स्वरकीर्ती नाट्यकीर्ती

विवेक मराठी    02-Feb-2022   
Total Views |
@वर्षा भावे  9594962586 
 स्वरसम्राज्ञी’ कीर्ती शिलेदार यांचे नुकतेच निधन झाले. उत्तम गायिका, संगीतज्ञ, संगीतकार, नाट्यकर्मी असे त्यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्याचा सहवास लाभलेल्या वर्षा भावे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...

kirti

माझ्या वयाच्या केवळ दहाव्या वर्षी जिच्या पाणीदार, मोठ्या आणि भावपूर्ण डोळ्यांनी मला कायमची मोहिनी घातली आणि जिचा चेहरा मी आयुष्यभर विसरू शकले नाही, अशी व्यक्ती म्हणजे कीर्ती शिलेदार! नाटक होतं संगीत स्वयंवर आणि कीर्तीताईच्या रूपाने माझ्यासमोर अवतरली होती साक्षात राजकन्या रुक्मिणी! नाटकातले ते पडदे, महाल, बागबगिचे, खूप सारा प्रकाश, नट-नट्यांचे भरजरी पोशाख यामुळे आधीच मंत्रमुग्ध झाले होते मी! परंतु ज्या क्षणी कीर्तीताई “दादा, ते आले ना” हे वाक्य म्हणत मंचावर अवतरली, त्या क्षणापासून माझी तिच्या चेहर्‍यावरची नजर क्षणभरही ढळली नाही. तिचं गाणं, तिचं बोलणं, तिचं हसणं, फक्त गाण्यांनाच नाही, तर संभाषणांनाही कडाडून पडणारी टाळी.. आजही मला नजरेसमोर जशीच्या तशी दिसते ती रुक्मिणी! हळूहळू मला कळलं की माझ्या मनातली तिच्याबद्दलची ही भावना फक्त माझ्यापुरती मर्यादित नाही, तर ज्यांनी ज्यांनी कीर्तीताईचा अभिनय आणि तिच्या विविध भूमिका पाहिल्या आहेत, त्या कुणालाच कीर्तीताईचा तो बोलका चेहरा विसरणं अशक्य आहे.
 
 
माझी आजी इंदिराबाई खाडिलकर स्वत: सवाई गंधर्व आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची शिष्या. शास्त्रीय गायनाप्रमाणेच नाट्यगीतांवर तिचं प्रभुत्व होतं. त्या वेळी ज्या समकालीन गायिका नाट्यसंगीताची परंपरा जपत होत्या आणि ज्यांना बालगंधर्वांचा आशीर्वाद लाभलेला होता, अशा गायिकांमध्ये जयमाला शिलेदार हे नावदेखील अग्रगण्य होतं. साहजिकच माझी आजी आणि जयमालाबाई यांच्यात एक स्नेहाचा धागा होता. त्यामुळे अगदी लहानपणापासून काही ना काही कारणांनी मी आदरणीय जयराम शिलेदार, जयमालाबाई आणि कीर्तीताई यांच्या संपर्कात वेळोवेळी येत असे. माझ्या आठवणीप्रमाणे मी कीर्तीताईची सगळी नाटकं पाहिली. संगीत स्वयंवर, संगीत मानापमान, संगीत द्रौपदी, संगीत संशयकल्लोळ, संगीत कान्होपात्रा, संगीत स्वरसम्राज्ञी आणि आणखीही बरीच! या सगळ्याच नाटकांचं गारुड विलक्षण होतं. माझं बालवय असल्यामुळे माझ्या मनावर त्या वातावरणाचा, त्या कसदार गायकीचा, त्या विलक्षण अभिनयाचा न पुसता येणारा प्रभाव पडला. विविध संगीत नायिका ताकदीने साकारून विलक्षण मोहजाल पसरणारं संगीत नाटकाच्या क्षेत्रातलं एकमेव नाव म्हणजे अभिनय-स्वर-सम्राज्ञी कीर्ती शिलेदार!
 
पुण्याला रेडिओच्या ऑडिशनसाठी मी गेलेली असताना ऑडिशन झाल्यानंतर मनात धाकधूक घेऊन मी बाहेर आले. कसं झालं असेल माझं गाणं.. असा विचार करत बसलेली होते, तेवढ्यात आतून नाना - म्हणजे माननीय जयराम शिलेदार बाहेर आले. म्हणजे ते आमचे परीक्षक होते तर... मनात झर्रकन विचार येऊन गेला. त्यांची आणि माझी तशी ओळख होतीही आणि नाहीही... म्हणजे मी त्यांना पाहिलं होतं, भेटलेही होते, पण ते का म्हणून मला ओळखतील.. असं काहीसं वाटत होतं. आतून बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसले. मला जरा दबूनच गेल्यासारखं झालं. मी उभी राहिले, तेव्हा ते मला म्हणाले, “आमच्या शारदा नाटकात काम करणार का?” मला त्या क्षणी नेमकं काय वाटलं ते मला सांगता येत नाही, पण मी रेडिओच्या परीक्षेत पास झाले, हे मला आपोआपच कळलं. नंतर यथावकाश आजीला आणि आईवडिलांना सांगून मी ‘मराठी रंगभूमी’च्या शारदा नाटकात शारदेची भूमिका केली. मी तो एकच प्रयोग केला, परंतु शिलेदार कुटुंबीयांशी माझं फार जवळचं नातं जोडलं गेलं. अभिनेत्री कीर्तीताईचा प्रेमळ स्वभाव, लताताईचा खेळकरपणा, माझ्याकडून उत्तम भूमिका बसवून घेण्याची नाना आणि बाईंची तळमळ, शारदेतली सगळी गाणी अभिनयासह उत्तम व्हावीत म्हणून प्रत्येक प्रसंग उलगडून सांगण्याची कीर्तीताईची हातोटी.. या सगळ्यातून त्यांचं त्या नाटकावर आणि एकूणच संगीत नाट्यव्यवसायावर असलेलं निखळ प्रेम आणि निष्ठा मला सतत जाणवत राहिली.
 
 
त्या नाटकामध्ये मूळ चालींपेक्षा वेगळ्या चाली असलेली एक-दोन गाणी होती. फार सुंदर होत्या त्या चाली. “या कोणाच्या आहेत चाली?” असं विचारताच कीर्तीताईने त्या पंडित नीलकंठ अभ्यंकर यांच्या आहेत असं सांगितलं. ते तिचे गुरू असून गेली काही वर्षं ती त्यांच्याकडे गाणं शिकते आहे, असं तिने मला अतिशय आदरपूर्वक सांगितलं. पुढे काही वर्षांनी लग्नानंतर मी मुंबईला आले, तेव्हा माझे गुरू पंडित काणेबुवा यांनी मला पंडित नीलकंठ अभ्यंकर यांच्याकडेच मी गाणं शिकावं, असं सुचवलं. मग मी बुवांकडेच शिकू लागल्याने पुन्हा एकदा कीर्तीताईशी माझं ज्येष्ठ गुरुभगिनी म्हणून नव्याने अधिक दृढ नातं जुळलं.
 
 
मराठी रंगभूमी संगीत नाटक ज्या काही मोजक्या नाटक कंपन्यांनी स्वत:च्या अपत्यासारखं जपलं, जोजवलं, रुजवलं, त्याचं संगोपन केलं, त्यात ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात आणि परदेशातही मराठी रंगभूमीची दुंदुभी वाजली ती संस्थापक जयराम आणि जयमाला शिलेदार यांच्यामुळे आणि त्यांच्या कन्या कीर्ती आणि लता शिलेदार यांच्यामुळे! पु.ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे की “संगीत रंगभूमी ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. ही देणगी इमानेइतबारे सांभाळण्याचं बिकट काम मराठी रंगभूमीने केलं.” बिकट या कारणासाठी की चित्रपट, गद्य नाटकं, दूरचित्रवाणी यांच्यामुळे संगीत रंगभूमीवर निश्चितच गंभीर परिणाम होऊ लागला. एकेकाळी राजवस्त्र परिधान करणारी ही रंगभूमी, पण तिचा तो वैभवाचा रंग फिकट होऊ लागला. लोकांच्या काळ-कामाच्या गणितात लांबलचक संगीत नाटक बसेनासं झालं. अशा वेळी जुनं सोनं त्याच कसाने जपून ठेवण्याचं महत्त्वाचं काम ‘मराठी रंगभूमी’ने केलं. हे काम किती महत्त्वाचं होतं किंवा आहे, हे ती जुनी दिमाखदार आणि रंजनाबरोबरच सहज उद्बोधन करणारी, स्वर-भाषेचा समृद्ध वसा घेतलेली नाटकं बघितली की प्रकर्षाने जाणवतं. यासाठी मराठी रंगभूमीने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत संगीत नाटकांचे दौरे केले. संगीत नाटक म्हणजे पाठीवर बिर्‍हाड घेऊन जाणारं एक भलंमोठ कुटुंबच! प्रसंगी आर्थिक झीज सोसून हे घेतलेलं व्रत निगुतीने सांभाळत राहिली ही संस्था! मराठी रंगभूमीने हा जो वसा घेतला होता, तो त्यांना अतिशय आनंद आणि समाधान देणारा जरी असला, तरी शरीर-मनाला आतिशय थकवणारा होता, हे अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि म्हणूनच बदलत्या काळानुसार वेगळा किंवा सोपा मार्ग न निवडता कीर्तीताई आणि लताताई दोघींनीही हाच खडतर प्रवास स्वीकारला, ही फार लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे .
स्वरसम्राज्ञी हे कीर्तीताईचं स्वत:चं पहिलं स्वतंत्र संगीत नाटक! विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे संगीतकार म्हणजे आमचे गुरू पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर! मला माहीत आहे, त्यानुसार या नाटकाच्या निमित्ताने 1972-73च्या सुमारास कीर्तीताई अभ्यंकरबुवांकडे शिकू लागली. आमचे बुवा हे उत्कृष्ट शास्त्रीय गायक तर होतेच, तसंच सी. रामचंद्र यांचे साहाय्यक संगीतकार म्हणूनही त्यांनी अनेक वर्षं काम केलेलं होतं. सर्वच गीतप्रकारांशी बुवांचं मैत्र होतं. बुवा एकदम मिश्कील होते, अनुभवसंपन्नही होते. त्यांनी स्वरसम्राज्ञी एका वेगळ्याच संगीत रंगात रंगवली, कीर्तीताईनेही प्रचंड मेहनत घेतली आणि ते नाटक कमालीचं लोकप्रिय झालं. यातली लताताई वठवत असलेली, स्वत:ला प्रस्थापित शास्त्रीय गायिका समजणार्‍या तारिणीदेवीची काहीशी विनोदी भूमिका बुवांनी खुमासदार क्रिया-प्रतिक्रियांनी अधिकच रंगीन केली, असं मला कीर्तीताईने सांगितलं होतं.
 
मूळ संगीत नाटकाचा गाभा कायम ठेवून मराठी रंगभूमीने अनेक नवीन प्रयोग केले. ‘सखी मीरा’ हा मीरेच्या चरित्रावर आधारित तिने केलेला संगीत नाट्यमय एकपात्री प्रयोग, तरुण कलाकारांना घेऊन रचलेली नवीन संगीत नाटकं, संगीत नाटक वाचनाचे बैठे प्रयोग, रामराज्यवियोगसारख्या जुन्या नाटकाचं पुनरुज्जीवन आणि त्यात केलेला मंथरेचा - तिच्या सर्व गोड भूमिकांशी फारकत घेणारा खलनायिकेचा रोल अशा अनेक गोष्टी! कीर्तीताईचं व्यक्तिमत्त्व चतुरस्र! ती उत्तम गायिका, संगीतज्ञ, संगीतकार, उत्तम नकलाकर, उत्तम वक्ती, साहित्य, काव्य यांची जाण असलेली रसग्राहक, उत्तम तबला आणि पखवाजवादक आणि समकालीन किंवा गद्य नाटकाच्या भूत-वर्तमानाशी कायम निगडित असलेली कलाकार होती. ती संगीत नाटक अकादमीच्या समितीवर कार्यरत होती, महाराष्ट्र शासनाचा बालगंधर्व पुरस्कार, नाट्यदर्पणचा नाट्यव्रती पुरस्कार अशासारख्या अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित होती. एनएसडीमध्ये आणि इतर अतिशय नामवंत संस्थांनी तिला संगीत नाटक आणि नाट्यसंगीत या विषयावर कार्यशाळा घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. विविध नाटकांमधून तिसाहून अधिक महत्त्वाच्या भूमिका आणि सुमारे साडेचार हजार नाट्यप्रयोग तिच्या नावावर आहेत. संगीत आणि नाटकाच्या संदर्भात अनेक सप्रयोग व्याख्यानं, आकाशवाणीवर नॅशनल कार्यक्रम यातून तिच्या कार्याची व्यापकता आपल्यासमोर येते. ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्द आणि काव्यार्थ यांचं महत्त्व सांगणारा शोधनिबंधही कीर्तीताईने लिहिलेला आहे.
 
आज कीर्तीताई आपल्यात नाही. दि. 22 जानेवारी 2022 या दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. अगदी काहीच दिवस आधी जेव्हा मी तिला भेटले, तेव्हा आजारी असूनही ती अगदी प्रसन्न होती. खूप बोलत होती. तिचा आणि लताताईचाही बोलण्याचा विषय एकच होतं - संगीत नाटकं आणि अजूनही त्या संदर्भात राहिलेलं खूप काम! बोलता बोलता म्हणाली, “माणसाने आनंदी असलं पाहिजे. जे आपल्या वाट्याला येईल, ते अजिबात तक्रार न करता स्वीकारलं पाहिजे.” तिचं हे आश्वासक बोलणं ऐकलेलं असल्यामुळेच, ती आता नाही हे मानायला मन तयार होत नाही.
 
मला नेहमी वाटतं की ही अशी सदैव कार्यरत आणि समाजाला काहीतरी देऊन जाणारी माणसं असतात, त्यांचं तेज, त्यांची पुण्याईच वेगळी! सूर्य आपल्यापर्यंत त्याचे किरण पोहोचवतो, पण या तेजस्वी व्यक्तीच्या तेजात ते तेज मिसळून समाजाला अधिक ऊर्जा देत असणार! गेल्या दोन वर्षांत ही अशी तेजस्वी माणसं जरा जास्तच प्रमाणात आपल्यातून निघून गेली. कीर्तीताई ही अशीच एक तेजस्वी तारका.. संगीत रंगभूमी सतत जागती ठेवण्याचं स्वप्न पाहणारी! तिचं हे स्वप्न नक्की सत्यात येईल, तिने पेरलेल्या बीजांचे वृक्ष होतील आणि पुढच्या संगीत रंगभूमीला आकाशातून ती सदैव चैतन्याचा प्रकाश देत राहील, असा विश्वास बाळगू या. तिच्या विशाल कार्याला विनम्र अभिवादन!