ध्वज विजयाचा..

विवेक मराठी    11-Mar-2022
Total Views |
उत्तर प्रदेशाबरोबरच अन्य तीन राज्यांत उल्लेखनीय यश मिळवत भाजपाने विजयाचा खणखणीत चौकार लगावला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक राज्यातील परिस्थितीचे वेगळेपण लक्षात घेऊन त्यानुसार आखलेले डावपेच, बदललेली व्यूहरचना हे या राष्ट्रीय पक्षाचे वैशिष्ट्य आहे.

bjp
 
पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना, “2022चे उत्तर प्रदेशचे निवडणूक निकाल 2024चे भविष्य ठरवतील”असे पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी उद्गार काढले. उत्तर प्रदेश हे देशातले सर्वात मोठे राज्य असल्याने त्यांनी हे विधान केलेले नाही, तर गेल्या 5 वर्षांत योगी सरकारने विविध कामांच्या माध्यमातून तिथे रुजवलेला विकासकेंद्री राष्ट्रवाद आणि त्याचा उत्तर प्रदेशच्या जनतेवर पडलेला प्रभाव याचा संदर्भ त्याला आहे.
 
 
हिंदुत्वाची पार्श्वभूमी असलेले, विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरलेले समाजाच्या समग्र विकासाचे राजकारण करता येते, याचा वस्तुपाठ योगी सरकारने आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळातून देशासमोर ठेवला. म्हणूनच प्रचंड बहुमताने मिळवलेला विजय म्हणजे केलेल्या कामाला दिलेले प्रशस्तिपत्र आहे. या नियोजनबद्ध कामातूनच या सरकारबद्दल, त्यामागच्या राजकीय पक्षाबद्दल जनमानसात विश्वास निर्माण झाला. हा विश्वास इतका दृढ होता की कोणत्याही फुकट गोष्टींची दाखवली गेलेली लालूचही जनमतावर प्रभाव टाकू शकली नाही.
  
राममंदिर उभारणीच्या कामाला झालेली सुरुवात, काशी-विश्वनाथ कॉरिडॉरची झालेली निर्मिती या घटना तर देशातील सर्व हिंदुजनांसाठी आनंददायक, अभिमानास्पद आहेत. तेव्हा केवळ या दोन घटनांच्या आधारे जर उत्तर प्रदेश निकालाचे मूल्यमापन केले, तर ती आत्मवंचना ठरेल आणि येथील जनतेने दिलेल्या समंजस कौलाचा अपमानही. या विकासकामांबरोबरच राज्यातील पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रासाठी केलेले कामही योगींच्या मतांचे पारडे जड करून गेले.
 
 
उत्तर प्रदेशाबरोबरच अन्य तीन राज्यांत उल्लेखनीय यश मिळवत भाजपाने विजयाचा खणखणीत चौकार लगावला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक राज्यातील परिस्थितीचे वेगळेपण लक्षात घेऊन त्यानुसार आखलेले डावपेच, बदललेली व्यूहरचना हे या राष्ट्रीय पक्षाचे वैशिष्ट्य आहे. सत्तेच्या राजकारणात यशाचा एकच एक फॉर्म्युला असत नाही, याचे उदाहरणच या चार राज्यांमधील यशाने समोर ठेवले आहे. प्रस्थापित विरोधी मानसिकतेचा (अँटीइन्कम्बन्सीचा) फटका सत्ताधार्‍यांना बसतो हे आपल्याकडील एक सर्वमान्य गृहीतक. या गृहीतकाला चारही राज्यातील निकालांनी छेद दिला आहे. आधीच्या कार्यकाळातील प्रगतिपुस्तक समाधानकारक असेल, तर प्रस्थापितांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असा संदेश देणारे हे निकाल आहेत.
 
 
प्रभावी पक्ष संघटन, अविश्रांत अन नियोजनबद्ध मेहनत घेणारे कार्यकर्ते आणि प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला प्रभावी वापर हेदेखील या यशाचे महत्त्वाचे घटक आहेत. यामुळेही भाजपा अन्य राजकीय पक्षांपेक्षा वरचढ आणि वेगळा ठरतोे, हे लक्षात घेऊन त्याच्या विरोधकांनी केवळ मोदींवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवण्यापेक्षा आपापल्या पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी काम करायला हवे.
 
 
उत्तर प्रदेशातला विजय हा विकासकेंद्री राष्ट्रवाद रुजत असल्याची खूण, तर उत्तराखंडमधला विजय हाही (मुख्यमंत्री पराजित झाले तरी) तेथील विकासकामांना दिलेला प्रतिसाद आहे असे म्हणता येईल. मणिपूरचे यश म्हणजे ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना रुजत असल्याचे द्योतक आहे, तर गोव्यामध्ये मिळवलेला विजय हा अतिशय चतुराईने आखलेल्या राजकीय डावपेचांना मिळालेल्या यशाचा उत्तम नमुना आहे. थोडक्यात, 2024 डोळ्यासमोर ठेवूनच भाजपा या विधानसभांच्या निवडणुका गांभीर्याने घेतो आहे, तशा तयारीने सामोरा जातो आहे याची जाणीव करून देणारे आणि आणखी काही महिन्यांनी होत असलेल्या काही राज्यांच्या निवडणुकांसाठी उत्साह, स्फूर्ती देणारे असे हे निकाल आहेत.
 
 
त्याच वेळी पंजाबमध्ये आपला मिळालेल्या यशाकडे सावधतेने पाहायला हवे. खलिस्तानी चळवळीला उघड पाठिंबा देणार्‍या आपने बहुमताच्या बळावर सत्ता प्राप्त करणे हे देश म्हणून चिंता वाढवणारे आहे. तसेच येथील मतदार आपच्या दिल्ली फॉर्म्युल्याने - म्हणजेच काही फुकट तर काही स्वस्त सेवा, सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण यानेही प्रभावित झाले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर, ‘मदतीच्या कुबड्यांपेक्षा स्वावलंबी बनवणारा विकास महत्त्वाचा’ हे पंजाबी जनमानसात रुजवण्यासाठी भाजपाला विशेष मेहनत घ्यावी लागेल. आता अकाली दलापासून दूर गेल्याने भाजपा हा राज्यातल्या केवळ शिखेतरांसाठीचा पक्ष नसून तो सर्वांसाठीच आहे, हा संदेशही कामामधून पोहोचायला हवा.
 
 
आपने अकाली दल, काँग्रेस या पारंपरिक पक्षांची मुळे उखडून टाकून तेथील जमीन सपाट करण्याचे काम केले आहे. अशा या सपाट जमिनीत भाजपा विकासकेंद्री राष्ट्रवाद रुजवायची संधी घेईल, अशी आशा आहे.


शून्यातून विश्व उभे करायची भाजपाची आजवरची परंपरा आहे, त्याला पंजाबही अपवाद नसावा.