समाजातील अपप्रवृत्तीवर ‘आघात’

विवेक मराठी    26-Nov-2022   
Total Views |
 
vikram
 
डॉ.खुराणा - एक प्रथितयश, अनुभवी सर्जन...‘अहंगंडानं ’ पछाडलेला... आपलं निदान कधी चुकूच शकत नाही यावर प्रचंड विश्वास, खरं तर फाजील विश्वास असलेला... पेशंटच्या जिवाशी- मनाशी आपण निष्ठुरपणे खेळतो आहोत याचं भानच गमावलेला...‘मी म्हणेन ती पूर्व’च्या नादात, याच भावनेतून मार्गदर्शनाखाली शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशीही वर्तन करणारा डॉ. खुराणा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात बोकाळत चाललेल्या बेदरकार, बेपर्वा वृत्तीचं जितंजागतं प्रातिनिधिक उदाहरण...
 
 
त्याच्या या वृत्तीला वेसण घालणारी, कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता त्याच्याशी लढायला तयारी झालेली, त्यासाठी आपल्या उज्ज्वल भविष्याची शक्यता आपल्या हाताने मिटवून टाकायला तयार झालेली डॉ. स्मिता देशमुख... या दोघांमधला म्हणजेच वैद्यकीय व्यवसायात बोकाळलेल्या अपप्रवृत्ती आणि अद्याप तग धरून असलेल्या सत्प्रवृत्ती यांच्यामधला संघर्ष म्हणजे ‘आघात’ हा चित्रपट... गेली काही वर्षं या विषयावर वर्तमानपत्रातून लेखन होत आहे, मराठीत कथा-कादंबरी - नाटक अशा साहित्यप्रकारातून या विषयावर लेखन झालं. मात्र आरोपांच्या थेट फैरी झाडण्याचा प्रयत्न ‘आघात’ मधून प्रथमच होत आहे. डॉक्टरांवर आरोप करतानाच पेशंटकडून होणार्‍या चुकांवर भाष्य करायलाही हा चित्रपट विसरत नाही आणि म्हणूनच तो एकांगी होत नाही.... विषयाच्या वेगळेपणाइतकंच हे राखलं गेलेलं भान हेही वैशिष्ट्यपूर्ण म्हणावं लागेल.
 
 
 
या चित्रपटासंदर्भातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिग्दर्शन क्षेत्रात के लेला प्रवेश... अभिनेता म्हणून घेतलेल्या प्रदीर्घ अनुभवानंतर, ही नवी ‘इनिंग’ त्यांनी सुरू केली आहे... तीही समाजातल्या एका ठुसठुसणार्‍या जखमेवर बोट ठेऊन! संवेदनशील अभिनेत्याइतकीच प्रखर सामाजिक जाणीवेचा कृतीशील कलावंत हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला महत्त्वाचा पैलू या निमित्ताने समोर येतो. कोणताही आडपडदा न ठेवता किंवा कलात्मकतेच्या नावाखाली प्रतिमात्मक भाषेचा आधार न घेता (त्यांच्या स्पष्टवक्ता स्वभावानुसार) त्यांनी थेट विषय मांडला आहे आणि म्हणूनच विषयाचं गांभीर्य प्रेक्षकाच्या मनावर ठसतं, त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं.
 
 
वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तीनेच लिहिलेलं कथानक आणि मुक्ता बर्वे, सुहास जोशी, अमोल कोल्हे यांच्यासह नवोदित कादंबरी कदमने केलेला प्रभावी अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू..
 
 
या पार्श्वभूमीवर विक्रम गोखलेंशी साधलेला संवाद...‘आघात’च्या पार्श्वभूमीवर या विषयाशी निगडीत त्यांची मतं जाणून घेण्यासाठी मारलेल्या गप्पा आहेत...
 
त्या गप्पांचा हा वृत्तांत...
 
एक संवेदनशील नाट्यचित्रपट अभिनेते ही सर्वसामान्य मराठी रसिक प्रेक्षकाला तुमची इतक्या वर्षांची ओळख. त्यामुळे दिग्दर्शक ही तुमची नवी खेळी हा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता... अर्थात्, चित्रपट पाहिल्यानंतर आनंदही झालाच. कसं काय दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरावंसं वाटलं?
 
 
गेली 28 / 29 वर्षं मी ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशन’ या भारतातल्या एका मोठ्या संस्थेचा आजीव सभासद आहे. तेव्हा हे क्षेत्र माझ्यासाठी नवीन अजिबात नाही, लोकांना त्याची आता माहिती होते आहे इतकंच. याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे केवळ हौस म्हणून, करून दाखवायचं म्हणून मला दिग्दर्शनात उतरायचं नव्हतं. ज्यावेळी आतून वाटेल तेव्हाच करायचं हे नक्की होतं. त्यामुळे उशीर वगैरे झालाय असं काही मला वाटत नाही.
 
 
2009 मध्ये डॉ. नितीन लवंगारेंची कादंबरी मी वाचली. ती वाचल्यावर मला असं वाटलं की, ही थेट मुस्कटात मारणारी कादंबरी आहे आणि ती मारणाराही त्याच क्षेत्रातला आहे... या विषयाची सध्या गरज आहे, तेव्हा यावरच चित्रपट करावा म्हणून मी तो करायला घेतला.
 


vikram 
 
 
आणि फक्त डॉक्टर्स चुकीचे असतात असं नाही, पेशंटस्ही आडमुठे असतात असं दाखवून बॅलन्स साधायचा प्रयत्न केला आहे. पेशंटस्चीही काही कारणं असतात, तेही कधीकधी बेभान होऊन प्रतिक्रिया देतात, हॉस्पिटल्स जाळतात, डॉक्टरांना मारहाण करतात...मात्र ही प्रतिक्रियाही समर्थनीय नाहीच. हा जो वेडेपणा आहे, त्यावरही हा सिनेमा भाष्य करतोच. सिनेमा एकांगी होऊ नये यासाठी मी काळजी घेतली आहे.
 
 
तुम्ही विषय निवडलात तोही गंभीर आणि मांडणीही अतिशय भेदक केलीत... असे विषय निवडण्यात सिनेमा न चालण्याची भीती असते... तुम्ही दिग्दर्शक म्हणून ती जोखीम पत्करलीत आणि तुमचे निर्माते या क्षेत्रातले नसूनही त्यांनी तुमच्या या धाडसाला साथ दिली. असे ‘हौशी’ निर्माते मिळणं हेही एक आश्चर्यच!
 
 
हे तिघेही निर्माते म्हणजे मोहन दामले, श्रीराम दांडेकर आणि संजय साठ्ये, माझे गेल्या 25/30 वर्षांपासूनचे मित्र आहेत. मी सिनेमा दिग्दर्शित करावा ही त्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मला जेव्हा कथा आवडली आणि त्यावर सिनेमा करावा असं वाटलं तेव्हा मी त्यांना ही कथा ऐकवली. के वळ गोष्ट सांगायची म्हणून ही गोष्ट नाही तर पाहणार्‍याला विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे, हे त्यांना स्पष्ट सांगितलं. तुम्हाला आवडावी असा आग्रह नाही... आवडली नाही तर मी घरी जाईन.
 
 
मात्र त्यांनाही ही कथा आवडली आणि त्यांनी माझ्यावर ताबडतोब विश्वास टाकत जवळजवळ एक कोटींची गुंतवणूक केली... फक्त मी त्यात कामही करावं इतकीच त्यांची अट होती. त्यानंतर निर्मितीच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांनी माझ्या कामात ढवळाढव केली नाही की अनावश्यक सल्ले दिले नाहीत. मात्र या व्यवसायातले हिशेब अन्य व्यवसायांपेक्षा वेगळे असतात याची मी त्यांना कल्पना दिली. अशा तर्‍हेचे विषय चालतीलच असं सांगता येत नाही. यातलं युद्ध जे आहे ते बौद्धिक युद्ध आहे, तात्त्विक युद्ध आहे, नैतिक युद्ध आहे. ते ताणून प्रेक्षकांवर त्याचा बाँब कसा टाकायचा याची मला कल्पना आहे, ते मी करेन असं सांगितलं. तेव्हा आम्ही जेवढे पैसे घातले आहेत, तेवढे परत मिळाले तरी चालतील असं माझ्या निर्मात्यांनी म्हटलं आणि मी कामाला सुरुवात केली.
 
 
आजच्या काळात अतिशय महत्त्वाचं ठरणारं कथानक, सर्वच पात्रांचा खिळवून ठेवणारा अभिनय... अशा जमेच्या बाजू असतानाही तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये... संपूर्ण मुंबईत फक्त तीन थिएटर्समधे तोही दिवसाला एकच शो आणि गैरसोयीच्या वेळेला लागत असेल तर आम्ही तो पाहायचा कसा ? 25/30 खुर्च्याची क्षमता असलेल्या सिनेमॅक्स किंवा वंडरमॉलमध्येच फक्त हा सिनेमा लागणं हे बरोबर आहे का? पॉपकॉर्न खात खात बघायचा हा चित्रपट नाही... हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे, मग त्यांच्यापर्यंत पोचणार कसा? डोंबिवलीसारख्या जास्तीत जास्त मराठी वस्ती असणार्‍या पण नोकरीवर जाणार्‍या माणसांच्या शहरात जर याचा शो दुपारी 12.30 चा ठेवला तर जो पाहणं अशक्यच आहे. मग पोटतिडिकीने जो विषय तुम्ही मांडता आहात तो पोचणारच नसेल तर ही मेहनत व्यर्थ आहे असं नाही का वाटत?
 
 
 
वाटतं ना... नक्कीच वाटतं! पण वाटलं तरी उपाय काय..? ज्या निर्मात्याला असे चित्रपट काढायचे असतील त्यांनी स्वत:चं थिएटर काढणं हाच एकमेव उपाय मला दिसतोय!
 
 
पण जाणूनबुजून असं करण्यात थिएटर मालकांचा डाव आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने सर्वस्वी गैरसोयीच्या वेळेला शो लावायचा आणि प्रेक्षक येत नाहीत तर कशाला लावायचे मराठी चित्रपट अशी सरकारकडे तक्रार करून मोकळं व्हायचं ही त्यांची पॉलिसी आहे.
मला तर आता वाटायला लागलंय की दर रविवारी फक्त तीन शो ठेवावेत. आम्हाला प्लाझाला पहिल्या आठवड्यात दुपारी एकचा शो मिळाला. आता दादरसारख्या ठिकाणी कुठला मराठी माणूस आपली कामं बाजूला ठेवून आमचा सिनेमा बघायला येणार आहे? हे आपल्या लक्षात येतं तसं थिएटर मालकांच्या लक्षात येत नसेल? नक्कीच येत असणार. पण ते जाणीवपूर्वक अशीच वेळ देतात. अशी वेळ दिली नाही तर मराठी सिनेमा चालत नाही ही तक्रार सरकारकडे कशी करता येईल? आणि वेळ गैरसोयीची दिली म्हणून निर्माता चित्रपट घरात तर ठेवू शकत नाही ना? प्लाझाला आम्ही रात्रीचा शो मागून घेतला. एकच मिळणार असेल तर किमान रात्रीचा तरी द्या, प्रेक्षक निदान यायचा तरी विचार करतील, असं सांगितलं.
 
 
 
अतिशय ‘फोकस्ड’ मांडणी हे या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य... उगीचच प्रेमकहाणीची फोडणी किंवा अनावश्यक गाणी घालून तुम्ही विषयाचं गांभीर्य कमी केलं नाहीत. नाही तर व्यावसायिक तडजोड किंवा प्रेक्षकांची गरज अशी कारणं देत मूळ आशयाला धक्का लागेल अशी भर घातली जाते...
 
 
 
नेमका काय विषय मांडायचा आहे, याचं दिग्दर्शकाला ज्ञान नसलं की असं होतं! मग डॉ. खुराणांच्या बायकोचं पुढे काय झालं ? खुराणा केस हरला की जिंकला? मुक्ता बर्वे आणि अमोल कोल्हेचं लग्न होतं का? त्या संगीता प्रधानचं पुढे काय होतं... हे सगळे प्रश्न दुय्यम आहेत. डॉ. खुराणांचा पराभव झाला हे महत्त्वाचं आहे आणि ते जास्तीत जास्त प्रभावीपणे दाखवणं हा माझा उद्देश होता.
 
 
 
एखादा प्रथितयश डॉक्टर माणूस म्हणून कसा संवेदनाहीन बनत जातो, त्याच्यातला ’अहंगंड’ आणि त्याचा फाजील आत्मविश्वास कसा घात करू शकतो यावर तुमचा सिनेमा मुख्यत्वे भाष्य करतो... आणि कथानकाच्या ओघात कट प्रॅक्टीस, अव्वाच्या सव्वा आकारले जाणारे चार्जेस यावर चर्चा होते. सिनेमाचा शेवट करताना वैद्यकीय क्षेत्रात बोकाळलेल्या प्रवृत्तींवर आघात करायचं आवाहन तुम्ही करता, तो आघात केला जावा असं वाटतं?
 
 
 
यावर एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे... प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी विचार करायला पाहिजे. डॉक्टरनीही करायला हवा आणि पेशंटनीही करायला हवा. वैद्यकीय क्षेत्रात काही अपप्रवृत्ती शिरायला पेशंटसही तितकेच जबाबदार असतात. ज्या डॉक्टरची फी मजबूत, ज्याच्याकडे 5 मिनिटांच्या अपॉईंटमेंटसाठी आधी 3/3 महिने नंबर लावावा लागतो, तोच डॉक्टर मोठा असा लोकांचा भ्रम असतो. त्यातून आपणच समाजात काही डॉक्टरांचं प्रस्थ निर्माण करतो.
 
 
आमच्या पार्ल्यात एक डॉक्टर आहेत, ते म्हणाले की माझ्याकडे छातीत दुखतंय सांगत कोणी पेशंट आला की मी त्या पेशंटला सांगतो की मी काही लगेच अँजिओग्राफी / अँजिओप्लास्टी करणार नाही... व्यायाम कर त्यापेक्षा. असं सांगणारेही डॉक्टर आहेत. पण त्यांच्याकडे, त्यांच्या ज्ञानाकडे आपण अविश्वासाने पाहतो.
 
 
 
या विषयावर पुण्यात परवा एक चांगला परिसंवाद झाला. या परिसंवादामध्ये पुण्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या संस्थेचे सभासद आले होते. जे पेशंटला नागवणार नाहीत अशा डॉक्टर्सचा समाजात जो गट आहे, या गटाने उभारलेली संस्था. हे सर्व सभासद मोठेमोठे सर्जन्स् आहेत. वेगवेगळ्या शाखांचे डॉक्टर आहेत आणि ते सगळे, पेशंटला ज्या गोष्टींची गरज आहे तेवढंच पेशंटला करायला लावायचं, अधिक काही करण्याचा आग्रह धरायचा नाही या विचाराचा पुरस्कार करणारे आहेत. पेशंटचा खिसा जपायचा या विचाराने भारलेले, प्रेरित झालेले लोक आहेत. त्यांनी एक चांगला उपाय सुचवला...ज्यांना खरोखरीच चाड आहे, जे कट प्रॅक्टीसच्या विरोधात आहेत त्यांनी या संस्थेचे सदस्य व्हावं असं त्यांनी आवाहन केलं. या संस्थेचे तुम्ही सभासद झालात की मेंबरशिपचं सर्टीफीकेट तुमच्या दवाखान्यात लावण्यासाठी दिलं जाईल. रुग्णाला दिसेल असं दर्शनी भागात ते लावावं. संस्थेच्या सभासद डॉक्टर्सची डिरेक्टरीही त्यांनी तयार केली आहे. एकेका शाखेचे किमान 4/5 तज्ज्ञ डॉक्टर्स त्या लिस्टमधे आहेत. आपल्याला झालेल्या आजारावर उपचार करणारे त्या लिस्टमधे कोण डॉक्टर आहेत हे पहावं... आणि पेशंटने सेकंड ओपिनियनही जरूर घ्यावं, असाही त्यांचा आग्रह असतो. आम्ही सांगतो म्हणून हेच करा असं नाही, तर जरूर आणखी एका तज्ज्ञाचं मत घ्या असं आवर्जून सांगतात.
 
 
 
एका पंचतारांकित हॉस्पिटलची भलीमोठी जाहिरात बरेच दिवस लक्ष वेधून घेत होती. कदाचित आजही असेल ती तिथे. वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचं रेटकार्डच दिलं आहे त्यावर. सगळे आकडे लाखातले, पण ती जाहिरात हे दर कसे वाजवी आहेत याची भलामण करणारी! आपण या व्यवसायाचा कसा बाजार केला आहे त्याचं निदर्शक वाटते ती.. खूप उद्विग्नता येते मनाला. काय करायचं कळत नाही अशा वेळी...!
 
 
 
पाहिल्या आहेत मीही अशा जाहिराती... लाखातले आकडे आणि म्हणायचं वाजवी भाव! भरमसाठ वाढलेल्या या उपचारखर्चाचं मूळ कशात आहे तर शिक्षणव्यवस्थेत...हे एक दुष्टचक्र आहे. जागोजागी उगवलेली खाजगी मेडीकल कॉलेजेस्, भले थोरले पगार देऊन ही कॉलेजेस् मोठमोठ्या डॉक्टर्सना तिथे शिकवण्यासाठी नियुक्त करतात. साहजिकच त्यांच्या नावामुळे अनेक विद्यार्थी तिथे अ‍ॅडमिशनसाठी जीव टाकतात. याच विद्यार्थ्यांना भली थोरली फी आकारून सगळा खर्च भरून काढला जातो. या फीच्या आकड्यांनी लाखांची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे... अशा ठिकाणी पदवी घेणारा जेव्हा हॉस्पिटल टाकायचं म्हणतो तेव्हा आधीचा कर्जाचा हा बोजा कोटीवर जाऊन पोहोचतो. त्या कर्जाचा महिन्याचा हप्ताच लाखांमध्ये असतो आणि हे पैसे गोळा करण्यासाठी सर्वसामान्य पेशंटचा खिसा कापायचा. असं हे दुष्टचक्र आहे. परवा कार्यक्रमात एक डॉक्टरच सांगत होते. त्यांच्या मुलाला एम. एस. ऑर्थो करायचं आहे... मात्र व्यवसाय सुरू होईपर्यंत त्यासाठी घ्यावं लागणारं कर्ज काही कोटींवर पोहोचलं असेल.
 
 
 
अशा सगळ्या व्यापारी वातावरणातही, माझ्या माहितीत एक हॉस्पिटल आहे. औरंगाबादचं डॉ. हेडगेवार रूग्णालय.... . त्यांच्याकडे एकदा तुम्ही तुमचा के सपेपर केलात, तोही काहीतरी 70 / 75 रुपयाला... त्यानंतर त्या हॉस्पिटलमधे फक्त औषधाचेच पैसे आणि ज्या काही ट्रिटमेंट घ्याव्या लागतील त्या ट्रिटमेंटच्या साधनांचं जे काही भाडं असेल तेच. अगदी थोडक्या पैशांत तिथे हृदयावरची शस्त्रक्रिया होऊ शकते. मग जे औरंगाबादमध्ये होऊ शकतं ते मुंबई - पुण्यात नाही का नाही होऊ शकत..? कारण एकच... इच्छाशक्तीचा अभाव... सिनेमात डॉक्टर स्मिताच्या तोंडी एक वाक्य आहे, ती डॉ. खुराणांना म्हणते की,‘लोकं देव म्हणून तुमच्याकडे येतात पण तुम्ही आता माणूसही राहिलेले नाही.’ मला वाटतं, आजच्या परिस्थितीवरचं जळजळीत भाष्य आहे ते! हेडगेवार रुग्णालयासारखी हॉस्पिटल्स् ठिकठिकाणी व्हायला हवीत आणि रुग्णांनीही शहाणं व्हायला हवं.
 
 
इन्शुरन्ससारख्या गोष्टींमुळेही अनेक ट्रिटमेंट अतिशय महागड्या, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या होऊन बसल्या आहेत. केवळ इन्शुरन्स आहे म्हणून पंचतारांकित हॉस्पिटलमधे दाखल होणारे अनेक महाभाग असतात.
 
 
वैद्यकीय क्षेत्रातल्या अपप्रवृत्तीवर तुम्ही थेट हल्ला चढवलाय. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या काय प्रतिक्रिया ?
 
 
सगळ्यांना आवडला चित्रपट. पूर्ण वैद्यकीय क्षेत्र नासलं आहे, अशी एकांगी टीका मी केलेली नाही. यात हल्ला आहे, तो एका डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरवर केला आहे. हे युद्ध आहे अपप्रवृत्ती आणि सत्प्रवृत्तीमधलं. आणि अपप्रवृत्तीच्या विरोधात लढणारी नव्या पिढीची प्रतिनिधी आहे आणि तिचा नैतिकतेचा आग्रह आहे. अनुभवी आणि प्रस्थापित डॉक्टरविरुद्ध तिने दिलेला लढा आहे. स्वत:चा अनुभव तोच प्रमाण मानणारा आणि तिने केलेल्या प्रतिप्रश्नाने अहंकार दुखावलेला असा हा डॉक्टर आहे. त्यामुळे मला अनेक डॉक्टर्सनी चित्रपट आवडल्याचं आवर्जून सांगितलंय.
 
माझी इच्छा आहे की यातून समाजात काही विधायक बदल घडावा. त्याची सुरुवात होणं हे या चित्रपटाचं खरं यश असेल.
 
***
9594961865

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.