वारकरी भावदृष्टीतून पंढरी क्षेत्राचा विकास व्हावा

सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी। माझी पंढरी कामधेनु॥

विवेक मराठी    12-Dec-2022   
Total Views |
श्रीक्षेत्र पंढरपूर सध्या प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ (मंदिर परिसर विकास)च्या विषयावरून अस्वस्थ झालेले आहे. यापूर्वी 1984मध्ये मंदिराभोवतीची घरे-दुकाने पाडून पूर्वीचा 10-12 फुटाचा रस्ता 40 फूट रुंद करण्यात आलेला आहे. त्या वेळी बाधितांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे वारकरी भावदृष्टीतूनच पंढरी क्षेत्राचा विकास व्हावा व जुन्या स्मृती-परंपरांना प्राधान्य देऊन मंदिराभोवतीचे सांस्कृतिक परस्पर सौहार्द सहजीवन जतन करण्याचा प्रयत्न व्हावा, अशी समस्त पंढरपूरकरांची इच्छा आहे.

pandharpur
 
 
श्रीक्षेत्र पंढरपूरचे अनंत, अगाध माहात्म्य आपण संतांच्या अभंगातून वाचतो, ऐकतो. त्याविषयी मराठी माणसांना काही अधिक सांगण्याची गरज नाही. ‘पंढरीची वारी’ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्ती-ज्ञानाधिष्ठित वारीचा सोहळा हे सामाजिक एकता-समरसता यांचे दर्शन आहे. लाखो वारकर्‍यांचे भक्ती माहेर असलेले आणि सदैव टाळमृदंगाच्या घोषासह हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणारे श्रीक्षेत्र पंढरपूर सध्या प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ (मंदिर परिसर विकास)च्या विषयावरून अस्वस्थ झालेले आहे. वादविवाद, निषेध सभा, निषेध मोर्चे यांनी ग्रासले आहे. संपूर्ण पंढरपूरभर दुकानादुकानांपुढे ‘कॉरिडॉर’ निषेधाचे काळे फलक समस्त संभावित बाधितांची मनोदशा दर्शवीत आहेत. यापूर्वी 1984-85मध्ये विठ्ठल मंदिराभोवतीचा रस्ता, चौफाळा ते महाद्वार घाटापर्यंत चांगलाच रुंद करण्यात आला असून त्यासाठी त्या वेळी सुमारे 400-500 दुकाने, घरे ताब्यात घेऊन पाडण्यात आली होती. त्या दुकाने, घरे उद्ध्वस्त झालेल्यांचे ना उत्तम पुनर्वसन झाले, ना त्यांना योग्य आर्थिक भरपाई मिळाली आहे. आता विठ्ठल मंदिर परिसरात हे दुसर्‍यांदा ‘कॉरिडॉर’च्या माध्यमातून भलेमोठे रस्ते रुंदीकरण होणार आहे. 1985च्या सरकारी कामाच्या अनुभवामुळे स्थानिक सरकारच्या पुनर्वसन योजनेबाबत साशंक आहेत. काय आहे हा ‘पंढरपूर कॉरिडॉर’? काय आहेत वादी-प्रतिवादींची मते? आणि एकूण वस्तुस्थिती यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या.
 
 
श्रीक्षेत्र ‘पंढरी’चे आगळेपण
 
‘कॉरिडॉर’ योजनेचा आढावा घेण्यापूर्वी आपणास तिरुपती, वाराणसी, शिर्डी आदी स्थानांपेक्षा पंढरी क्षेत्राचे वेगळेपण काय आहे ते माहीत पाहिजे, म्हणून अगदी थोडक्यात पंढरीच्या आगळ्यावेगळ्या स्थानमाहात्म्याची माहिती घेऊ.
 
पंंढरपूर हे मुख्यत: दोन विभागात विभाजित असे नगरपालिका क्षेत्र आहे. पंढरपूरचा पहिला भाग म्हणजे विठ्ठल मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गाचा परिसर, पंढरपूरचा दुसरा भाग म्हणजे जुनी पेठ, नवी पेठ, स्टेशन परिसर व अन्य विस्तारित शहरी उपनगरे. सरकारद्वारा प्रस्तावित कॉरिडॉरचा विषय हा ‘विठ्ठल मंदिर परिसराशी’ निगडित विषय आहे.
 
 
श्री विठ्ठल मंदिर व आवतीभोवतीचा परिसर याला एक प्राचीन इतिहास व सांस्कृतिक महत्त्व आहे. मंदिराभोवती अनेक संतांची स्मृतिस्थाने, मठ-मंदिरे, तसेच विठ्ठल-रुक्मिणीचे मुख्य पुरोहित बडवे, उत्पात, सेवाधारी व क्षेत्रोपाध्ये, वतनदार यांचे पुरातन वाडे आहेत. या वाड्यांमध्येच पंढरीच्या वारीसाठी येणार्‍या साधुसंतांचे व हजारो वारकर्‍यांचे परंपरेने पिढ्यानपिढ्या वास्तव्य होत आल्याने वारकरी भावविश्वामध्ये या सार्‍या वास्तूंना-वाड्यांना विविध घटनांचे व संत वास्तव्याचे ऐतिहासिक स्मरण संदर्भ/महत्त्व आहे. हे विठ्ठल मंदिर परिसराचे आगळे वैशिष्ट्य व वेगळेपण आहे.
 
 
pandharpur
 
पंढरी क्षेत्रामध्ये दर वर्षी चार प्रमुख वार्‍या (यात्रा) होतात. त्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत येतात. तीन-चार दिवस त्यांचा मुक्काम असतो. या वारकर्‍यांचा नित्यनेम ठरलेला असतो - चंद्रभागेत स्नान, भजन, कीर्तन, नगर प्रदक्षिणा आणि विठ्ठल दर्शन. पंढरीत विठ्ठल दर्शनापेक्षाही भजन-कीर्तन या नामभक्तीचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पंढरीतील विठ्ठल मंदिराएवढेच येथील मठांना व वाड्यांना महत्त्व आहे, कारण या वाड्यांतून, मठांतूनच वारकर्‍यांचे सामूहिक भजन-प्रवचनादी नामस्मरण, नामघोषांचे भक्तीसोहळे साजरे होतात. वाड्यांमध्ये अत्यंत अल्प दरामध्ये 7-8 दिवस राहण्याची सोय आणि अशी अनेक पिढ्यांची वहिवाट, यामुळे अत्यंत गरीब, श्रमजीवी, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर वर्ग अत्यंत तुटपुंज्या खर्चात पंढरीची वारी करू शकतो व भक्तिसुखाचा अनुभव घेतो. अनेक शेतकरी वारकरी पैसे न देता मोबदला म्हणून चक्क धान्य देतात. पंढरीचा पांडुरंग हा गरीब, शेतकरी भाविकवर्गाचा देव आहे. तिरुपती-शिर्डीपेक्षा पंढरीचे वेगळेपण असून ते येथील साधेपणात आहे. निखळ निष्काम भक्ती हेच पंढरीचे वैशिष्ट्य आहे.
 
 
प्रस्तावित ‘विकास आराखड्याचे’ स्वरूप
 
 
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी आदी वारीनिमित्त जमणार्‍या लाखो भाविकांच्या सोईसाठी ब्रिटिशांपासून प्रत्येक सरकारने वेळोवेळी काही सुधारणा केलेल्या आहेत. तीर्थक्षेत्र म्हणून ब्रिटिशांनी इ.स.1858मध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नागरी सुविधांसाठी नगरपालिका (म्युन्सिपालिटी) स्थापन केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वारीवरील यात्रा कर रद्द केला व वारीच्या व्यवस्थेसाठी नगरपालिकेला अनुदान सुरू केले. 1984-85मध्ये विठ्ठल मंदिराभोवतीच्या रस्त्याचे रुंदीकरण करणारा ‘मास्टर प्लॅन’ करण्यात आला. चौफाळा ते महाद्वार घाट असा रस्ता रुंद करण्यासाठी सुमारे 400-450 घरे, दुकाने पाडून पूर्ण रस्ता पूर्वीपेक्षा तीन पट मोठा - रुंद केला गेला. या मास्टर प्लॅनमुळे अनेक जण बेघर झाले, अनेकांची दुकाने गेली व ते बेकार झाले. याला 40 वर्षे झाली, तरी अजूनही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. अजूनही संत प्रल्हादमहाराज यांचा वाडा भग्नावस्थेत आहे. आता ‘तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत मंदिर परिसर रुंदीकरणाचा नव्हे, तर मंदिराभोवती चौफाळा ते महाद्वार घाट अशा 120 चौ.मीटर रुंदीकरणाच्या ‘कॉरिडॉर’ची योजना राबविण्याचे सरकारने प्रस्तावित केलेले आहे.
 
 

pandharpur
 
आराखडा प्रारूप
 
सरकारद्वारे ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा’ नावाची 194 पानांची, या योजनेची तपशीलवार माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली असून त्या अधिकृत पुस्तिकेतील माहितीनुसार आपण हा तीर्थक्षेत्र विकास व ‘कॉरिडॉर’ काय आहे? कसा आहे? ते समजून घेऊ.
 
 
या प्रस्तावित आराखड्याचे मुख्य तीन भाग आहेत.
 
1) विठ्ठल मंदिर सुधार
 
 
2) पंढरपूर शहर विकासाचे विविध प्रकल्प
 
 
3) चौफाळा ते महाद्वार घाट विठ्ठल मंदिराभोवतीचा कॉरिडॉर.
 
या योजनेअंतर्गत सरकारने जे आराखडा प्रारूप प्रसिद्ध केले आहे, ते असे -
 
अ) विठ्ठल मंदिर व मंदिर परिसरात करावयाच्या पायाभूत सुविधा.
 
ब) पंढरपूर शहरातील पायाभूत विकासकामे.
 
 
क) पालखी तळ भूसंपादन व विकास
 
ड) वारकरी संप्रदाय प्रचार प्रसिद्धी अनुषंगाने निर्माणकार्य
 
 
पुढे आराखड्यात ‘धोरणात्मक बाबी’ म्हणून 5 प्रकल्प उल्लेखित आहेत.
 
 
1) वाराणसी धर्तीवर ‘चौफाळा ते महाद्वार घाट’ कॉरिडॉर निर्माण.
2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाडा आणि श्रीमंत शिंदे सरकार देवस्थाने जागा संपादन करणे.
 
 
3) पंढरपूरभोवती ‘रिंग रोड’ तयार करणे.
 
 
4) शहरातील रस्ते विकास.
 
5) संत तुकाराम ‘संतपीठ’विषयी निर्णय.
 
असा उपरोक्त आराखडा दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी समस्त नागरिकांना व संबंधितांना अवलोकनार्थ नगरपालिका, प्रांत कार्यालय आदी ठिकाणी उपलब्ध करून दिला व त्यावर दि. 26 सप्टेंबरपर्यंत हरकतीसाठी मुदत दिली गेली. एवढ्या अवधीत 85 हरकती सरकारकडे आल्या.
 
 
निर्णयप्रक्रिया व कार्यवाही क्रम
 
 
1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महापूजेस श्रीक्षेत्र पंढरपूरला आले, तेव्हा त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. 2) त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडीने (दि. 24 ते 26 ऑगस्ट 2022) वाराणसी व तिरुपती असा पाहणी दौरा केला. 3) दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रालयाच्या ‘वॉर रूम’मध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक. त्यामध्ये पंढरपूर स्थानिक लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून आराखडा सादर करण्याचे आदेश. 4) दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित खासदार, आमदार, नगराध्यक्ष, मंदिर समिती सदस्य, पालखी सोहळा दिंडी प्रमुख, फडकरी, लोकप्रतिनिधी यांच्यापुढे विकास आराखड्याचे सादरीकरण केले. सूचना मागविल्या. 5) दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी उपमुख्यमंत्री कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरला महापूजेसाठी आले तेव्हा सर्व बाधितांचे पूर्ण समाधान करूनच प्रकल्प राबवू असे आश्वासन. 6) दि. 10 नोव्हेंबर रोजी राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पंढरपूरमधील संत तुकाराम भवनमध्ये स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ची माहिती दिली व लोकांची मते ऐकून घेतली. त्या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदी अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
‘कॉरिडॉर’ योजनेचे प्रारूप
 
 
मंदिराभोवती चौफाळा ते महाद्वार घाट असा प्रशस्त ‘कॉरिडॉर’ निर्माण करणे ही पंढरपूरमध्ये होणार्‍या अनेक विकास प्रकल्पांपैकी एक योजना आहे. त्याला स्थानिकांचा आक्षेप आहे. या कॉरिडॉरची चौफाळा ते महाद्वार घाट लांबी 510 मीटर राहणार असून रुंदी 120 मीटर (360 फूट) प्रस्तावित आहे. त्यासाठी 73 हजार 554 चौ.मी. जागेची आवश्यकता असून त्यापैकी मंदिर समिती व नगरपालिकेकडे केवळ 9 हजार 195 चौ.मी. जागा ताब्यात आहे. आणि तब्बल 64 हजार चौ.मी. जागा, मंदिराभोवतीची घरे-दुकाने पाडून मिळविण्याची आहे. सरकारी आराखड्यानुसार या जागाप्राप्तीसाठी 247 निवासी घरे-वाडे, 136 दुकाने, 7 मठ आणि 7 मंदिरे ताब्यात घेऊन पाडण्याची गरज आहे. त्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.
 
 
अशा प्रकारे जमीन मिळवून मंदिराभोवती 120 मीटरचा भव्य रस्ता व पूर्वेला महाद्वार घाटापर्यंत आणि पश्चिमेला ‘चौफाळा’ चौकापर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय दोन मजली दोन शॉपिंग सेंटर, दोन भजन हॉल, प्रशासकीय इमारत, अनेक मजली पार्किंग, ग्रंथालय, संत संग्रहालय, सुविधा केंद्र असे विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत.
 
 
pandharpur
 
स्थानिकांचे आक्षेप, हरकती
 
 
1) तीर्थक्षेत्र विकास योजनेतील मंदिर सुधार, घाट दुरुस्त्या, आरोग्य सुविधा, दर्शनबारी स्काय वॉक, रिंग रोड, वारकरी सुविधा केंद्रेे अशा कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध नाही. फक्त मंंदिराभोवतीच्या 120 मीटरच्या ‘कॉरिडॉर’ला विरोध आहे. कारण 1984मध्ये मंदिराभोवतीची घरे-दुकाने पाडून पूर्वीचा 10-12 फुटाचा रस्ता 40 फूट रुंद करण्यात आलेला आहे. मग पुन्हा 120 मीटर कॉरिडॉरची गरज काय? असा स्थानिकांचा, नागरिकांचा प्रश्न आहे.
 
 
2) पंढरपूर हे वाराणसी, तिरुपती यासारखे यात्रेचे स्थान नाही, तर वारकरी विठ्ठलभक्तांच्या ‘वारी’चे भक्तिपीठ आहे. ‘यात्रा’ व ‘वारी’ यामध्ये खूप फरक आहे, तसेच वाराणसी-तिरुपती आणि पंढरपूरच्या सांस्कृतिक, धार्मिक प्रथा-परंपरांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. वारकरी हे स्वयंशिस्त आहेत. वारकरी समाज ही यात्रेकरू भक्तांची गर्दी नाही, तर ते एक सुसंघटित, सुसूत्र आचारप्रणालीबद्ध विठ्ठलभक्त आहेत. हा सूक्ष्म आणि महत्त्वाचा फरक लक्षात घेऊन, स्थानिक, वारकरी, फडकरी-मठाधिपतींशी चर्चा करूनच ‘कॉरिडॉर’ची उपयुक्तता ठरविली जावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
 
 
3) पंढरीच्या वारीत विठ्ठल दर्शनाएवढेच नामसंकीर्तन, कीर्तन, भजन, प्रदक्षिणा, गोपाळकाला या वारकरी आचारधर्मांना विशेष प्राधान्य आहे, हे लक्षात घेऊन ‘कॉरिडॉर’पेक्षा एकादशीला दिंड्यांच्या प्रदक्षिणेसाठी प्रदक्षिणा मार्ग, कीर्तन-भजनास नदीचे वाळवंट आणि गोपाळकाला होतो त्या गोपाळपूरपर्यंतचा रस्ता रुंदीकरण-स्वच्छता, सुशोभीकरण यावर सरकारने भर द्यावा, ही मागणी आहे.
 
 
4) ‘कॉरिडॉर’मुळे मंदिराभोवतीचे सांस्कृतिक भावविश्व उद्ध्वस्त होईल, मंदिर परिसरातील ऐतिहासिक संतस्मृतींना वारकरी कायमचा मुकेल, अशी वारकर्‍यांना, नागरिकांना भीती वाटते. सरकारने 65 एकरांचा भूभाग वारकरी सुविधा, मुक्काम, गाड्या पार्किंगसाठी, काही वर्षांपूर्वी तुकाराम मुंडे (जिल्हाधिकारी) यांनी मोठ्या दूरदृष्टीने विकसित केला असून वारकरी मोठ्या आनंदाने त्यांचा वापर करीत आहेत. त्यामुळे वारीतील लाखो वारकरी त्या 65 एकराच्या परिसरातच राहतात. पंढरपुरात अशा मोकळ्या जागा भरपूर असून त्यांचा उपयोग करून सरकारने भाविकांची सोय करून मंदिराचे प्राचीनत्व जपावे, असे नागरिकांना वाटते.
 
 
विरोध आंदोलनाची तीव्रता
 
 
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास जरूर करा, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे व पूर्वी आम्ही आमची घरे, दुकाने देऊन त्यासाठी मोठी आर्थिक झीज-कष्ट सोसलेले आहेत, आता पुनश्च एकदा आमची घरे-दुकाने उद्ध्वस्त करून आम्हाला देशोधडीला लावू नका असे म्हणत पंढरपुरातील हजारो महिलांनी निषेध मोर्चा (दि. 17 नोव्हेंबर) काढला होता. तसेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आहे. केवळ बाधित होणारे घर-दुकानदारच नव्हे, तर अनेक वारकरी फडकरी, मठाधिपती, वारकरी संघटनाही आंदोलनात उतरल्या आहेत. वारकरी फडकरी संघटना, पाईक संघ, संतभूमी बचाव समिती यांनी बैठका घेऊन कॉरिडॉरला विरोध दर्शविला आहे. दि. 4 नोव्हेंबरला वारकर्‍यांनी मोठा निषेध ‘दिंडी मोर्चा’ काढला. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक, अभयसिंह कुलकर्णी, अ‍ॅडव्होकेट आशुतोष आदी अनेकांनी यासंबंधी पत्रे, निवेदने दिलेली आहेत.
 
 
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वाडा व राममंदिर पाडण्यात येणार असल्याने धनगर समाज संघटनांनी तो अस्मितेचा विषय केला आहे. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी कॉरिडॉरचे निमित्त करून ‘भाजपा-शिंदे सरकार’वर टीका करीत राजकारण सुरू केले आहे. जनतेच्या या रोषावर राजकारणाची पोळी भाजण्याचे काम सुरू झाले आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे समाधान करीत विकासाचा मार्ग कुशलपणे मोकळा करण्याचे फार मोठे आव्हान मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे आहे.
 
 
समस्या निराकरणाचे काही बिंदू
 
 
संभाव्य बाधित लोकांचा व वारकरी महाराज मंडळींचा कॉरिडॉरला असलेला विरोध लक्षात घेऊन कॉरिडॉरचा विषय तूर्त स्थगित करून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील अन्य सर्व योजना सरकारने हाती घेऊन तातडीने पूर्ण केल्या, तर विरोधाची तीव्रता कमी होईल. अन्य विकासकामांना कोणाचा विरोध नाही. कमीत कमी पाडकाम करून कॉरिडॉरची संकल्पना कशी प्रत्यक्षात आणता येईल, याचा पुनर्विचार व्हायला हवा. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंढरपूर बैठकीत म्हटल्याप्रमाणे कॉरिडॉर 76 हजार चौ.मीटर जागेऐवजी, प्लॅन 2प्रमाणे 40 हजार चौ.मी.चा केला, तर बाधितांची संख्या कमी होईल. 1985 साली झालेल्या मंदिराभोवतीच्या रस्ता रुंदीकरणाचा उपयोग व्हीआयपी, पोलीस, मंत्र्यांच्या व सरकारी अधिकार्‍यांच्या मोटारगाड्या थेट मंदिरापर्यंत येण्यापुरताच झाला. स्थानिकांच्या व वारकरी वाहनांना त्या रस्त्यावर कायमची प्रवेश बंदी आहे, शिवाय मंदिर समितीच्या अनेक मजली, अनेक इमारती अपुर्‍या वापरामुळे पडून आहेत, त्यांचाच अधिक सोई-सुधारणा करून वापर करता येईल, अशी सूचना करण्यात आली आहे.
 
 
पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून, पदस्पर्श दर्शन घेण्याची पूर्वापार परंपरा आहे. तिरुपती-वाराणसीत 10 फुटावरून दर्शन घेण्याची पद्धत आहे. पंढरपूरची ही दर्शन पद्धती देशात कोठेच नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनास प्रत्येक वारकर्‍यास लागणारा वेळ लक्षात घेतला, तर तासाला अधिकाधिक 2000 ते 2500 वारकरी दर्शन घेतात आणि वारीच्या काळात 24 तास दर्शन सुरू असते. त्यामुळे एका दिवसात 40 ते 50 हजार भाविकांना पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येतो. हे लक्षात घेऊन नव्या संगणक युगातील तंत्राचा वापर करून प्रत्येक वारकर्‍याला पंढरपुरात प्रवेश करताच पूर्वनिर्धारित दर्शन वेळेचा हँडबँड, टॅग द्यावा आणि गर्दीचे योग्य नियोजन करावे. सध्या वारीच्या काळात पदस्पर्श दर्शनास 8 ते 10 तास रांगेत उभे राहावे लागते. तो वेळ कमी होईल आणि दर्शनबारीमध्ये आवश्यक तेवढीच गर्दी होईल. बाकीचा वेळ वारकरी भजनपूजन, अन्य स्थानभेटी देत बाजारात घालवेल. वैष्णोदेवीला अशी दर्शन वेळेच्या पूर्वनिर्धारणाची सोय आहे. तिरुपतीलाही काही प्रमाणात ती चालू आहे. अशा नव्या कालसुसंगत आधुनिक दर्शन व्यवस्थेतून विठ्ठल मंदिराभोवतीच्या गर्दीचे नियोजन-विकेंद्रीकरण करता येईल का? ‘कॉरिडॉर’ला हा पर्याय असू शकेल का? याचाही सरकारने विचार करावा.
 
 
वारकरी भावदृष्टीतूनच पंढरी क्षेत्राचा विकास व्हावा व जुन्या स्मृती-परंपरांना प्राधान्य देऊन मंदिराभोवतीचे सांस्कृतिक परस्पर सौहार्द सहजीवन जतन करण्याचा प्रयत्न व्हावा, अशी समस्त पंढरपूरकरांची इच्छा आहे.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.