भिकाऱ्यांचे उपचार करणारा आगळावेगळा डॉक्टर

विवेक मराठी    22-Feb-2022   
Total Views |
आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. रस्त्यावर भिक मागणाऱ्या कित्येक भिकाऱ्यांमध्ये आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांच्या आजाराचे निदान करून डॉ. अभिजित त्यांच्यावर उपचार करतात.

dr 

पेशाने डॉक्टर असणाऱ्या अभिजित सोनावणे यांचा जन्म साताऱ्यातील मुचवड गावात झाला. डॉ. अभिजित यांची घरची परिस्थिती बेताचीच, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर दवाखाना सुरु करण्यासाठी कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते. अशावेळी भिक मागणाऱ्या एका आजोबांनी अभिजीतला मदत केली. हा संदर्भ वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु डॉ. अभिजित यांच्या सांगण्यानुसार, “हे एक असे आजोबा होते, जे स्वतः सुशिक्षित, चांगल्या घरातील असूनही काही कौटुंबिक घटनांमुळे त्यांच्यावर भिक मागण्याची वेळ ओढावली.”
 
या आजोबांचे नाव न सांगता डॉ. अभिजित म्हणाले की, काही समाजकंटकांनी या आजोबांचा उपयोग करून, सर्वतोपरी फायदा घेऊन त्यांना नंतर आपल्याच भाऊबंदांनी रस्त्यावर सोडलं होतं. त्या आजोबांनी अभिजीतला अनेक मोलाचे सल्ले दिले. रुग्णांच्या वेदनांना औषध देऊन डॉक्टरचे कर्तव्य संपत नाही तर पीडितांच्या वेदनांचे वेदन करणे व त्यानुसार त्यांची शुश्रुषा करणे, हा वैद्याचा धर्म आहे अशी शिकवण त्या आजोबांनी अभिजीतला दिली.
 
नोकरी नसल्याने घरोघरी जाऊन अभिजित रुग्णांवर उपचार करत असत. अशावेळी आर्थिक समस्याही बऱ्याच होत्या. आर्थिक समस्या भेडसावू लागल्या की माणूस काही काळाने आपसूकच निराश होतो. अभिजित यांनाही त्या काळात नैराश्याने ग्रासले होते. त्यावेळी त्या आजोबांनी त्यांना मानसिक आधार दिला. तसेच वेळोवेळी आर्थिक सहाय्यही केले. अभिजीतला नैराश्यातून बाहेर काढण्यात या आजोबांचा मोठा वाटा आहे असे अभिजित सांगतात. ‘वेद शिकण्यासोबतच एखाद्याची वेदना समजून घेणे, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण’, हे त्यांनीच मनावर बिंबवलं ! पुढे अभिजीत यांना नोकरी मिळाली व आजोबांशी येणारा नित्याचा संबंध कमी झाला.
 
अभिजित एका आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रमुख म्हणुन काम करत होते, मासिक पगार तीन लाखांहून अधिक होता आणि अशातही ते समाधानी नव्हते! याहून अधिक पैसे कमावणे हे त्यांच स्वप्न होतं. घर हवं, गाडी हवी, सगळ्या प्रकारची भौतिक सुखं हवी आणि त्यासाठी लागणारा पैसा हवा. पैसा मिळवण्यासाठी अजून वरचं पद हवं. महाराष्ट्र प्रमुख झाल्यावर , उद्या भारताचा प्रमुख होणे, जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे हे त्याचं स्वप्न होतं. डॉ. अभिजित सांगतात, “काळाच्या ओघात प्रतिष्ठेची नशा चढली असताना मी आजोबांची सर्व शिकवण विसरून गेलो. नेमक्या अशावेळी मला समजले की त्या आजोबांचे रस्त्यावरच बेवारस म्हणून निधन झाले.”
 
बापासारखा खंबीर आधार देणाऱ्या आजोबांचे बेवारस म्हणून निधन झालेले ऐकताच अभिजित यांना मोठा धक्का बसला. दि. १५ ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र दिन साजरा करत असताना अभिजित यांनी स्वतःला पैशाच्या शर्यतीतून स्वतंत्र केले. नोकरी सोडली आणि त्यांनी पुण्यात सोहम ट्रस्टची स्थापना केली. मोटरसायकलवर आपला दवाखाना थाटला. यावेळीही अनेक अडचणी आल्या. मला मदत करणाऱ्या आजोबांना आदरांजली म्हणून मी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना मदत करायचे ठरवले. सुरुवातीला भिकारी अभिजित यांना आपल्या जवळ फिरकू देत नसत. त्यांना वाटे आपल्याला पकडून हे पोलिसांत देतील किंवा आपल्याला फसवून आपल्या किडन्या काढतील. २०१५ पासून २०१८ पर्यंत त्यांची जवळजवळ अडीच ते तीन वर्ष फक्त भिकाऱ्यांमध्ये मिसळून जाण्यात गेली. यावेळी अभिजित त्यांच्यासोबत बसत असत, त्यांच्या पानात जे शिळं, नासलेलं अन्नसुद्धा ते खात असत. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले. यानंतर भिकारी त्यांना आपली दुखणी सांगू लागले. या काळात अभिजित यांच्या पत्नी मनीषा यांनी संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. अभिजित म्हणतात, मनीषाच्या सहकार्याशिवाय हे काम मी करूच शकलो नसतो.
 
आज पाच वर्षानंतर डॉ. अभिजित सोनावणे यांचं भिक्षेक-यांचं कुटुंब ११०० इतक्या लोकांचं आहे. या कुटुंबात २०० ते ३०० इतके आईबाप आहेत २०० ते ३०० लहान मुलेही आहेत आणि तितकेच आजी-आजोबा आहेत. यातील ५२ मुलांचे शिक्षणसुद्धा डॉ. अभिजित पाहत आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुमारे ५५० लोकांना डोळ्यांची शस्त्रक्रियाही करून दिली आहे. तसेच या कार्यातून संपर्कात येणाऱ्या भिकाऱ्यांना पुढच्या आयुष्यात भिक न मागण्याचा आग्रह ते करतात. बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या १६ आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आणि आता ते आजी आजोबा सोनावणे हे आडनाव आपल्या नावामागे लावतात. हे आपले सर्वात मोठे यश आहे असे अभिजित मानतात. आज "भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी" हे सोहम ट्रस्टच्या कामाचे ब्रीदवाक्य आहे. भिकाऱ्यांना भीक मागणे सोडायला प्रवृत्त करणे सोपे नव्हते, त्याचबरोबर अभिजित यांनी त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसायही सुचवले. या प्रयत्नांना यश येऊन आतापर्यंत 85 कुटुंबांनी भीक मागणे सोडलं आहे आणि ही कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.
धर्मादाय आयुक्त कार्यालय, आयकर विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, लेले रुग्णालय, पोलीस विभाग, यासह पुण्यातील अनेक नामांकीत संस्था आणि व्यक्तींनी त्यांना या कामात मदत केली आहे.
 
सिंधुताई सपकाळ, डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, विश्वास नांगरे पाटील इत्यादी आपापल्या क्षेत्रातील नामवंतांनी अभिजित यांच्या कामाचे कौतुक केले आहे. हे आपल्याला मिळालेले सर्वोत्तम पुरस्कार आहेत असे अभिजित मानतात. भिकाऱ्यांवर उपचार करणे, त्यांना सन्मार्गावर आणणे आणि यासाठी अखंडपणे प्रयत्न करत राहणे यासाठी सोहम ट्रस्ट यापुढेही तत्पर राहील असा विश्वास डॉ. अभिजित सोनावणे व्यक्त करतात. साप्ताहिक विवेकच्या वतीने त्यांच्या या कार्याला अनेक शुभेच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.