सिद्ध होईल. शबरीमलाला जावे की नाही हे बाईच्या मर्जीवर अवलंबून आहे असे मानणारे आणि तसे ठणकावून सांगणारे हे माध्यमकर्मी, बाईने मशिदीत जावे का आणि जायचे असल्यास एकटीने की कोणाबरोबर हे ठरवण्याची मोकळीक बाईला आहे, असे संबंधितांना ठणकावून सांगण्याची हिंमत करणार नाहीत. निर्भीडपणे मत मांडण्याचे यांचे धाडसही सापेक्ष असते, ते असे!