सारथ्य समृद्धीचे राजकर्तव्य देवेंद्रांचे

विवेक मराठी    10-Dec-2022   
Total Views |
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे आणि नागपूर मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. समृद्धी महामार्ग हा देवेंद्रजींचा ड्रीम प्रोजेक्ट! महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा हा प्रकल्प पूर्णपणे भाजपाची आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना होय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉइंट येथून या आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या संपूर्ण दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते आणि मुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते. हे मोठे अन्वर्थक आहे.
 
bjp
 
कालपर्यंत जे लोक समृद्धी महामार्गाला विरोध करत होते, तेच आज या महामार्गाचे श्रेय लाटण्यासाठी धडपडत आहेत. “कुणी कितीही प्रयत्न केले, तरी या महामार्गातून माझे नाव मिटवू शकणार नाही” हे उद्गार काढले होते माजी मुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. दिवस होता 5 एप्रिलचा. बरोबर नऊ महिन्यांनी, म्हणजे 4 डिसेंबर रोजी, त्याच समृद्धी महामार्गावरून एसयू्व्ही चालवून फडणवीस यांनी या महामार्गाच्या स्वप्नपूर्तीचे श्रेय आपलेच असल्याचे शब्दावाचून सांगितले. तसेच आपले एक राजकर्तव्य पूर्ण होत असल्याचे समाधानही मिळविले.
 
 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या आणि नागपूर मेट्रोच्या लोकार्पणाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. (लेख प्रकाशित होईपर्यंत लोकार्पण सोहळा झालेला असेल.) समृद्धी महामार्ग हा देवेंद्रजींचा ड्रीम प्रोजेक्ट! महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा हा प्रकल्प पूर्णपणे भाजपाची आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना होय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विदर्भ-मराठवाड्यातील मागास भागांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची संकल्पना समोर मांडण्यात आली होती. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यावेळी चडठऊउचीही जबाबदारी होती. त्यामुळे या महामार्गांच्या निर्मिती-नियोजनात त्यांचाही मोठा सहभाग होता. ती साकारण्यापर्यंतच्या टप्प्यात अनेक विघ्नसंतोषी मंडळींनी अडथळे आणण्याचेच प्रयत्न केले. इतकेच नव्हे, तर अनेक अडथळ्यांना-विरोधांना पुरून उरून साकार झालेल्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचाही क्षुद्र प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकल्पाच्या इतिहासाची आणि प्रवासाची पुन्हा उजळणी करायची गरज आहे, म्हणजे ज्याचे श्रेय त्याला मिळेल.
 
 
bjp
 
समृद्धी महामार्गामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातून 26 तालुके जोडण्यात येत असून, 392 गावांतून महामार्ग जाणार आहे. 710 किलोमीटर लांबीच्या महामार्गावर 1700 पूल आहेत. यातील 400 पुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. नंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्हाही या प्रकल्पाला जोडण्यात आला. इंटरचेंजेसच्या माध्यमातून आणखी 14 जिल्हे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. राज्यातील एकूण 36पैकी 24 जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे. त्यामुळे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला विकासाच्या कवेत आणणारा असा प्रकल्प दुसरा झालेला नाही.
 
 
या 710 किलोमीटर लांबीच्या महामार्गालगत 18 टाउनशिप विकसित करण्यात येणार आहेत. हा ग्रीनफील्ड महामार्ग असून, मार्गाच्या दुतर्फा साडेआठ लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. या मार्गाची रुंदी 120 मीटर एवढी प्रशस्त असून तो सहा पदरी असेल. संपूर्ण महामार्ग ‘इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’शी (आयटीएमएसशी) जोडलेला आहे. त्यामुळे वेगमर्यादा, लेन तोडणे यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर लगेच कारवाई होणार आहे.
 

bjp 
 
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले होते, की समृद्धी महामार्गाची ही संकल्पना वीस वर्षांपासून त्यांच्या डोक्यात घोळत होती. नागपूर ही जन्मभूमी आणि मुंबई ही कर्मभूमी या दोहोंना जोडण्याची कल्पना कदाचित लोकप्रतिनिधी म्हणून कारकिर्द सुरू झाल्यापासूनच त्यांच्या मनात असावी. जनतेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संधी दिली, तेव्हा त्यांनी अग्रक्रमाने हा महामार्ग बांधायला घेतला. त्या वेळी विरोधी पक्षात असलेल्यांनी आणि विरोधकांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या विश्लेषकांनी त्यांची कोण चेष्टा केली! फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी हा रस्ता बांधण्यात येत असल्याच्या, शेतकर्‍यांना बेघर करण्यात येत असल्याच्या भूमिका उठवण्यात आल्या. पण दैवयोग काय असतो पाहा! तेव्हा समृद्धी महामार्गाला ज्या लोकांनी विरोध केला, त्याच लोकांनी या महामार्गाचे उद्घाटन करण्याची घाई केली, जेणेकरून त्याचे श्रेय घेता यावे. रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी या महामार्गाचे काम पूर्ण होण्याचीही वाट पाहिली नाही. इतकेच नाही, तर आयत्या पिठावर रेघोट्या माराव्या तसे आपल्या वडिलांचे नावही या समृद्धी महामार्गाला देऊन टाकले. ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे’ असे या प्रकल्पाचे मूळ नाव होते. मध्यंतरी बळकावलेल्या सत्तेच्या जोरावर त्याचे नामकरण ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग’ असे करण्यात आले आहे.
 
 
देवेंद्र फडणवीस सरकार 2014 साली सत्तेवर आले. त्यानंतर या सरकारने राबविलेल्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये समृद्धी महामार्गाचे स्थान खूप वरचे होते. मुख्यमंत्री असताना यासाठी फडणवीस यांनी शेकडो बैठका घेतल्या. प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. त्यांनी अक्षरश: झपाटल्यासारखे काम केले. त्या वेळी विरोधी पक्षांत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्राणपणाने या प्रकल्पाला विरोध केला. त्यावर नाना आरोप केले. त्याच काळात सत्तारोधी असलेल्या (म्हणजे सत्तेत सामील होऊनही सतत विरोधच करणार्‍या) शिवसेनेही जमेल तसे या प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी निव्वळ शिवसेनाप्रमुख असलेले, मात्र नंतर मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे हे त्यात आघाडीवर होते. महामार्गाविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलनही झाले होते. त्याला अनेक नेत्यांची फूस होती.
 

bjp 
 
या प्रकल्पाला विरोध करण्याची शिवसेनेची वृत्ती कोणत्या थराला गेली होती, याची चुणूक केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी लिहिलेल्या एका पत्रात दिसून आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत आहेत, अशी तक्रार केली होती. राज्यात सुरू असलेल्या महामार्गांच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात असून यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अर्धवट रस्त्यांची कामे रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी पुरावेही दिले होते.
 
पर्यावरणाला व वन्यजीवांना अनुकूल प्रकल्प

bjp

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या व महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची विशेष बाब म्हणजे वन्यजीवांच्या सुलभतेसाठी याचे विशिष्ट पद्धतीने बांधकाम करण्यात येत आहे. एखाद्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करताना वन्यजीवांच्या हालचालींवर गदा येणार नाही याची काळजी घेऊन त्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या संरचनांची बांधणी करण्याचे काम भारतात प्रथमच करण्यात येत आहे. या कामासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूडब्ल्यूआय) या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. महामार्गाच्या कॉरिडॉरमध्ये मनुष्यांचे व वन्य प्राण्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी व त्यांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी महामार्गालगत करण्यात येणार्‍या वृक्ष लागवडीमध्ये त्यांना आकर्षित करणार्‍या आंबा, काजू, जांभूळ, संत्रे, मोसंबी व खजूर अशा 13 प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीस विशेषकरून वगळण्यात आले आहे. प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण 96 बांधकामे प्रस्तावित केली असून, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी 7 ओव्हरपास ब्रिज, तसेच अंडरपास, बॉक्स कल्व्हर्ट व लहान-मोठ्या अशा 89 पुलांचा समावेश आहे.
 
 
 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉइंट येथून या आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या संपूर्ण दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते आणि मुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते. हे मोठे अन्वर्थक होते. मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात फडणवीस यांनी विकासाचाच ध्यास घेतला. त्यासाठी अनेक प्रकल्प आखले. अनेक मार्गी लावले. मात्र त्यांची वंचना करून सत्ता बळकावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ या प्रकल्पांना खीळ घालण्याचे काम केले. यातील काही प्रकल्प त्यांनी चक्क रद्द केले, तर काहींना वेगळे वळण दिले. सुदैवाने हा प्रकल्प केंद्राच्या साहाय्याने राबविण्यात आल्यामुळे त्यांना व त्यांच्या साथीला असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा उपद्रव करता आला नाही.
 
 
 
 
 
 
राज्यातील खरोखर मागास असलेल्या विदर्भाला व मराठवाड्याला समृद्धीच्या मार्गावर आणणारा हा प्रकल्प विकासाची तळमळ असलेल्या फडणवीस यांच्यासारख्या नेत्याच्या डोक्यातूनच येऊ शकतो. मुंबई-पुणे अंतर दोन तासांत पूर्ण करता येईल असे युती सरकारच्या काळात जेव्हा नितीन गडकरी सांगत होते, तेव्हा हेच लोक त्यांचीही अशीच थट्टा करायचे. आज त्याच एक्स्प्रेस वेवरून त्यांच्याच गाड्या धावतात, तेव्हा त्यांना ती थट्टा आठवत नाही. समृद्धी महामार्ग हा एक्स्प्रेस वेच्या कैकपट मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याची कल्पना व अंमलबजावणी फडणवीस यांचीच आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्या मार्गावरून त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांचे सारथ्य नाही केले, तर या संपूर्ण प्रकल्पाचेच सारथ्य केलेय. जनतेचे कल्याण करणे, जनतेला समृद्ध करणे हे राजाचे आद्य कर्तव्य. फडणवीसांनी या प्रकल्पाच्या रूपाने या कर्तव्याची परिपूर्ती केलीय.
 

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक