संघर्षवादी, तरीही मुक्त मुक्ता!

विवेक मराठी    30-Dec-2022   
Total Views |
 
 
vivek
पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी कर्करोगाने निधन झाले. नगरसेवक आणि महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी धडाडीने घेतलेले निर्णय आणि त्यांचे राजकीय कार्यकर्तृत्व यांचा आढावा घेणारा श्रद्धांजली लेख.
भारतीय जनता पक्षाने मुक्ता शैलेश टिळक यांना पुण्याच्या शनिवार पेठ-रमणबाग मतदारसंघातून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वप्रथम उमेदवारी दिली, तेव्हापासून मी त्यांचे काम पाहत होतो. उमेदवारी घ्यावी की न घ्यावी, अशा दोलायमान परिस्थितीत त्या होत्या. पण त्यांना ती मिळाली. त्यांनी पक्षाचा तो आदेश मानला. त्या निवडून येणार ही खात्री होतीच, पण अडथळेही काही कमी नव्हते. त्यांना ज्या ज्या वेळी काही शंका असेल, त्या त्या वेळी त्या फोन करून ती त्या बोलून दाखवत. मी मला उमजेल त्यानुसार त्या शंकेचे निरसन करीत असे. त्या नगरसेवक म्हणून कामाला लागल्यानंतर त्यांनी स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे जे एक काम केले असेल, तर ते वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या नाशासाठी मशीन्स तयार करवून घेऊन त्यांनी त्याला सार्वजनिक रूप दिले. त्यांनी ॐकारेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या बागेत असे हे पहिले यंत्र उभे केले आणि पुढल्या काळात त्याचा उपयोग केला जाऊ लागला.
 
 
त्याशिवाय पुण्यातल्या मुलींच्या शाळांमध्ये आणि मुलींच्या महाविद्यालयांत मशीनमध्ये दोन रुपयांचे नाणे टाकून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होईल, अशी त्यांनी व्यवस्था केली. या गोष्टी बोलून किंवा सांगून होत नाहीत, त्या बोलताही येत नाहीत ही गोष्ट ओळखून त्यांनी संबंधित गोष्टी बनविणार्‍या कंपन्यांशी बोलून त्याची यंत्रे बनवून घेतली आणि ती सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. विशिष्ट वयात अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता असते, हा विचारच तोपर्यंत दुर्दैवाने केला गेला नव्हता. त्या महापौर झाल्या, तेव्हा घोले रस्त्यावर महापौर बंगल्यासमोरच्या मोकळ्या जागेवर बराच कचरा गोळा केला जात असे. महापालिकेच्या कचरावाहक मोटारीही तिथेच लावल्या जात असत. तिथे गोळा झालेल्या त्या कचर्‍याचे वर्गीकरण केले जात असे. त्यात प्लॅस्टिकचा बराच कचरा वेगळा केला जाऊ लागला. या एवढ्या प्रचंड प्रमाणात गोळा झालेल्या प्लॅस्टिकचे करायचे काय, हा प्रश्न होताच. अशा वेळी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे काही शास्त्रज्ञ त्यांना भेटायला आले. त्या वेळी त्यांच्याकडे अर्थातच महापौरपद होते. या शास्त्रज्ञांनी मुक्ता टिळक यांना प्लॅस्टिकपासून इंधन बनविण्याच्या योजनेविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगितले. ते त्यांनी स्वत: पाहून, कचर्‍याच्या त्या मोकळ्या जागेतच त्याचा प्लँट उभा करायला परवानगी दिली. तिथे सुक्या कचर्‍यातून प्लॅस्टिक वेगळे केले जाऊ लागले. रोज चार टन प्लॅस्टिकचा कचरा गोळा होत असताना त्यातून रोज काहीशे लीटर इंधन - म्हणजेच पायरोलिसिस ऑइल (लाइट डिझेल ऑइल) तयार करण्याची ही योजना होती. त्यांनी ती लगेच अमलात आणायचे निश्चित केले. त्यांनी या इंधनाविषयी खात्री करून घेऊन ते येरवड्याच्या हॉटमिक्स प्लँटमध्ये वापरण्याचा आदेश दिला. हा प्लँट पुण्यात 2018मध्ये उभारण्यात आला. तो भारतातील पहिला प्लँट असताना आणि त्याच्या निर्मितीचे श्रेय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांना असताना ‘गूगल विद्यापीठा’कडून ते चेन्नईच्या एका जोडप्याला देण्यात आले असल्याचे आढळून आले. पुण्यात, तेही सर्वप्रथम तेव्हाच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या कारकिर्दीत त्या उभारणीस हातभार लागलेला असताना त्याचे श्रेयही मथुरा महापालिकेस देण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. हे सगळे उद्योग 2019नंतर सुरू झाले असतील, पण पुण्यात मुक्ता टिळक यांनी हे काम 2018मध्ये हाती घेऊन यशस्वी करून दाखविले. त्यांना प्रसिद्धीचे तंत्र माहीत नसल्याने असेल, त्याचे श्रेय दुसर्‍याच कुणालातरी गेले. अर्थात त्याने त्यांचे काहीही बिघडले नाही, महापालिकेचे पैसे वाचले, ही गोष्ट निखळ सत्य आहे. या प्लँटसाठी महापालिकेला एक पैसाही खर्च करावा लागला नाही. प्लँट उभारण्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक कार्यनिधीतून (सीएसआर फंडमधून) 2 कोटी रुपयांएवढा निधी गोळा करून हा प्लँट उभारला गेला. तो प्लँट उभा करणार्‍या कंपनीकडून पुणे महापालिकेला दरमहा 15 हजार रुपये त्या जागेच्या भाड्यापोटी दिले जात होते, ते वेगळेच. हॉटमिक्स प्लँटच्या इंधनावर खर्च होणारे महापालिकेचे दरमहाचे एक लाख रुपये वाचले, म्हणजे वर्षाकाठी 12 लाख रुपये वाचले. या पैशाचे एक वेळ जाऊ द्या, पण पुण्यात एरवी इतस्तत: विखरून पडलेला प्लॅस्टिकचा कचरा या अशा कार्यासाठी उपयुक्त ठरला, हे काय कमी महत्त्वाचे आहे? एरवी बंगळुरूमध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणात वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकचे आम्हा पत्रकार मंडळींनी केवढे म्हणून कौतुक केले होते, ते विसरता येत नाही. दुर्दैवाने मुक्ता टिळक यांच्या महापौरपदाची मुदत संपल्यानंतर या प्लँटला तिथून काढता पाय घ्यावा लागला. आपल्याला त्या जागेवर ‘सिटी सेंटर’ आणि वाचनालय उभारायचे आहे असे सांगून त्या जागेवरून त्या प्लँटला दुसरीकडे हलविण्यास भाग पाडण्यात आले. या प्लँटसाठी आयुक्तांनी फुरसुंगीजवळ जागा देऊ केली, पण ती त्या कंपनीला मान्य नव्हती. त्यांना पुन्हा सगळी फेरमांडणी करावी लागली असती, हा विचार करून कंपनीने सुपे औद्योगिक वसाहतीत आपला प्लँट उभा केला आहे. थोडक्यात तेलही गेले आणि तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले, तसे हे आहे. महापालिकेच्या हॉटमिक्स प्लँटच्या इंधनासाठी आता महापालिकेला पैसे मोजावे लागतात आणि पुण्यातले प्लॅस्टिक आता पुन्हा गावभर कुणी आम्हाला उचलता का, म्हणून वाट पाहत विखुरले गेले आणि ये रे माझ्या मागल्या म्हणून पुन्हा कचर्‍याची ओरड सुरू झाली.
 
 
 
मुक्ता यांचे नगरसेविका असल्यापासूनचे स्वतंत्र कार्यालय होते; पण त्यांच्या त्या कामात त्यांचे पती शैलेश फारसे कधीही लक्ष घालत नसत, त्या तसे घालूही देत असतील असे वाटत नाही. आपण भले आणि आपले काम भले, ही त्यांची वृत्ती सदोदित राहिली होती. अतिशय विनयशील म्हणून त्यांच्याकडे कायमच पाहिले जात होते. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे किमान सहा महिने महापौरपद आणि आमदारपद अशा दोन्ही पदांचा अधिकार होता. त्याचाही त्यांनी योग्य वापर करून घेतला. त्यांनी आपण कोणीतरी खूप मोठ्या पदावर आहोत, हा भाव कधीही दाखविला नाही. त्या आणखी जगायला हव्या होत्या. त्यांना हा विकार जडला नसता, तर त्या नक्कीच राज्यात मंत्री झाल्या असत्या. त्यांचा कामाचा उरक लक्षात घेऊन मंत्रिपदच त्यांच्याकडे चालत आले असते, पण ते घडायचे नव्हते.
 
 
 
त्यांनी आपल्या नगरसेविकापदाच्या काळात केलेल्या कामांची यादी मोठी आहे. नगरसेविका बनल्या, त्याच वर्षात - म्हणजे 2002मध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यात आपल्या प्रभागात भिडे पुलाजवळ एक विसर्जन हौद बांधून घेतला. घरच्या गणपतींचे विसर्जन त्या हौदात करायचे आवाहन त्यांनी केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तिथे महानगरपालिकेचे सेवक ठेवून त्यांनी हा उपक्रम राबविला आणि पुढे दर वर्षी अन्य प्रभागांमध्ये त्याचे अनुकरण केले गेले. आपली नदी स्वच्छ राहावी यासाठी त्यांचे हे प्रयत्न आज नक्कीच कारणी लागले आहेत आणि पाणी ओसरल्यावर दिसणारी गणेशमूर्तींची विटंबनाही थांबली. मुख्य म्हणजे नागरिकांमध्ये आपली जीवनवाहिनी स्वच्छ राहावी ही उमेद तयार झाली. नदीच्या पाण्याचे प्रदूषण काही प्रमाणात तरी रोखण्यात यश आले.
 
 
 
शनिवारवाड्यापासून केळकर रस्त्याच्या टोकाशी असणार्‍या आयुर्विमा कार्यालयापर्यंत नदीपात्रालगत एक रस्ता काढला जाणार होता. गेली अनेक वर्षे ही योजना चर्चेत होती. ती पुन्हा हाती घेतली जाणार असे दिसताच त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन तिथल्या अनेक मालमत्ताधारकांचे गार्‍हाणे त्यांच्या कानावर घातले आणि या रस्त्याला त्यांनी स्थगिती मिळविली. पुण्यातल्या कार्यक्षम आणि तडफदार नगरसेविका ही त्यांची ओळख होती आणि त्यांच्याकडे काम घेऊन अनेक जण जात, तेव्हा कोणीही विन्मुख होऊन परत जात नसे. त्याचे काम कशा स्वरूपाचे आहे ते पाहून त्या संबंधित खात्याच्या व्यक्तीशी त्वरित संपर्क साधत आणि त्याचे काम त्वरेने कसे होईल ते पाहत. न चिडता आणि शांत राहूनही समाजकार्य करत येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी आनंदवन मित्रमंडळाच्या वतीने अनेक संस्थांनाही मदत केली. त्यात अहमदनगरचे स्नेहालय, पंढरपूरचे पालवी, तसेच महामानव डॉ. बाबा आमटे सेवा संस्था, ममता फाउंडेशन, आनंदवन वरोरा यासारख्या संस्थांनाही त्यांनी मदत केली आहे. रोटरी आणि लायन्स क्लबसारख्या संस्थांनी त्यांच्या सेवाभावाला आपलाही हातभार लावला आहे.
 
 
त्यांना शिकण्याची हौस होती. त्या आधी विमलाबाई गरवारे प्रशालेत आणि नंतर फर्ग्युसनमध्ये शिकल्या. मानसशास्त्र हा बीएला त्यांचा विषय होता. लग्नानंतर त्यांनी एमबीए केले. त्यांनी याच काळात भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या मुळातच अत्यंत हुशार होत्या आणि सर्वच विषयांतली त्यांची समज अतिशय चांगली होती. त्या गेली काही वर्षे कर्करोगाशी अक्षरश: झुंझत होत्या. त्यात त्यांचे निधन झाल्याने पुणेकरांचे आणि एकूणच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.