कर्करोगग्रस्तांच्या सेवेचा कौतुकास्पद वसा घेतलेला युवक

विवेक मराठी    26-Feb-2022   
Total Views |


 घडाळ्याचे पट्टे बनवून ते विकायचे, विकले गेले तरच रात्रीचं जेवण नशिबात असे. नाहीतर एकवेळच्या भातासोबत चटणी आणि तेल नाहीतर चतकोर भाकर तुकडयासोबत चटणीचे पाणी पिऊन दिवस ढकलायचा, हाच दिनक्रम होता.
 
1

धारावीतील गल्लीत राहणारा जय होलमुखे एका गरीब कुटुंबात वाढला. 
नववीत शिकत असताना माहीममध्ये त्याने हाउस कीपिंगचं काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला महिन्याला आठ हजार रुपये मिळत. त्यातून त्याने गडकिल्ल्यांवर जाऊन तेथील वस्त्यांवरच्या मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. अशाप्रकारे स्वतः हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या जयची वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच समाजसेवा सुरु झाली.

एका रक्तदान संस्थेसोबत काम करता करता जयच्या लक्षात आले की मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाबाहेर कित्येक रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांचे जेवणाखाण्याचे हाल होतात. कर्करोगासारख्या महाभयंकर रोगाने पिडीत उपचारासाठी रुग्ण ठीकठिकाणाहून टाटा रुग्णालयाकडे येतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांची सोय होऊ शकत नाही म्हणूनच काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचार पूर्ण होईपर्यंत अक्षरशः रस्त्यावर झोपतात. कित्येकदा ते भुकेलेले असतात. त्यांना एकवेळचं तरी अन्न मिळावं म्हणून जयने त्यांच्यासाठी जेवण न्यायला सुरुवात केली. जयच्या आईने जेवण बनवावे व त्याने दुचाकीवरून ते घेऊन जावे, असे करता करता जयच्या या कामात असे अनेक तरुण जोडले गेले व त्यांनी माणुसकीची उब ट्रस्ट स्थापन केला. दिवसाला जवळपास १५० माणसांना पुरेल इतके जेवण या ट्रस्टद्वारे ते बनवतात. हे सर्वच सामान्य परिस्थितीत वाढलेले स्वयंसेवी तरुण असल्याने त्यांना जेव्हा पूर्ण जेवण देणे जमत नाही तेव्हा ते आमटी-भात असे दोन पदार्थ देतात तसेच केव्हातरी बदल म्हणून भाकरी किंवा चपातीसुद्धा असते. त्यांच्यातील कुणाचा वाढदिवस असेल तर कुणी स्वेच्छेने काहीतरी गोड पदार्थदेखील देऊ करतात.

या कामात कधी निधी कमी पडला तेव्हा जयने चक्क आईचा एखादा दागिना गहाण ठेऊन निधीची व्यवस्था केली. अन्नदान हे व्रत मानून त्यात कोणताही खंड न पडू देता जय आणि त्याची ही मित्रमंडळी काम करत आहेत. रोज १० किलो तांदूळ, ४ किलो तुर डाळ, १५० ते २०० चपात्या आणि भाजी इतके समान त्यांना यासाठी लागते.

माणुसकीची उब ट्रस्टने २०१६ पासून सुरु केलेल्या कार्यात सहसा खंड पडू दिलेला नाही. या अन्नाचं वाटप संध्याकाळी साधारण ६ -६:३० पासून सुरु होतं. त्याचबरोबर महिन्यातून एकदा रस्त्यावर राहणाऱ्या महिला रुग्णांना आणि त्यांच्या महिला नातेवाईकांना सॅनिटरी नॅपकीन वाटले जातात. रुग्णांपैकी लहान मुलांसाठी चित्रकलेचे सामान, पुस्तकंसुद्धा वाटली जातात. जय सांगतो की आम्ही शक्यतो कुणाकडे पैसे मागत नाही, तयार जेवणच देण्यास सांगतो. कुणाला जेवण देणे शक्य नसेल तर तेवढ्यापुरती आर्थिक मदत घेतो. तसेच, सॅनिटरी नॅपकीन कुणी कमी किमतीत बनवून देत असतील तर त्यांना ट्रस्टला जोडून देण्याचे आवाहन त्याने केले आहे.

संदेश शिंदे, ज्योत्स्ना लोखंडे, तुषार तल्लारी, सुधीर सोनावणे, किरण शिंदे, मनमोहन पोखरकर, पूजा आंब्रे आणि अनघा गोगटे ही टाटा अन्नदान ट्रस्टची सर्व टीम रुग्णसेवेचं हे आगळंवेगळं कार्य निर्धाराने पार पाडत आहेत. या सर्व टीमशिवाय हे कार्य अपूर्णच आहे असे जय म्हणतो. त्यांचे हे काम अविरत चालू राहावे व मदतीचा अधिकाधिक ओघ समाजातून त्यांच्याकडे यावा, यासाठी साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा!
 
जय होलमुखे - ७०३९२२१२९०
अनघा गोगटे- ९१३७७९५३५६ 

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.