अखंड, अभंग प्रेरणास्रोत

विवेक मराठी    19-Feb-2022   
Total Views |
'संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार' या साप्ताहिक विवेकच्या विशेषांकात प्रकाशित झालेला लेख... छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने पुनःप्रकाशित करत आहोत.

shivaji maharaj
“यदि तत्त्व को अपना आदर्श मानना हो तो फिर कहना ही क्या है? किन्तु यदि आपका विचार किसी व्यक्ति को अपना गुरू मानने का होता तो श्री छत्रपति शिवाजी महाराज जैसा व्यक्ति अन्यत्र दुर्लभ है। क्योंकि छत्रपति के गुरू श्री समर्थ रामदास स्वामी जी ने स्वयं जनता से कहा है कि शिवाजी को ही आदर्श मानो। शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रतापफ अर्थात श्री शिवाजी के स्वरूप का ध्यान करना चाहिए और उन्ही के प्रताप का स्मरण भी करना चाहिए।”
- डॉ. हेडगेवार

समाजहितासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीच्या द्रष्टेपणाचं मूल्यमापन, त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा केवळ त्याच्या हयातीत असलेल्या प्रभावावरून केलं तर ते तोकडंं ठरण्याचीच शक्यता अधिक असते. त्या व्यक्तीच्या हयातीत आणि त्यानंतरही तिच्या विचारांचं, कर्तृत्वाचं स्मरण होणं, त्याचा जाणवेलसा प्रभाव टिकून असणं आणि त्यातून वर्तमानात समाजहिताचं काम करण्याची, समाजातील स्फुल्लिंग चेतवण्याची प्रेरणा जागृत राहणं असं होत असेल, तर ती व्यक्ती भूत-वर्तमान-भविष्यावर आपला ठसा उमटवणारी असते. तिचं कर्तृत्व हे झळाळणार्‍या शंभरी नंबरी सोन्यासारखं तेजस्वी आणि अविनाशी असतं.

 
यामागे संदर्भ आहे तो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणून सर्वपरिचित असलेल्या दोन आदर्शांचा - त्यातही व्यक्ती म्हणून संघटनेने स्वीकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा.
96 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचं बीज हिंदुस्थानच्या भूमीत आणि इथल्या प्रत्येक हिंदूच्या मनामनात रुजवताना, संघटनेचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी फक्त दोन आदर्श संघस्वयंसेवकांसमोर ठेवले - हिंदू संस्कृतीत त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक असलेला भगवा ध्वज हा पहिला आदर्श आणि हिंदुपदपातशाही निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हा दुसरा आदर्श.

प्रखर बुद्धिवादी, चिकित्सक आणि कर्मयोग्याचं जीवन जगणार्‍या डॉक्टरांनी संघटनेसमोरील आदर्श म्हणून भगव्या ध्वजाची निवड करण्यामागे सखोल विचार होता. हा ध्वज म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासाचं, संस्कृतीचं, परंपरेचं सर्वोच्च प्रतीक आहे. तो हिंदू संस्कृतीच्या शौर्याचंही प्रतीक आहे आणि समाजासाठी केलेल्या त्यागभावनेचंही. या अमूर्त आदर्शाच्या प्रकाशात संघटनेने वाटचाल करावी, समाजासाठी काम करावं हा विचार त्यामागे होता. म्हणूनच राष्ट्रकार्यासाठी तत्त्वपूजा सर्वोपरी मानणार्‍या डॉक्टरांनी भगव्या ध्वजाच्या पूजेची परंपरा संघात निर्माण केली. जाणीवपूर्वक रुजवली. ती करत असताना त्यामागच्या भूमिकेची, वैचारिक अधिष्ठानाची वेळोवेळी सविस्तर मांडणीही केली. एखादा स्फूर्तिदायक विचार किंवा अशा अनेक विचारांचा समुच्चय असलेलं प्रतीक जेव्हा आदर्श म्हणून समोर ठेवलं जातं, तेव्हा त्याची अपरिवर्तनीयता हा त्याचा गुण महत्त्वाचा ठरतो. अर्थात अशा अमूर्त विचारांच्या प्रकाशात वाटचाल करण्यासाठी, त्या माध्यमातून कार्याची नवनवी क्षितिजं धुंडाळण्यासाठी संबंधित कार्यकर्त्यांच्या मनाची तशी मशागत झालेली असायला हवी. ती होण्यासाठी वाढीच्या वयात अनुकूल वातावरण, संस्कार लाभायला हवेत वा त्या व्यक्तीची आकलनशक्ती, समजशक्ती तरी असाधारण असायला हवी. मात्र अशा व्यक्तींची संख्या कोणत्याही समाजात नेहमी कमीच असते. तेव्हा संघटनेचा ङ्गआदेशफ म्हणून प्रत्येक स्वयंसेवक भगव्या ध्वजाची प्रतीकात्मक पूजा मनोभावे करेलही. मात्र या भगव्या ध्वजामध्ये या देशाच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि त्यागाचा इतिहास सामावलेला आहे, हे त्या सगळ्याचं प्रतीक आहे याची खोलवर जाणीव नसेल, तर या पूजेतून अपेक्षित साध्य - स्फूर्ती वा प्रेरणाजागृती घडेलच असं नाही. असं झालं तर भगव्या ध्वजाची पूजा हे संघनिर्मित कर्मकांड होऊन बसेल. तेव्हा भगव्या ध्वजाच्या जोडीने या देशातील पराक्रमी हिंदू सम्राट आदर्शस्थानी असायला हवा. मात्र हाडामांसाची व्यक्ती एका मोठ्या समाजाची आदर्श असण्यात अडचण असते, ती म्हणजे तिच्या वागणुकीतील परिवर्तनीयता. व्यक्ती कितीही थोर असली, तरी काळानुसार तिच्या वागण्यात बदल होऊ शकतात. कधीकधी सुरुवातीच्या कालखंडात आदर्शवत वर्तन असलेली व्यक्ती तिच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तशीच राहील याची खातरी नसते. अशा वेळी जिची आदर्श म्हणून पूजा केली, तिचे पाय मातीचे आहेत हे लक्षात आल्यावर तिला आदर्श मानणार्‍या गटावर/समाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. किंवा मग त्या गटाला आदर्श सतत बदलावे लागतात. यापैकी काहीही घडणं हे समाजव्यापी होऊ इच्छिणार्‍या संघटनेसाठी घातक ठरण्याची शक्यता अधिक. म्हणूनच संघटनेसाठी आदर्श व्यक्ती निश्चित करण्यापूर्वी डॉक्टरांनी अतिशय सखोल चिंतन केलं होतं. त्यांच्या अनेक बौद्धिकांमधून, भाषणांमधून त्याचं जाहीर प्रकटन झालेलं दिसतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अखिल हिंदूंचं संघटन करण्यासाठी स्थापन झाला. हे असं संघटन आहे, ज्यात सहभागी होणारी व्यक्ती संघटनेचे विचार, भूमिका, अधिष्ठान, कार्यकर्त्याकडून असलेल्या अपेक्षा समजून घेत घेत त्यानुसार घडत जाईल, स्वत:ला घडवतही जाईल. ङ्गअसेल तसा घ्यायचा, हवा तसा घडवायचाफ हा संघाचा विचार सर्वश्रुत जरी असला. तरी आलेल्या व्यक्तीला संघटनेत कायमस्वरूपी राहावंसं वाटेल असं वातावरण संघात हवं, वैचारिक-तात्त्विक भूमिकेची मांडणी सर्वांना समजण्याजोगी हवी याचीही डॉक्टरांना जाणीव होती. स्वयंसेवक होणार्‍यांच्या नित्यसंपर्कासाठी दैनंदिन शाखा हे माध्यम होतं. या शाखा म्हणजे मनुष्यघडणीच्या कार्यशाळाच होत्या, आजही त्या हे कार्य करत आहेत.

 
या दैनंदिन शाखांमधूनच ङ्गभगवा ध्वज सर्वोपरीफ हा संस्कार संघस्वयंसेवकांवर केला जातो. त्यामागचा विचार त्यांच्यामध्ये रुजवला जातो. या भगव्या ध्वजाला मनुष्यरूपी आदर्शाची जोड दिली, तर संघटनेचं उद्दिष्ट सर्वसामान्य स्वयंसेवकाला अधिक स्पष्ट होईल आणि त्यातून त्याची कार्यप्रेरणा अखंड जागृत राहू शकेल, या विचारातून सर्वमान्य होईल अशी कोणती व्यक्ती स्वयंसेवकाचा आदर्श असावी याचा शोध सुरू झाला. राम-कृष्णांसारखं विभूतिमत्त्व लाभलेला आदर्श असावा की, एखाद्या पराक्रमी चक्रवर्ती सम्राटाला संघाचा आदर्श म्हणून मान्यता द्यावी की ज्याच्या पराक्रमाची, चरित्राची सत्यासत्यता संशोधनाच्या कसोट्यांवर तपासता येईल असा नजीकच्या भूतकाळातला एखादा पराक्रमी पुरुष आदर्श असावा... यातल्या तिसर्‍या पर्यायावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब केलं. यातून त्यांची इतिहासाकडे, ऐतिहासिक व्यक्तीकडे - तिच्या पराक्रमाकडे पाहण्याची दृष्टी किती चिकित्सक होती, याची जाणीव होते. ते म्हणतात, ङ्गङ्घतत्त्वाची निर्विकार मनाने पूजा करता येत नसेल तर त्या तत्त्वाचे प्रतीक अशी व सद्गुणांचा समुच्चय असलेली व्यक्ती आपल्या गुरुस्थानी ठेवा. पण ती व्यक्ती ऐतिहासिक असावी. कारण वैदिक काळातील एखादी महान व्यक्ती गुरुस्थानी ठेवली, तर तिच्या ऐतिहासिकत्वाबद्दल शंका उपस्थित करण्यात येतात. ...जिच्या अस्तित्वाबद्दल शंका नाही व जी दोषरहित असेल अशी जवळच्या इतिहासातील एखादी प्रभावी विभूतीच निवडणे श्रेयस्कर.फफ
 
या कसोटीवर छत्रपती शिवाजी महाराज आदर्श ठरतात हे लक्षात आल्यावर, त्याची जी मांडणी डॉक्टरांनी केली आहे तीही मुळातून अवश्य वाचण्याजोगी - ङ्गङ्घअशाच व्यक्तीला आदर्श ठेवा की, जी कधी चुकणार नाही व जिचे गुण आपल्याला घेता येतील. या दृष्टीने जर आपण आपल्या जवळच्या इतिहासाकडे पाहिले, तर एक अत्यंत जवळचा पुरुष दृष्टीसमोर येतो. ही व्यक्ती म्हणजे छत्रपती श्री शिवराय ही होय. त्यांना आदर्श ठेवावे वा कोणती तरी व्यक्तीच आदर्श ठेवावी असा माझा आग्रह नाही, तत्त्वालाच आदर्श ठेवावयाचे असेल तर उत्तमच. पण व्यक्तीला गुरुस्थानी मानायचे असेल तर शिवरायांसारखी दुसरी व्यक्ती तुम्हांला आदर्शस्थानी ठेवण्यालायक मिळणार नाही...फफ याच्या पुष्ट्यर्थ डॉक्टरांनी समर्थ रामदासांनी शिवरायाचं कर्तृत्व आदर्शवत मानावं असा दिलेला सल्ला समोर ठेवला आहे. ते पुढे म्हणतात, ङ्गङ्घशिवाजीला आदर्श ठेवले तर त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणार्थ जे पराक्रम केले ते आठवतात... जो इतिहास भगव्या ध्वजाच्या दर्शनाने आठवतो आणि जी स्फूर्ती मिळते, तीच स्फूर्ती शिवरायाच्या चरित्रापासून मिळते. जो ध्वज खरोखरीच धुळीत पडला होता, तो शिवरायाने उचलून हिंदू पदपातशाहीची प्राणप्रतिष्ठा केली व मरू घातलेले हिंदुत्व जगविले. तेव्हा तुम्हाला जर व्यक्ती आदर्श ठेवावयाची असेल तर शिवरायालाच ठेवा.फफ
ङ्गङ्घहिंदुस्थान जर हिंदूंचा देश असेल, तर त्याच्या उद्धाराची सारी जबाबदारीही हिंदूंच्याच माथ्यावर आहेफफ इतक्या स्पष्ट शब्दांत संघस्वयंसेवकांना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणार्‍या डॉक्टरांनी छत्रपती शिवरायांना आदर्श मानण्यामागची भूमिका या मांडणीतून लक्षात येते. मरू घातलेल्या वा अनेक वर्षांच्या मानसिक गुलामगिरीमुळे विस्मृतीत गेलेल्या हिंदुत्वाची जागृती करण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करण्याची, ते समजून घेण्याची आणि त्याचे मर्म आत्मसात करून हिंदू समाजाच्या उत्थानासाठी कालसापेक्ष कृती करण्याची गरज आहे, हाच विचार डॉक्टर अधोरेखित करत आहेत.
पुण्यातील 1935 साली झालेल्या संघ शिक्षा वर्गात डॉक्टर म्हणतात, ङ्गङ्घव्यक्तीपुरतेच पाहिले तर शिवाजी महाराजांना काहीही कमी नव्हते. ते अगदी सुखात लोळतील असे वैभव त्यांच्याजवळ होते. एका मोठ्या जहागीरदाराचे ते पुत्र होते. त्यांना मानमरातबाची इच्छा असती, तर मुसलमान राजाच्या दरबारी नोकरी करून त्यांना त्या बाबतीत पूर्ण यश मिळाले असते. पण सुखाचे व मानाचे वाढून ठेवलेले ताट लाथाडून त्यांनी स्वराज्य संपादनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेविले व रणयज्ञाची दीक्षा घेतली. इतर काही स्वाभिमानशून्य व पुचाट हिंदूंप्रमाणे शिवाजी महाराजांनी वैभवाच्या व अधिकाराच्या लालसेने जर का मुसलमानी धर्म स्वीकारला असता, तर त्यांच्या वैभवास पारावार उरला नसता. पण त्या कल्पना शिवाजी महाराजांना मरणप्राय वाटत होत्या. ...धर्माभिमानाची ज्योेत त्यांच्या हृदयात सारखी तेवत होती आणि ती इतकी प्रखर होती की जो जो हिंदू त्यांच्या सहवासात आला, त्याला ते त्याच कार्याकरिता उद्युक्त करीत, जसे एका दिव्याने हजारो दिवे लावावेत. असा लोकोत्तर इतिहास या नादान समाजाने व्यापलेल्या हिंदुस्थानात शिवाजी महाराजांनी हिंदूंकडूनच घडवून आणला. अस्सल हाडाचा हिंदू मिळेल तेवढा गोळा करून त्यांनी आपले कार्य शेवटास नेले... देह झिजवीन तर ध्येयसिद्धीसाठीच, जगेन तर ध्येयासाठीच, मरेन तरी ध्येयासाठीच - या निश्चयाने ते वागले आणि म्हणूनच आपल्या उद्योगात ते यशस्वी होऊ शकले.फफ

 
शिवरायांच्या चरित्राचं सार डॉक्टर समोर बसलेल्या स्वयंसेवकांना सांगत होते. या विलक्षण प्रेरक चरित्रकथनातून त्यांच्या अंत:करणात स्वधर्मासाठी, स्वधर्मीयांसाठी काम करण्याची प्रेरणा जागृत करत होते. केवळ तसं बोलत नव्हते, तर स्वत: तसं आचरण करून स्वयंसेवकांना उदाहरण घालून देत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्शस्थानी मानलं, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिवरायांची जन्मतिथी वा पुण्यतिथी साजरी करायची प्रथा नाही, तर संघात साजरा होतो ङ्गहिंदू साम्राज्य दिनोत्सवफ शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिवस.

हिंदू समाजाची उत्सवप्रिय मानसिकता लक्षात घेऊन डॉक्टरांनी संघात सहा उत्सव सुरू केले. परंतु ते पारंपरिक कौटुंबिक आणि धार्मिक उत्सवांपेक्षा वेगळे होते. उत्सवी परंपरेची बाह्य चौकट स्वीकारत त्यात संघानुकूल बदल केले आणि त्या उत्सवांना राष्ट्रीय आशय देत स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीय विचारांचं बीजारोपण केलं. परंपरा आणि नवता यांचा असा अनोखा संगम या उत्सवांमधून दिसून येतो.
 
हिंदू साम्राज्य दिनोत्सव करण्यामागेही हीच भूमिका होती. या उत्सवात शिवाजी महाराजांचं स्मरण आहे, त्यांच्या अभिमानास्पद पराक्रमाची आठवण आहे आणि त्यांच्या जाज्वल्य विचारांची जागृती आहे. डॉक्टरांनंतर ज्यांनी ज्यांनी या विशाल संघटनेचं नेतृत्व केलं, त्यांनी हे जागृतीचं काम सातत्याने केलं आहे. नागपूर येथील हिंदू साम्राज्य दिनोत्सवात संघस्वयंसेवकांना संबोधित करताना, संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजींनीही शिवचरित्रातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत पुढे म्हटलं, ङ्गङ्घ...आपण तर नि:स्वार्थी भावनेने भारतमातेच्या सेवेत मग्न असलेले संघस्वयंसेवक आहोत. म्हणूनच आपल्या कार्यपूर्तीसाठी आपण सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतही वज्रनिश्चयी, नीतिज्ञ शिवाजीच्या आदर्श जीवनापासून प्रेरणा प्राप्त करून घेत चालले पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या घोर निराशापूर्ण स्थितीत सर्वनाशाची शक्यता दिसत असली, तरी आपल्या अंत:करणातील आशा, विश्वास आणि धैर्य ह्यांना किंचितही धक्का लागू न देता पूर्ण उत्साहाने व पूर्णपणे मन लावून संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने उपयुक्त प्रयत्नात धैर्याने मग्न राहिले पाहिजे.फफ
 
अशा रितीने हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करतानाही त्यात व्यक्तिपूजा आणि तत्त्वपूजा यांचा सुंदर मेळ घातला गेल्याचं लक्षात येतं. हिंदू साम्राज्य निर्माण करायचं हे शिवाजी महाराजांचं जीवितकार्य होतं. हिंदूंचं सिंहासन निर्माण करणं हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. राज्याभिषेकाने ते साध्य झालं, म्हणजेच जीवितकार्यात ते यशस्वी झाले. हिंदू राजा म्हणून राज्याभिषेक होणं ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होती. तात्पर्य, व्यक्ती म्हणून आदर्श निवडतानाही जो जीवितकार्यात यशस्वी झाला त्याची निवड करण्यात आली, हाच संदेश या उत्सवातून, त्यातल्या बौद्धिकांतून अप्रत्यक्षपणे दिला जातोे. आपल्याला संघटना म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवायचा तो त्यांच्या कर्तृत्वाचा ठेवायचा, त्यांच्या विचारांचा ठेवायचा आणि त्यांनी साधलेल्या उद्दिष्टपूर्तीचा ठेवायचा, हे सांगणारा हा उत्सव आहे.

शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती आदर्श मानताना डॉक्टरांना स्वयंसेवकांकडून ज्या प्रकाच्या योगदानाची अपेक्षा आहे, ती पुरी करणारे लाखो स्वयंसेवक आजही देशाच्या कानाकोपर्‍यात कार्यरत आहेत. ते स्वयंसेवक संघाचं सामर्थ्य आहे. संघाची ऊर्जाकेंद्रं आहेत. त्यांच्याच नि:स्वार्थी योगदानामुळे संघ देशव्यापीच नाही, तर विश्वव्यापी होऊ लागला आहे. राजकारणापासून असं समाजातील एकही क्षेत्र नाही, जे संघविचारांच्या व्यक्तींनी आणि त्यांनी दिलेल्या अजोड योगदानाने प्रभावित नाही.

स्वयंसेवकांमधली संपूर्ण समर्पणाची भावना अखंड, अभंग राहण्यात संघासमोर असलेल्या दोन आदर्शांचा वाटा फार मोठा आहे. त्या मार्गावर चालणार्‍या संघस्वयंसेवकांसाठी ते दीपस्तंभच आहेत. त्याचबरोबर, हे आदर्श निश्चित करताना, त्यामागचे विचार स्वयंसेवकांसमोर तळमळीने मांडताना डॉक्टर हेडगेवार यांच्यासह शीर्षस्थानी असलेले सर्व जण त्या आदर्शांबरहुकूम जगले, म्हणून ही संघटना वर्धिष्णू झाली, शतायुषी झाली आणि प्रेरणेचे दीपही मनामनात अखंड तेवत राहिले.

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.