चार वर्षांचा अनाथ ते चाळीस अनाथांचा आधार

विवेक मराठी    15-Feb-2022   
Total Views |
 @मृगा वर्तक 
     मो - ९६०७७३९१४८  
पालघर जिल्ह्यातील विरारजवळील भाताणे गावातील रहिवासी विशाल परुळेकर, वयाच्या चौथ्या वर्षापासून अनाथ असलेला हा तरुण आज अनेक अनाथांना आधार देतो आहे. त्याच्या या कार्याची सुरुवात कशी झाली हे आपण त्याच्याच शब्दातून जाणून घेऊया.
 
vishal

विशाल म्हणतात, “एक आजीबाई होत्या. त्यांना कृष्ठरोग होता. पण दवाखान्यात दाखल केल्यानंतर एक नवाच प्रश्न होता की त्यांच्या एकुलत्या एका गणेशला कुठे ठेवावे?” आणि त्या गणेशपासून विशाल परुळेकरांच्या ‘साई परिवाराचा’ श्रीगणेशा झाला.
 
विशाल तेव्हा २१-२२ वर्षाचा होता. त्याला अनाथांविषयी अतिशय कळवळा होता. त्याचं कारणही होतंच तसं. विशाल सव्वा महिन्याचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. वडिलांचाही मृत्यू झाला. विशाल सर्वार्थाने अनाथ झाला. मिळेल तसे आयुष्य जगताना त्याने भीक मागायला सुरुवात केली. साईबाबांच्या मंदिरासमोर तो भीक मागत असे. त्यावेळी त्याला अनेकांनी मदत केली. विरारचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नोकरी दिली आणि विशालचं भीक मागणं थांबलं.
 
आपल्याला झालेला त्रास इतरांना भोगावा लागू नये म्हणून विशालने त्यावेळीपासूनच अनाथांना मदत करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला स्टेशनरीचे समान घेऊन देणे किंवा शाळेचे किंवा परीक्षांचे शुल्क भरण्यास मदत केली. गणेशला घरी घेऊन आल्यानंतर मात्र अनेक अनाथ मुलांना साई परिवाराने आश्रय दिला. एका निराधार मुलाला आधार दिल्यापासून आज तेरा वर्षात ८०हून अधिक अनाथ मुले साई परिवाराचा भाग झाली. आजच्या घडीला ३६ मुले व मुली विशाल व अंकिता यांच्यासोबत राहतात. येथे कोणी कर्मचारी नाही त्यामुळे परिवारातील सदस्यच सारी कामे वाटून करतात.
 
नुकतीच विशी पार केलेला तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहण्यात दंग असतो.. आयुष्यात आर्थिक स्थैर्य कसे येईल या प्रयत्नात तो गढून गेलेला असतो. परंतु विशालच्या महत्वाकांक्षा त्याहूनही मोठ्या होत्या त्याजोडीला त्याचं मनही तेवढंच विशाल होतं. शून्यातून उभारी घेऊन ऐन तारुण्यात ४० जणांच कुटुंब चालवणं सोपं काम नसतं. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. एखादी जबाबदारी घ्यायची म्हणजे तेवढीच कडवी वचनबद्धता हवी. मात्र स्वतःच्या लहानशा संसारात घर हरवलेल्याचं कुटुंब सांधायचा प्रयत्न विशाल करत आहेत.
 
विशाल परुळेकर यांच्या पत्नी अंकिता परुळेकर यांची या साई परिवाराच्या उभारणीत मोलाची कामगिरी आहे. विशाल म्हणतो, कधी गाडी बाहेर लावून घरात येतोय तर कुठेतरी कोपऱ्यात भिंतीला टेकून उभं राहिलेलं, बावरलेलं गोड पोर डोळ्यात कुतूहल घेऊन आपल्या होऊ घातलेल्या आबांकडे पाहत असतं. तेव्हा समजून जावं की अंकिताने आपली आईपणाची जबाबदारी मलाही न सांगता परस्पर घेतलेली आहे!

vishal 
या परिवारात मुलांना बारावीपर्यंत शिक्षण देऊन नंतर शिलाई काम, बांधकाम, नर्सिंग, मोबाईल दुरुस्ती कोर्स करायला देऊन तसेच गरजेपुरते साहित्य विकत घेऊन दिले जाते. त्यानंतर मुले आपली आपली वाट शोधण्यास परिवारातून बाहेर पडतात. या सुरुवातीच्या वर्षांत त्यांना जगाशी दोन हात करण्याची चांगलीच सवय झालेली असते. मग ते आपापले मार्ग जोखण्यासाठी बाहेर पडतात. परंतु मुलींना मात्र लग्न होईपर्यंत साई परिवारात आश्रय मिळतो. अशा चार मुलींची लग्ने विशालने लावली आहेत. आजही त्यांच्या परिवारात ७ मुली आहेत. अंकिता मुलींना शिवणकामाचे धडे देतात तसेच त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. त्यातही त्या मुलींना प्रशिक्षित करून घेतात. जेणेकरून पुढील आयुष्यात त्यांना कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
 
विशाल यांचा स्वतःचा टेम्पो होता. त्यावरून त्यांच्या संपूर्ण परिवाराचा चरितार्थ चालत होता. परंतु कोविडच्या पहिल्या लाटेत त्यांना आपला टेम्पो विकावा लागला. आता ते गाडी भाड्यावर घेऊन आपले व कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. त्याचबरोबर मुली व अंकिता आपले शिवणाचे काम व ब्युटीपार्लर चालवून संसाराला हातभार लावत असतात. आताशा समाजातील काही लोकांनी विशाल यांचे काम पाहून त्यांना मदतीचे हात पुढे केले आहेत. परंतु ही मदत पुरेशी नाही. त्यांना किरणामालासाठी महिन्याला साधारण २० ते २२ हजार रुपये इतका खर्च येतो. त्याव्यतिरिक्त वेगळे खर्च आहेतच. मुले वाढत्या वयाची आहेत, दूर गावात राहणे, पायी शाळेत जाण्याने मुलांना भूक लागते. एकंदरीतच गरजा जास्त असल्यामुळे जुने, वापरलेले किंवा फाटलेले असतील तरीही असे कपडे द्यावे असे ते आवाहन करतात. परंतु लोकांनी पाठवलेले कपडे इतक्या वाईट अवस्थेत असतात की त्यांची पायपुसणीसुद्धा शिवता येत नाहीत. परुळेकर दाम्पत्य तेही फुकट घालवत नाहीत. मग त्या कपड्यांच्या पिशव्या शिवून विकल्या जातात.
 
स्वामी विवेकानंद युवा सन्मान, ब्राम्हण सभा गिरगाव यांचा सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार, जीवन विद्या मिशनचा समाजभान सन्मान, We need you society यांचा शिक्षणव्रती पुरस्कार, ज्येष्ठ समाजसेवक जगदीश सामंत स्मृती पुरस्कार, श्री गुरुजी स्मृती सेवा पुरस्कार(सांगली), कर्मवीर भाऊराव पाटील समाजरत्न सन्मान, रोटरी क्लब ऑफ इंडिया यांचा मुंबई मेरी जान सन्मान, नाना पालकर स्मृती पुरस्कार, असे अनेक सन्मान विशाल परुळेकर व त्यांच्या परिवाराला लाभले आहेत.
 
समाजात आर्थिक स्थिती उत्तम असलेले अनेक जण अशा समाजकार्यासाठी आपला वेळ व पैसा खर्चत असतात परंतु स्वतः गरीब पार्श्वभूमीतून आलेले विशाल अनाथांसाठी काम करत आहेत, यातून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित होते. असंख्य आपत्तींशी झगडत त्यांनी आपल्या स्वप्नाला आणि मुलांच्या यशाला उभारी दिली तसेच कोरोनाचा मोठा फटका बसूनसुद्धा त्यांनी त्यांचे हे काम अविरत चालू ठेवले आहे. अवघं आयुष्य अनाथांसाठी समर्पित करण्याऱ्या विशाल परुळेकरांच्या साई परिवाराची ही गोष्ट. साप्ताहिक विवेककडून त्यांच्या या परिवाराला अनेक शुभेच्छा.

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.