घरबसल्या (बसल्याच) घणाघात!

विवेक मराठी    01-Feb-2022   
Total Views |
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातूनच ऑनलाइन माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. आपल्या सरकारच्या कर्तबगारीबद्दल वा कार्याबद्दल आणि वडिलांच्या मोठेपणाबद्दल बोलायचे सोडून मजबूर मुख्यमंत्र्यांची गाडी फक्त भाजपा आणि भाजपावर घसरली. आपल्या सहकारी पक्षांकडून होणारी अवहेलना आणि मुस्कटदाबी यांबद्दल बोलण्याची हिंमत नसल्यामुळे भाजपावर निशाणा साधण्यात त्यांनी धन्यता मानली.

political

गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक न दिसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अखेर प्रकटले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोधामृत पाजले. आपल्या वडिलांच्या (तेच ते, ज्यांनी भाजपाशी युती केली होती, परंतु त्या युतीचा मान न राखता आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री बनून दाखवू, असे वचन उद्धवजींनी दिले होते) जयंतीनिमित्त त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. खरे तर अडीच वर्षांची सत्ता आणि शिवसेनाप्रमुखासारख्या वडिलांची जयंती असा योग साधून दुसर्‍या एखाद्याने आपल्या कर्तृत्वाची उजळणी केली असती. आपण काय-काय केले आहे आणि काय-काय करायचे आहे, याचा पाढा वाचून दाखविला असता. परंतु ज्यांच्या आडातच काही नाही, ते पोहर्‍यात काय दाखविणार? मग आपल्या आजारी आवाजाची आणि त्यापेक्षाही जास्त रोगट मानसिकतेची चुणूक दाखवत उद्धवजींनी भाजपावर शेरेबाजी करण्यात धन्यता मानली.
 
वास्तविक शिवसेनेची अवस्था सध्या गलितगात्र की काय म्हणतात तशी झालीय. ‘पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी?’ असा प्रश्न विचारणार्‍या सत्यभामेसारखी सर्वसामान्य शिवसैनिकांची अवस्था झालेली. कधी रामदास कदम, कधी हेमंत पाटील यांच्या, तर कधी अन्य कोणाच्या तोंडातून या व्यथेचा, या नाराजीचा उच्चार होत असतो. मुख्यमंत्रिपदी आपला माणूस असला तरी कामे राष्ट्रवादी काँग्रेसचीच होतात, पक्षाची ताकदही त्यांचीच वाढते, या ना त्या निवडणुकीच्या निमित्ताने ही वस्तुस्थिती बाहेर येते, हे एव्हाना शिवसैनिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. परंतु ही अस्वस्थता सांगणार कोणाला? त्यांचा नेता मजबूर आणि अंथरुणाला खिळलेला. अंथरुणावर नसतानाही तो कधी मैदानात यायला तयार नाही आणि मैदानात उतरल्यावर शेवटपर्यंत लढायची धमकही नाही. शरद पवारांच्या मर्जीनुसार चाललेल्या पक्ष आणि सत्तेच्या खेळात सामान्य प्याद्यांएवढीसुद्धा किंमत शिवसेना कार्यकर्त्याला उरलेली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तगमग नेमकी पकडली, परंतु त्याबद्दल नंतर बोलू.
 
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्या सरकारच्या कर्तबगारीबद्दल वा कार्याबद्दल आणि वडिलांच्या मोठेपणाबद्दल बोलायचे सोडून मजबूर मुख्यमंत्र्यांची गाडी फक्त भाजपा आणि भाजपावर घसरली. आपल्या सहकारी पक्षांकडून होणारी अवहेलना आणि मुस्कटदाबी यांबद्दल बोलण्याची हिंमत नसल्यामुळे भाजपावर निशाणा साधण्यात त्यांनी धन्यता मानली. हे उद्बोधन म्हणजे कुचाळक्या-कम-उद्वेग होता. एका जुन्या मराठी म्हणीतूनच सांगायचे तर ‘घरातली ऐकेना अन् बाहेरचा म्हणतो पदर का घेईना’ असे बोलणे होते. नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या झालेल्या वाताहतीचे वैफल्य त्यात शब्दाशब्दाला दिसत होते. आपल्याच (नव्या) मित्रपक्षांनी केलेली ‘वाघाची ससेहोलपट’ त्यात जाणवत होती अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि शिवसेनेच्या ताटाखालच्या माध्यमांनी याचे वर्णन घणाघात असे केले आहे! आपण शब्द किती स्वस्तपणे वापरतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.


political

गेली अडीच वर्षे राज्य एकामागून एक भीषण संकटांतून जात असताना राज्याचा नेता मैदान सोडून घरात बसला होता. त्या राजाने देवळे बंद करण्याचा आदेश दिल्यावर राजाचे चाकर उलट ‘देवानेच मैदान सोडले’ म्हणत लोकांच्या श्रद्धेची टर उडवत होते. अश्राप साधूंना एकटे गाठून जमाव पोलिसांदेखत जीवे मारत होता. बांधावर जाऊन मदत देण्याच्या गमजा करणारे उंबरठा ओलांडायला तयार नव्हते. तेव्हा हा घणाघात कुठे होता?
 
या घणाघाताच्या नावाखाली उद्धवजींनी आपली जुनीच टेप वाजविली. भाजपासोबत युतीमध्ये 25 वर्षे सडली हे त्यांनी पुन्हा सांगितले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम उत्तर दिले - ‘आपला पक्ष सडला असे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात, पण भाजपासोबत असताना तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. आता भाजपाला सोडल्यानंतर तो चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला.’ आता यात नक्की कोण कोणासोबत सडले?
 
क्रमांक वगैरे सोडूनच द्या, शिवसेना ही त्यांच्या कथित सहकारी पक्षांच्या दृष्टीने खिजगणतीतही राहिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी गोव्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न चालविला. शिवसेनेने काँग्रेस व स्थानिक पक्षांसोबत महाराष्ट्रासारखी गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात काँग्रेसला 30 जागा देण्याची तयारी दाखविली होती. काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावला. धुडकावून लावला म्हणण्यापेक्षा त्याची दखलही घेतली नाही. आमचा प्रस्ताव मान्य केला नाही, हे स्वत: शिवसेनेला सांगावे लागले. मग ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घेतला. ही यांची किंमत!
 
फडणवीस म्हणाले तसे, सोईचा इतिहास आणि निवडक विसरणे या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पाहायला मिळाल्या. 25 वर्षे आम्ही युतीत सडलो असे ठाकरे म्हणाले. पण 2012पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांपेक्षा उद्धवजी जास्त शहाणे? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवले का?

उद्धवजी म्हणाले, “आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, रामजन्मभूमीसाठी आम्हीच तिथे होतो.” शिवसेनेचा कोणता नेता राममंदिर आंदोलनात होता? रामजन्मभूमी आंदोलनात लाठ्या, काठ्या आणि गोळ्या खाणारे मुख्यत: संघपरिवारातील कार्यकर्ते होते. अन्य हिंदुत्ववादी पक्षही होते. अन्य सगळे होते, फक्त शिवसेना सोडून! आता सत्ता मिळाल्यानंतर आपल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक विषय नरेंद्र मोदी यांनी तडफदारपणे सोडवून दाखविला - मग तो रामजन्मभूमी असो किंवा काश्मीरचा मुद्दा! मोदींनी करून दाखविले. दुसर्‍यांच्या हेलिकॉप्टरमध्ये फुकटातील फेर्‍या मारून फोटोग्राफी नाही केली. कित्येक पिढ्यांचे स्वप्न असलेले राममंदिर आता अयोध्येत उभे राहत आहे. त्याला कोणाचे श्रम कारणीभूत आहेत, हे सगळ्या जगाला माहीत आहे. यांना साधे दुर्गाडी आणि श्रीमलंगगडसुद्धा सोडविता आलेले नाहीत. दूर कशाला, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायलासुद्धा यांचे हात धजत नाहीत. ज्या बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त साधून उद्धवजींनी मनातली ही मळमळ बाहेर काढली, त्याच बाळासाहेबांनी औरंगाबादला संभाजीनगर हे नाव दिले होते. ते नामांतर पूर्ण करण्याचे वचन यांनी आपल्या पिताश्रींना दिले नव्हते का? योगी आदित्यनाथांनी अलाहाबादचे प्रयागराज केले, मुगलसरायचे पं. दीनदयाळ उपाध्याय स्थानक केले, यांना साधे उस्मानाबादचे धाराशीव करता आलेले नाही.
 
देवेंद्रजींनी या वेळी धर्मवीर आनंद दिघेंचा उल्लेख केला. मलंगगडासाठी आनंद दिघे आणि संघकार्यकर्त्यांनी संघर्ष केला. स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याचे हे स्वप्नसुद्धा उद्धवजी पूर्ण करू शकले नाहीत. या असल्या दुबळ्या सौभाग्याला घेऊन शिवसैनिकाला जगायचे आहे. ज्या शिवसैनिकांना ही वेदना सहन होत नाही, ते मग अन्य पर्याय शोधतात. म्हणूनच ज्या दिवशी उद्धवजी हा तथाकथित घणाघात करत होते, त्याच दिवशी - म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच मीरारोड येथील शिवसेना विभागप्रमुख संजय वर्तक यांनी भाजपात प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासमवेत अनेक शिवसैनिक होते, हे वेगळे सांगायला नको. शिवसेनेची सत्ता असतानाही बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपामध्ये प्रवेश करण्याचे कारण काय? हा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, की आता आम्ही शिवसेनेत काम नाही करू शकत. आमचा आता शिवसेनेवर विश्वास नाही राहिला, म्हणून ते आत्मविश्वास असलेल्या भाजपामध्ये येत आहेत.
 
हे आहे जमिनीवरचे वास्तव. केवळ वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांवर घणाघात म्हटल्याने तो घणाघात होत नाही. संस्कृतमधील एक वचन आहे, ‘न हि घृतवचनेन पित्तं नश्यति.’ केवळ तूप-तूप म्हटल्याने पित्त जात नाही, त्यासाठी तूप खावे लागते. केवळ मोठमोठे आणि जहरी शब्द वापरून घणाघात होत नसतो, त्यासाठी धमक लागते. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ ही वृत्ती तिथे चालत नाही.
 
मुख्यमंत्र्यांमध्ये एवढीच धमक असेल तर त्यांनी आपल्या सहकारी काँग्रेस पक्षाचे ढुढ्ढाचार्य नाना पटोले यांना वेसण घालून दाखवावी. कानात वारे शिरलेल्या वासरासारखे ते राजकारणाच्या शिवारात वावरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी अनेकदा घाणेरडी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. एखाद्या दारुड्या गावगुंडासारखे त्यांचे वागणे-बोलणे आहे. त्याला त्यांनी आवर घालून दाखवावा. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधानांबद्दल नव्हे, तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. पण तसला कोणी गुंड असल्याचे पोलीस यंत्रणेला माहीतच नव्हते. या असल्या गणंगांसोबत उद्धव ठाकरे सत्ता चालवीत आहेत.. किंबहुना सत्तेची झूल पांघरून वावरत आहेत. हे बिंग कधीचेच फुटले आहे, पण डोळे मिटून दूध पिणार्‍या वाघासारखे (अं हं, मांजरीसारखे) त्यांनाही वाटते की कोणाला हे सोंग कळत नाही. मग त्यासाठी घणाघात, टोला वगैरे शब्दांची सरबत्ती करण्यात येते आणि सत्तेने उपकृत झालेल्या टोळ्या तेच शब्द पुढे चालवितात. परंतु नागडे फिरणार्‍या राजाला जसे एका लहानग्याने वास्तव लक्षात आणून दिले होते, तसेच याही राज्यकर्त्याला कोणी तरी नि कधीतरी सांगेनच की आपली सगळी तलवारबाजी घरातच चालू आहे. त्याचे प्रत्यक्ष फलित शून्य आहे.
 
 

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक