सुळक्यांवर चढून डोंबाऱ्याचा खेळ करणारा अवलिया

climbing and highline - rohit vartak

विवेक मराठी    17-Mar-2022   
Total Views |
रस्त्यांवर दोन काठ्यांना दोरी बांधून त्यावरून चालणारे डोंबारी आपण पाहिलेले असतात. कोणत्याही आधाराविना लटपटत्या पावलांनी दोरावरून ते चालतात. त्याचंच किती अप्रूप वाटतं आपल्याला! रोहित तर दोन डोंगरांच्या दोन सुळक्यांवर दोरी टांगून त्यावरून चालतो!

ro1

मूळचा अलिबागचा असलेला रोहित वर्तक लहानपणापासून लोणावळ्यात आपल्या कुटुंबासोबत वाढला. लोणावळा हा दऱ्याखोऱ्यांचा भाग. जंगली श्वापदे, जनावरे फार. वरचेवर घरात साप यायचे. रोहित फार भ्यायचा. त्या भीतीतूनच त्याला साप पकडावेसे वाटू लागले. साधारण १४-१५ व्या वर्षापासून त्याने एका संस्थेसोबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली साप पकडायला सुरुवात केली. त्याबरोबरच इतर साहसी खेळ तो पाहू लागला. तिथून प्रस्तरारोहणाचे धडे घ्यायला त्याने सुरुवात केली. ते न जमल्याने रोहित निराश झाला. मात्र या निराशेवर मात करत त्यानंतर त्याने आपले लक्ष प्रस्तरारोहणावरच केंद्रित केले. सह्याद्रीतील अनेक सुळक्यांवर त्याने लीलया चढाई केली. यामुळे प्रस्तरारोहक (rock climber ) म्हणून त्याला प्रसिद्धी मिळू लागली.
लोणावळ्यात काम करणाऱ्या 'शिवदुर्ग' टीमसोबत जोडून घेतल्यानंतर त्याने अनेक यशस्वी चढाया केल्या. हरिश्चंद्र गडाला असणारा उभा कातळ कडा, ज्याला 'कोकणकडा' म्हणतात, हा १८०० फुटांचा कोकणकडा ४ जणांच्या टीमसोबत तो चढून गेला. हा कडा फारच मोजक्या गिर्यारोहकांनी यशस्वीपणे चढला आहे. त्याचवेळी त्याने स्वप्न पाहिले होते शोशालाचे. शोशाला हा हिमाचल प्रदेशमधील असा पर्वत आहे ज्यावर चढाई करायचा प्रयत्न आजवर बऱ्याच जणांनी केला परंतु स्वित्झर्लंडमधील एका ग्रुपशिवाय कुणीही यावर यशस्वी चढाई करू शकलेले नाही.

ro1 
अशातच त्याने स्लॅकलाईन हा दोरीवरून चालण्याचा प्रकार एका व्हिडीओमध्ये पाहिला आणि याच खेळाने रोहितला पछाडले. दोन पर्वतांवरून हायलाईन लावून त्यावरून चालावे असे त्याला वाटू लागले. परंतु भारतात हे कुणीही करत नव्हते. लोणावळ्यातच तो स्लॅकलाईन लावायला शिकला आणि सरावही केला. त्याने पहिल्यांदा हायलाईन लावली सांधण दरीत. सांधण दरी ही एकाच डोंगराला पडलेली भेग. फारच चिंचोळा भाग, पण उंच. त्यावर दोन्ही बाजूंनी दोरी टांगून चालायचा त्याचा पहिलाच प्रयत्न असफल झाला. त्याला दोरीवर उभेसुद्धा राहता आले नाही. जमिनीलगत असलेल्या दोरीवर चढणे सोपे परंतु डोंगरावरच्या दोरीवर सुरुवातीपासून चालता येत नाही. चुकून पाय घसरला तर दगडावर आपटून कपाळमोक्ष होण्याचीच शक्यता जास्त. अथक सराव करून त्याने दोरीवर चढण्याचा सराव केला. यात कितीतरीवेळा तो पडलादेखील. पहिल्यांदा आपण पडतो ते महत्वाचं असतं. पहिल्यावेळीच भीती वाटते. पहिल्याच वेळी निर्णय होतो. पहिल्या वेळेवरच सगळं आधारलेलं असतं.. रोहित म्हणतो, “भीती वाटत असेल तर एक 'फॉल' घ्यावा. जोपर्यंत भीती वाटते तेवढे फॉल्स घ्यावे म्हणजे भीती जाते आणि आपण लाईनवर लक्ष केंद्रित करू शकतो.” पुन्हा त्याने संधान दरीत लाईन बांधली, यावेळी हसं होऊ नये म्हणून रोहित फक्त एका मित्राला सोबत घेऊन गेला. याचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर टाकले असता त्याला भारतभरातून अनेकांचे फोन येऊ लागले. अनेकांना हा साहस प्रकार करण्याची उत्सुकता होती. त्यातून जगभरातील अनेक माणसे रोहितशी जोडली गेली.

ro1
 
लोणावळ्यात एक किलोमीटर लांबीची लाईन लावायचा रोहितचा प्रयत्न होता. ज्याने जुने सर्व रेकोर्ड मोडले गेले असते, परंतु त्यासाठी लागणारी साधने भारतात उपलब्ध नसल्याने भारतातील सर्वात लांब ७५० मीटर लांबीची लाईन त्याने पार केली. लाईन वरून चालताना त्याने आपला प्रस्तरारोहणाचा छंद सोडला नाही. २०२१ मध्ये शिवदुर्गच्या टीमने शोशालाची मोहीम आखली. सोबत तीन प्रस्तरारोहाकांना घेऊन रोहितने ही मोहीम पहिल्याच प्रयत्नांत यशस्वी केली. त्याच्या सोबतीला होते योगेश उंबरे, सचिन गायकवाड, समीर जोशी, भूपेश पाटील, ओमकार पडवळ व शिवम आहेर. सह्याद्रीत चढाई करताना टांगता तंबू लावून अर्ध्या कड्यावर झोपण्याची सोय करता येते. हिमालयात मात्र असे करता येत नाही. थंडीने माणूस गारठून जातो. त्यामुळे दर दिवशी फ़क़्त बोल्टमध्ये दोर बांधून पुन्हा रॅपलिंग करत पायथ्याशी यावे लागे. संपूर्ण कडा चढून जायला १२ दिवस लागले. १२ दिवस पुन्हा पुन्हा तोच कडा चढत नवीन दोर बांधत तेवढेच रॅपलिंग करत संपूर्ण टीमला पायथ्याशी यावे लागे. असे करताना संपूर्ण टीमने जवळपास १०,००० फुट रॅपलिंग आणि तेवढेच जुमारिंग केले आहे. यात अनेक अडचणी आल्या, परवानग्या घ्याव्या लागल्या, स्थानिकांचा सण होता त्यामुळे रस्ताही बंद होता, त्यानंतर रस्ता माहितीच नव्हता तो शोधावा लागला. वर पाऊस होता. वातावरण खराब झाले तर हिमालयात ट्रेक चालू ठेवणे अतिशय धोक्याचे असते. वातावरण चांगले असेल तरच चढाई करता येते. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी चढाई करणारा महाराष्ट्रातील हा गट आशियातील पहिलाच तर जगातील दुसरा गट ठरला.
रोहित वर्तक उत्तुंग शिखरं चढत राहीलच, तसेच भविष्यात अनेक यशस्वी चढाया करेल, त्याच्या या मेहनतीसाठी व उज्वल भविष्यासाठी साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.