धर्मांधांचा हैदोस, तरी चोरांच्या उलट्या बोंबा

विवेक मराठी    25-Mar-2022   
Total Views |
 होळीच्या दरम्यान बांगला देशात इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर झालेला हल्ला हे मुस्लीमबहुल देशांतील धर्मांधांच्या हैदोसाचे ताजे उदाहरण आहे. अशा अनेक घटना अनेक वर्षांपासून घडत आहेत, तरीही पाकिस्तानसारख्या दहशतवाद पसरविणार्‍या देशाच्या प्रस्तावावरून व त्याला अन्य इस्लामी देशांनी दिलेल्या पाठिंब्यावरून 15 मार्च हा ‘इस्लामद्वेष विरोधी दिवस’ साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र सभेने घेतला, याला चोरांच्या उलट्या बोंबाच म्हणावे लागेल.
 
bangladesh
 
नुकत्याच झालेल्या 17 मार्चच्या होळी-धूलिवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान बांगला देशात ढाक्यातील इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर स्थानिक मुस्लीम धर्मांधांनी हल्ला करून तोडफोड, लूटमार केली. काही हिंदूंना जखमी केले. हल्ला करणारा हाजी सैफुल्ला सुमारे 200 लोकांना घेऊन आला होता. त्या हल्ल्याचा प्रतिकार करताना काही हिंदू जखमी झाले. स्थानिक हिंदूंबरोबरच भारतातही कोलकाताच्या इस्कॉन संघटनेचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. इस्कॉन ही हिंदू धार्मिक संघटना भारतात तसेच भारताबाहेर सक्रिय आहे. अनेक देशांमधून इस्कॉनची मंदिरे आहेत. त्यात पाश्चिमात्य भक्त फार मोठ्या प्रमाणात असले, तरी त्या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर होणे तर सोडाच, पण काही हिंदू संघटना आणि वृत्तपत्रे यांच्याव्यतिरिक्त भारतातील प्रतिष्ठित आणि व्यापक खप असलेल्या वृत्तपत्रांनीही त्याची नोंद घेतली नाही. इतर वेळी मुस्लीम समुदायासंदर्भात गळे काढून आकाशपाताळ एक करणार्‍या लेखांचे रतीब ज्या वृत्तपत्रांतून पाडले जातात, त्यातील एकातही या घटनेची नोंद घेणारा लेख आला नाही. कारण नेहमीचे आणि स्पष्ट आहे - इस्लाम आणि मुस्लीम यांच्या संदर्भात काही विरोधी बोलायचे अथवा लिहायचे झाल्यास या बोरुबहाद्दरांच्या बुद्धीला लकवा मारतो आणि जीभ आणि हात लुळे पडतात.
 
 
भयभीत अल्पसंख्याक
 
बांगला देशाच्या बाबतीत बोलायचे, तर तेथे अशा घटना वारंवार घडत आल्या आहेत. सात-आठ वर्षांपासून आढावा घेण्याचे कारण तेथे शेख हसीना यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार आहे. तरीही अल्पसंख्याकांवर हल्ले करण्याचे, त्यांना हाकलून लावण्याचे सत्र सुरूच आहे. दि. 1 मे 2016च्या बातमीप्रमाणे निखिल चंद्र, 50 वर्षे, या शिंप्याचा व्यवसाय करणार्‍या हिंदूची त्याच्या दुकानात हत्या करण्यात आली. दि. 8 जून 2016च्या बातमीप्रमाणे आनंद गोपाळ गांगुली, 70 वर्षे यांची धारधार शस्त्रांनी हत्या करून त्यांचे शव धानाच्या शेतात फेकून देण्यात आले होते. बांगला देशातील अनेक ब्लॉगर्सनी हल्ले होण्याच्या भीतीने युरोपातील देशात आसरा घेतल्याची बातमी होती (द हिंदू, 17 मे 2016). या हल्ल्यातून ख्रिश्चनसुद्धा सुटले नाहीत. स्वत: स्वातंत्र्यसेनानी असलेल्या, पण 15 वर्षांपूर्वी ख्रिश्चन झालेल्या समीर अलीला धारधार शस्त्राने हल्ला करून मारण्यात आले. इतकेच नव्हे, तर सप्टेंबर 15मध्ये इटलीवरून मदतकार्यासाठी आलेल्या इटलीतील एका नागरिकाची आणि लगेच पाच दिवसांत जपानी नागरिक कुनिओ होशी यांची हत्या करण्यात आली. दि. 2 जुलै 2016ला एका कॅफेवर झालेल्या हल्ल्यात ज्यांना कुणाला कुराणातील काही आयता म्हणून दाखविता आल्या नाहीत त्यांना वेगळे काढून त्यांची हत्या करण्यात आली. त्या हत्यांना धरून शेख हसीना यांनी कोणाही गुन्हगाराला मोकळे सोडण्यात येणार नाही अशी घोषणा तर केली, पण ती वार्‍यावर विरली. त्याचदरम्यान भारत आणि बांगला देश या दोघांनी मिळून अतिरेक्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली (13 मे 2016). या संदर्भातसुद्धा प्रगती झाली नाही. त्या घोषणा हवेत विरल्या. हिंदूंना लक्ष्य करण्याचे बांगला देशातील सत्र अजूनही थांबले नाही. याचे कारण दोन्ही देशांतील स्थानिक नेत्यांमधे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. बांगला देश सरकारने अशी कृत्ये करणार्‍या नराधमांना पकडण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्यावर कारवाई केल्याचे वृत्त आले नाही. भारतीय दूतवासाने तो प्रश्न धसास लावून धरल्याचे वृत्त आहे.
 
 
इथे भारताने सुधारित नागरिकत्व कायदा (CAA 2019)संमत केला, त्याचे महत्त्व अधोरेखित होते. पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंकेतील पीडित हिंदू, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ख्रिश्चन शरणार्थींना भारतीय नागरिकत्व प्राधान्याने देण्याचा कायदा करण्याचे कारण या शेजारी देशांतील हिंदूंना वेळोवेळी स्थानिक अतिरेकी मुस्लिमांच्या कारवायांना सामोरे जावे लागते, हे ढळढळीतपणे दिसते आहे. गैर-मुस्लीम शरणार्थींना नागरिकत्व देऊन भारतात सामावून घेणार्‍या कायद्याचे महत्त्व अशा घटनांमधून अधोरेखित होते.
 
 
bangladesh
 
इस्लाममधील परधर्म-परपंथ द्वेष
 
इस्लाममध्ये ‘काफिरांना मुस्लीम करा, देशांतर करण्यास भाग पाडा अथवा त्यांच्या कत्तली करा’ असे आदेश कुराणात आहेत. काफिर कोण हे ठरविण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे ठरते. मुस्लीम देशांमधून ते ठरविण्याची मक्तेदारी कोणीही मुस्लीम व्यक्ती घेऊ शकतो. त्यासाठी न्यायालयात जाण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही. शेख हसीना सत्तेत आल्यावर, आता मोकळेपणाने आपले विचार मांडता येथील असा विचार करून काही हिंदू आणि मुस्लीम ब्लॉगर्सनी आपले आधुनिक विचार माध्यमांमधून मांडायला सुरुवात केली होती. ते धर्मांधांना आवडले नाही. बांगला देशातच काही मुस्लीम ब्लॉगर्सना ठार करण्यात आले. गैर-सुन्नी, सूफी आणि शिया पंथांच्या मुस्लिमांना ठार करण्यात आले. शिया पंथाच्या मशिदींवर आणि मुहर्रमच्या मिरवणुकींवर हल्ले होत असतात. इतकेच काय, प्रागतिक विचार मांडणारी पुस्तके छापणारा प्रकाशक फैजल आरेफिन याची हत्या करण्यात आली.
 
 
हे हत्यांचे सत्र केवळ बांगला देशापुरते मर्यादित नाही. पाकिस्तानपासून ते आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील मोरोक्कोपर्यंत हे मारकाटीचे सत्र चालू आहे. या महिन्यातील पहिल्या शुक्रवारी 4 मार्चला एका आत्मघातकी हल्लेखोराने पेशावर शहरातील शिया मशिदीत आत्मघातकी बाँब हल्ला करून 56 लोक मारले. त्याच स्फोटात सुमारे 200 लोक जखमी झाले. एका धडाक्यात इतक्या लोकांना मारणारा आणि जखमी करणारा तो बाँब किती शक्तिशाली असावा, याची कल्पना येते. या आत्मघातकी हल्ल्यापूर्वी मशिदीच्या परिसरात तेथे पहारा देणारे पोलीस दल आणि अतिरेकी यांच्यात गोळीबार झाला. त्यातील एका पोलिसाला गोळी घालून तो हल्लेखोर मशिदीपर्यंत पोहोचला (इंडि. एक्स्प्रेस, 5 मार्च 2022). शुक्रवारी जो जुम्म्याचा नमाज असतो, त्या वेळी सर्व पंथांचे मुस्लीम मोठ्या प्रमाणावर आपापल्या पंथांच्या मशिदींमध्ये एकत्र जमतात. त्याच वेळी असे मोठ्या प्रमाणावर बळी घेणारे हल्ले प्रामुख्याने सुन्नी अतिरेकी वारंवार करतात. कारण त्यांच्या लेखी सुन्नी सोडून इतर सर्व पंथांचे मुसलमान काफिर असतात. एक वेळ खरा मुस्लीम कोण याची ओळख पटविता येणार नाही, पण काफिर कोण हे मात्र प्रत्येक मुस्लीम बरोबर ओळखून असतो. इस्लामअंतर्गत पांथिक सुंदोपसुंदीला त्या त्या पंथांचे मुल्लामौलवी नेहमी खतपाणी घालून वाढवत ठेवतात. पाकिस्तानी मुळाची अमेरिकेतील लेखिका नवीदा खानने Muslim Becoming : Aspiration and Skepticism in Pakistan (2012) या पुस्तकात याचे सखोल विवेचन केले आहे. दर शुक्रवारच्या नमाजांच्या वेळी काफिरांविरोधात विद्वेष पसरविणार्‍या मुल्लांना साधारण पाकिस्तानी नागरिक ‘बद मिजाजी दीनी बंदे’ असे म्हणून त्यांची हेटाळणी करत असला, तरी त्या धर्मांधतेविरोधात उभे राहण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. हे पळपुटेपण अनेक मुस्लीम देशांचे, तसेच गैर-मुस्लीम देशांमधून मोठ्या संख्येने नागरिक असलेल्या एकूणच मुस्लीम समाजाचे सामाजिक दुर्दैव आहे. आपण ते भारतातही अनुभवतो.
 
 
चोरांच्या उलट्या बोंबा

याच दरम्यान, अचंब्यात टाकणारी एक घटना जागतिक स्तरावर घडली. दि. 16 मार्चला संयुक्त राष्ट्र सभेत जागतिक स्तरावर इस्लामद्वेष विरोधी दिवस पाळण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावाचा मसुदा कोणी प्रस्तुत करावा? सर्व जगात अतिरेकी कारवायांचा स्रोत म्हणून शिक्का बसलेल्या पाकिस्तानने हा ठराव प्रस्तुत केला. ही आश्चर्य करण्याची पहिली गोष्ट. त्याला कमी नव्हे, तर 56 मुस्लीम देशांनी अनुमोदन दिले. त्यात खनिज तेलाचे उत्पादन करणार्‍या देशांच्या संघटनेचे अनेक मुस्लीम सदस्य देश सहभागी झाले होते. त्यातील अनेक देशांना पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवाया करणार्‍या संघटनांची झळ पोहोचली आहे. तरीही या देशांनी वरील प्रस्तावाला पाठिंबा दिला. हे दुसरे आश्चर्य. तसेच चीनने त्या ठरावाला पाठिंबा दिला, हे तिसरे आश्चर्य. चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विरोधाला झुगारून आणि इस्लामी देशांची पर्वा न करता गेली काही वर्षे उघ्युर मुसलमानांचा वंशच्छेद करण्याचे आणि त्यांच्या हजारो धार्मिक स्थळांवर मुतार्‍या आणि शौचालये बांधण्याचे धोरण सुरू ठेवले आहे. त्या चीनने या ठरावाला पाठिंबा द्यावा, यासारखा विरोधाभास कोणता असेल? असा एकांगी आणि इतर अनेक धार्मिक समुदायांना वगळणारा ठराव संयुक्त राष्ट्र सभेने एकतर्फी चर्चेसाठी स्वीकारावा, हे चौथे आश्चर्य. संयुक्त राष्ट्र सभेने यापूर्वी कधी एकेश्वरी अब्राह्मिक धर्म सोडले, तर इतर धर्मांच्या लोकांच्या दुर्दैवाच्या संदर्भात या प्रकारची जाणीव दाखविलेली नाही. या ठरावाला विरोध करणार्‍या देशांत प्रामुख्याने भारत होता. त्याला फ्रान्सने साथ दिली. संयुक्त राष्ट्र सभेने असा केवळ एकाच धर्माला धरून एखादा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करावा याला विरोध दर्शविला. पाचवे आश्चर्य असे की भारताबरोबर फ्रान्ससारखा एखाददुसरा गैर-इस्लामी देश सोडला, तर एकाही गैर-इस्लामी देशाने या ठरावाच्या विरोधात ठामपणे मतप्रदर्शन केल्याचे वृत्त नाही. एक वेळेस जपानचे समजू शकते. जपानने मुस्लीम धर्मीयांना खड्यासारखे वगळले आहे. जपानला इस्लामी अतिरेकाचा सामना करावा लागलेला नाही. पण आग्नेय आशियातील देशांनी - ज्यात ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम, फिलिपीन्स इ. देश येतात, त्यांना कमी-अधिक प्रमाणात इस्लामी अतिरेकाची झळ पोहोचली आहे. त्यांनी, तसेच इस्लामी अतिरेकाने पोळलेल्या युरोपातील देशांनी त्या प्रस्तावाला कडकडून विरोध दर्शविणे अपेक्षित होते. त्यांनीसुद्धा विरोध दर्शविला नाही. हेही जागतिक स्तरावर घडलेले सहावे आश्चर्य आहे.
 
‘केवळ एका धर्माला उद्देशून असा ठराव स्वीकारण्याऐवजी सर्वच धर्मांचा द्वेष न करण्याचा विरोधी दिवस (Anti-Religiophobia) जागतिक स्तरावर पाळला जावा’ - टी.एस. तिरुमूर्ती, - संयुक्त राष्ट्रसभेतील भारताचे राजदूत

bangladesh
 
या सभेत भारताने केवळ विरोधासाठी विरोध न दर्शविता सकारात्मक मुद्दे मांडले. भारताचे संयुक्त राष्ट्रसभेतील राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी भारताची बाजू मांडताना ‘केवळ एका धर्माला उद्देशून असा ठराव स्वीकारण्याऐवजी सर्वच धर्मांचा द्वेष न करण्याचा विरोधी दिवस (Anti-Religiophobia) जागतिक स्तरावर पाळला जावा’ असे प्रतिपादन केले. भारतात अनेक धर्मांचे नागरिक असून धार्मिक विविधता नांदते आहे, याकडे तिरुमूर्तींनी लक्ष वेधले. जगात अनेक देशांमधून हिंदूंविरोधातच नव्हे, तर शिख, बौद्ध, जैन तसेच स्थानिक भिन्न धर्मीयांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे, त्या धर्मांच्या अनुयायांची हत्या करण्याचे प्रकार अनेक मुस्लीम देशांत घडले आहेत, याकडे लक्ष वेधले (टाइम्स ऑफ इंडिया, दि. 18 मार्च). सुन्नी इस्लामी अतिरेक्यांनी इस्लामअंतर्गत इतरही छोट्या-मोठ्या संप्रदायांच्या अनुयायांचे शिरकाण केले. आयसिसने यझिदी लोकांचा जवळपास वंशच्छेद केला, कुर्द समाजाची ससेहोलपट केली. त्या सर्व अतिरेकी कारवाया जगातील देश विसरले की काय, अशी परिस्थिती आहे. संयुक्त राष्ट्र सभेतर्फे सामूहिक सौहार्द दिन इ. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळले जात असताना केवळ इस्लामला वेगळे काढून असा दिवस साजरा करण्याचे काय औचित्य आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. संयुक्त राष्ट्र संघटना चीन आणि खनिज तेल उत्पादक देशांच्या ताटाखालील मांजर झाल्याचे प्रत्यंतर या बैठकीदरम्यान दिसून आले. तसेच या ठरावाला कडाडून विरोध करून भारताने सुचविल्याप्रमाणे सर्व प्रकारचा धार्मिक द्वेष विरोध दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला भरघोस पाठिंबा देण्यात गैर-इस्लामी देश फार कमी पडले, असे खेदाने म्हणावे वाटते. 15 मार्च हा दिवस यापुढे दर वर्षी ‘इस्लामद्वेष विरोधी दिवस’ म्हणून, केवळ पाकिस्तानसारख्या दहशतवाद पसरविणार्‍या देशाने प्रस्तुत केलेला आणि इस्लामी देशांनी पाठिंबा दिल्यामुळे साजरा होईल. याला चोराच्या नव्हे, अनेक चोरांच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल.

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.