संन्यस्त खड्ग!

विवेक मराठी    11-Mar-2022   
Total Views |
भारताची मुख्य सांस्कृतिक धारा, जी आजवर भारतीय राजकारणाच्या मुख्य परिघाच्या बाहेर होती, तीच आता भारतीय राजकारणाचा येत्या काळातील मुख्य प्रवाह असेल, हे या निवडणुकीने निश्चित केले. योगी आदित्यनाथ यांचे संन्यस्त खड्ग या लढाईत उतरले, एका हातात विकास व दुसर्‍या हातात प्रखर हिंदुत्व अशी दोन खड्ग घेऊन लढले. या निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी पत्रकारांनी मतदारांना प्रश्न विचारले की “तुमची जात काय, आप कौनसी बिरादरी से हो?” तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्तर मिळाले की “हम हिंदू है’.. आम्ही यादव, कुर्मी, ब्राह्मण, ठाकूर, बनिया, जाट वगैरे नाही, तर आम्ही हिंदू आहोत!” आम्ही हिंदू आहोत, हीच भावना मतपेटीतही उतरली आणि निकालांतून स्पष्टपणे दिसून आली.

bjp

हा विजय केवळ भाजपाचा नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ यांचा नाही. हा विजय भारतीय राष्ट्रवादाचा आहे. जी विचारधारा राममंदिराच्या उभारणीसह परमवैभवशाली राष्ट्रमंदिराच्या निर्मितीचे ध्येय उराशी बाळगते, त्या विचारधारेचा हा विजय आहे. येत्या काळात भारतीय राजकारणाची दशा आणि दिशा काय राहणार, हे या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. भारताची मुख्य सांस्कृतिक धारा, जी आजवर भारतीय राजकारणाच्या मुख्य परिघाच्या बाहेर होती, तीच आता भारतीय राजकारणाचा येत्या काळातील मुख्य प्रवाह असेल, हे या निवडणुकीने निश्चित केले. या प्रक्रियेचा मजबूत पाया 2014मध्ये घातला गेला आणि 2022च्या उत्तर प्रदेश निवडणुकीने या प्रक्रियेला एक निर्णायक गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे केवळ पक्ष वा संघटना म्हणून नाही, तर एक राष्ट्रनिष्ठ नागरिक, कार्यकर्ता म्हणून उत्तर प्रदेशच्या निकालांचे स्वागत करणे क्रमप्राप्त ठरते.
 
निकालांतून प्राप्त झालेली आकडेवारी, मतांची टक्केवारी इत्यादींची गणिते मांडत बसणे हा या लेखाचा मुख्य उद्देश नाही. ते सर्व एव्हाना सर्व माध्यमांतून चघळून झाले आहे. उत्तर प्रदेशच्या निकालांचा अन्वयार्थ समजून घेणे, हा लेखाचा मुख्य उद्देश आहे. साप्ताहिक विवेकने आपल्या नियमित अंकामधून, तसेच सोशल मीडियावरील इतर अनेक उपक्रमांतून गेले काही महिने सातत्याने ही मांडणी केली की उत्तर प्रदेशची या वेळची निवडणूक जातकेंद्री राजकारण विरुद्ध विकासकेंद्री राष्ट्रवाद अशी लढली जाईल. अमुक तमुक जातींची वा जातिसमूहांची समीकरणे, हा मुस्लीम चेहरा तो दलित चेहरा वगैरे नॅरेटिव्ह, लांगूलचालन, ध्रुवीकरण आदी मुद्दे एका बाजूला असतील, तर दुसरीकडे प्रत्येक भारतीयास एकत्वाच्या धाग्यात गुंफणारा विकासकेंद्री राष्ट्रवाद असेल आणि या दोन बाजूंपैकी कोणत्या बाजूला उभे राहायचे, याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या मतदारांना घ्यावा लागेल. 10 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालांतून उत्तर प्रदेशचे मतदार यातील कोणत्या बाजूला उभे राहिले, हे पुरते स्पष्ट झाले. कदाचित, ‘मेनस्ट्रीम’ वगैरे मानली जाणारी माध्यमे व त्यांचे धुरीण ही प्रक्रिया अखेरपर्यंत समजून घेऊ शकले नाहीत. त्यामुळेच निकालांनंतरही या मंडळींचे विश्लेषण ‘ही जात ती जात’, ध्रुवीकरण वगैरे मुद्द्यांभोवतीच फिरत राहिले. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार गेली पाच वर्षे कोणत्या स्तरावर काम करत आहेत, त्यास तळागाळापर्यंत कसा प्रतिसाद मिळत आहे, याचा थांगपत्ताच बहुधा या मंडळींना लागू शकला नाही.


bjp
 
2017मध्ये जेव्हा भाजपाने मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड केली, तेव्हा देशातील एका विशिष्ट वर्गातून लगेचच प्रश्नचिन्हांची मोठी मालिकाच उभी करण्यात आली होती. एक संन्यासी साधू राज्य कसे चालवणार, त्यांना अनुभवच काय आहे, राज्यात धार्मिक ध्रुवीकरण होणार, उन्माद वाढणार.. वगैरे वगैरे. भगवी वस्त्रे परिधान करणारा कुणी एक योगी राज्याचा प्रमुख होणार, ही कल्पनाच काहींना पचू शकली नाही (अजूनही पचू शकलेली नाही). त्यात पुन्हा उत्तर प्रदेश म्हणून स्वत:चे वेगळे प्रश्न होतेच. क्षेत्रफळ, लोकसंख्या अशा दोन्ही बाबतींत एक महाकाय असे राज्य, त्यात पुन्हा गुन्हेगारीचे, गरिबीचे, जातीयवादाचे, भ्रष्टाचाराचे ‘बिमारू’ राज्य ही प्रतिमा, अशा अनेक स्तरांवर ही लढाई होती. योगी आदित्यनाथ यांचे संन्यस्त खड्ग या लढाईत उतरले, एका हातात विकास व दुसर्‍या हातात प्रखर हिंदुत्व अशी दोन खड्ग घेऊन लढले. बजबजपुरी बनलेल्या राज्यात मुळापासून प्रशासकीय, धोरणात्मक सुधारणा करत दुसरीकडे विकासकामांचा अभूतपूर्व असा धडाका योगी सरकारने लावला. द्रुतगती महामार्गांचे भलेमोठे जाळे राज्यात विणले गेले, पन्नास-पन्नास वर्षे रखडवलेल्या योजना - प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित झाले, प्रमुख शहरांत मेट्रो सुरू झाल्या, उत्कृष्ट दर्जाचे विमानतळ उभे राहिले, आयआयटी-आयआयएमसारख्या राष्ट्रीय शिक्षणसंस्था आणि एम्ससारख्या आरोग्य संस्था उभ्या राहिल्या, जलवाहतुकीचे प्रकल्प सुरू झाले, सिंचन प्रकल्प सुरू झाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढू लागली, औद्योगिक प्रकल्प उभे राहू लागले.. या सगळ्याला स्थैर्य, सुरक्षा आणि शांतता प्रदान करण्यासाठी कायदा-सुव्यवस्था हा विषय प्राधान्याने हाताळला गेला. उत्तर प्रदेशची गुंडाराज प्रतिमा पुसून काढण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न झाले. त्यासाठी कोणताही कठोर निर्णय घेण्यास योगी सरकारने कसूर बाळगली नाही. राजकीय परिणामांची तमा बाळगली नाही.


bjp

पक्ष जागा
भाजपा+मित्रपक्ष 274

समाजवादी पक्ष + 124

काँग्रेस 2

बसप 1

इतर 2

 
या विकासाला योगींनी अधिष्ठान दिले ते हिंदुत्वाचे, राष्ट्रवादाचे. असंख्य गाव-शहरांची मूळ नावे बदलून परकीय आक्रमकांनी लादलेली नवी नावे हद्दपार करत पुन्हा जुने नाव देण्यात आले. यासाठी झालेली टीका, सोशल मीडियावरून उडवलेली खिल्ली इत्यादींना योगी आदित्यनाथ यांनी केराची टोपली दाखवली. त्यातूनच मग अलाहाबाद हे प्रयागराज बनले, फैजाबाद जिल्हा अयोध्या झाला. अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीस प्रारंभ झाला, अयोध्या नगरीचे रूप पालटले, काशीविश्वनाथ कॉरिडॉर झाला, प्रयागराजमध्ये जागातिक स्तरावर प्रशंसा मिळवणारा कुंभमेळा झाला. कित्येक कत्तलखाने बंद करण्यात आले. ‘लव्ह जिहाद’ला चाप बसवण्यासाठी प्रयत्न झाले. हे सर्व करत असताना प्रसारमाध्यमे, ल्युटेन्स दिल्लीतील ठराविक पत्रकार, स्वयंघोषित पुरोगामी वर्तुळ यांच्याकडून झालेली अवहेलना, टीका योगी आदित्यनाथ यांनी शांतपणे सहन केली. आपल्या मार्गापासून ते किंचितही ढळले नाहीत. या प्रयत्नांतून ‘गुजरात मॉडेल’प्रमाणेच विकासकेंद्री राष्ट्रवादाचे ‘यूपी मॉडेल’ उभे राहिले. उत्तर प्रदेशसारखे राज्य, जिथे राजकारणापासून प्रत्येक बाबतीत जात फॅक्टर व्यवस्थेच्या नसानसांत भिनला आहे, तिथे मतदाराला हिंदू म्हणून एका धाग्यात गुंफणे अशक्य मानले जात होते. परंतु हे शक्य आहे, असा आत्मविश्वास आज उत्तर प्रदेशात निर्माण होऊ लागलेला दिसतो. आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल की या निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी पत्रकारांनी मतदारांना प्रश्न विचारले की “तुमची जात काय, आप कौनसी बिरादरी से हो?” तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्तर मिळाले की “हम हिंदू है’.. आम्ही यादव, कुर्मी, ब्राह्मण, ठाकूर, बनिया, जाट वगैरे नाही, तर आम्ही हिंदू आहोत!” आम्ही हिंदू आहोत, हीच भावना मतपेटीतही उतरली आणि निकालांतून स्पष्टपणे दिसून आली.
 

bjp
 
अर्थात, याचा अर्थ उद्यापासून जात हद्दपार झाली असा निश्चितच होत नाही. आजही हिंदू समाजापुढील प्रश्न मोठे आहेत आणि उत्तर प्रदेशात या निकालांमुळे बिथरलेल्या हिंदूविरोधी शक्ती आता अधिक त्वेषाने कारवाया सुरू करण्याचीही शक्यता आहे. स्थानिक राजकारणात भाजपलाही क्वचित प्रसंगी जात या फॅक्टरचा आधार घ्यावा लागतो आहेच. परंतु, या पलीकडे जाऊन हिंदू समाजात शेकडो वर्षांत निर्माण झालेल्या जातींच्या भिंतींना विकासकेंद्री राष्ट्रवादाच्या माध्यमातून तडे दिले जाऊ शकतात, हा आत्मविश्वास उत्तर प्रदेशात आता निर्माण होताना दिसतो आहे. गेले अनेक दिवस सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा बघितली, तर हिंदुत्वविरोधी आणि हिंदुत्ववादी, दोन्हींमध्ये एकमत दिसून येते, ते म्हणजे हिंदुत्व विचारधारा भारतीय राजकारणाचा मुख्य प्रवाह बनत चालली आहे. गेली सत्तरेक वर्षे काँग्रेसप्रणीत सरकारे आणि डाव्या विचारांच्या प्रभावाखालील माध्यमे, शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थाने यांनी ‘सर्वसमावेशक राजकारण’ वा ‘सर्वसमावेशक चेहरा’ या गोंडस नावांच्या आडून भारतीयांच्या मनावर भलत्याच गोष्टी ‘हॅमर’ केल्या. भगवी वस्त्रे घातलेला आणि हिंदुहिताची गोष्ट करणारा माणूस जातीयवादी ठरतो आणि एरवी जातीचेच राजकारण करणारा, इफ्तार पार्टीत जाऊन टोप्या घालून फोटो काढणारा मात्र ‘सर्वसमावेशक’ ठरतो, अशी समजूत आपल्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. परंतु, सूर्य झाकता येत नाही. तसेच हिंदुत्वाचे तेज उफाळून आलेच आणि या देशाने, देशातील जनतेने ते आपलेसे केलेदेखील. असंख्य कार्यकर्ते यासाठी कित्येक दशके झटले, एकेकाळची तीव्र प्रतिकूलता सहन करत काम करत राहिले आणि या प्रयत्नांचा आविष्कार नरेंद्र मोदी यांच्या उदयातून समोर आला. भारतीय राजकारणात या राष्ट्रवादाचे वाहक, चेहरा नरेंद्र मोदी बनले व या वाटचालीत त्यांनी आपल्यासोबत नवे शिलेदारही उभे केले. योगी आदित्यनाथ हे त्या शिलेदारांपैकी एक प्रमुख नाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलांवर पाऊल टाकत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशसारख्या अत्यंत अवघड राज्यात विकासकेंद्री राष्ट्रवादाचा, हिंदुत्वाचा ध्वज पुढे नेला, तळागाळात पोहोचवला.
 
bjp

भारतीय जनता पक्ष हा त्या त्या निवडणुकीबरोबरच पुढच्या अनेक वर्षांची व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष आहे, हे या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माध्यमांतून मोदी-शाह या जोडीची काहीही प्रतिमा रंगवली जात असली, ते कसे सार्‍यांवर कंट्रोल ठेवू पाहतात याच्या सुरस कथा ऐकवल्या जात असल्या, तरी वास्तवात भाजपाने दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील नेतृत्वाला उभे राहण्यास, विकसित होण्यास पुरेपूर वाव दिला आहे. प्रादेशिक नेतृत्वाला भक्कम साथ, पाठिंबा दिला आहे. दुसर्‍या फळीत हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ ही नावे उदाहरणादाखल घेता येतील. याउलट काँग्रेसने आजवर आपले प्रादेशिक, दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील नेतृत्व खच्ची करण्याला प्राधान्य दिले. त्यातून अनेक राज्ये टप्प्याटप्प्याने काँग्रेसच्या हातून निसटत गेली, या वेळी पंजाब हे ताजे उदाहरण. आज काँग्रेसकडे ना प्रादेशिक स्तरावर नेतृत्व आहे, ना राष्ट्रीय स्तरावर कुणी प्रभावी चेहरा आहे. खुद्द नेहरू-गांधी घराण्याच्या मर्यादाही आता स्पष्ट झाल्या आहेत. याउलट भाजपामध्ये एका फळीतून दुसर्‍या फळीकडे नेतृत्वबदलाची प्रक्रिया सहजपणे घडत आली आहे आणि भविष्यात पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सक्षम चेहरे विकसितदेखील होताना दिसत आहेत. या निवडणुकीतून पुन्हा एकदा ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

 
देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या, सर्वाधिक मतदारसंघांच्या राज्याने आपली दिशा स्पष्ट केली आहे. येत्या काळात भारतीय राजकारणावर ही निवडणूक निर्णायक असा परिणाम करणार आहे. आता प्रश्न उर्वरित राज्यांचा आहे - उदाहरणार्थ महाराष्ट्र! उत्तर प्रदेशने ठाम आणि सुस्पष्ट धोरण, स्थिर आणि गतिमान शासन, कठोर आणि खमके नेतृत्व, विकास आणि हिंदुत्व यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रालाही लवकरच असा निर्णय घ्यावा लागणार आहे. अराजकाच्या गर्तेत नेणार्‍या बाजूला उभे राहायचे की कुशल, खंबीर, स्थिर नेतृत्वाच्या बाजूने उभे राहायचे, या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला उत्तर प्रदेशने दिले आहे. त्यामुळेही या निकालांचे आपण स्वागत करायला हवे.

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.