कातळशिल्पांपासून फुलपाखरांपर्यंत निसर्गाचा वेध घेणारे 'सुधीर रिसबूड

विवेक मराठी    19-Mar-2022   
Total Views |
तळकोकणाला सौंदर्याचा वारसा निसर्गदत्तच लाभला आहे. सुंदर समुद्रकिनारे, लागूनच नारळी-पोफळीच्या हिरव्या बागा.. या भूमीतील लोकही हुशार, चौकस, जिज्ञासू. सुधीर रिसबूड यांचा जन्मही याच भूमीतील रत्नागिरी येथे झाला. बालवयातच त्यांना इतिहास, पुरातन मंदिरे, गड-किल्ले, पक्षी निरीक्षण याविषयी आवड निर्माण झाली. सुधीर यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला, व्यवसायाने ते शासनमान्य ठेकेदार म्हणनू २२ वर्ष कार्य करत आहेत. परंतु इतिहासाची तसेच पुरातन वास्तूंची ओढ त्यांना कातळशिल्पांकडे घेऊन गेली. 
1 
कोकणात तशा पुरातन वास्तू भरपूर. जुनी मंदिरे, पुरातन स्थापत्य असलेल्या विहिरी, किल्ले अशा असंख्य वास्तू. काही काळाने त्यांना शोध लागला कातळ शिल्पांचा. कोकणात लाल दगड अर्थात जांभा आढळतो. जांभा तसा काम करण्यासाठी सोपा. आदिम कोकणी माणसाने आपली कला त्यावर मुक्तहस्ताने उधळली. म्हणूनच कोकणात कातळ खोद चित्र मोठ्या प्रमाणावर सापडतात. भाईंनी त्यानंतर शाळेतील मुलांना घेऊन अभ्यास सफरींचे आयोजन करायला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ या उपक्रमात त्यांनी विशेष सहभाग नोंदवला. अनेक शाळांत, महाविद्यालयांत त्यांनी व्याख्याने सुरु केली. अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी सुरक्षा विषयक लेख लिहून जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्मिती व जुन्या वास्तूंचे संवर्धन परंपरागत व अपरंपरागत बांधकाम आधारित कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सहभागी व्हायला सुरुवात केली.
 
मुळातच चिकित्सक स्वभाव, शोध घेण्याची वृत्ती जिज्ञासा जागृत करते. त्यातून माणूस संशोधन करतो. संशोधनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि माणूस समृद्ध होत जातो. आपण केलेला अभ्यास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. हळूहळू जनसामान्यांना त्याच महत्व पटतं आणि गोडी लागते. असे करत सुधीर रिसबूड यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७२ गावांतून १६०० पेक्षा जास्त अश्मयुगीन कातळ खोद चित्रांचा शोध घेतला. त्यांच्यासोबत धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई हेही यासाठी सक्रिय होते. तसेच त्यानंतर त्यांनी ‘आडवळणाचे कोकण’ या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत त्यांच्या अभ्यास मोहिमा सतत चालू असतात. यासोबतच त्यांचे पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीही नियमित सुरु असते. आजपर्यंत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातून विविध जाती व वेगवेगळ्या प्रजातींच्या ३६० पेक्षा अधिक पक्ष्यांचा वेध घेतला आहे. त्यात केवळ रत्नागिरीतूनच जवळपास ४२० पक्षी शोधले आहेत. रत्नागिरीतूनच नवीन १३० फुलपाखरांच्या प्रजातीही त्यांनी नोंदवल्या आहेत तसेच १०० पेक्षा अधिक प्रकारची कातळ फुले शोधली आहेत. आणि त्यांचा हाच प्रवास आज १७ वर्षे अविरत चालू आहे. त्यांची ‘कोकणातील पक्षी’ ही २ भागांतील पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
 

1 
कातळ खोद शिल्प या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. अंदाजे ३५ हजार वर्षे जुनी कातळ शिल्प त्यांनी शोधून काढली आहेत. भारतात इतर ठिकाणी आढळणाऱ्या रचनांपेक्षा कोकणातली चित्रे वेगळी आहेत. इतर ठिकाणी पेट्रोग्लीप्स दगडांवर, गुहेत, डोंगरावर खोदलेले आहेत तर कोकणात सपाट भूभागावर कोरले आहेत. त्यांच्या या अभ्यासातून मानवी उत्क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्याची माहिती समोर आली आहे. ज्यातून तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ लावणे शक्य होणार आहे. तसेच द्वितीयक जांभा दगडात मोठ्या प्रमाणावर चुंबकीय विस्थापनाचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे.
 
सुधीर रिसबूड यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पक्षी जीवनावरील कार्याबद्दल आरोही संस्था, चिपळूण, नेचर वॉक संस्था, पुणे, तसेच महाराष्ट्र वन विभागाकडूनही त्यांचा गौरव झाला आहे. तरुण भरतचा सन्मान पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. विद्युत सुरक्षा सप्ताह या उपक्रमात केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा गौरव झाला आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंटकडून पर्यटन मित्र म्हणूनही त्यांचा सन्मान झाला आहे त्याचबरोबर मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुधीर रिसबूड उर्फ भाई यांचे हे महत्वपूर्ण काम असेच पुढे होत राहो, या साप्ताहिक विवेककडून शुभेच्छा.
 
 
 
 

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.