कानडगावची जलगाथा

विवेक मराठी    17-Dec-2022   
Total Views |

krushi vivek
गावकर्‍यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला ‘अण्णासाहेब कदम-पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान’, ‘जनकल्याण समिती’ आणि ‘सेवावर्धिनी’ या संस्थांची जोड मिळाल्याने पाच दशकांपासून पाणीटंचाईचे चटके सोसणारे कानडगाव (ता. राहुरी) हे गाव आज जलसमृद्ध गाव म्हणून नावारूपाला आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अर्धशतकानंतर प्रथमच या गावातील सातही बंधारे, सर्व विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. गावातील 250 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.
 
 
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरापासून 22 कि.मी. अंतरावर ‘कानडगाव’ हे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावच्या एकूण 1800 हेक्टरपैकी वनक्षेत्र वगळता 1100 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यातील बहुतांश क्षेत्र जिरायत आहे. विहिरीच्या उपलब्ध अल्प पाण्यावर गहू, हरभरा, कांदा अशी थोडीफार रब्बी पिके घेतली जातात. उन्हाळी हंगाम मात्र संपूर्ण नापिकीचा जातो. पशुपालन व दुग्धव्यवसाय हाच इथल्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. या ठिकाणाहून दररोज सुमारे वीस हजार लीटर इतके दूध संकलन होते. या गावाचा आर्थिक विकास फारसा झालेला नसला, तरी सामाजिक सलोखा व सामाजिक समरसतेचा भाव हा इथल्या एकोप्याचा आधार आहे.
 
 
 
’अण्णासाहेब कदम-पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान’चे कार्यवाह शिवाजी उदावंत सांगतात, “गावाचा विकास झाला पाहिजे, असे संघाच्या शाखेत जाणार्‍या तरुण स्वयंसेवकांना प्रकर्षाने वाटत होते, पण नेमके काय करायचे आणि कोणी करायचे याचे उत्तर सापडत नव्हते. आपले गाव विकासापासून वंचित राहिले, त्याचे एकमेव कारण म्हणजे येथील पाण्याचे दुर्भिक्ष होय आणि ते दूर केल्याशिवाय गावचा विकास संभव नाही, याची या तरुणांना पक्की खात्री झाली होती. पुढे पाणलोट क्षेत्रविकासात काम करणार्‍या पुणे येथील जनकल्याण समिती आणि देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील ‘अण्णासाहेब कदम प्रतिष्ठान’ या समाजसेवी संस्थांशी या तरुणांचा संपर्क झाला. 1972च्या दुष्काळात या गावात अण्णासाहेब कदम यांच्या पुढाकाराने पाणलोट क्षेत्रविकासाचे काम झाले होते. हा ऋणानुबंध कानडगावच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वाचा दुवा ठरला. 2017मध्ये ‘अण्णासाहेब कदम प्रतिष्ठान’ने पाणलोट क्षेत्रविकासकामासाठी कानडगावची निवड केली. या कामात पुढे पुण्यातील ‘जनकल्याण समिती’, ‘सेवा वर्धिनी’ व ‘अ‍ॅटलास कॉप्को’ या संस्था जोडल्या गेल्या. या सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून कानडगाव जलसमृद्धीचा पथदर्शक प्रकल्प यशस्वी झाला आहे.
 
 

krushi vivek 
 गाळमुक्त तलाव
 
krushi vivek
 
गाळयुक्त शिवार 
 
 
गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार
 
 
गावात 1952 साली पाझर तलाव बांधण्यात आला होता. 1972च्या दुष्काळात शासनाने या तलावातील गाळ काढला होता. त्यानंतर पुन्हा यातील गाळाला कोणी स्पर्शदेखील केला नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठून होता, जल विकासयात्रेचे पहिले पाऊल म्हणून कानडगावात पाणलोट क्षेत्रविकासाचे काम करायचे निश्चित झाले. याबाबत शिवाजी उदावंत म्हणाले, “अण्णासाहेब कदम-पाटील प्रतिष्ठानची आर्थिक अवस्थाच तशी अत्यंत बिकट होती. हे शिवधनुष्य एकट्याने पेलणे शक्यच नव्हते. अशा परिस्थितीत रा.स्व. संघाच्या जनकल्याण समितीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. याच वेळी महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार’ या योजनेतून खोदाई मशीनचा इंधन खर्च मिळाला. यानंतर रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. नानाजी जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन कामास प्रारंभ झाला.
 
 
 
कामाची सुरुवात करण्यासाठी प्रारंभीची रक्कम प्रतिष्ठानने देऊ केली. तलावातील गाळ अत्यंत सुपीक होता आणि खडकाळ जमीन असलेल्या या भागातील शेतकर्‍यांकडून त्याला मोठी मागणीही होती. त्यामुळे तलावातून निघालेला गाळ शेतकर्‍यांनी स्वखर्चाने किंवा स्वत:च्या वाहनाने आपल्या शेतात नेऊन पसरवावा, असे ठरविण्यात आले. तसेच लोकसहभाग म्हणून ग्रामस्थांनी खारीचा वाटा म्हणून आपले आर्थिक योगदानही देऊ केले. या सामूहिक प्रयत्नातून दहा हजार घनमीटरपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला. खोलीकरणामुळे तलावाची पाणी साठवणक्षमता 1 कोटी लीटरने वाढली. या कामानंतर, रा.स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांच्या हस्ते पहिल्या पावसाळ्यात तलावातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. या कामाची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे जलकार्यातही संघासारख्या स्वयंसेवी संस्था उत्तम प्रकारे कार्य करू शकतात, हा विश्वास वाढला.”
 
 
krushi vivek
 
 
krushi vivek
 
 जलवाहिनी प्रवाहित झाल्यानंतर जलपूजन करताना ग्रामस्थ
 

krushi vivek 
 
कानडगावातील पाण्याने
भरलेली विहीर
 
 
जलप्रशिक्षणातून दिशादर्शक कार्य
 
 
सेवावार्धिनीने जलदूत 2 प्रकल्पांअंतर्गत नियोजित प्रशिक्षणासाठी कानडगावची निवड केली. यामध्ये ग्राम जलदूत म्हणून मधुकर गागरे, प्रतिष्ठानचा संस्था जलदूत म्हणून किरण सूर्यवंशी आणि प्रतिनिधी म्हणून प्रतिष्ठानचे कार्यवाह शिवाजी उदावंत यांची निवड केली. या सर्व जलदूतांना आणि संस्था प्रतिनिधींना, तसेच निवडक ग्रामप्रतिनिधींना पुणे, जालना, नांदेड, सांगली आणि मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कृषी विज्ञान केंद्रात वर्षभर टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले जमीन, पाणी, पर्जन्य आणि प्रकल्प याबाबतचे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान मिळाले.
 
 
 
प्रशिक्षण कालावधीतच या प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कानडगावात विविध सर्वेक्षणे करण्यात आली. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाकडून शाश्वत विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये तलावातील वाहून जाणार्‍या अतिरिक्त पाण्याचे नियोजन करण्याच्या उपायावर काम करण्यात आले. गावाच्या पश्चिम दिशेकडील 50 वर्षांपासून बंद पडलेल्या ओढ्यात सोडण्याचा प्रकल्प यशस्वी करण्यात आला.
 
 
परावर्तित जलवाहिनी प्रकल्प
 
 
शाश्वत विकास प्रकल्प आराखड्यानुसार गावातील तलावाच्या बाजूच्या भिंतीपासून थेट पश्चिमेकडील मृत ओढ्यापर्यंत तीन फूट व्यासाच्या सिमेंट वाहिनीचा वापर करून 238 मीटर लांबीची भूमिगत परावर्तित जलवाहिनी टाकण्यात आली. प्रतीक्षा आणि उत्सुकता होती ती चांगला पाऊस पडून तलाव भरण्याची आणि जलवाहिनीतून पाणी दुसर्‍या बाजूने बाहेर पडण्याची. सप्टेंबर 2022च्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस पडून तलाव भरला आणि प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाला. जलवाहिनी प्रकल्पामुळे जवळपास पाच दशकांनंतर गावातील सातही बंधारे पाण्याने तुडुंब भरून वाहिले. गावकर्‍यांनी या पाण्याचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.
 
 
दुबार पिकांची आस
 
 
 
या जलकार्यामुळे 250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यामुळे वर्षानुवर्षे एकबार पीक घेणारे शेतकरी आता दुबार पीक घेण्याची तयारी सुरू करत आहेत. रब्बीचा हंगाम आम्ही प्रथमच पाहणार आहोत असे शेतकरी आनंदाने सांगत आहेत. हे पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकून राहील आणि आम्ही उन्हाळी पिकेसुद्धा घेऊ, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सेवा संस्था, लोकसहभाग व सरकारी योजना यांच्या समन्वयातून कल्याणकारक कार्य उभे राहते, याचा प्रत्यय कानडगावच्या जलविकास कामातून अनुभवास येतो.
 
 
“कानडगाववासीयांनी किफायतशीर
शेती करणे गरजेचे”


“कानडगाव प्रक्षेत्राला मोठ्या धरणांचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे हे गाव बागायत पिकांपासून वंचित होते. इथल्या शेतकर्‍यांचा आर्थिक विकास व्हावा, या भूमिकेतून आम्ही कानडगावाचा जलविकास करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 16 लाख रुपये लागले. ’सेवावर्धिनी’ने व अ‍ॅटलास कॉप्को’ या कंपनीने आपल्या सामाजिक फंडातून एवढा मोठा आर्थिक भार उचलला. त्यामुळे जलसमृद्धीचा हा संकल्प सिद्धीस आला. सेवावर्धिनी आता ‘वर्षाजल संचयन प्रकल्प’अंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी कार्य करत आहे. गावातील हनुमान मंदिराच्या छतावरील पाणी नियंत्रित करून 365 फूट खोलीच्या सहा इंची बोअर घेऊन त्यामध्ये संयचित केले जात आहे. गावातील भूजल पातळी वाढण्यास या प्रकल्पाचीही मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काळात गावातील कृषी उत्पादकता वाढण्यास वाव आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी पाण्याचे व्यवस्थापन करून एकसारखी पिके न घेता वेगवेगळ्या पिकांची लागवड करून किफायतशीर शेती करणे तितकेच गरजेचे आहे.”


krushi vivek
- कार्यवाह
अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान,
देवळाली प्रवरा, ता.राहुरी
संपर्क - 9607979393/
9860373498

 
- कार्यवाह
अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान,
देवळाली प्रवरा, ता.राहुरी
संपर्क - 9607979393/
9860373498

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.