भारताचा पाकिस्तान - रशियाचा युक्रेन

विवेक मराठी    19-Feb-2022   
Total Views |
रशियाचा युक्रेन हा रशियाचा पाकिस्तान आहे. आज युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख तीस हजार खडे सैन्य आहे. ते युक्रेनमध्ये घुसणार का? या प्रश्नाची चर्चा चालू आहे. फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे अस्तित्व स्वीकारले. रशिया फाळणीनंतर युक्रेनचे अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. दोन देशांच्या मानसिकतेतील हा फरक आहे.


book
पाकिस्तानची सर्व भूमी 1947 सालापूर्वी अखंड भारताचा भाग होती. ज्याला आज आपण भारतीय संस्कृती म्हणतो, त्या संस्कृतीची अनेक अंगे भारत विभाजित झाल्यानंतर पाकिस्तानात गेली. हिंगलाज मातेचे मंदिर बलुचिस्तानात आहे. ही हिंगलाज माता भारतातील कोट्यवधी लोकांची (प्रस्तुत लेखकाचीही) कुलदेवता आहे. अरबस्तानातील किंवा युरोपमधील एखादी देवता आपली कुलदेवता असू शकत नाही. जगातील सगळ्यात प्राचीन, ज्ञानसंपन्न विद्यापीठाचे नाव आहे ‘तक्षशिला’. ती आज उद्ध्वस्त आहे. भगवान गौतम बुद्धांच्या साडेपाचशेहून अधिक जातक कथा आहेत. यातील अनेक कथांत तक्षशिलेचा उल्लेख येतो. काशीचा राजा ब्रह्मदत्त, त्याच्या घरी बोधिसत्त्वाचा जन्म झाला आणि तो शिक्षणासाठी तक्षशिलेत गेला.. अशा प्रकारे कथेचा प्रारंभ होतो. गुरू नानक देव यांचे जन्मस्थान पाकिस्तानात गेले. मुस्लीम आक्रमकांशी शौर्याने लढणारा राजा दाहीर हा सिंधचा आहे. पंचनद्यांनी पंजाब तयार होतो. अर्धा पंजाब पाकिस्तानात गेला आहे. सिंधूशिवाय हिंदू होऊ शकत नाही. ती सिंधू आपल्यापासून काढून घेण्यात आलेली आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतात.

पाकिस्तानला संस्कृती नाही. भारताचा द्वेष म्हणजे हिंदूंचा द्वेष, जिहादी तालिबानी अशी आज त्याची संस्कृती झाली आहे. पाकिस्तानातील विचारवंत यामुळे अस्वस्थ आहेत. आपण कोण आहोत, याचा शोध घेताना ते सांगतात की, ‘पाकिस्तानी म्हणून माझे वय 70-72 वर्षांचे आहे आणि हिंदुस्थानी म्हणून माझे वय पाच हजार वर्षांचे आहे.’ ते स्वत:ला सिंधू संस्कृतीशी जोडून घेतात. एका प्राध्यापकाचे वाक्य प्रसिद्ध आहे - “बलुचिस्तान ते बांगला देश भारत एक आहे. मी राजकीय पाकिस्तानी असेन, पण सांस्कृतिकदृष्ट्या मी भारतीय आहे.”

रशियाचा युक्रेन हा रशियाचा पाकिस्तान आहे. रशिया नावाच्या राजकीय राज्याचा (रशियन स्टेटचा) उदय युक्रेनच्या किव शहरातून होतो. त्याची माहिती मागील लेखात दिली आहे. आजचा रशिया, युक्रेन, बायलोरशिया यात राहणारे सर्व लोक एका धर्माचे, एका वंशाचे आणि दीर्घकाळ एकाच राजवटीखाली राहणारे होते. युक्रेनच्या आजच्या राजधानीचे नाव किव असे आहे आणि ती रशियातील सर्व प्रमुख शहरांची जननी मानली जाते. सर्वांचा इतिहास समान आहे. मंगोल लोकांचे आक्रमण रशियावर झाले. त्यांनी किव शहर जाळून टाकले. तसेच रशियातील अनेक शहरे जाळून टाकली. त्यांच्या राजवटीला ‘गोल्डन होर्डे’ असे म्हणतात, सराई ही त्यांची राजधानी झाली आणि त्यांनी चारशे वर्षे रशियावर राज्य केले. मॉस्कोच्या ग्रँड ड्यूक डीमिट्री इवॅनोव्हिच याने कुलिकोवो या ठिकाणी त्यांचा पराभव केला. डीमिट्री इवॅनोव्हिच हा संपूर्ण रशियाचा राष्ट्रनायक आहे.
 
ज्याच्यातून रशिया जन्मला, तो युक्रेन 1991 साली रशियातून फुटून निघाला. मोठ्या देशामध्ये अशी फाटाफूट होत असते. तिचे एकमेव कारण म्हणजे जेव्हा केंद्रसत्ता दुर्बळ होते, केंद्रसत्तेची आर्थिक घडी विसकटते, तेव्हा केंद्रसत्तेपासून दूर असलेले प्रदेश म्हणजे सीमावर्ती भाग स्वतंत्र होत जातात. मोगल सत्ता दुर्बळ झाल्यानंतर भारतात हेच घडले. त्याअगोदर मौर्य वंशाची मगध सत्ता दुर्बळ झाल्यानंतर त्या राज्याचेही तुकडे पडले. भारतात लहान लहान राज्य निर्माण होण्याचे कारण दुर्बळ केंद्रसत्ता होती. रशिया भारताच्या या इतिहासाचा अनुभव सध्या घेत आहे.
 
 
केंद्रसत्ता दुर्बळ झाली की परकीय सत्ता तिथे हस्तक्षेप करू लागतात आणि दुर्बळ झालेली सत्ता आणखी कशी दुर्बळ बनेल या प्रयत्नाला लागतात. युक्रेन स्वतंत्र झाल्यांनतर नाटो संघटनेने युक्रेनमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. युक्रेनला नाटो संघटनेत सभासद करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. 1993 ते 2005 युक्रेनचे पंतप्रधान आणि अध्यक्ष लिओनिद कुचमा (ङशेपळव र्घीलहार) यांनी हे प्रयत्न केले. ‘युक्रेन म्हणजे रशिया नव्हे’ या शीर्षकाचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात ते म्हणतात -
* रशियापेक्षा युक्रेन वेगळा आहे. हे वेगळेपण त्याच्या इतिहास, भूगोल आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चानिटीमध्ये आहे.

* ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च आणि पूर्वेचा ऑर्थोडॉक्स चर्च यातून युक्रेनियन ऑर्थोडॉक्सी स्वतंत्र झाली आहे.

* युक्रेनचे स्वातंत्र्य रशियाच्या पचनी पडले नाही. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनाची दखलही रशिया घेत नाही.

* युक्रेनची राष्ट्रीय मूल्ये रशियापेक्षा वेगळी आहेत. युक्रेन हा युरोपला अधिक जवळचा आहे, रशियाला नाही. रशियाची मानसिकता आणि युक्रेनची मानसिकता ही परस्परविरोधी आहे.

* रशियाने युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वीकारले पाहिजे, तरच दोन देशांतील तणाव दूर होईल.

* युक्रेनला रशियाशी जोडून घेण्याचे काम 1920 साली कम्युनिस्ट पक्षाने केले. ते लोकांच्या इच्छेविरुद्ध केले.

* रशियाच्या अनेक भागात युक्रेनियन लोकांची बहुसंख्या आहे. हा सर्व प्रदेश युक्रेनमध्ये आला पाहिजे. बायलोरशियाने त्यांचे जे लोक रशियात राहत होते ती भूमी बायलोरशियाला जोडून घेतली आहे.

* रशियाने युक्रेनचा क्रिमिया प्रांत जिंकून घेतला आहे. तो युक्रेनला परत मिळाला पाहिजे. युक्रेनची भाषा ही ऑर्थोडॉक्स रशियन भाषा नाही, ती संमिश्र भाषा आहे. रशिया आपल्या वाङ्मयातून आपली भाषा युक्रेनवर लादण्याचा प्रयत्न करतो.


* मेझप्पा हा रशियाच्या दृष्टीने फितूर असेल, पण तो युक्रेनचा राष्ट्रपुरुष आहे.


पाकिस्तानदेखील जवळजवळ असाच युक्तिवाद करीत असतो. तो म्हणतो की आमची ओळख इस्लामची आहे. झियाने इस्लामची ओळख घट्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. पाकिस्तानचे राष्ट्रपुरुष भारतावर आक्रमण करणारे आहेत. हिंदीतून जन्म पावलेली उर्दू भाषा पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे. क्रिमियाप्रमाणे काश्मीरचा खूपसा भाग पाकिस्तानने हडप केलेला आहे आणि संपूर्ण काश्मीर आमचा आहे असा त्यांचा दावा आहे. पाकिस्तानला सर्व प्रकारे शस्त्रसज्ज करण्याचे काम अमेरिकेने आणि ब्रिटनने केलेले आहे. पाकिस्तान नाटोचा सभासद नसला, तरीही अमेरिकेने सिंटो आणि सिटो अशा दोन संघटना उभ्या करून त्यात पाकिस्तानला सामील करून घेतले आहे. पाकिस्तानला जसा स्वत:चा इतिहास नाही, तसा युक्रेनलाही एक राष्ट्र म्हणून स्वत:चा इतिहास नाही. लिओनिद कुचमा यांच्या पुस्तकात रशियन साम्राज्याशी आणि सोव्हिएत रशियाशी असलेले प्रदीर्घ काळापासूनचे संबंध नमूद करतात आणि यामुळे युक्रेनियन अस्मिता निश्चित करणे कठीण जाते, असेही सांगतात.
 
आज युक्रेनच्या सीमेवर रशियाचे एक लाख तीस हजार खडे सैन्य आहे. ते युक्रेनमध्ये घुसणार का? या प्रश्नाची चर्चा चालू आहे. फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे अस्तित्व स्वीकारले. रशिया फाळणीनंतर युक्रेनचे अस्तित्व स्वीकारायला तयार नाही. दोन देशांच्या मानसिकतेतील हा फरक आहे. अमेरिका आणि नाटो संघटनेतील युरोपीय देशांना युक्रेन स्वतंत्र हवा आहे. असे असले, तरी उद्या युद्ध सुरू झाल्यास नाटो संघटनेतील सगळेच देश त्यात उतरतील असे नाही. जर्मनीने युक्रेनला शस्त्रेे देण्यास नकार दिला आहे. फ्रान्स, बेल्जियम, ग्रीस इत्यादी देशांचे रशियाबरोबरील व्यापारी संबंध हेदेखील महत्त्वाचे आहेत. युद्ध कुणालाच नको आहे. परंतु युक्रेनचा प्रश्न तर सुटला पाहिजे. युक्रेनने युरोपीय युनियनमध्ये आणि नाटोमध्ये सामील होऊ नये, ही रशियाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचा निकाल लागल्याशिवाय युक्रेनचा प्रश्न संपणार नाही.

मागील लेखात (दि. 13 फेब्रुवारी 2022च्या अंकातील) युक्रेन, रशिया आणि नाटो या संघर्षात भारताच्या भूमिकेविषयी ओझरते लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ घेऊन भारताच्या भूमिकेचा विचार करावा लागेल, तो आपण पुढील लेखात करू.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.