वर्क फ्रॉम होमचे नवे पर्याय

विवेक मराठी    23-Mar-2022   
Total Views |
छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडलाय की ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेद्वारे बरेचसे काम सुरळीतपणे पार पडू शकते. त्यासाठी कर्मचार्‍यांना रोज रोज ऑफिसमध्ये बोलावण्याची काहीएक गरज नाही. काही अत्यावश्यक कामे वगळता बरेचसे कर्मचारी अर्ध्या पगारात घरात बसून कामे करू शकतात, हा धडा आपल्याला लॉकडाउनने दिलेला आहे. आता घरी बसून - म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येण्यासारखे पर्याय कोणते ते पाहू.

work
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले होते, ते अजूनही सुरळीत झाले नाहीत. ज्या नोकरीच्या, व्यवसायाच्या बळावर लोकांनी पुढील आयुष्याच्या योजना आखल्या, ईएमआयवर फ्लॅट, गाडी वगैरे खरेदी केले, तो कमाईचा मार्ग बंद झाल्याने पुढील हप्ते कसे भरायचे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुसरीकडे नोकरी मिळण्याची शक्यता कमी असताना किंवा नव्या व्यवसायात भांडवल गुंतवण्याची जोखीम पत्करणे कठीण असताना जगायचे कसे, हा प्रश्न अनेकांसमोर आ वासून उभा आहे.

यावर विचार करताना एक नक्की समजले की लॉकडाउनचा परिणाम इंडस्ट्रीच्या प्रकारानुसार कमी-अधिक झाला आहे. उदाहरणार्थ, एअरलाइन्स आणि हॉटेल इंडस्ट्रीवर सर्वात जास्त परिणाम झालेला दिसून येतो. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सध्या अनेक जण जीवतोड मेहनत घेत आहेत. पण त्याच वेळी, ज्या कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करतात, त्यांच्यावर मात्र लॉकडाउनचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. टेलिकॉम कंपन्या, ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स यांच्यावर लॉकडाउनचे सावट पडले नाही. बाकी ऑटोमोबाइल्स, रिअल इस्टेट, टेक्स्टाइल्स, लॉजिस्टिक्स, केमिकल्स इत्यादींवर कमी-अधिक प्रमाणात का होईना, पण परिणाम नक्कीच झाला आहे. शेतकरीसुद्धा यातून सुटले नाहीत.

आता येऊ या मूळ मुद्द्याकडे. काही दिवसांनी हळूहळू जीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल. परंतु या लॉकडाउनमुळे बेरोजगारीसारखे जे प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले आहेत, ते कसे सोडवणार? ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या न्यायाने काही जण तग धरतील, पण बाकीच्यांचे काय? आहे त्या अवस्थेत दिवस काढणे किंवा अर्थार्जनासाठी साधने बदलून पाहणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतील. मग पैसे कुठून आणि कसे कमावणार? त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता काही पर्याय दिसले, तेच इथे मांडतोय.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या - छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडलाय की ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेद्वारे बरेचसे काम सुरळीतपणे पार पडू शकते. त्यासाठी कर्मचार्‍यांना रोज रोज ऑफिसमध्ये बोलावण्याची काहीएक गरज नाही. काही अत्यावश्यक कामे वगळता बरेचसे कर्मचारी अर्ध्या पगारात घरात बसून कामे करू शकतात, हा धडा आपल्याला लॉकडाउनने दिलेला आहे. आता घरी बसून - म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येण्यासारखी कामे कोणती, ते पाहू या -
इंटरनेट सिक्युरिटी स्पेशालिस्ट - हॅकिंगचा प्रकार प्रचंड वाढलाय. याला आळा घालण्यासाठी इंटरनेट सिक्युरिटी स्पेशालिस्ट लोकांची कमतरता आहे. नवीन कौशल्ये शिकून घ्या, अर्थार्जनाचा नवीन मार्ग खुला होईल.


work
कंटेंट रायटर - चांगल्या कंटेंट रायटर्सची आज मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मनोरंजनाची साधने वाढत जात आहेत. मालिका, चित्रपट, वेबमालिका यांना सुगीचे दिवस येत आहेत. अशा वेळी कंटेंट रायटर्सच्या हातांना भरपूर काम मिळणार आहे.

कॉपी रायटर - हा कंटेंट रायटिंगसारखाच प्रकार असतो, यात वेब पेजेससाठी लिखाण करावे लागते. संकेतस्थळावरच्या अनेक उत्पादनांबाबत आणि सेवांबाबत माहिती आकर्षक शब्दात लिहिणे म्हणजे कॉपी रायटिंग. लोक जास्तीत जास्त ऑनलाइन सर्व्हिसेसचा वापर करणार आहेत आणि अर्थातच कॉपी रायटर्सना मागणी येणार आहे.
 
प्रायव्हेट ट्यूटर - प्रचंड मागणी असणारे हे क्षेत्र आहे. तुमच्याकडे स्वत:ची काही विशेष कौशल्ये आहेत? मग ऑनलाइन क्लास घ्या! रेसिपीपासून ओरिगामीपर्यंत, भाषा विषयापासून तंत्रज्ञानापर्यंत काहीही शिकवू शकता आणि त्यासाठी विद्यार्थीसुद्धा तयार आहेतच.

भाषांतरकार (ट्रान्स्लेटर) - तुमच्याकडे एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान आहे? मग भाषांतरकार व्हा. जवळपास सर्व कंपन्या ऑनलाइन सेवा देताना आता संपूर्ण जगाला लक्ष्य करणार आहेत. जगाच्या विविध भागांत राहणार्‍या लोकांना त्यांच्या भाषेत कंटेंट द्यावा लागतो. भाषांतरकारांना हे काम मिळेल.

सोशल मीडिया मॅनेजमेंट/डिजिटल मार्केटिंग - जुन्या पारंपरिक जाहिरातींच्या आयडिया आता डस्टबिनमध्ये टाकून देण्याची वेळ आली आहे. आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग हाच परवलीचा शब्द आहे. यात आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत अल्प खर्चात पोहोचणे सहज शक्य असते. अर्थार्जनासाठी हा एक अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

ग्राफिक डिझायनर/व्हिडिओ एडिटर - येणारा काळ ऑडिओ-व्हिज्युअल्सचा आहे. जेवढे जास्त लोक ऑनलाइन असणार, तेवढे जास्त ग्राफिक कंटेंट त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार. प्रत्येक क्षेत्रात ग्राफिक्सची आवश्यकता आहे. काही स्किल्स शिकून तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकता.
 
वेबसाइट डेव्हलपर/अ‍ॅप डेव्हलपर - आता अगदी छोट्यातल्या छोट्या कंपनीला/दुकानाला स्वत:ची वेबसाइट/अ‍ॅप तयार करणे गरजेचे बनले आहे. अगदी कोपर्‍यावरचा किराणा दुकानदारदेखील आपली वेबसाइट बनवून त्यावर ऑर्डर घेऊन होम डिलिव्हरी देण्याचा विचार करतोय. येत्या काळात डेव्हलपर लोकांना बरीच मागणी असणार आहे.

ब्लॉगर - स्वत:चा ब्लॉग असणे कुणाला आवडणार नाही? ब्लॉग तयार करून त्या माध्यमातून पैसे मिळवू शकता.

फ्रीलान्स असिस्टंट/कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह - पूर्वी हेच काम ऑफिसमध्ये जाऊन केले जात असे. आता घरीच आपला सेटअप बनवून घ्या. एकाच वेळी अनेक कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन घरबसल्या त्यांचे कॉल/इन्क्वायरी हँडल करू शकता आणि घसघशीत इनकम मिळवू शकता.

हे पर्याय तर आहेतच, शिवाय घरात काही स्किल्स वापरून विविध वस्तू तयार करून त्या वस्तूसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून विकू शकता. यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अशा विविध सोशल मीडिया माध्यमांचा वापर करूनही पैसे कमवू शकता.

काही गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा. आपल्यामध्ये काय कौशल्ये आहेत ते शांतपणे विचार करून ठरवा. एखाद्या क्षेत्रात ग्लॅमर वाटते म्हणून तिकडे जाण्यापेक्षा आपल्याला जे चांगले जमते तिकडेच गेलेले उत्तम! तसेच वर्क फ्रॉम होम करतोय याचा अर्थ कमी दर्जाचे काम करतोय असे अजिबात नसते. उलट यात वेळेचे बंधन नसल्याने जास्त कमाई करता येते.

अनुप कुलकर्णी

काही काळ बँकेत नोकरी केल्यानंतर राजीनामा देऊन स्वतःचा 'स्मार्ट मीडिया सोल्युशन्स' हा व्यवसाय सुरुवात केला. गेल्या आठ वर्षांपासून पूर्णवेळ सोशल मीडिया मॅनेजर आणि कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सोशल मीडियाचा सर्वांगीण अभ्यास व त्याचा उपयोग व्यावसायिकांना व्हावा याची अखंड धडपड. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिके, मासिके आणि पोर्टल्सवर विविध विषयांवर लेख प्रकाशित.