‘हिजाब’ बंधनातले स्वातंत्र्य

विवेक मराठी    18-Feb-2022
Total Views |
‘हिजाब’ हा पूर्णपणे धार्मिक विषय आहे, ज्याला कुठल्याही प्रकारे थोडाबहुत ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हा भाग सोडला, तर भारतीय संविधानाला अपेक्षित ‘कायदेशीर’ अर्थबोध नाही. हिजाब म्हणजे बंधन, जे स्त्री आणि पुरुष दोहोंना लागू असते. स्त्रियांसंदर्भात ‘हिजाब’चे नियम क्लिष्ट आहेत, तेच पुरुषांसंदर्भात बर्यापैकी ‘नीतिमत्तेवर’ आहेत. पण अर्थातच त्याची चर्चा फारशी होत नाही, होते ती स्त्रियांसंदर्भात असणार्या बंधनांची!

musalim
शीर्षक वाचून वाचकांचा गोंधळ उडू शकतो, कारण बंधनात कसले आलेय स्वातंत्र्य? पण विषय जर ‘हिजाब’ असेल, तर मात्र वरील शीर्षक चपखलपणे लागू होते! ‘हिजाब’ हा सध्या कर्नाटकातील वादामुळे गाजणारा विषय आहे. जाहीरपणे ‘हिजाब’ ह्या विषयाची चर्चा सुरू झालीय, हा विषय धार्मिक की कायदेशीर, हिजाब घालणे योग्य की अयोग्य, हिजाब परिधान करणे - न करणे हा वैयक्तिक व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय नाहीय का? धार्मिक संकल्पनांची तपासणी कायदेशीर बाबींवर करणे योग्य की अयोग्य.. असे एक ना अनेक असंख्य प्रश्न बर्याच लोकांना पडले असतील. पण एक गोष्ट अशी आहे की ज्याची वरील सर्व प्रश्नांच्या पलीकडे जाऊन चर्चा करणे अपेक्षित आहे, ही चर्चा झाली तरच मुळात हिजाब म्हणजे काय हा मूळ प्रश्न समजेल आणि तो मूळ प्रश्न समजला की वरील प्रश्नांची आणि तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य लोकांना ह्या विषयावर रोज पडणार्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
 
 
‘हिजाब’ ह्या अरबी शब्दाचा लाक्षणिक अर्थ होतो ‘बंधन’! ‘हिजाब’ हा शब्द ‘कुराण’मध्ये फक्त सात वेळा वापरला गेलाय. होय, फक्त सात वेळा! पण तरीही ‘हिजाब’मागील गूढ आणि टॅबूचे वलय मात्र प्रचंड मोठे आहे. कुराणमध्ये जरी हा शब्द सात वेळाच वापरला गेला असेल, तरीही ‘हदित’मध्ये मात्र ‘हिजाब’ विषयावर विस्तृत विवेचन सापडेल. इस्लामी धार्मिक संकल्पना ह्या फक्त आणि फक्त दोन गोष्टींवर उभ्या आहेत - एक पवित्र ‘किताब’ म्हणजे ‘अल कुराण’ आणि दुसरी मोहम्मद पैगंबर ह्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी, नियम, आचरण, स्वत:ला, कुटुंबाला आणि त्यांच्या अनुयायांना घालून दिले, त्याचे त्यांच्याच काही अनुयायांनी ठेवलेल्या नोंदी, ह्या नोंदींना म्हणतात ‘हदित’. प्रेषित मुहंमद पैगंबर विशिष्ट परिस्थितीमध्ये कसे वागले, कसे बोलले याच्या नोंदी म्हणजे ‘हदित’. कुराणाचा प्रेषितांच्या आयुष्याचा संदर्भकोश म्हणजे ‘हदित’. कुराणातून न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे ‘हदित’मधून देण्याची प्रथा आहे. अगदी शयनकक्षापासून, परिधानापासून तर थेट धर्मयुद्ध, नीतिशास्त्र इथपर्यंतचे सर्व आदेश किंवा दिशा हदितमधून मिळतात, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. प्रेषितांच्या मृत्यूनंतर शंभर-दीडशे वर्षांनी प्रेषितांच्या स्मृतिकथा संकलित करण्याचे काम सुरू झाले होते. ‘हदित’चा विचार केला, तर केवळ सहा संकलकांना प्रमाण मानले जाते. त्यातल्या सहिह बुखारी आणि सहिह मुस्लीम यांनी संकलित केलेल्या हादिस संग्रहांना खूप मानाचे स्थान आहे. ‘सहिह’ या शब्दाचा अर्थच विश्वसनीय असा होतो. उरलेले इतर चार आहेत, हे ह्या दोघांनंतर विश्वासार्ह आहेत. ‘हिजाब’चा विचार केला, तर कुराणनंतर हदितमध्ये काय म्हटलेय, ह्यावरून इस्लामी इमाम, उम्माह हे निर्णय घेतात. अर्थात बरेच निर्णय वादग्रस्त ठरतात. इमामांमध्ये किंवा ‘अल बाहित’ म्हणजे इस्लामी संशोधकांमध्येसुद्धा ‘हदित’ किंवा ‘कुराण’ यात सांगितलेल्या अरबी ‘सुराह’च्या आणि ‘आयतीं’च्या अर्थबोधावर आणि आजच्या लाक्षणिक निर्णयांवर मतभेद होतात. शेवटी शरिया कायद्याप्रमाणे कायदापीठ निर्णय घेते. मतभेद होतात त्याला मुख्य कारण असावे अरबी भाषेचे क्लिष्ट व्याकरण आणि कालपरत्वे स्थिती आणि इस्लामची व्युत्पत्ती! एकूण काय, तर ‘हिजाब’ हा पूर्णपणे धार्मिक विषय आहे, ज्याला कुठल्याही प्रकारे थोडाबहुत ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हा भाग सोडला, तर भारतीय संविधानाला अपेक्षित ‘कायदेशीर’ अर्थबोध नाही. वर म्हटले, तसे हिजाब म्हणजे बंधन, जे स्त्री आणि पुरुष दोहोंना लागू असते. स्त्रियांसंदर्भात ‘हिजाब’चे नियम क्लिष्ट आहेत, तेच पुरुषांसंदर्भात बर्यापैकी ‘नीतिमत्तेवर’ आहेत. पण अर्थातच त्याची चर्चा फारशी होत नाही, होते ती स्त्रियांसंदर्भात असणार्या बंधनांची! ही सगळी मूळ बंधने नेमकी काय आहेत, ते बघू या.
सुराह 24 (अन-नूर) अयाह 30 -
 
‘आस्तिक पुरुषांना सांगा की त्यांची ‘दृष्टी’ (काही) कमी करा आणि त्यांच्या खाजगी भागांचे रक्षण करा. त्यांच्यासाठी ते अधिक शुद्ध आहे. नि:संशय, ते जे काही करतात ते अल्लाहला माहीत आहे.’ - कुराण, 24:30
सुराह 24 (अन-नूर) अयाह 31 -
 
 
musalim
‘श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये. त्याव्यतिरिक्त (स्त्रियांच्या शरीरावरील जागा) ज्या सहजासहजी दृष्टिक्षेपात येतील. त्याचबरोबर आपल्या (स्त्री) छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये. परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले, आपल्या मेलमिलाफाच्या (मैत्रिणी) स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, आपल्या हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा (लैंगिक) हेतू (दृष्टी) बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी (ऋतुचक्र) अद्याप परिचित झाली नसतील (त्यांच्यासमोर प्रकट करू शकतात). (स्त्रियांनी) आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपवलेला आहे, त्याचे ज्ञान (इतर) लोकांना होईल. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्व जण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप व्यक्त करा, अपेक्षा आहे की सफल व्हाल!’ - कुराण, 33:59
सुराह 33 (अन-अहजब) अयाह 59 -
 
 
‘हे नबी (स.)(प्रेषित पैगंबर), आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या परिधानाचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय, जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.’ - कुराण 33:59.
 
 
कुराणला अपेक्षित असलेला ‘हिजाब’ बंधनाचा अर्थ असा आहे की हिजाब परिधान करणारी स्त्री तिचे सौंदर्य दाखवण्याच्या आणि तिच्या सभोवतालच्या इतर स्त्रियांशी स्पर्धा करण्याच्या व्यर्थ आणि स्वार्थी इच्छेपासून स्वत:ला मुक्त करते. स्वत:चे सौंदर्य खुलवणे ही स्त्रीची एक जन्मजात इच्छा असते, जी ‘हिजाब’ परिधान करून विनयशील प्रदर्शनाने आणि नम्रता आणि आच्छादनाने नियंत्रित केली जाते. हिजाब हे दर्शवते की स्त्रीला समाजाला अपेक्षित गोष्टींनुसार जगण्याची गरज नाही आणि तिला तिच्या सभोवतालच्या लोकांकडून मान्यता किंवा स्वीकृती मिळवण्यासाठी तिच्या सौंदर्याचा वापर करावा लागणार नाही. वर नमूद केलेल्या अल-अहजाबच्या अध्यायात, ‘तो सर्वशक्तिमान (ईश्वर) म्हणतो हिजाबचा अर्थ काय आहे? स्त्रियांना योग्य/अयोग्यतेची जाण असेल आणि त्यांचा गैरवापर होणार नाही.’ अशा प्रकारे, हिजाबच्या कार्यांपैकी एक म्हणजे शोषण आणि हानीपासून महिलांचे संरक्षण करणे. ह्यामध्ये विशेषत: लैंगिक शोषणाचा आणि छळाच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. इतर समाजात पुरुषांना बर्याचदा मिश्रित संकेत मिळतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की स्त्रियांना त्यांचे शरीर प्रकट करण्याच्या मार्गाने त्यांची प्रगती हवी आहे. उलटपक्षी, हिजाब पुरुषांना एक सिग्नल पाठवतो की परिधान करणारी एक नम्र आणि पवित्र स्त्री आहे, जिला त्रास देऊ नये.
 
 
हिजाबचा कुराणात अभिनिवेश असलेला ‘धार्मिक’ अर्थ असा आहे. विस्तृतरित्या हिजाब ह्या विषयाकडे लक्ष दिले, तर कळेल की हा विषय म्हटल्याप्रमाणे कुराणात असलेली ‘हिजाबची’ व्याख्या काहीशा मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे मुस्लीम उम्माह अधिक खोलात जाण्यासाठी आणि त्याच्या विस्तृत विवेचनासाठी ‘हदित’चा आधार घेतात. हदितमध्ये मुहम्मद पैगंबरांनी काय सूचना, आदेश, सल्ले दिले आहेत, त्याचबरोबर ‘हिजाब’ परिधान करणे म्हणजे काय; तसेच सध्या कर्नाटक उच्च न्यायालयासमोर जी केस सुनावणीला आली आहे, त्याचे अपडेट्स आणि विवेचन आणि समाजावरील होणारे परिणाम हे आपण पुढील भागात वाचू या.
 
(क्रमश:)